अध्याय ६८ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यस्य पादयुगं साक्षाच्छ्रीरुपास्तेऽखिलेश्वरी । स नार्हति किल श्रीशो नरदेवपरिच्छदान् ॥३६॥

विश्वश्री जे अखिलेश्वरी । जियेच्या सुरस्त्रिया किङ्करी । ते जे साक्षात् परमेश्वरी । पदयुग स्वकरीं मर्दितसे ॥५३॥
तो श्रीनायक निश्चयेसीं । योग्य नव्हे नृपचिह्नांसी । ऐसें बोलतां कौरवांसी । लज्जा मानसीं कां न वटे ॥५४॥
खद्योत नोकिती दिनेशा । वायस न मानिती राजहंसा । तेंवि कौरव परमपुरुषा । गणिती मानुषांमाजिवडे ॥२५५॥
ज्या कृष्णाचा अगाध महिमा । वर्णूं न शके शङ्कर ब्रह्मा । प्रत्यक्ष दिसतो आम्हां तुम्हां । प्रकट गरिमा ते ऐका ॥५६॥

यस्यांघ्रिपंकजरजोऽखिललोकपालैर्मौल्युत्तमैर्धृतमुपासिततीर्थतीर्थम् ।
ब्रह्मा भवोऽहमपि यस्य कलाः कलायाः श्रीश्चोद्वहेम चिरमस्य नृपासनं वव ॥३७॥

ज्या कृष्णाचे चरणाब्जरज । अख्ल लोकपाळांचे पुञ्ज । उत्तम मौळी करूनि सहज । चर्चिती सुतेज ऐश्वर्या ॥५७॥
हरिपदपंकजरजोलेपनें । मौळी मिरविती उत्तमपणें । ऐसिये निगमगर्भींचे खुणे । जाणूनि भूषणें मिरवती ॥५८॥
सार्ध त्रिकोटी जिहीं तीर्थें । उपासिलीं सप्रेम आर्तें । तयां योगीश्वरांपरौतें । वरिष्ठ तीर्थ आन नसे ॥५९॥
तयां योगियांही तीर्थ परम । हरिपदाब्जरज उत्तम । अथवा जाह्ववी कैवल्यधाम । ओपी निस्सीम उपासितां ॥२६०॥
तयेचें जें जन्मस्थान । यालागीं तीर्थांचें पूण । श्रीकृष्णाचे पादाब्जरेणु । त्रिजगत्पावनपटुतर जे ॥६१॥
लक्ष्मी विरंचि गौरीरमण । आणि मी जो संकर्षण । कृष्णपादाब्जरजःकण । वाहों भूषण निजमौळीं ॥६२॥
कृष्णांशाचे अंशभूत । श्रीविधिहरादि आम्ही समस्त । त्यातें नृपासन नाशवंत । अल्प प्राकृत कोणीकडे ॥६३॥
ऐसिया त्रिजगन्ननका हरी । कौरवीं हेळिलें व्यंग्योत्तरीं । हाचि विस्मय मज अंतरीं । वदतां वैखरी लाजतसे ॥६४॥
कृष्णनिंदा ऐकतां कानीं । निंदकांची प्राणहानि । म्यां करावी तेचि क्षणीं । तो मी आझूनि उगा असें ॥२६५॥
आणिक बोलिले पैशून्यवचन । त्याचें करूनि अनुस्मरण । वदे विस्मयें संकर्षण । तें सज्जन परिसतू ॥६६॥

भुंजते कुरुभिर्दत्तं भूखंडं वृष्णयः किल । उपानहः किल वयं स्वयं तु कुरवः शिरः ॥३८॥

कौरवीं दिधली परिमिता क्षिती । तेथील ऐश्वर्य वृष्णि भोगिती । आजि ते कुरुवरा आज्ञा करिती । हे काळगति विपरीत ॥६७॥
आम्ही उपानह केवळ । स्वयें कौरव अमळ मौळ । ऐशा दुरुक्ति वदले बहळ । लज्जा अळुमाळ न धरूनियां ॥६८॥
किल म्हणिजे निश्चयात्मक । आम्ही उपानहचि सम्यक । कौरव उत्तमाङ्ग मस्तक । ऐसा विवेक दृढ केला ॥६९॥
हेलनोक्तीच्या अनुस्मरणें । रसरसूनि संकर्षणें । आवांकिलें जें अंतःकरणें । तें श्रोतीं श्रवणें परिसावें ॥२७०॥

अहो ऐश्वर्यमत्तानां मत्तानामिव मानिनाम् । असंबद्धा गिरोरूक्षाः कः सहेतानुशासिता ॥३९॥

सखेद परमाश्चर्यें म्हणे । ऐश्वर्यमत्तांचें बोलणें । मद्यपा उन्मत्ताप्रमाणें । कोणा साहणें घडेल ॥७१॥
गौडी माध्वी पैष्टी वारुणी । क्षौद्री मैरेयी गोस्तनी । उन्मत्त इत्यादि मदिरापानी । परुशभाषणी भ्रमग्रस्त ॥७२॥
कौरव तैसे ऐश्वर्यमस्त । परुषवाक्यें अपरिमित । वदतां सोढव्य करील येथ । कोण सामर्थ्य असतांही ॥७३॥
स्वयें होत्साता दण्डधर । आणि कुटिलोक्ति या कठोर । कोण साहील धरूनि धीर । आजि हे पामर निर्दाळीन ॥७४॥
करितां कृतघ्नां उपकार । फिरूनि करिती ते अपकार । त्यांचा करूनियां संहार । गर्वपरिहार करूं आजी ॥२७५॥
पंजरी न शोभे काउळा । पुष्पभूषणें गोळाङ्गुळा । तेंवि कौरवां कुटिलां खळां । स्नेहजिव्हाळा अयोग्य ॥७६॥
पंचाङ्गुळीं मंडित पाणि । भोजनीं प्रविष्ट अन्नीं वदनीं । तेथ उधवतां नखाग्रश्रेणी । सवेग छेदूनि काढाव्या ॥७७॥
तेंवि आप्तांमाजीं दृप्त । कौरव करीन आजि समाप्त । मज कोपतां यातें गुप्त । न करी व्युप्तकेशविधिही ॥७८॥

अद्य निष्कौरवीं पृथ्वीं करिष्यामीत्यमर्षितः । गृहीत्वा हलमुत्तस्थौ दहन्निव जगत्त्रम् ॥४०॥

आजि निष्कौरवी धरा । करीन ऐसिया निर्धारा । बोलोनि उचलिलें नांगरा । दांत करकरां खाऊनी ॥७९॥
क्रोधें थरथरां कांपे गात्र । खदिराङ्गारासारिखे नेत्र । प्रळयकाळीं कुबेरमित्र । त्रिजगत्संहारक जैसा ॥२८०॥
तैसा क्षोभे उठिला बळ । प्रबळबळें परजिला हळ । दिसे जैसा कृतान्त काळ । प्रळयानळ कीं दूसरा ॥८१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP