अध्याय २९ वा - श्लोक ४६ ते ४८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


बाहुप्रसारपरिरंभकरालकोरुनीवीस्तनालभननर्मनखाग्रपातैः ।
क्ष्वेल्याऽवलोकहसितैर्व्रजसुंदरीणामुत्तंभयन्नतिपतिं रमयांचकार ॥४६॥

फेडूनि सव्रीड भेदपदर । बाहु पसरूनि स्मरनिर्भर । श्रीकृष्ण कंदर्पकेलिचतुर । बल्लवीनिकर आलिंगी ॥६४५॥
अस्ताव्यस्त वसनाभरणीं । कृष्णीं मिनल्या ज्या विरहिणी । सालंकृता रतिरंजणीं । कृष्णेक्षणीं त्या जाल्या ॥४६॥
कुसुमग्रथित कबराभरणीं । मंडित मौळें सलंब वेणी । मलयजकर्दमविलेपनीं । अंगयष्टि मघमघिती ॥४७॥
मंदारमाल्यग्रथित माळा । रुळती बल्लववनितागळां । मन्मथवल्ली फुलल्या बहळा । तेंवि पुंजाळा लावण्यें ॥४८॥
भुजंगभोगोपम भुज सरळ । पसरोनि परस्परें लंबाळ । गोपी आणि श्रीगोपाळ । क्रीडाशील रतिरसिक ॥४९॥
निर्द्वंद्वही द्वंद्वीभूत । अंगनांशीं अनंगतात । कामकौशल्यें उल्हासयुक्त । आळंगीत सप्रेमें ॥६५०॥
तया आलिंगनामाझारी । बल्लवींच्या अभ्यंतरीं । उठती परमानंदलहरी । निर्विकारीं हरिसुरतें ॥५१॥
बाहुप्रसरण स्मरोत्कर्षें । संकेत दावितां परमपुरुषें । तैशाच गोपी स्वबाहुपाशें । कवळिती तोषें श्रीकृष्णतनु ॥५२॥
कृष्णालिंगनीं पडतां मिठी । खुटली हृदयींची द्वैतगांठी । अद्वयसुखें भरली सृष्टि । रमली दृष्टि श्रीकृष्णीं ॥५३॥
आब्रह्मस्तंभपर्यंत । अभेदकृष्णस्वानंदभरित । सुखसंभ्रमें क्रीडासक्त । दिसती विभक्त अविभक्ता ॥५४॥
आज्यशर्करापयादि मिष्ट । जिह्वे सुखद आणि स्वादिष्ट । परी तिक्त कट्वम्ल पटु रामट । अशनीं अभीष्ट रोचकें ॥६५५॥
इत्यादि उपचार सूपशास्त्रीं । मनुजादिकां विधानसूत्रीं । येर तिर्यक पश्वादि हिंस्री । तृणादि गात्रीं तोषिजे ॥५६॥
तेंवि पश्वादि सर्व योनि । सकाम प्रवर्तती मैथुनीं । परी मनुष्यादि सुरवरांलागुनी । स्मरानुशासनीं प्रवृत्ति ॥५७॥
तेथ कामशास्त्रशिक्षिता युक्ति । वरिष्ठ उत्तम प्रशस्त रति । लिंगसांघट्यमात्रें प्राकृतीं । तिर्यग्जाती समरमिजे ॥५८॥
कृष्ण स्वयमेव शास्त्रयोनि । सुरवनिता या व्रजकामिनी । यालागीं यथोक्त क्रीडाचरणीं । स्मरालागूनि अनुशिक्षी ॥५९॥
बाहुप्रसरण आलिंगन । वेणीग्रहण मुखचुंबन । पाणिग्रहण कुचमर्दन । नीवीमोक्षण संस्पर्श ॥६६०॥
विमुक्तकंचुकी विगतनीवी । करलालन सर्वावयवीं । हनुगल्लोरुकरपल्लवी । सस्मितभावीं परिहसिती ॥६१॥
मंजुळ कोमळ विनोदवचनीं । कुचादिनखाग्रपरिपातनीं । सादर अवयवनिरीक्षणीं । अधरपानीं स्मितवक्त्रीं ॥६२॥
इत्यादि क्रीडा सविस्तर । कंदर्परहस्यशास्त्रानुसार । सुभगशिक्षित नारीनर । दुर्लभतर त्रैलोक्यीं ॥६३॥
एवं शास्त्रोक्त सौभाग्यरति । भाग्यें भोगिती नर सुकृति । श्वानसूकरगोखरजाति । तेंवि रमती पामरें ॥६४॥
सुमनें तांबूल चंदन । धूपदीप खाद्यपान । कुंजकुसुमितवितानशयन । कामोद्दीपन संपत्ति ॥६६५॥
वाद्यगीत नर्तनकळा । आनंदनिर्भर वनिता सकळा । अनीर्ष्यरतिसुख सोहळा । श्रीगोपाळा सान्निध्यें ॥६६॥
कामशास्त्राचीं उदाहरणें । देऊनि पदशः व्याख्यान करणें । केवळ स्त्रैण्याचीं कारणें । ग्रंथीं गौणें न वदावीं ॥६७॥
येर सज्जनां संकेतमात्र । सूत्रप्राय वदलें वक्त्र । वृथा किमर्थ कामशास्त्र । येथ समग्र वाखाणूं ॥६८॥
बाहुप्रसरण आलिंगन । कचकुचकरऊरुस्पर्शन । नीवीमोक्षण नखाग्रपातन । हास्य ईक्षण नर्मोक्ति ॥६९॥
इत्यादि क्रीडा करूनि हरि । व्रजललनांचे अभ्यंतरीं । रमवी रतिपति प्रदीप्त करी । लावण्यलहरी लालित्यें ॥६७०॥
हरिवल्लभा बल्लवललना । सप्रेमळा स्वपदशरणा । रमविता जाला त्रैलोक्यराणा । स्वैराचरणा प्रकटूनी ॥७१॥

एवं भगवतः कृष्णाल्लब्धमाना महात्मनः । आत्मानं मेनिरे स्त्रीणां मानिन्योऽभ्यधिकं भुवि ॥४७॥

एवं म्हणिजे ऐशिये परी । महात्मा जो कृष्णावतारी । त्या भगवंतापासूनि नारी । महत्त्वथोरी पावल्या ॥७२॥
जीव तितुके मनाधीन । तें मन वर्ते ज्या अधीन । त्याशींच महात्मा अभिधान । तो श्रीकृष्ण भगवंत ॥७३॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । कृष्णपरमात्मा मनमोहन । सुरतीं श्रीकृष्णापासून । पावल्या बहुमान व्रजललना ॥७४॥
लोकत्रयीं ज्या श्रेष्ठ वनिता । त्यांहून आपण महत्त्ववंता । भूमंडळीं त्या बल्लवकांता । कृष्णाभिरमिता मानिती ॥६७५॥
श्रीकृष्णसुरतीं लब्धमाना । इतुकेन वाढतां अभिमाना । कळलें हृदयस्था श्रीकृष्णा । तन्नशना आरंभी ॥७६॥
भगवत्प्राप्तिही जालियावरी । अभिमानाश्रित साही वैरी । करूनि प्राप्तीची बोहरी । बळें संसारीं बुडविती ॥७७॥
यालागीं निजात्मशरणागता । कृष्ण कैवारी रक्षिता । भंगोनि अरिवर्गा दुष्कृता । साधी स्वहिता स्वजनांच्या ॥७८॥

तासां तत्सौभगमदं वीक्ष्यमानं च केशवः । प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतरधीयत ॥४८॥

होतां भवसुखीं विरक्ति । सप्रेम भगवंतीं अनुरक्ति । अनुतापरूप विरहस्थिति । कृष्णप्राप्तिसापेक्षें ॥७९॥
तंववरी श्रवण कीर्तन स्मरण । यथादृष्ट रूपलावण्य । प्रियतम वेधक मूर्तिध्यान । तत्पदसेवन अभीष्ट ॥६८०॥
मानसीं क्रीडा अभ्यर्चन । अभिवादन प्रसादन । स्निग्ध सप्रेम दास्याचरण । सख्य सौजन्य अभिलसित ॥८१॥
इत्यादि देखोनि कारुण्यता । कृपें वोळल्या प्राणनाथा । आत्मनिवेदनाची आस्था । अत्यंत चित्तामाजिवडी ॥८२॥
विरहभूमिकेआंतौती । साधनदशा हे बाणली होती । त्यासि जोडतां श्रीकृष्णसुरतीं । चित्सुखावाप्ति अवगमली ॥८३॥
मग विसरल्या पूर्वस्थिति । मानिली सौभाग्यउन्नति । आपणा ऐशा सभाग्ययुवति । नाहींत म्हणती त्रिजगांत ॥८४॥
विसरल्या विरहविरक्ति पहिली । न म्हणती कृष्णें कृपा केला । लावण्य गर्वाचिये भुलीं । कृष्णीं मानिली स्त्रैणता ॥६८५॥
आम्ही वरिष्ठा उत्तम गुणी । सालंकृता लावण्यखाणी । विलासशृंगारसवाहिनी । मृगांकवदनी मृगनयना ॥८६॥
आमुचे आंगीं तारुण्यभर । विशेष चातुर्य शृंगार । इत्यादि सौभाग्यें श्रीधर । आम्ही सत्वर वश केला ॥८७॥
कृष्ण भुलला आमुच्या गुणां । आम्हीच सुभगा वरांगना । येर त्रिजगीं दुर्भगा हीना । काय गणना तयांची ॥८८॥
कृष्ण झाला आम्हाधीन । आतां आम्हीच मान्य धन्य । आम्हांपुढें त्रिजग तृण । ऐसा अभिमान मानसीं ॥८९॥
सौभाग्याचा चढला मद । भोगितां कृष्ण सुरतानंद । तेणें वाढला उन्माद । म्हणती मुकुंद वश केला ॥६९०॥
ऐसा अभिमान मानिती मनीं । उदेला जाणोनि चक्रपाणि । प्रवर्ते त्यांचिया कल्याणीं । मदोपशमनीं मानेशीं ॥९१॥
त्यांचिया आंगींचा सौभाग्यमद । कृष्ण भुलविला हा अभिमान विशद । तो प्रशमूनि श्रीमुकुंद । पूर्ण प्रसाद करावया ॥९२॥
म्हणे आमुच्या सन्निधानें । गोपी कवळिल्या मदाभिमानें । पुढती विरहोद्दीपनें । प्रशम करणें मदमाना ॥९३॥
लक्षूनि विरहाचें कारण । वेष्टित असतां वनितागण । तेथेंचि पावला अंतर्धान । पूर्ण प्रसन्न होआवया ॥९४॥
माझिये सुरतीं समरस मिळणी । मिनल्या असतां व्रजकाभिनी । स्वसाक्षित्वें यांलागूनी । मदाभिमान झगटला ॥६९५॥
जेंवि समरसीं योगप्रवीण । साक्षित्वभेदें उरतां भिन्न । लयविक्षेपें विपरीतज्ञान । सच्चित्सुखघन अंतरवी ॥९६॥
भरोनि दृश्याचे काननीं । करण वदनें करोनि ग्लानी । स्थिरचरविषया पुसती वचनीं । सच्चित्सुखघन जगदात्मा ॥९७॥
गोपी मदाभिमानाविष्टा । वियोगविरहें पावती कष्टा । काननीं होऊनि प्रविष्टा । आत्माभीष्टा हुडकिती ॥९८॥
स्थिरजंगमां पुसतां वनीं । त्रास पावती करितां ग्लानि । पुन्हां उपरति धरूनि मनीं । यमुनापुलिनीं स्थिर होती ॥९९॥
तेथ करितां गुणकीर्तन । विशुद्ध निर्मद निरभिमान । जालिया होती सुखसंपन्न । निजात्मदर्शन लाहोनी ॥७००॥
ऐसी अनुकंपा श्रीहरि । लक्षूनियां अभ्यंतरीं । प्रसादार्थ वनितानिकरीं । अंतर्धाना पावला ॥१॥
इतुकी लीला ये अध्यायीं । ललनालालस शेषशायी । विचरला तें श्रवणालयीं । परीक्षितीच्या शुक वदला ॥२॥
पुढिले अध्यायीं गोपिका । वनीं हुडकिती मनसिजजनका । विरहप्रेमामृतरस निका । सावध ऐका साधक हो ॥३॥
श्रीमत्प्रतिष्ठानवासिनी । एकनाथा एकाभिधानी । भवरोगिया आरोग्यदानी । साधकजननी जगदंबा ॥४॥
चिदानंदाचें दर्शन । दिवि स्वानंदें उजळून । गोविंदकृपाजोगवादान । करूनि दिवटा मज केलं ॥७०५॥
गोविंदसद्गुरुचरणसेवा । कृपेनें वोळला नवार्णवा । तिणें स्वबोधें दयार्णवा । माजि वैभवा भरियेलें ॥६॥
स्वानंददिवीचा प्रकाश । करूनि ग्रंथार्थाचें मिस । गुरुकृपेचा पूर्ण तोष । श्रोतयांस प्रकाशला ॥७॥
दिविप्रकाशीं स्नेह जळे । जन्ममरणाची पीडा टळे । निजात्मवैभवरेखा उजळे । नाथिलें वितुळे भवदैन्य ॥८॥
द्वैतदुर्गेची वोवाळणी । करूनि अद्वैतसाम्राज्यसदनीं । स्वानंद भोगिजे श्रोतेजनीं । हे विनवणीं दिवट्याची ॥९॥
आपुले कृपेचा जोगवा । देऊनि पदभजनीं जागवा । सरतें कीजे दयार्णवा । संतां सदैवां हे विनति ॥७१०॥
इति श्रीमद्भागवत । अठरा सहस्र श्रुतिनिर्मथित । परमहंसीं श्रुताधीत । कैवल्यामृत ज्या श्रवणें ॥११॥
तयांतीत स्कंध हा दशम । शुकपरीक्षितीसंवाद सुगम । रासक्रीडा उपक्रम । अध्याय उच्चार ऊनत्रिंश ॥७१२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे सुरतवर्णनं नामैकोनत्रिंशतमोऽध्यायः ।
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४८॥ ओवीसंख्या ॥७१२॥ एवं संख्या ॥७६०॥ ( एकोणतिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १४८६८ )

एकोणतिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP