अध्याय ६८ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


दृष्ट्वानुधावतः सांबो धार्तराष्ट्रान्महारथः । प्रगृह्य रुचिरं चापं तस्थौ सिंह इवैकलः ॥६॥

आले देखोनि धार्तराष्ट्र । साम्बें फिरविला रहंवर । चुम्बूनि धार्तराष्ट्रीचे अधर । म्हणे भीरु भय न धरीं ॥५५॥
तुझिये सोडवणे कौरव । धनुर्विद्येचा करूनि गर्व । धांविले परंतु मी हे सर्व । करीन अगर्व समरंगीं ॥५६॥
साम्बें ऐसी दौर्याधनी । आश्वासूनि वीरश्रीवचनीं । श्मश्रु स्पर्शोनि दक्षिणपाणी । ठाकला रणीं महारथी ॥५७॥
जैसें अमरेन्द्रकोदंड । प्रावृटीं भासे सुरंगाढ्य । तैसें रुचिर कार्मुक दृढ । साम्बें झडकरी चढविलें ॥५८॥
रुचिर चाप घेऊनि मुष्टीं । कौरव लक्षिले दूरदृष्टी । सिंह जैसा देखे करटी । तैसा पोटीं सावेश ॥५९॥
समरीं ठाकला जैसा मेरु । अढळ अभंग महावीरु । एकला एकाकी रहंवरु । जेंवि भास्कर तमोहंता ॥६०॥
तयाप्रति धार्तराष्ट्र । देखोनि लोटले अनावर । म्हणती धरा बांधा चोर । कन्या सुन्दर नेतो हा ॥६१॥
आधींच कर्म केले खोटें । आतां पळसील कोणे वाटे । मरण ओढवलें ओखटें । दावीं मुखवटें परतोनी ॥६२॥
ऐसे सक्रोध कौरव । भोगिती शब्दाचें गौरव । साम्ब धरूं इच्छिती सर्व । समर अपूर्व तो ऐका ॥६३॥

तं ते जिघृक्षवः क्रुद्धास्तिष्ठ स्तिष्ठेति भाषिणः । आसाद्य धन्विनो बाणैः कर्णाग्रण्यः समाकिरन् ॥७॥

कोठें पळसी उभारे उभा । बोलती लंबा करूनि जिभा । महारथी चढले क्षोभा । वीरश्रीशोभा प्रकाशिती ॥६४॥
कर्ण कौरवां अग्रणी । धनुष्यें वाहिलीं समराङ्गणीं । साम्ब सभवंता परिवेष्टूनी । वर्षती बाणीं धनुर्धर ॥६५॥
वीर धनुवाडे झुंजार । मुख्य करूनि कर्णादि प्रवर । साम्बावरी वर्षती शर । प्रळयजलधरपडिपाडें ॥६६॥
सिंहनादें आरोळिया । मत्तगजांच्या किङ्काळिया । शस्त्रश्रेणी मोकळिया । भेदिती बळिया साम्बातें ॥६७॥
तडक फुटती अकस्मात । जैसे मेघीं विद्युत्पात । वीर वर्षती शरजीमूत । साम्ब निवान्त ते ठायीं ॥६८॥
नवल केलें परीक्षिती । अचिन्त्यैश्वर्य जो श्रीपति । साम्ब तयाची संतति । समरक्षिती न डंडळी ॥६९॥

सोऽपविद्धः कुरुश्रेष्ठ कुरुभिर्यदुनंदनः । नामृष्यत्तदचिंत्यार्भः सिंहः क्षुद्रमृगैरिव ॥८॥

शशक जंबुक शाखामृग । ऋक्ष सूकर लांडगे वाघ । गोगज गवयसहकुरंग । क्षुद्र अनेग मृगनिचय ॥७०॥
ऐसा क्षुद्र मृगांचा भार । सिंह न गणी एकाङ्गवीर । तैसाचि साम्ब महाशूर । समरीं सधीर दृढत्वें ॥७१॥
अचिन्त्य जो कां जनार्दन । तत्सुत साम्ब यदुनंदन । कौरववीरांतें न गणून । करी संधान तें ऐका ॥७२॥

विस्फूर्ज्य रुचिरं चापं सर्वान्विव्याध सायकैः । कर्णादीन्षड्रथान्वीरस्तावद्भिर्युगपत्पृथक् ॥९॥

रुचिरचापाची शिञ्जिनी । सांबें कौतुकें आस्फाळूनी । काढूनि निषंगाची गवसणी । सज्जिला गुणीं दिव्यशर ॥७३॥
कौरवांच्या शस्त्रश्रेणी । छेदूनि धुरोळा उडविला गगनीं । सर्व महारथे मार्गणीं । कर्णाग्रणीं भेदियले ॥७४॥
सामान्य सैन्य मारिलें किती । शुकाचार्य तें न वदे ग्रथीं । ग्रंथभूयस्त्वाची खंती । म्हणोनि व्युत्पत्ति न वाढवी ॥७५॥
एर्‍हवीं प्रभु सामान्य कोणी । विचरे वेष्टित परिवारगणीं । मा हे तो भीष्मादि कौरवाग्रणी । सेनेवांचूनि कैं जाती ॥७६॥
असो साम्बें मारिली सेना । पुढें कौरवां साही जणां । महारथियां भीष्मा कर्णा । दुर्योधना शलप्रमुखां ॥७७॥
एकेचि समयीं साही वीर । भेदिले विंधूनि तीक्ष्ण शर । व्याख्यान करितां लागे उशीर । परी केला पार चमत्कारें ॥७८॥
दिशाविभागीं साही जणीं । समब भेदिला असतां बाणीं । परन्तु तेणें अलौकिक करणी । दाविली रणीं कुरुवृद्धा ॥७९॥
साही जणांचे छेदूनि बाण । अपार मारिलें कौरवसैन्य । एकेचि समयीं साही जण । भेदूनि आंगवण दाखविली ॥८०॥
रणप्रवीण महारथी । भीष्मकर्णादि यूथपति । साम्बें भेदिले कोणे रीती । तें परीक्षिति अवधारीं ॥८१॥

चौर्भिश्चतुरो वाहानेकैकेन च सारथीन् । रथिनश्च महेश्वासांस्तस्य तत्तेऽभ्यपूजयन् ॥१०॥

चारी चारी चौं चौं बाणीं । यन्ते एकैकें भेदूनी । साही जणां साही बाणीं । एकेचि क्षणीं भेदियलें ॥८२॥
भीष्मादि योद्धे रणप्रवीण । धनुर्विद्यापरायण । तथापि साम्बाचें संधान । तयां लागून न लक्षे ॥८३॥
साम्बें भेदिले वारू सारथि । भीष्मकर्णादि महारथी । भला रे भला साम्बा म्हणती । शब्दें पूजिती अवघेची ॥८४॥
धन्य ते जाम्बवती माय । धन्य श्रीकृष्णाचें वीर्य । धन्य साम्बाचें वीरश्रीधैर्य । देखूनि कुरुवर्य मानवला ॥८५॥
म्हणती वीर हा प्रतापजेठी । आंगा स्पर्शों नेदी काठी । दिसे विजयाची विफळ गोठी । केंवि गोरटी सोडविजे ॥८६॥
विचार करूनि साही जणीं । विभागें साम्ब भेदिला बाणीं । तें तूं ऐकें कोदंडपाणि । कुरुकुळतर्णि परीक्षिति ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP