अध्याय २९ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीकृष्णस्वामिने नमः ॥
कैवल्यसुखाचें पारणें । प्रणता जयाच्या पादस्मरणें । तो गोविंद सद्गुरु अंतःकरणें । सप्रेमध्यानें कवळिला ॥१॥
स्वस्वरूपाच्या विमुखपणें । जीवा कैवल्यसुख नेणणें । बाह्यविषयांचेनि भानें । संतत शिणणें सुखलाभा ॥२॥
लक्षचौर्यांशीं योनीप्रति । वाहतां विषयांची सुखावाप्ति । इच्छूनि भवोद्भवें भरती । दुःखदुर्गतीमाजिवडे ॥३॥
सर्वयोनींमाजि ज्ञान । सांचलसूचकध्वनिबोधन । तैसेंचि स्पर्श तें वेदन । खेद मोदन परस्परें ॥४॥
तैसेचि सर्वांठायीं चक्षु । रूपमात्र शकती लक्षूं । जातिविषयें सुखोत्कर्षु । क्लेशविशेषभय बोधें ॥५॥
तैसीच नैसर्गिक रसना । जातिवैशिष्ट्यें रसज्ञा । जाणे आणि अवघ्राणा । घ्राणकोविद निसर्गें ॥६॥
आहार निद्रा भय मैथुन । सर्वेंद्रियीं इतुकेंचि ज्ञान । भूत भविष्य वर्तमान । पाप पुण्य अनोळख ॥७॥
इहामुष्मिक पारावार । वेदशास्त्र कुलाचार । वृत्ति व्यवसाय अहंकार । दीर्घतर संग्रह ॥८॥
इत्यादि बोध नाहीं त्यांसी । विमुख तुरीयेच्या प्रवेशीं । जागृतिस्वप्नसुषुप्तींपाशीं । निबद्ध जालीं गुणकर्में ॥९॥
सर्पीं नेत्रेंचि ऐकावें । पश्वादी घ्राणें वोळखावें । मयूरीं नेत्रेंचि रमावें । पदीं सेवावें उद्भिज्जें ॥१०॥
ऐसिया अनेक योनीप्रती । विपरीत अनेकि इंद्रियवृत्ति । नैसर्गिक विषयप्रवृत्ति । साधनसंपति त्यां कैंची ॥११॥
बहुत पशु होऊनि एक । आदरें घेती काय श्रवणसुख । वक्ता बैसवूनि सम्मुख । ज्ञाता सम्यक पशुवर्य ॥१२॥
जाणोनि आयुर्दायविशेष । सर्प न करिती योगाभ्यास । चिरायु क्रमिती गगनास । परी यात्रा वायस न करिती ॥१३॥
हस्तपादादिसंपन्न । म्हणोनि रीसवानरगण । न करिती वेद्शास्त्रपठण । कर्माचरण श्रौतादि ॥१४॥
एवमादि सर्वजाति । तुरीयबोधेंचिं वर्तती । अनुपरमें तुरीयास्थिति । दुर्लभ त्यांप्रति सर्वत्र ॥१५॥
म्हणोनि न खंडे जन्ममरण । आणि न वाढेचि क्रियमाण । प्रारब्ध मात्र होय क्षीण । वर्ष्मपतनपर्यंत ॥१६॥
ऐसे अनेक जन्म घेतां । वेंचिती आगळ्या संचिता । पापपुण्या ये तुल्यता । तैं लाभे तत्त्वता नरदेह ॥१७॥
ऐसा नरदेह अवचट जोडे । तेथही विषयसुखाचे चाडे । कर्माचरण करूनि पुढें । भोगिती बापुडे दुर्योनि ॥१८॥
लाहोनियां नरदेह सार । निर्दय हिंसक ढीवर । निषादादि परमक्रूर । पुन्हा अघोर नारकी ॥१९॥
एक तृणकाष्ठाछेदक । एक कृषीवळ भूकर्षक । शिल्पिक नापिक कारुक । वार्धुषिक नटकादि ॥२०॥
पोषिती व्याघ्र सर्प वृश्चिक । काढिती अमंगल मूत्रनरक । ऐसे व्यवसाय अनेक । दुर्विवेक पोटार्थ ॥२१॥
जन्मापासूनि मरणपरी । विषयांवेगळी गोष्ठी दुसरी । नुमजों देतां षड्विकारीं । ज्यां षड्वैरि जाचिती ॥२२॥
ऐशा नरदेहाचिया प्राप्ति । लाहोनि वृथा नरका जाति । त्यांसि दुर्लभ तव पदप्रणति । ते भवभ्रांतिवरपडे ॥२३॥
दुर्लभनरदेहाची प्राप्ति । त्याहूनि दुर्लभ सत्संगति । तेथही दुर्लभ सत्प्रवृत्ति । जे दे रति सत्संगीं ॥२४॥
सत्संगतीं वेधतां मन । प्रवृत्ति निवृत्ति होय श्रवण । सारासार कळतां पूर्ण । करी प्रयत्न सारार्थ ॥२५॥
तेव्हां असारीं होय विरत । सप्रेमनिष्कामभजनीं रत । सारांश जाणोनि निजात्मस्वार्थ । अतिंद्रित शमषट्कीं ॥२६॥
इत्यादि साधनीं भगवान । द्रवे कारुण्यें कळवळून । तेव्हां सद्गुरुसन्निधान । करूनि भजन प्रमोदे ॥२७॥
भगवत्प्रसादजानितभक्ति । तरीच निर्विघ्न गुरुपदराति । येरां मृगजलाचिये स्थिती । बाह्यप्रवृत्ति नाथिली ॥२८॥
एवं भगवद्वरदप्रणतां । कैवल्यपारणें गुरुपदभक्तां । अनेककल्प योनि करूनि साधनांची पाउटी । साधनांमुकुटीं गुरुभक्ति ॥२९॥
गुरुपदभजकां मोक्षासाठीं । न लगे साधनीं आटाआटी । करूनि साधनांची पाउटी । साधनांमुकुटीं गुरुभक्ति ॥३०॥
यालागीं प्रणतीं चरणस्मरण । करितां कैवल्यसुख संपूर्ण । भोगूनि निवविती ते निजशरण । मिथ्या भवभान उमजवूनी ॥३१॥
तो गोमतीआनंदकंद । मजमाजि नांदे श्रीगोविंद । सबाह्य सप्रेम ध्यानानंद । अनन्य अभेद प्रकटला ॥३२॥
आतां वक्ता आणि वदविता । एकात्मतेची लाहती सत्ता । तथापि श्रीचरणापरौता । लाभ तत्वता मज नुमसो ॥३३॥
ऐसें ऐकोनि अभेद स्तवन । वशी करूनि अंतःकरण । कृपेनें दिधली आठवण । ग्रंथ निर्माण करावया ॥३४॥
अठ्ठाविसाव्या अध्यायांतीं । वैकुंठदर्शन गोपांप्रति । देऊनि पुढती पूर्वस्थिति । यथाप्रवृत्ति आणिले ॥३५॥
यावरी गोपींच्या वरोत्तीर्णा । कामक्रीडाविडंबना । देऊनि करील मन्मथमथना । त्रैलोक्यराणा तें ऐका ॥३६॥
आतां एकोणतिसावा । अध्याय आरंभिला बरवा । येथूनि रासरसाब्धिहेलावा । तेतिसावापर्यंत ॥३७॥
या अध्यायीं कृष्णगीता । ऐकोनि गोपी विरहतप्ता । वनीं वनमाळी संप्राप्ता । तेणें धर्मता वारिल्या ॥३८॥
तिहीं प्रत्युक्तिभाषण । अभेदप्रेमा दर्शवून । सूचिलें दुस्त्यज भगवचरण । मग झाला रमोन हरि गुप्त ॥३९॥
इतुकी कथा ये अध्यायीं । परिसे परीक्षिति प्रायोपशासी । मुनिनिर्वाणसुखनवायी । नृपा ये ठायीं निरूपी ॥४०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 03, 2017
TOP