अध्याय ६८ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥
अजय जय वीरश्रीवल्लभा । जय जगज्जनका पंकजनाभा । नमनें नाशक भवभ्रमकोंभा । वैराग्यलाभा लाभवुनी ॥१॥
तव पदपंकजप्रणतिमात्रें । प्रज्ञाप्रकाश लाहूनि वक्त्रें । निमंत्रिलीं सद्गुणपात्रें । भगवच्चरित्रें परिसावया ॥२॥
सप्तषष्टीपर्यंत कथा । शुकें कथिली कौरवनाथा । अष्टषष्टीमाजी आतां । वर्णीं तत्त्वता बळविजय ॥३॥
कैसा विजय केला कोठें । ऐसा प्रश्न करणें घटे । तरी संक्षेपें श्रवणपुटें । सप्रेमनिष्ठें परिसावें ॥४॥
सांबें दुर्योधनाची तनया । स्वयंवरीं हरिली पाहतां राया । कौरवीं जिंकूनि रोधिलें तया । हें यदुवर्या श्रुत झालें ॥५॥
ऐकूनि यादव चढले क्षोभा । म्हणती कौरवगर्वकोंभा । खंडूनि समरीं काढूं शोभा । प्रकटूं प्रभा शौर्याची ॥६॥
तयां वारूनि रेवतीरमण । करूं गेला स्नेहरक्षण । म्हणूनि नांगरें भेदिले वप्र । मग संपूर्ण क्षोभला ॥७॥
पालथें घालीन हस्तिनापुर । म्हणूनि नांगरें भेदिले वप्र । चडळ उचटितां हाहाकार । झाला अपार पुरगर्भीं ॥८॥
भीष्मप्रमुख कौरव सकळ । शरण होवूनि नमिती बळ । नेईं म्हणती स्नुषा बाळ । रक्षीं कुरुकुळ कृपाळुवा ॥९॥
इतुकी कथा ये अध्यायीं । परीक्षितीच्या श्रवणालयीं । शुकें कथिली ते समयीं । आनंददायी सेवावी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP