मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| श्लोक १२ ते १५ अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - श्लोक १२ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १२ ते १५ Translation - भाषांतर राजोवाच :- कृष्णं विदुः परं कांतं न तु ब्रह्मतया मुने । गुणप्रवाहोपरमस्तासां गुणधियां कथम् ॥१२॥राजा म्हणे जी वाशिष्ठप्रवरा । बादरायणि परम चतुरा । मानसवनजा संशयवारा । अळुमाळसा झगटला ॥७३॥तेणें वक्तृत्वस्वातीघन । वर्षत असतां तव मुखगगन । चंचलतेस्तव अमृतकण । जाती विखरोन न थरतां ॥७४॥प्रश्न ऐकोनि ममोदित । निवांत कीजे संशयवात । तेणें वक्तृत्व अमृतावाप्त । पूर्ण संतृप्त होईन ॥१७५॥तरी पतिपुत्रादि जगद्ब्रह्म । भावनामात्र भेदभ्रम । तितुकेन प्राणी भोगिती कर्म । अज्ञानरजतमसंवलित ॥७६॥अज्ञानरूपअविद्यावरण । वास्तव ज्ञानें न होतां क्षीण । मोक्ष न पवती प्राणिगण । हा निश्चय पूर्ण वेदांतीं ॥७७॥तेंवि अज्ञाना पशुपजाया । परम लावण्य श्रीकृष्णकाया । देखोनि भाळल्या रमावया । नेणोनि अव्यया परब्रह्मा ॥७८॥परम सुंदर हा परपुरुष । कृष्ण नेणोनि श्रीपरेश । जारबुद्धी विषयाभिलाष । धरितां गुणपाश कां तुटले ॥७९॥पतिपुत्रादिप्रपंचभजनें । मोक्ष न पविजे प्राणिगणें । जारबुद्धी कृष्णध्यानें । केंवि बंधनें निर्मुक्त ॥१८०॥जारबुद्धि विषयप्रवाहीं । कामासक्ता कृष्णदेहीं । त्यांच्या विषयवासना कैशा पाहीं । विषयापासूनि निरसल्या ॥८१॥इतुके शंकेच्या निरसना । केली स्वामीसि प्रार्थना । निःसंशय निरूपणा । करितां श्रवणा सुख वाटे ॥८२॥श्रीशुक उवाच :- उक्तं पुरस्तादेतत्ते चैद्यः सिद्धिं यथागतः । द्विषन्नपि हृषीकेशं किमुताधोक्षजप्रियाः ॥१३॥शुक म्हणे गा कुरुपुंगवा । तुवां प्रश्न केला बरवा । निरूपिजेल तो पर्येसावा । वसों नेदावा संशय ॥८३॥‘ तव पुरस्तात् मया एतदुक्तं ’ । राया तुजपुढें हें म्यां कथिलें । कोण्या एक्या योगें भलें । कृष्णीं मानस संलग्न जालें । तरी फावलें अमृतत्व ॥८४॥परमद्वेषें शिशुपाळाचें । कृष्णीं मानस जडलें साचें । तेंचि कारण अमृतत्त्वाचें । सिद्धी गेलें त्यालागीं ॥१८५॥द्वेषित होत्साताही चैद्य । हृषीकेशातें ध्यातां सत्य । अपवर्ग लाधला अनवद्य । मा गोपी वंद्य कां नवह्ती ॥८६॥जारबुद्धि या सप्रेमभावें । अधोक्षजीं रंगल्या जीवें । असतां कैवल्य कां न लभावें । येथ संशय संभवे कोण पां ॥८७॥पतिपुत्रादि जगद्ब्रह्म । ते अविद्यासंवृत गुणसंभ्रम । मनःकल्पित करणानुक्रम । विषयीं सुखतम प्रतिभासे ॥८८॥कृष्ण केवळ हृषीकेश । हृषीकसमुच्चयाचा ईश । अनावृत जो उत्तम पुरुष । निर्विशेष परब्रह्म ॥८९॥योगमायाअंगीकारें । नटला स्वजनप्रेमानुसारें । तथापि कोण्हाही प्रकारें । सन्निधिमात्रें मोक्षद ॥१९०॥शिवब्रह्मादि जो अक्षगण । ज्याहूनि अर्वाक् जयांचें ज्ञान । यालागीं अधोक्षज हें अभिधान । विपश्चिज्जन बोलती ॥९१॥येथ गोपींचा विशेष कायी । हो कां कोण्ही मनुष्यदेही । त्याच्या कल्याणार्थ पाहीं । सगुण निर्गुण तनुनाट्य ॥९२॥नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप । अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः ॥१४॥अविद्याअनावृत्त भगवत्तनु । येर संवृत अवघा जनु । तो जन व्हावया निरावरण । भगवद्भजन द्योतिले ॥९३॥गुणनियंता श्रीभगवंत । येर अवघे गुणसंवृत । भगवद्भजनें होती मुत्क । हा इत्थंभूत सदुपाय ॥९४॥गुणसंवृता जनाप्रति । भजनालागीं भगवन्मूर्ति । निर्गुणाची सगुण व्यक्ति । जे श्रुतिस्मृतिनिर्दिष्ट ॥१९५॥श्यामराजीवलोचन । पद्मायताक्ष मयंकवदन । चतुर्बाहु आजानुपीन । सरळ सोज्वळ सुकांत ॥९६॥मुकुट कुंडलें मेखळा । श्रीवत्स कौस्तुभ आपादमाळा । केयूरांगदें बाहुयुगळां । कंबुकटकें मुद्रिका ॥९७॥विद्युद्भासुर पीतांबर । कांसे कसिला मनोहर । चरणीं बिरुदांचा तोडर । वांकी वाळे नूपुरें ॥९८॥रातोत्पलनिभ चरणतळें । सामुद्रिकें सोज्वळ सफळें । घोटीव वर्तुळ सुतेजाळें । नखशशिकळा सपीयूपा ॥९९॥कंजारिकंबुकौमोदकी । आयुधें शोभती चौहस्तकीं । निषंगशार्ङ्गनंदकप्रमुखीं । विराजमान विश्वदृक् ॥२००॥वस्त्राभरणीं सालंकृत । करुणावत्सल कमलान्वित । सपार्षद सोपस्कृत । विभूतियुक्त विदितात्मा ॥१॥अप्रमेय जो निर्गुण । त्याची व्यक्ति ऐसी सगुण । भजतां भंगी अविद्यावरण । विशुद्धज्ञान प्रकाशी ॥२॥स्वजनमोक्षणाकारणें । राया निर्गुणा सगुण होणें । येरवीं असतां पूर्णपणें । भव निस्तरणें दुर्घट पैं ॥३॥पार्थिवादिभगवद्व्यक्ति । करूनि भक्त जे जे भजती । त्यांसि अक्षय सायुज्य मुक्ति । मा कृष्णचिन्मूर्ति परब्रह्म ॥४॥गोपी केवळ अमरांगना । वंदूनि विरंचीची आज्ञा । बल्लवी होऊनि मर्त्यभुवना । भगवत्तोपणा पातल्या ॥२०५॥म्हणोनियां त्या पुरुषोत्तमा । नैसर्गिक लाहोनि प्रेमा । जारभावें वांछिती कामा । आत्मारामा अमराद्या ॥६॥कां तेंवि चिन्मात्र तनूच्या ठायीं । शत्रुषट्कात्मकप्रेमें पाहीं । हृदय निबद्ध केलें जिहीं । त्या लवलाहीं तन्मयता ॥७॥म्हणोनि प्राकृत देहधारी । तैसा नव्हे हा निर्विकारी । त्याची मूर्ति अभ्यंतरीं । कोण्या प्रकारीं संचरतां ॥८॥कामं क्रोधं भयं स्नेहमैक्यं सौहृदमेव च । नित्यं हरौ विदधतो यांति तन्मयतां हि ते ॥१५॥काम म्हणिजे विषयाभिलाषें । आसक्ति धरितां दृढमानसें । अचिंत्यवस्तुसामर्थ्यवशें । सायुज्य आपैसें घरनिघें ॥९॥हो कां कोण्ही एक काम । कामूनि भजतां मेघश्याम । परमपुरुषार्थ होय सुगम । जडतां प्रेम भगवंतीं ॥२१०॥जारविरहकामासक्ति । केवळ प्रेमाची अभिव्यक्ति । गोपी तदर्थ अमरयुवति । ब्रह्मवरदोक्ती अवतरल्या ॥११॥क्रोधावेशें भगवन्मूर्ति । कवळूनि राहे अविसर स्मृति । मग त्यां कैंची पुनरावृत्ति । भवनिर्मुक्ति न मगतां ॥१२॥तृणजळु कां भिंगुरटी । भयें सदैव चिंतितां पोटीं । तद्रूपता उठाउठीं । लाहे गोठी हे तैसी ॥१३॥भगवद्भयें मानस वेधे । तैं निजसुरेंचि सांडिजे भेदें । मग अक्षय कैवल्य साधे । हें कां शब्दें शंसावें ॥१४॥पुत्रादि कोना एका स्नेहें । भगवद्विग्रह कवळितां मोहें । मग त्या अपवर्ग अपैता नोहे । हें बोलों न लाहे विनिर्गमें ॥२१५॥तैसाचि संबंध कोण्ही एक । होऊनि भगवंतीं पडतां ऐक्य । तो तेव्हांचि उत्तमश्लोक । होय चित्सुख सामरस्यें ॥१६॥अथवा उच्चनीचयोनि । कोणी एक जन्मोनि प्राणी । निःसीम प्रेमा भगवद्भजनीं । तैं निर्वाणीं समरसता ॥१७॥इत्यादि कोण्ही एक्या भावीं । अजस्र प्रेमा वासुदेवीं । जडतां तन्मयता पावावी । हे अचिंत्य दैवी योगशक्ति ॥१८॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP