अध्याय २९ वा - श्लोक ६ ते ११

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


परिवेषयंत्यस्तद्धित्वा पाययंत्यः शिशून्पयः । शुश्रूषंत्यः पतीन्काश्चिदश्नंत्योऽपास्य भोजनम् ॥६॥

भोक्तयांच्या बैसल्या पंक्ति । त्यांसि वाढितां गोपयुवति । कृष्णगीतें हरिल्या स्मृति । त्यागूनि जाती तत्कर्में ॥१२॥
पय पाजितां निजलेंकरें । गायनीं रमलीं अभ्यंतरें । टाकूनि धांवत्या झाल्या त्वरें । प्रेम बावरें हरिवेधें ॥१३॥
सुखशेजारीं असतां भर्त्ता । तत्सेवनीं ज्या अभिरतां । तिहीं ऐकतां कृष्णगीता । टाकूनि स्वकांतां धांविल्या ॥१४॥
रुचतां कृष्णध्वनीची गोडी । कांत न रुचती जैसीं मडीं । उन्मन मानसें जालीं वेडीं । बाह्यपरवडी विसरलीं ॥११५॥
एकी भोजना बैसल्या ताटीं । कोण्ही जेविल्या अर्धपोटीं । कोण्ही ग्रास मोडिले बोटीं । कोण्ही वोठीं स्पर्शिले ॥१६॥
तंव कृष्णाचें मधुर गान । श्रवणमार्गें झडपी मन । सवें विसरल्या देहभान । टाकूनि भोजन धाविन्नल्या ॥१७॥
लागतां कृष्णगीताची गोडी । रसना विसरली रसपरवडी । भोज्यभोजनभोक्तृत्व सोडी । वेधें आवडी उपरमे ॥१८॥

लिंपंत्य प्रमृजंत्योऽन्या अंजंत्यः काश्च लोचने । व्यत्यस्तवस्त्राभरणाः काश्चित्कृष्णांतिकं ययुः ॥७॥

एकीं सारवितां गृहाजिरें । वेधिल्या कृष्णगीतस्वरें । धांवत्या जाल्या तैशाच करें । स्मृति न स्मरे । तनुभावा ॥१९॥
डोई चिकटली जाणोनि नारी । कृष्णमृत्तिका मर्दिती शिरीं । तंव कृष्णगीताची माधुरी । भरे अंतरीं वेधक ॥१२०॥
कृष्णगीतें हरितां मना । तनु न स्मरती नग्नानग्ना । मृत्तिका लेपिली कचकुदवदना । धांवती वना ध्वनिपंथें ॥२१॥
कित्तेक अभ्यंगीं स्नेहाक्ता । उद्वर्त्तनीं उद्वर्तितां । नग्नाअनग्ना तद्द्रव्यलिप्ता । भूषणरहिता धांवती ॥२२॥
अंजनवर्तिका घेऊनि करीं । अंजन रेखिलें अर्धनेत्रीं । तंव कृष्णगीत मानसां हरी । भुलल्या नारी तद्वेधें ॥२३॥
अंजनशलाका तैसीच हस्तीं । सांडूनि हंसगति गजगति । पवनवेगें धांवती पंथीं । विवशस्मृति देहभावीं ॥२४॥
एकी नेसणी पांघुरल्या । एकी प्रावरणें नेसल्या । एकीं विपरीत भूषा केल्या । हस्तपादादि अवयवीं ॥१२५॥
एकीं मेखळा घातल्या कंठीं । कंठभूषणें मणगटीं । चरणांगुळीं एकांची दाटी । घालिती मुकुटीं वेणिये ॥२६॥
एकीं पुष्पें घातिलीं मुखीं । तांबूल तुरंबिलें मस्तकीं । करणाभरणाअनोळखी । श्रीकृष्णसुखीं स्मृति रमली ॥२७॥
पंकजगंधा वाहे पवन । तेणें मार्गें भ्रमरागमन । तेंवि ऐकोन कृष्णगान । करिती धावन तत्पथें ॥२८॥
एवं तनुमनभावीं विवशा । कृष्णगायनवेधवशा । कृष्णापाशीं मीनल्या कैशा । भवदुराशा नुरवुनी ॥२९॥
ऐशा विवश धांवतां नारी । कोण्ही निषेधक नव्हते घरीं । ऐशा संदेह धरूनि चतुरीं । शंका अंतरीं हें न कीचे ॥१३०॥
बाह्य कृष्णार्थ करितां कर्म । अंतर वेधी तद्गुणप्रेम । वेधे विह्वळ इंद्रियग्राम । तैं कर्मसंभ्रम व्यत्यस्त ॥३१॥
कृष्णभजनीं विपरीतता । कृष्णप्रेम त्यां सांगतां । गोपी वेधूनि कृष्णगीता । विवशसंकेता सूचिलें ॥३२॥
कृष्णभजनीं ज्या सस्निग्धा । त्यांसि विघ्नाची न बाधी बाधा । यालागीं गोपींच्या निषेधा । कोण्हा निरोधा न करवे ॥३३॥

ता वार्त्यमाणाः पतिभिः पितृभिर्भ्रातृबंधुभिः । गोविंदापहृतात्मानो न न्यवर्तंत मोहिताः ॥८॥

इहामुत्रीं ज्या विरक्तमना । भवसुखसंमान मानिती वमना । त्यांसि निषेध करवे कोणा । आप्तां स्वजनां कां इतरां ॥३४॥
आकाश तुटोनि पडल्यावरी । विरोनि ठिकर्‍या होय धरित्री । कां उपडोनि गडबडां लोटल्या गिरी । विरक्त अंतरीं न डंडळिती ॥१३५॥
लोटतां प्रळयसिंधुजळ । कीं वरी पडतां वज्रकल्लोळ । कोपें खवळतां कृतांत काळ । विरक्त निश्चळ निर्मम ॥३६॥
देहस्मृतीचें अस्तमान । कोण सांभाळी प्रपंचभान । मान अपमान कीं सम्मान । इत्यादि ज्ञान कोण मनी ॥३७॥
गोपी हरिरंगीं होऊनि सक्ता । इहामुष्मिकीं ज्या विरक्ता । विवश भुलोनि कृष्णगीता । वना धांवत निशिगर्भीं ॥३८॥
गृहासक्तीची सबळ काठी । घेऊनि भर्तार लागती पाठीं । त्यांस न गणितां देऊनि पाठीं । दाटोदाटीं निघाल्या ॥३९॥
मातापितरें अतिसवेग । शीळभंगभयाची डांग । घेऊनि पाठीं करिती लाग । पळती आंग चुकवुनी ॥१४०॥
बंधु लोकलज्जेच्या दोरें । कवळोनि बांधों धांवती निकरें । कृष्णानुरक्ता सप्रेमभरें । निजनिर्धारें धांवती ॥४१॥
गोत्राभिमानें भ्रातृगण । वृत्तिक्षेत्रादि धान्यधन । इत्यादि रज्जूंचें बंधन । त्या रोधन करूं पाहती ॥४२॥
परी त्या उमरडूनि तयांसी । गोपकांता कांतारासी । सप्रेमवेधें कृष्णापाशीं । धांवती निशी न गणूनी ॥४३॥
पैशून्यादि मर्मस्पर्श । कुटिलोक्तीचे घालूनि पाश । बांधों पाहती सुहृद अशेष । परी त्या उदास नावरती ॥४४॥
स्नेहपाशें कुमरी कुमरें । बांधों धांवती अभ्यंतरें । परी त्या लोटूनि ममतासूत्रें । बलात्कारें निघाल्या ॥१४५॥
इत्यादि सर्व ईषणात्यागें । सवेग धांवती त्या विरागें । ममता लोभ घालूनि मागें । श्रीरंगरंगें रंगल्या ॥४६॥
गोपी जेवीं सुपक्कदळें । झगटतां श्रीकृष्णगीतानिळें । सोडूनि द्रुमाचीं डाहाळे कुळें । निर्मम चपळें वावडती ॥४७॥
कीं भास्करोदयीं अंडजगण । प्रपंचद्रुमींचें सांडूनि स्थान । हरिसुखचारा अभिलक्षून । करिती धावन निःशंका ॥४८॥
ऐशा निराट गोपनारी । भगवन्निरत विरता घरीं । भरल्या निशीगर्भीं कांतारीं । मधुरस्वरीं गुंतोनी ॥४९॥
गीतध्वनीचा लक्षूनि मार्ग । हरिप्राप्तीचा करिती लाग । भवसुखवैरस्यें अभंग । श्रीरंगसंगसकामा ॥१५०॥
राया अपूर्व याहीवरी । परिसें हरिविरहाची थोरी । एकी बल्लवीं बळात्कारीं । गृहामाझारीं कोंडिल्या ॥५१॥

अंतर्गृहगताः काश्चिद्गोप्योऽलब्धविनिर्गमाः । कृष्णं तद्भावनायुक्ता दध्युर्मीलितलोचनाः ॥९॥

कृष्णप्रेमासक्त रामा । परी कोंडल्या माजि धामा । न लाहती हरिगीतवर्त्मा । कीं निबद्ध कर्मामाजिवड्या ॥५२॥
बृहदारण्यीं हरिनिश्वसित । उपनिषच्छुतिरूप कृष्णगीत । ज्यांसि नव्हेचि श्रवणागत । अलब्ध पथ यालागीं ॥५३॥
निरुद्ध प्रारब्धकर्मधामीं । कोंडूनि ठेल्या इंद्रियग्रामीं । परी प्रेमा अभंग निष्कामकामीं । मेघश्यामीं जयांचा ॥५४॥
श्रवण न होतां साधनपथ । विरक्तिनिर्गम कैंचा प्राप्त । यालागीं कोंडल्या प्राक्तनांत परी आसक्त हरिरूपीं ॥१५५॥
मेघश्याम भगवन्मूर्ति । प्रतीतिगोचर जैसी होती । निरतिशयें ते चिंतूनि चित्तीं । ध्यानस्थिति कवळिली ॥५६॥
मग त्या अर्धोन्मीलितदृष्टि । तुरीयेपोटीं बाह्यसृष्टीं । सांठवूनियां उठाउठीं । ते केली पैठी चित्स्वरूपीं ॥५७॥
अचिंत्यैश्वर्यभगवान । त्याचें लागतां तीव्र ध्यान । निर्गुण हो कां अथवा सगुण । दृढभवबंधनच्छेदक तें ॥५८॥

दुःसहप्रेष्ठविरहतीव्रतापधुताशुभाः । ध्यानप्राप्ताच्युताश्लेषनिर्वृत्त्या क्षीणमंगलाः ॥१०॥
तमेव परमात्मानं जारबुद्ध्याऽपि संगताः । जहुर्गुणमयं देहं सद्यः प्रक्षीणबंधनाः ॥११॥

तीव्रध्यानें भगवन्निरता । कृष्णसुखीं ज्या संप्राप्ता । देहादित्रिगुणात्मक अहंता । त्यागूनि निर्मुक्ता त्या जाल्या ॥५९॥
आशंकाद्वय येथें स्फुरे । श्लोकद्वयें तें परिसंहरे । क्षणैक निश्चळ अभ्यंतरें । तीं उत्तरें परिसावीं ॥१६०॥
जारबुद्धी सगुणप्रेम । धरूनि भजतां पुरुषोत्तम । त्यांसि कैसें कैवल्यधाम । निर्गुण परब्रह्म नुमजतां ॥६१॥
येथ समर्थ वस्तुमहिमा । पंगिस्त नोहे ज्ञानधर्मा । अमृत सेवितां मरणकामा । नापी आत्मा मृत्यूतें ॥६२॥
संचित प्रारब्ध आणि क्रियमाण । त्रिविध कर्म जें पापपुण्य । भोगें न होतां पुरतें क्षीण । गुणबंधन केंवि तुटे ॥६३॥
निष्कामकर्में चरमदेहीं । सविराम अपरोक्षज्ञानें पाहीं । देहअहंता विरतां नाहीं । संचित आणि क्रियमाण ॥६४॥
संचितनाहें ज्ञानोदयें । क्रियमाणही अहंतालयें । भोगावेगळां प्रारब्धक्षय । कोण्या अन्वयें बोलिला ॥१६५॥
प्रारब्धक्षय जाला नसतां । शुभाशुभ सुखदुःख न भोगितां । कैंची गुणबंधा क्षीणता । बंधुनिर्मुक्तता केंवि वदा ॥६६॥
न साहती क्लेश बहळ । यालागीं दुःखभोगीं काळ । बहुत लागे तये वेळे । विरहें केवळ भोगिले ॥६७॥
प्रियतमभगवव्द्विरहक्षोभें । तिहीं सर्वां जाळिलें उभें । कोटियुगांचीं निमेषगर्भें । गगनें अशुभें भोगिलीं ॥६८॥
सप्रेमभगवत्तनुचिंतनें । सुख भोगितां तदालिंगनें । त्रिविधें सुकृतात्मकबंधनें । तीं तत्क्षणें तूटलीं ॥६९॥
विरहजदुःखाश्लेषसुख । गोपी भगवद्ध्यानोन्मुख । भोगूनि देह त्रिगुणात्मक । तिहीं सम्यक त्यागिलें ॥१७०॥
एवं गुणबंधनिर्मुक्ता । निर्विकार सप्रेमभरिता । कृष्णस्वरूपीं सायुज्यता । निजएकांता पावल्या ॥७१॥
ऐसें ऐकतां निरूपण । संशयवातें दोलायमान । नृपाचें मानसपंकज पूर्ण । झालें म्हणोन पुसतसे ॥७२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP