अध्याय २९ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - भगवानपि ता रात्रीः शरदोत्फुल्लमल्लिकाः । वीक्ष्य रंतुं मनश्चके योगमायामुपाश्रितः ॥१॥

हेमंतीं गोपीव्रताचरण । करूनि कात्यायनीपूजन । लाधल्या जें हरिवरदान । तें संपूर्ण करावया ॥४१॥
शरच्छर्वरी शशिभायुक्त । कुंज सकूजित कुसुमित । गोपीसुकृतोदय संप्राप्त । जाणोनि प्रकटित रतिरंगा ॥४२॥
किंवा गोपी बाल्यवयसा । फेडून लेती यौवनदशा । तोंवरी केली काळप्रतीक्षा । होतां त्या निशा संप्राप्त ॥४३॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । असतांही श्रीभगवान । कां पां कालप्रतीक्षण । केलें म्हणोन शंकाल ॥४४॥
योगमाया अंगीकारी । काय पां करूं न शके हरि । तो कां काळप्रतीक्षा कव्री । झणें अंतरीं हें माना ॥४५॥
अकाळीं वनश्री प्रकटितां । बाल्या फेडूनि तारुण्य देतां । तत्काळ गोपीमनोरथा । काय पुरवितां अशक्य ॥४६॥
तरी ऐकावें इये विशीं । अशक्य नाहीं भगवंतासी । परी भक्तांच्या सुकृतराशि । येती उदयासि तैं लाभ ॥४७॥
गोपी तोषवूनि वरदानें । यज्ञपत्न्यांचीं उत्कटपुण्यें । त्यांच्या सप्रेम स्नेहबंधनें । पूर्ण कारुण्यें कळवळिला ॥४८॥
काम असतां कृष्णाआंगीं । तरी अनुकूलवयस्का तन्वंगीं । करूनि रमता स्वेच्छाभोगीं । तेचि प्रसंगीं उताविळा ॥४९॥
पूर्णकाम परमेश्वर । सप्रेम स्वजनाचें अंतर । जाणोनि क्रीडे तदनुसार । नानावतार नटनाट्यें ॥५०॥
जाणोनि स्वभक्तमनोगता । स्वलीला प्रकटी बालचरिता । येरवीं कंस संहारितां । दुर्घटता त्या कोण ॥५१॥
हिरण्यकशिपुनिर्दाळणा । स्तंभीं प्रकटवी आपणा । तो येथ कंससंहरणा । समरांगणा समर्थ ॥५२॥
परंतु भक्ताचें वालभ । जाणोनि झाला पशुपडिंभ । अमरां दुर्लभ पंकजनाभ । तो क्रीडे स्वयंभ सुलभ्यत्वें ॥५३॥
गोपीचीरापहरणकाळीं । भावूनि निजवयसा कोंवळीं । यथाकाळें श्रीवनमाळी । कंदर्पकेलिप्रद हो कां ॥५४॥
जाणोनि त्यांच्या अभिवांछिता । कालप्रतीक्षा झाला करिता । येर्‍हवीं जो मायाभर्ता । त्या भगवंता न अशक्य ॥५५॥
गोपीमनोऽनुकूला रात्री । शरदत्फुल्लमल्लिकापत्रीं । श्रीभगवंत लक्षूनि नेत्रीं । तच्चरित्रीं प्रवर्तला ॥५६॥
योगमायेच्या अवलंबें । अभीष्टविभव आणूनि शोभे । रतिरहस्य पंकजनाभें । मनसिजक्षोभें मनीं धरिलें ॥५७॥
हरिहरब्रह्मादि जिंकूनि कामें । कंदर्प दाटला दर्पभ्रमें । तो येथ जिंकूनि रासक्रमें । विजयसंभ्रमें हरि वर्ते ॥५८॥
रासमंडळा जो मंडन । होऊनि कंदर्पर्पखंडन । करी आखंडलस्मयदंडन । पवनकृशानुवरुणेंशीं ॥५९॥
येथ शंका कीजेल श्रोतां । परदारविनोद केला असतां । कंदर्प विजयाची योग्यता । श्रीभगवंता न शोभे ॥६०॥
परस्त्रीविनोदें करून । कंदर्पजयाचें श्लाघ्यपण । भासे विपरीत कर्माचरण । न शोभे गौण भगवंतीं ॥६१॥
ऐसी शंका झणें माना । योगमायाअवलंबना । करूनि नाट्यक्रीडा नाना । आत्मारामचि अभिरमें ॥६२॥
‘ योगमायामुपाश्रितः ’ । भावार्थ याचि पदाआतौता । जों न शिवोनि परयोषिता । झाला रमता स्वाराम ॥६३॥
‘ आत्मारामोऽप्यरीरमत ’ । वक्ष्यमाणोक्ति हें संमत । साक्षान्मन्मथाचा मन्मथ । परस्त्री किमर्थ ते ठायीं ॥६४॥
जयाच्या स्वरूपा मन्मथ भाळे । द्वैत निवटूनि मावळे । तेथ परस्त्रीसुखसोहळे । म्हणतां काळे मुख नोहें ॥६५॥
तस्माद्रासक्रीडाविडंबन । कामविजयप्रख्यापन । तेथींचें तत्व इतुकें पूर्ण । सकारण जाणिजे ॥६६॥
एवं आपण आपुले ठायीं । सुरतक्रीडा शेषशायी । करूनि प्रवर्ते मन्मथविजयीं । ते ये नवायी कथेची ॥६७॥
तेचि शृंगारकथामिषें । पंचाध्यायीं रासरसें । अध्यात्मपरनिवृत्तिदशे । आणूनि विशेषें उमजा हें ॥६८॥
भगवत्प्रतिश्रुता ज्या रजनी । मनोऽनुकूला स्मरक्रीडनीं । त्या दो श्लोकीं श्रीशुक वर्णी । श्रोतीं सुकर्णीं परिसाव्या ॥६९॥

तदोडुराजः ककुभः करैर्मुखं प्राच्या विलिंपन्नरुणेन शंतमैः ।
स चर्षणीनामुदगाच्छुचो मृजन् प्रियः प्रियाया इव दीर्घदर्शनः ॥२॥

योगमायाविभवें हरि । स्वेच्छा वनश्री अनुकूल करी । पंचभूतें सशर्वरी । कोणे परी तें ऐका ॥७०॥
जाणोनि गोपींचा स्मरोदय । वनीं वाहूनि वनजाप्रिय । तत्प्रीतीस्तव अत्रितनय । प्रकट होय प्राग्भागीं ॥७१॥
उडुगणेंशीं विराजित । ऐंद्रीदिङ्नायिकाकांत । जेंवि चिरकाळें प्रिय संप्राप्त । संल्लालित ललनांगा ॥७२॥
कुंकुमरंगें मुख विलेपी । करलालनें विरहा लोपी । तेंवि अरुणभा मयंक वोपी । लावण्यरूपी दिग्वदनीं ॥७३॥
शीतल संतम सुखतमकरीं । उदयरागें कुंकुमापरी । प्राचीदिग्वदना शृंगारी । स्वभा पसरी सर्वांगीं ॥७४॥
सर्वजनाची तापलाग्नि । शीतळ करी परिहारूनी । ऐसा उडुपति उदेला गगनीं । प्रीतीकरूनि कृष्णाचे ॥७५॥

दृष्ट्वा कुमुद्वंतमखंडमंडलं रमाननाभं नवकुंकुमारुणम् ।
वनं च तत्कोमलगोभिरंजितं जगौ कलं वामदृशां मनोहरम् ॥३॥

जें कृष्णाचें निजमानस । आनंदमय मयंकवेष । घेऊनि उगवे प्राक्ककुभेस । धवळी आकाश स्वतेजें ॥७६॥
कुमुदें निजोदयें विकसित । करी म्हणोनि तो कुमुद्वंत । कमलावदना समान कांत । अखंडित प्रकाशला ॥७७॥
अखंडमंडल जैवातृक । अरुण नवकुंकुमकिंजल्क । तैसा अरुणप्रभात्मक । रजनीनायक नभोगर्भीं ॥७८॥
त्यातें लक्षूनि कमलारमण । कोमल तत्करप्रभेकरून । रंजित देखोनि वनजीवन । आदरी गायन गोगोप्ता ॥७९॥
तें गायन म्हणाल कैसें । सुधा लाजवी माधुर्यरसें । श्रवणमात्रें वधूमानसें । बळें नेतसे हरूनिया ॥८०॥
कामाक्तनेत्रा वामदृशा । श्रवणमात्रें केल्या पिशा । वनीं पहावया परेशा । धांवती कैशा तें ऐका ॥८१॥

निशम्य गीतं तदनंगवर्धनं ग्रजस्त्रियः कृष्णगृहीतमानसाः ।
आजग्मुरन्योन्यमलक्षितोद्यमाः स यत्र कांतो जवलोलकुंडलाः ॥४॥

सुमनोहर भगवद्गान । सबाह्यनंगोद्दीपन । स्थावरजंगमीं स्मर मोदन । पावे ऐकोन अभिवृद्धि ॥८२॥
घृतादिसिंचनें पावक वाढे । कां मर्मस्पर्शें क्रोध चढे । कीं गंधगुणपाशें आसुडे । कुसुमाकडे रोलंब ॥८३॥
कीं विष्णुस्मरणें सुकृतवृद्धि । गुरुपदभजनें वाढे बुद्धि । तैसी कंदर्पा प्रवृद्धि । होय निरवधि ज्या गानें ॥८४॥
ते प्रवृद्धि म्हणाल कैशी । अल्प सूचनें सुज्ञापाशीं । येरां मूर्खां प्राकृतांशीं । हृदयस्फोटेंशीं नुमजवे ॥८५॥
ज्याचे पदरीं निष्क एक । तो सहस्र निष्क होय कामुक । सहस्र निष्कीं सर्वात्मक । वांछी कनक अभिवृद्धि ॥८६॥
धनिक वांछी भूपमान । मानी वांछी भूपासदन । सार्वभौमत्व जें असपत्न । भूपसामान्य कामिती ॥८७॥
सार्वभौम स्वाराज्यता । तो अभिलाषी वैराज्यता । पारमेष्ठ्यादि साम्राज्यता । सांडूनि परता स्मर वाढे ॥८८॥
परी तीं नश्वर अवघीं सुखें । पुढती तितुकींच भोगिजे दुःखें । विषयकामीं इहामुष्मिकें । ठकती अल्पकें फळलोभें ॥८९॥
याहूनि विशेष वाढे काम । तैं वांछिती अक्षय्य धाम । स्वसंवेद्य आत्माराम । विषयसंभ्रमवैरस्यें ॥९०॥
ऐसे सनकादि आत्मरत । त्यांहूनि वाढे जैं मन्मथ । तैंभगवत्प्रेमा अत्यद्भुत । सबाह्य संतत वांछिती ॥९१॥
तें बृहदारण्यींचें भगवद्गान । पूर्वोक्त अनंगप्रवर्द्धन । उपनिषत्श्रुतिरूप होतां श्रवण । साधनसंपन्न वेधल्या ॥९२॥
साधनसंपन्न म्हणाल कैशा । कृष्णप्रगृहीतमानसा । व्रजस्त्रिया त्या भवसुखविरसा । कृष्णपरेशा कामिती ॥९३॥
कात्यायन्यादिव्रताचरणें । रजतम क्षाळूनि शोधिलीं मनें । गृहीं वर्ततीं हरिआज्ञेनें । परी संलग्न ध्यानें हरिरूपीं ॥९४॥
हरिवराचा उदयकाळ । भगवद्गगायन तदनुकूल । ऐकोनि झाल्या विरहाकुळ । धांवती विह्वल हरिप्रेमें ॥९५॥
करणें विसरली प्रवृत्ति । कृष्णगानें हरिल्या स्मृति । पडली भगभानीं विस्मृति । झाली उपरति मानसा ॥९६॥
नेनती पाउल पडलें कोठें । नादमार्गें धांवती नेटें । श्रवणीं कुंडलें लखलखाटें । तरळतां उमटे विद्युद्भा ॥९७॥
विजनीं निकुंजी जो कां कांत । रमारमणीयएकांत । त्याप्रति जात्या झाल्या त्वरित । कळों नेदित परस्परें ॥९८॥
विषयसुरतीं सपत्नभावें । रमतां त्रास पावल्या जीवें । यालागीं परस्परें न होतां ठावें । घेती धांवे परपुरुषीं ॥९९॥
पूर्वाज्ञेनें त्रैवर्गिक । करितां कृत्यें प्रापंचिक । कृष्णगायनें सम्यक । झाल्या प्रत्यक्प्रवण त्या ॥१००॥
कृष्णगीतें हरितां मन । कर्म मानिती जैसें वमन । भणगा जोडल्या भद्रासन । मग त्या कोरान्न जेंवि न रुचे ॥१॥
‘ यदहरेव विरजेत् । तदहरेव प्रव्रजेत् ’ । जेव्हां हरिरत झालें चित्त । तैं संन्यस्त त्रैवर्ग्य ॥२॥
अंतर रमतां अंतरंगा । मग तें विसरे सर्वसंगा । असोनि नेणे अंगींअंगा । भोगी अनंगा समरसें ॥३॥
जितुकें जालें जें जें कृत्य । तें तितुकेंचि टाकूनि त्वरित । गोपी धांवती काननांत । कमलाकांतसुरतेच्छें ॥४॥

दुहंत्योऽभिययुः काश्चिद्दोहं हित्वा समुत्सुकाः । पयोऽधिश्रित्य संयावमनुद्वास्यापरा ययुः ॥५॥

कोण्ही गोपी गोदहनीं । बैसल्या जानुधृतभाजनीं । स्तननिष्पीडनीं हस्त दोन्ही । जवें तळपती अधोर्ध्व ॥१०५॥
श्रवणीं भरलें हरिगायन । तेणें वेधिलें अंतःकरण । सवेग होतां मन उन्मन । प्रवृत्तिभान विसरल्या ॥६॥
पुढें दोहन करणें ठेलें । नेणती पात्र रितें भरलें । नवचे चुल्हीवव्री ठेविलें । चित्ता कर्पिलें हरिगानें ॥७॥
दोह विसरोनि घेती धांवा । गानध्वनीचा लक्षूनि अध्वा । सवेग ठाकिती वासुदेवा । कोण्ही गोवा नाठवतां ॥८॥
कोण्ही गोधूमकणकंडना । करूनि बैसल्या असतां पचना । सुपक्क चुल्लिस्थ नुतारितां अन्ना । करिती धावना ध्वनिमार्गें ॥९॥
अध्यात्मपरिभाषायोजना । अपरपर्यायव्याख्याना । निरूपितां ग्रंथरचना । नाटके गगना विस्तारें ॥११०॥
यालागीं पदार्थप्रकाश मात्र । ग्रथनीं जाणिजे सूचनासूत्र । शंकापरिहारें सर्वत्र । विशेष वक्त्र वावरे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP