अध्याय २९ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


व्यक्तं भवान्व्रजभयार्तिहरोऽभिजातो देवो यथाऽदिपुरुषः सुरलोकगोप्ता ।
तन्नो निधेहि करपंकजमार्तबंधो तत्पस्तनेषु च शिरःसु च किंकरीणाम् ॥४१॥

जैसा आदिपुरुष भगवान । सुरलोकाचें करी गोपन । तो तूं येथ व्रजरक्षण । दुःखनिरसन करावया ॥८८॥
व्रजींच्या समस्त जनांप्रति । जितुकीं दुःखें प्राप्त होती । त्यांची करावया निवृत्ति । तुझा श्रीपति अवतार ॥८९॥
नाना संकटांचिये काळीं । आदिपुरुष सुरमंडळीं । सुरसंकल्पें करूनि केली । कृपेनें पाळी निजशरणां ॥५९०॥
तो तूं येथ सर्वांपरी । व्रजंजनार्तिहर्त्ता हरि । असतां आम्ही तव किंकरी । मन्मथशरीं जाचतसों ॥९१॥
आर्ति हरूनि तोष करणें । आर्त्तबंधु या अभिधानें । गोपी करिती विज्ञापनें । अभीष्टप्रार्थने सुचवूनी ॥९२॥
स्मरसंतप्ता तव किंकरी । निजकरपद्मा आमुचे शिरीं । ठेवूनि निववीं स्मरातुरी । उदास न करीं विज्ञप्ति ॥९३॥
स्तनीं आननीं आपादमौळीं । मर्दीं चुंबीं आणि कुरवाळीं । आपुल्या शंतमपाणीकमळीं । श्रीवनमाळी सर्वज्ञा ॥९४॥
आम्हां किंकरींचिये शिरीं । कृपेनें स्पर्शें अमृतकरीं । जेंवि शशांक सुधाधारीं । चकोरांवरी अभिवर्षे ॥५९५॥
तव गानश्रवणें कामाग्नि दीप्त । तेणें सर्वांग जालें व्याप्त । करसरोजें कुच संतप्त । निववीं त्वरित पुंभावें ॥९६॥
कुरुपुंगवा बादरायणि । म्हणे समस्तव्रजकामिनी । कृष्णा कथिती मन्मथग्लानि । बहुतां वदनीं बहुविधा ॥९७॥

श्रीशुक उवाच :- इति विक्लवितं तासां श्रुत्वा योगेश्वरेश्वरः ।
प्रहस्य सदयं गोपीरात्मारामोऽप्यरीरमत् ॥४२॥

तया गोपींचें विक्लवित । एका वदनें इत्थंभूत । कथनीं साकल्यें असमर्थ । तस्मात्संकेत बोलिलों ॥९८॥
कृष्णवेधें करणगति । आचरों न शकेच प्रवृत्ति । यालागीं तिहीं केली विनति । परवशमतिवैकल्यें ॥९९॥
परतोनि जा हें आज्ञापिलें । चित्त श्रीकृष्णीं गुंतलें । आज्ञाभंगें शरीर ठेलें । या वैकल्यें विक्लवित ॥६००॥
वेणुश्रवणें कामज्वर । लावण्यवेधें अस्वतंत्र । निषेध ऐकोनि विरहातुर । विकळ अंतरें जल्पती ॥१॥
कृष्णवेधें न शकती जाऊं । आज्ञाभंगें न शकती राहूं । तथापि अभीष्टाभिप्रायो । वदल्या स्वमेव विफलत्वें ॥२॥
त्या गोपींचें विक्लवित । ऐकोनि श्रीकृष्ण रमाकांत । हास्य करूनि आनंदभरित । स्वयें रमवीत गोपींतें ॥३॥
एकला कृष्ण बहुत गोपी । झणें कोण्हाचें मानस कल्पी । तरी तो परमात्मा विश्वव्यापी । योगेश्वरांचा ईश्वर ॥४॥
योगी योगसिद्धीच्या बळें । भोगिती ऐश्वर्यसोहळे । श्रीकृष्ण योगें मायापटलें । निर्मी स्वलीले ब्रह्मांडें ॥६०५॥
परिपूर्णत्वें आत्माराम । तेथ कैंचा विषयकाम । जाणोनि गोपीमानसधर्म । रमता झाला स्वच्छंदें ॥६॥
प्रतिबिंबेंशीं बालक क्रीडे । तेंवि बल्लवींमाजिवडे । आत्मप्रियत्व प्रकटूनि फुडें । क्रीडे निवाडे जगदात्मा ॥७॥

ताभिः समेताभिरुदारचेष्टितः प्रियेक्षणोत्फुल्लमुखीभिरच्युतः ।
उदारहासद्विजकुंददीधितिर्व्यरोचतैणांक इवोडुभिर्वृतः ॥४३॥

भवीं विरक्ता स्वपादनिरता । गोपी जाणोनि नान्यासक्ता । प्रेमोत्कर्षें श्रीअच्युता । आली द्रवता कारुण्यें ॥८॥
मग धर्मधुरीणतेचा पट । ठेवूनि जैसा स्मरलंपट । उदारहासावलोकें वाट । प्रकटीं औद्भट भौजंगी ॥९॥
सांडूनि प्रशस्त मोकळी दृष्टि । स्मराक्त सस्मित वक्र भृकुटी । जाणोनि गोपी यथेष्ट तुष्टि । कृष्ण जगजेठी वेष्टिती ॥६१०॥
सर्वावस्था सर्वां देहीं । सर्वकाळ सर्वांविषयीं । आत्मप्रियत्वें भवाच्या ठायीं । प्राणी सर्वही अभिरमती ॥११॥
तो प्रियतम आत्माचि वास्तव । लीलालालस वासुदेव । सस्मित ईक्षिता गोपी सर्व । उत्फुल्ल अवयवीं टवटविल्या ॥१२॥
राकाग्लौदर्शनें ग्लानि । सांडूनि उत्फुल्लिता कुमुदिनी । तेंवि गोपी प्रसन्नवदनीं । कृष्णा वेष्टूनि तिष्ठल्या ॥१३॥
जैसा उडुपति उडुगणभारीं । मंडित मिरवे गगनोदरीं । तैशा गोपी फुल्लारवक्त्रीं । वेष्टिती रात्रीं हरिगात्रा ॥१४॥
मन्मथामिश्रित उदार हास्य । करितां कमलामानसहंस । दशनदीधितींचा प्रकाश । जेंवि कुमुदांस शरदिंदु ॥६१५॥
भवविरक्ता आत्ममिळणी । आल्या तिहींशीं चक्रपाणि । चटुल चेष्टा उदार करणी । शोभता जाला रतिरंगीं ॥१६॥
अच्युतप्रताप अच्युतरति । अच्युतैश्वर्य अच्युतशक्ति । यालागीं अच्युत हे शुकोक्ति । जाणोनि श्रीपति अस्खलित ॥१७॥
ऊर्ध्वरेता पूर्णकाम । विषयास्पृष्ट आत्माराम । तोही पुरवी अभीष्ट प्रेम । स्वजनाभिराम होऊनि ॥१८॥
त्या गोपींशीं रतिरंजन । करीत होत्साता श्रीकृष्ण । कैसा क्रीडे तें व्याख्यान । नृपालागून शुक सांगे ॥१९॥

उपगीयमान उद्गायन्वनिताशतयूथपः । मालां बिभ्रद्वैजयंतीं व्यचरन्मंडन्वनम् ॥४४॥

गोपी लावण्यललितवामा । कृष्णरतिरंगीं सकामा । अभीष्ट सुरतें पूर्णकामा । नधरत प्रेमा हरि गाती ॥६२०॥
षड्ज ऋषभ आणि गांधार । कंठहृदयनाभिस्वर । ज्यांच्या गानें अनंग स्मर । करी संचार सर्वांगीं ॥२१॥
कित्तेक गोपी यशें गाती । कित्तेक लावण्यललितोक्ति । कित्तेक चाटुल चटुल गती । हरिइंगितीं व्युत्पन्ना ॥२२॥
रसाळ वेणूद्गायन । करीत होत्साता श्रीकृष्ण । गोपीगान अनुलक्षण । अमृतासमान स्मररुचिर ॥२३॥
कृष्णगायनीं गोपीगान । मिश्रित सुस्वर तानमान । लास्यमूर्च्छनारागज्ञान । भाव दावून प्रकटिती ॥२४॥
कृष्णावेगळें दुसरें नाहीं । ऐसा एकांत साधिला तिहीं । कृष्ण लेऊनि आपुल्या देहीं । शंका कांहीं न ठेविली ॥६२५॥
मग निःशंक निरभिमानें । कृष्णमयचि गोपीगानें । कृष्णीं विरोनि गेलीं मनें । तनुक्रीडनें तदधीन ॥२६॥
ऐसीं अनेक गोपीशतें । त्यांमाजि यूथप श्रीकृष्ण तेथें । नानाविलासमन्मथचरितें । बहुविध सुरतें विचरतसे ॥२७॥
अम्लान उत्फुल्ल वैजयंती । कंठीं मिरवीतसे श्रीपति । सादृश्यगर्भित हे शुकोक्ति । विशद श्रोतीं परिसावी ॥२८॥
हेमोत्पलिनी वैजयंती । तेंवि गोपींच्या आननपंक्ति । प्रशस्त फुल्लारविंदाकृति । मघमघिताती सप्रेमें ॥२९॥
कीं वैजयंतीसी लावूनि कर । गोपी निबिडमाळाकार । कृष्णासभोंवता प्राकार । प्रेमें सादर स्मररसिका ॥६३०॥
वैजयंती धरिलीं करी । त्यांची कृष्णाभंवती भवरी । त्याच्या स्कंधावरूनि येरी । वनिताचक्रीं हरि गाती ॥३१॥
एकी सांडूनि सापत्नभावा । तळवट घेती चरणसेवा । समरसें करिती माजी रिगावा । मग केशवा कवळिती ॥३२॥
एकी करितां मंडपघसणी । अवसर न फवे कृष्णमिळणीं । मग त्या हरिरूप प्राशूनी नयनीं । स्वेच्छा ध्यानीं कवळिती ॥३३॥
तंव तें सप्रेमध्यान भरे । बाहीर अंतरींचें अवतरे । बाह्य भीतरीं भेद न सरे । मग एकसरें हरिसुरत ॥३४॥
एवं श्रीकृष्णरति लालसा । नवयौवना विगतक्लेशा । अवघ्या सप्रेम सुरतरसा । भोगिती डोळसा वनगर्भी ॥६३५॥
एवं त्रिजगासी मंडन । करूनियां तें क्रीडावन । स्वयें क्रीडे श्रीभगवान । वनीं जीवनीं उभयत्र ॥३६॥
वनीं म्हणिजे यमुनातटीं । निबिडनिकुंजीं तरुवरथाटीं । जीवनीं म्हणिजे वाळवंटीं । जळानिकटीं मृदुपुलिनीं ॥३७॥

नद्याः पुलिनमाविश्य गोपीभिंर्हिमवालुकम् । रेमे तत्तरलानंदकुमुदानंदवायुना ॥४५॥

नृत्य गीत हास विलास । गोपींसहित परमपुरुष । वनीं क्रीडतां परमोल्हास । पावोनि पुलिनीं प्रवेशला ॥३८॥
यमुनापुलिनीं रम्य मृदुळ । जेथ शर्करा सुशीतळ । मंदानिळें कुमुदें तरळ । परिमळबहळ जे ठायीं ॥३९॥
यमुनाजळीं कुमुदावळी । तरळ डोलती मंडानिळीं । तया वायूनें पुलिनपाळीं । तुहिनाचळीं उपमूं ये ॥६४०॥
गंधर्वसुरसिद्धकिन्नरीं । अंगनांसहित मन्मथसमरीं । सुगंध शीतळ वनोदरीं । जेंवि हिमगिरीमाजि रमिजे ॥४१॥
तैसा पुलिनीं प्रवेशोन । गोपींसहित मनमोहन । रमता झाला आनंदोन । लब्धानंद सप्रेमें ॥४२॥
तिये क्रीडेचीं इंगितें । चाटुचटुल रतिचेष्टितें । कामशास्त्रोक्त कामतातें । दाविलीं उचितें विचरोनी ॥४३॥
तीं नृपातें बादरायणि । ऊर्ध्वरेताही सप्रेम वर्णी । जेणें भंगती कलिमलश्रेणी । परिसा श्रवणीं तें आतां ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP