अध्याय ६८ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


चामरव्यजने शंखमातपत्रं च पांडुरम् । किरीटमासनं शय्यां भुंजत्यस्मदुपेक्षया ॥२६॥

शरीरसंबंध सामान्यासी । उमजावया या न्यूनत्वासी । आपणांसमान यां नृपसभेसी । सम्मानेंसी मिरविलें ॥९७॥
नृपसिंहासन तुंगातपत्रें । किरीटकुण्डलें युग्मचामरें । कंबुघोषें पांडुरच्छत्रें । दुंदुभिगजरें नृप झाले ॥९८॥
राजयानें राजशयनें । राजपानें राजसम्मानें । धनें गोधनें भूभुजचिह्नें । ऐश्वर्यभूषणें मिरविती हे ॥९९॥
आम्हांपुढें अपरच्छत्र । उभवी कोण मायेचा पुत्र । यादव सोयरे अस्वतंत्र । जाणूनि अन्यत्र न गणूं यां ॥२००॥
राजचिह्नाचा आग्रह । आम्हीं न केला धरूनि स्नेह । तेणें मदगर्वाचा रोह । झाला पहा हो यां आंगीं ॥१॥
आम्ही उपेक्षा करितां पाहीं । राजपदवी भोगिली इहीं । उपकार विसरूनियां सर्वही । धरिलें देहीं आढ्यत्व ॥२॥

अलं यदूनां नरदेवलांछनैर्दातुः प्रतीपैः फणिनामिवामृतम् |
येऽस्मत्प्रसादोपचिता हि यादवा आज्ञापयंत्यद्य गतत्रपा बत ॥२७॥

येथूनि याचा स्नेह पुरे । कायसे आमुचे हे सोयरे । वाढले नृपचिह्नांच्या भरें । तें यां न स्मरे कृतघ्नां ॥३॥
नरदेव जे चक्रवर्ती । त्यांचीं चिह्नें नृपसंपत्ति । पुरे येथूनि यादवांप्रति । केंवि मिरविती आम्हांपुढें ॥४॥
जेहीं यां दिधलीं साम्राज्यचिह्नें । प्रतीप झाले त्यांकारणें । सर्प पोसिला अमृतपानें । गरळदानें जेंवि फळें ॥२०५॥
आमुच्या प्रसादेंचि उपचय । पावला यादवांचा निचय । तो विसरूनि पूर्वन्वय । निर्लज्ज काय वदती हे ॥६॥
बत हा खेद वाटे मोठा । यादवीं धरिला केवढा ताठा । जे न लाहती पादपीठा । ते आजि मुकुटा चढूं आले ॥७॥
करुनृपाची आज्ञा कानीं । ऐकतां येती जे धांवूनी । तिहीं आजी निर्लज्जपणीं । आज्ञा सांगोनि पाठविली ॥८॥
ऐसे कृतघ्न हे यादव । पुरे यांचें नृपवैभव । आतां हिरोनि घेऊं सर्व । देऊं लाघव यां योग्य ॥९॥

कथमिंद्रोऽपि कुरुभिर्भीष्मद्रोणार्जुनादिभिः । अदत्तमवरुंधीत सिंहग्रस्तमिवोरणः ॥२८॥

इन्द्रही हो कां अमरनायक । न देतां भीष्मार्जुनादिक । वाहों न शके भूभुजाङ्क । जेंवि अविक सिंहग्रासा ॥२१०॥
बस्त मातलाही सबळ । घेऊं न शके सिंहकवळ । तैसे यादव झाले प्रबळ । अनर्ह केवळ नृपचिह्नां ॥११॥
कौरवांपुढें राजचिह्नां । इन्द्रही मिरवूं न शके जाणा । तेणें यदुवृष्णींची गणना । असो सामान्यांमाजिवडी ॥१२॥
शुक म्हणे कौरवपाळा । इत्यादि हेलनोक्तीच्या माळा । परस्परें बोलतां खळां । रोहिणीबाळा ऐकविलें ॥१३॥

श्रीशुक उवाच । जन्मबंधुश्रियोन्नद्धमदास्ते भरतर्षभ । आश्राव्य रामं दुर्वाच्यमसभ्या पुरमाविशन् ॥२९॥

कौरव अष्टमदें उन्मत्त । जन्म म्हणीजे मद आभिजात्य । बन्धुवर्गाचा सन्निपात । बळें औद्धत्य मिरविती ॥१४॥
विशेष राज्यश्रियेचा मद । वीरश्री आंगीं वाहती विशद । शीळदुर्विनीतता प्रसिद्ध । श्रियोन्नद्ध असभ्य जे ॥२१५॥
यदुनिंदेचीं परुष वाक्यें । रामा परिसवोनियां स्वमुखें । असभ्य म्हणिजे दुर्जन असिके । उठिले तवकें तेथूनी ॥१६॥
न पाहोनि रामाकडे । हेलनोक्ति वदती तोंडें । स्वपुरीं प्रवेशले रोकडे । आले निवाडे स्वस्थाना ॥१७॥
आधीं देऊनियां सम्मान । अर्घ्यपाद्यादि समर्पून । शेखीं गेले उपेक्षून । परुष वचनें बोलोनियां ॥१८॥
कौरवांचें देखोनि शीळ । कार्य करिता झाला बळ । तें तूं कुरुवर्या प्राञ्जळ । ऐकें समूळ निरूपितों ॥१९॥

दृष्ट्वा कुरूणां दौःशील्यं  श्रुत्वाऽवाज्यानि चाच्युतः । अवोचत्कोपसंरब्धो दुष्प्रेक्ष्यः प्रहसन्मुहः ॥३०॥

दुष्ट शीळ हें कौरवांचें । रामें सविस्तर देखूनि साचें । बोलिले वचनें जें दुर्वाचे । करी तयांचें अनुस्मरण ॥२२०॥
क्रोधें उचंबळला फार । दुःखें न पाहवें ज्या समोर । प्रस्तावला वारंवार । विस्मयपर हास्य करी ॥२१॥
उद्धव आणि श्रेष्ठ ब्राह्मण । तयांसी बोले प्रस्तावून । राया होऊनि सावधान । तें तूं श्रवण करीं आतां ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP