अध्याय ६८ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


लांगलाग्रेण नारमुद्विदार्य गजव्हयम् । विचकर्ष स गंआयां पहरिष्यन्नमर्षितः ॥४१॥

दक्षिणभगींचे प्रचंड वप्र । भेदिले करूनि हळप्रहार । तेणें उचलिलें हस्तिनापुर । द्रोणगिरिवर कपि जैसा ॥८२॥
पयोधिमथनीं मंदराचळ । तैसें हस्तिनापुरीचें चडळ । हलें उचलिता झाला बळ । न्युब्ज केवळ करावया ॥८३॥
पालथें घाला हस्तिनापुर । ऐसें बोलिला यादवेश्वर । मी नृपाचा आज्ञाधर । करीन साचार नृपाज्ञा ॥८४॥
उलथून पालथें गंगेमाजी । हस्तिनापूर घालीन आजी । नांगरें उत्पतितां सहजीं । पुर गजबजी हाहाकारें ॥२८५॥
माड्या गोपुरें लक्षकोडी । पडलीं भू होतां कानवडी । सदनीं गडबडिल्या उतरडी । पुरी हडबडी एकसरें ॥८६॥
बोंबा मारिती नारीनर । म्हणती मातले कौरव फार । त्यांचा करावया संहार । आज हलधर क्षोभला ॥८७॥
नगरीं झाला हाहाकार । शंख करिती लहान थोर । कौरवसंगें जन समग्र । आजि संहार पावेल ॥८८॥
बळें उचलितां हस्तिनापुर । कोण्या प्रकारें झालें वक्र । कौरवांचा कोण प्रकार । तो साचार अवधारा ॥८९॥

जलयानमिवाघूर्णं गंगायां नगरं पतत् । आकृष्यमाणमालोक्य कौरवा जातसंभ्रमाः ॥४२॥

जैसी नौका पालथी होये । गंगेमाजी तेणें न्यायें । हस्तिनापुर कलथों पाहे । म्हणती प्रळय वोढवला ॥२९०॥
गंगेमाजी अकस्मात । न्युब्ज होतां नगरपात । कौरव घाबरले समस्त । करिती आकांत प्राणभयें ॥९१॥
सर्वही करिती हाहाकार । एक सवेग वेंधले वप्र । एक पळाले सांडूनि पुर । कुटुंबें समग्र घेऊनी ॥९२॥
एकीं आणिला समाचार । कौरवीं अपमानिला बळभद्र । क्षोभला जैसा प्रळयरुद्र । नांगरें नगर उचटीतसे ॥९३॥
ऐकूनि भीष्मद्रोणादि म्हणती । कौरव मातले हे दुर्मति । कां क्षोभविला रेवतीपति । कोण आकान्तीं रक्षील या ॥९४॥
पालथी घालूं शके धरा । तया क्षोभविलें हलधरा । आतां रडती रांडा पोरा । मृत्यु अवसरा वरपडती ॥२९५॥

तमेव शरणं जग्मुः सकुटुम्बा जिजीषिवः । सलक्ष्मणं पुरस्कृत्य साम्बं प्राञ्जलयः प्रभुम् ॥४३॥

जीव वांचवावयाची आशा । घेऊनि कुटुंबा अशेषा । कींव भाकिती द्वारकाधीशा । म्हणती दासां रक्षावें ॥९६॥
त्या रामातें जाऊनि शरण । कुटुंबेंसहित वंदिती चरण । म्हणती आमुचे रक्षीं प्राण । होईं सघृण दयाळुवा ॥९७॥
कुटुंबेंसहित कौरवीं सकळीं । राम वंदूनि बद्धाञ्जळी । स्तविते झाले मुसळी हली । चंद्रमौळी जेंवि सुरीं ॥९८॥
आदिकरूनि भीष्मद्रोण । सहित अंबिकानंदन । कृपाचार्य विदुर कर्ण । दुर्योधन सह बंधु ॥९९॥
शकुनि भूरिश्रवा बाल्हिक । प्रजा प्रधान मुख्य मुख्य । वंदूनि रामाचे पदाङ्क । म्हणती सेवक संरक्षीं ॥३००॥
केविलवाणीं करूनि तोंडें । एक रडती रामापुढें । एक दाविती मोडलीं हाडें । वरी भिंताडें पडोनियां ॥१॥
एक म्हणती संपदा सकळी । क्षणामाजी मिळाल्या धुळी । कौरवीं दुष्टीं हेळिला हली । आम्ही वेगळीं निरागसें ॥२॥
वणव्यामाजी जंतु जळती । तैसी आम्हां झाली गति । चरणाङ्गुष्ठ दांतीं धरिती । रक्षीं यदुपति निजशरणां ॥३॥
भीष्मदिक करिती स्तवन । वंदूनि बळरामाचे चरण । करविती अपराधक्षमापन । तें आख्यान अवधारा ॥४॥

राम रामाखिलाधार प्रभावं न विदाम ते । मूढानां नः कुबुद्धीनां क्षंतुमर्हस्यतिक्रमम् ॥४४॥

जय जय रामा कल्याणधामा । लोकत्रयाच्या विश्रामा । अखिलाधारा पुरुषोत्तमा । रक्षीं आम्हां कृतागसां ॥३०५॥
तुझा प्रभाव आम्हां न कळे । मूर्ख नृपमदें आंधळे । विषयभ्रमें घूर्णित डोळे । शरीरबळें उन्मत्त ॥६॥
आम्ही कुबुद्धि कुटिल खळ । तूं परमात्मा त्रैलोक्यपाळ । अपराध क्षमा करूनि सकळ । होईं कृपाळ बळरामा ॥७॥
धरणीधर तूं संकर्षण । धरणीआंगीं सोढव्य पूर्ण । तुझिये सतेचा तो गुण । क्षमस्वी पूर्ण तूं रामा ॥८॥
शरणागता वज्रपंजर । हा तव बिरुदाचा बडिवार । कौरव कृतागस पामर । रक्षूनि साचार बिरुद करीं ॥९॥
जिहीं निन्दा केली तोडें । ते हे खालती करिती मुण्डें । कींव भाकिती प्राणचाडे । काय हें थोडें यश लोकीं ॥३१०॥
कुटुंबेंसहित लोटाङ्गणीं । कौरव निन्दक लागले चरणीं । हें यश मिरवीं हिमकर तरणि । जंववर गगनीं भ्रमती तों ॥११॥
ऐसा हलधर भीष्मप्रमुखीं । स्तवितां सस्मित बोले मुखीं । पादत्राण कुरुमस्तकीं । केंवि भूलोकीं मिरवेल ॥१२॥
कौरवदत्तभूखंडभाजी । वृष्णि वरिष्ठ झाले आजी । नृपचिह्नेंसी राजसमाजीं । भूभुजपुंजीं विराजले ॥१३॥
ऐसें बोलतां संकर्षण । भीष्मप्रमुखीं धरिले चरण । म्हणती दुष्टांचें भाषण । न करीं स्मरण याउपरी ॥१४॥
गंगेमाजी पडती समळ । गंगा त्यांतें करूनि अमळ । निर्मळ आहे सर्वकाळ । तेंवि हें कुटिळ विसरावें ॥३१५॥
साम्बनिग्रहण ऐकोन । क्षोभला राजा उग्रसेन । आमुचें इच्छूनि क्षेमकल्याण । त्वां त्यालागून शान्तविलें ॥१६॥
तूं आलासी स्नेहकामा । परि तें न कळे कौरवाधमां । कृतापराध करूनि क्षमा । रक्षीं आम्हां निजशरणां ॥१७॥
ऐसें स्तविती नाना परी । ससाम्ब लक्ष्मणा नोवरी । पुरस्करूनि ते अवसरीं । प्रलंबारी प्रार्थिंती ते ॥१८॥

स्थित्युत्पत्त्यप्ययानां त्वमेको हेतुर्निराश्रयः । लोकान्क्रीडनकानीश क्रीडतस्ते वदंति हि ॥४५॥

सर्वीं जोडूनि अंजलिपुट । घडघडां करिती स्तोत्रपाठ । केवळ संकर्षणाचे भाट । करिती बोभाट बिरुदांचा ॥१९॥
म्हणती उत्पत्ति स्थिति प्रळय । देवत्रयाचें कर्म त्रितय । तयां त्रिगुणां तूं आश्रय । निर्गुण निराश्रय केवळ तूं ॥३२०॥
पूवचैतन्य तूं ईश्वर । अखिल ब्रह्माण्ड चराचर । तुझी क्रीडा हे अजस्र । विविधाकार क्रीडनकें ॥२१॥
तुझिये क्रीडेचीं बाहुलीं । विविध लोकें प्रतिष्ठिलीं । शक्रादि अभिमानें ठेविलीं । विविधा चाली चालवूनि ॥२२॥
तुझा महिमा हा अव्यय । सर्वत्र प्रकटती अम्नाय । वाखाणिती मुनिसमुदाय । प्राकृता सोय तद्योगें ॥२३॥
आम्ही पामरें प्राकृतें हीन । तूं परमात्मा संकर्षण । मुनिश्वर करिती श्रुतिव्याख्यान । भाग्यें श्रवण तैं होय ॥२४॥
कैसें व्याख्यान मुनि करिती । जितुकें विदित आमुचे मति । तितुकें ऐकें अनंतमूर्ति । ऐसें प्रार्थिती कुरुवृद्ध ॥३२५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP