अध्याय २० वा - श्लोक ४६ ते ४९
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
गावो मृगाः खगा नार्यः पुष्पिण्यः शरदाऽभवन् अन्वीयमानाः स्ववृषैः फलैरीशक्रिया इव ॥४६॥
आनंदभरें शरदावसरी । धेनु पक्षिणी मृगी का नारी । कामी कांत नेच्छी जरी । बळात्कारीं उपयुक्त ॥८८॥
चाटु चटुल क्रीडारोळें । हावभावें मोडिती डोळे । क्षेमालिंगनें कंदर्पलीले । पुरुषा बळें कवळिती ॥८९॥
कां जे शरदृतूचा महिमा । पुष्पिणी म्हणिजे ऋतुमती रामा । चित्तें अनुसरोनियां कामा । सुरतीं प्रेमा स्वकांतीं ॥२९०॥
जैशा नित्यनैमित्तिकक्रिया । ईश्वराराधनार्थ केलिया । फ्गळ न मागतां फळलिया । बळें आलिया भोगार्थ ॥९१॥
उदहृष्यन् वारिजानि सूर्योत्थाने कुमुद्विना । राज्ञा तु निर्भया लोका यथा दस्यून्विना नृप ॥४७॥
शुक म्हणे गा परीक्षिति । शरदीं उगवतां गभस्ति । कुमुदांवांचूनि कमलांप्रति । आल्हाद चित्तीं न समाये ॥९२॥
जैसें नृपाच्या आगमनीं । दस्युतस्करां पडे पळणी । त्यां वेगळे सर्वजनीं आनंदोनि वर्तिजे ॥९३॥
चरमदिग्वधूमंदिरा । जातां देखोनि दिनकरा । पद्मिनी पतिव्रता सुंदरा । ईर्ष्यापरा कोमाइल्या ॥९४॥
पुन्हा देखोनि मित्रागमन । सर्वसंकोच विसर्जून । प्रेमेम उत्फुल्ल होऊन । होती निमग्न स्वानंदीं ॥२९५॥
परंतु दुःखिता कुमुदिनी । जैशा वनिता व्यभिचारिणी । येतां स्वकांत देखोनी । जार असोनि तिरोहिता ॥९६॥
तैसा चंद्र असोनि गगनीं । सूर्य आलिंगितां पद्मिनी । संकोच पावती कुमुदिनी । जैशा स्वैरिणी लज्जिता ॥९७॥
आणि तैसेचि सत्पांथिक । स्वमार्गाचारें वर्तती लोक । दस्यु तस्कर दुरात्मक । भयें साशंक लोपती ॥९८॥
जैसें नृपाच्या दर्शनीं । जार तस्कर लोपती दोन्ही । येर आनंदें वर्ततीं जनीं । तेवि पद्मिनी शरदकीं ॥९९॥
पुरग्रामेष्वाग्रयणैरैद्रियैश्च महोत्सवैः । बभौ भूः पक्कसस्याढ्या कलाभ्यां नितरां हरेः ॥४८॥
शरत्कालीं नानापरी । शोभती झाली वसुंधरी । पुरीं पट्टणीं ग्रामीं नगरीं । उत्साहगजरीं बहुविधा ॥३००॥
ब्राह्मणादि वर्णत्रय । जे आहिताग्नि सदन्वय । नवान्नप्राशनीं प्रवृत्तिविनय । यथाम्नाय आग्रयणीं ॥१॥
येर शांतिकें पुष्टिकें । क्षेमकल्याणकारकें । इंद्रियद्वारा विषयसुखें । अभिवर्धकें जीं कर्में ॥२॥
गर्भाधानें पुंसवनें । जातकर्में नामकरणें । अन्नप्राशनें निष्क्रमणें । चौलोपनयनें व्रतादि ॥३॥
समाराधनें यज्ञ दानें । नानाव्रतांचीं उद्यापनें । तुळसीधात्र्यादिपूजनें । वनभोजनें वनयात्रा ॥४॥
महोत्साह हे इंद्रियपर । यांसि ऐंद्रिय हा उच्चार । भूमि सस्याढ्य सफळतर । आनंदकर करणांसी ॥३०५॥
शरत्काळीं कलभाषणें । पक्षिविराव द्विजाध्ययनें । पेषणें कंडनें दधिमंथनें । गाती गायनें पुरंध्री ॥६॥
इत्यादि श्रवणें सुखकारके । शरत्काळींचें कौतुके । त्वगिंद्रियासि वाटे हरिखे । दांपत्तिकसंस्पर्शें ॥७॥
समसमान शीत उष्ण । यालागीं आवडे वस्त्राभरण । स्वच्छ सालंकृत देखोन । उत्साहपूर्ण परस्परें ॥८॥
वनीं सकळ सफळ तरु । लता वीरुध सुमनभारु । जळें वाहती अमृतसारु । अनंदकरु सर्वार्थीं ॥९॥
शरत्काळीं जनीं वनीं । ऐशीं शोभा सुखकर नयनीं । तैशीच रसज्ञेलागुनी । रसास्वादनीं उत्साह ॥३१०॥
फळें मूळें नूतन धान्यें । मधुघृततैलादि कषायलवणें । यथेष्ट दुभती नवगोधनें । अन्नपानें स्वादिष्टें ॥११॥
तिक्त अम्ल कशाय कटु । मधुर क्षार रसनापटु । मिळती षड्रस एकवाटु । शरत्काळीं सर्वत्र ॥१२॥
पद्माकरीं परागधूलि । सुमनें मघमघिती परिमळीं । सस्यें सुगंध षड्रस साळी । शरत्काळीं जिघृष्ट ॥१३॥
इत्यादि महोत्सवीं बहळ । शोभे शोभाढ्य भूमंडळ । त्याहूनि विशेष व्रजमंडळ । रामगोपाळक्रीडेनें ॥१४॥
उत्तर दक्षिण समान कळा । सूर्यें अधिष्ठिजे तुळा । चंद्रादित्य हरीच्या कळा । भूमंडळा शोभविती ॥३१५॥
दिवापति रजनीपति । ते हे बळराम श्रीपति । व्रजभुवनीं प्रकाशिती । गोपयुवतिकुमुदाब्जें ॥१६॥
नितराम् म्हणिजे येथें स्पष्ट । हरीचा विशेष महिमा प्रकट । दोघे असतां एकवाट । सुखें संतुष्ट कुमुदाब्जें ॥१७॥
यशोदादि स्निग्धा गौळणी । प्रकट प्रेमाच्या पद्मिनी । येर सकामा कुमुदिनी । कुत्सिताचरणीं निशीं रम्या ॥१८॥
कुत्सितमोदा अधिष्ठान । म्हणोनि कुमुदे हें अभिधान । अर्थ जाणती सर्वज्ञ । येर सामान्य गुंतती ॥१९॥
कृष्णींही जरी अविधि प्रेमा । तरी तो म्हणती कुमुदनामा । कां जे ऐशा पुढें रामा । विषयीं अधमा भ्रष्टती ॥३२०॥
कुत्सितमार्गें जे जे मुद । ते ते नामें बोलिजे कुमुद । स्वधर्ममार्गें पाविजे सुमुद । धर्मकोविद जाणती ॥२१॥
भावी गोपींचें अंतर । जाणूनि बोलिला योगींद्र । ऐसें जाणतां राजेंद्र । प्रश्नीं तत्पर न होय ॥२२॥
जेवीं जातीचे कोमळ कळिके । घ्राणदेवता सुगंध नचखे । हृदयीं जाणे कीं जेव्हां फाके । तैं दे सुखें सौरभ्य ॥२३॥
तेवीं गोपींचा मनोरथ । पुढिले अध्यायीं विशदर्थ । बोलणार तो हा येथ । श्रोतीं संकेत जाणावा ॥२४॥
यावरी मुनि बादरायणि । शरद्वर्णनोपसंहरणीं । अध्यायान्तीं श्लोक वर्णी । तो श्रोतीं करणीं परिसिजे ॥३२५॥
वणिड्मुनिनृपस्नाता निर्गम्यार्थान् प्रपेदिरे । वर्षरुद्धा यथा सिद्धाः स्वपिंडन् काल आगते ॥४९॥
प्रावृट्काळीं रोधल्या वृत्ति । होतां स्वच्छ शरत्प्राप्ति । आपुलाले उपतिष्ठति । लोक वर्तती तें ऐका ॥२६॥
वर्षरुद्धव्यासंगक । नानापरीचे वार्धुषिक । स्थळोस्थळीं ते जाती देख । स्वार्थ सम्यक साधावया ॥२७॥
तैसेच वर्षारुद्धमुनि । राहिले होते नानास्थानीं । ते ते तोषोनि शरदागमनीं । स्वेच्छा प्रयाणीं प्रवर्तती ॥२८॥
तैसेचि राजे वर्षारुद्ध । अश्वगजादिशाळा विविध । शरदागमीं सेनाबद्ध । जाती सन्नद्ध दिग्विजया ॥२९॥
आणि उपनीतक स्नातक । वार्षिकीं सेविती जननीजनक । शरत्काळीं ते देशिक । सेऊनि सम्यक् श्रुति पढती ॥३३०॥
एवं स्वार्थ जे जे ज्यांचे । व्यवसायसाधनोपाय त्यांचे । शरदागमीं लोक साचे । प्रतिपादिती संतोषें ॥३१॥
जैसे मांत्रिक कां योगी सिद्ध । करूनि राहिले आयुष्यरोध । सिद्धि लाधतां ते प्रसिद्ध । देहतादात्म्य त्यागिती ॥३२॥
मग योगसिद्धीचिये संपत्ती । देवगंधर्वकिन्नरयाती - । सारिखे पिंड नवे लाहती । तेंवि अर्थावाप्ति वाणिजादिकां ॥३३॥
एवं प्रावृट्शरच्छोभा । दृष्टांतरूप प्रबोधगर्भा । माजि क्रीडतां पद्मनाभा । विश्ववल्लभा अघहंत्री ॥३४॥
जैसें सामान्य सरितोदक । चरण क्षाळितां देशिक । सार्धत्रिकोटितीर्थात्मक । होय सम्यक् तत्क्षणीं ॥३३५॥
तैसा क्रीडतां पुरुषोत्तमा । ऋतुद्वयाचा एवढा महिमा । कथनीं शुकासि चढतां प्रेमा । नृपसत्तमा श्रवणार्ह ॥३६॥
तस्माद्योनिवर्णाश्रम । न म्हणोनियां अधमोत्तम । जेथें रंगला पुरुषोत्तम । तेथ प्रेम त्रिजगाचें ॥३७॥
तुळसी म्हणिजे रानींचें झाड । गोवर्धन तो केवळ दगड । तैसाचि पाञ्चजन्य हाड । आवडी गोड श्रीकृष्णाची ॥३८॥
कीं पाखराचे पांख बर्ह । कृष्णप्रियतम विश्वीं अर्ह । एवं साहूनि योग्यतागर्व । मानिजे सर्व हरियोगें ॥३९॥
प्रेम बांधिती श्रीकृष्णचरणीं । वैकुंठ सांडोनि धांवे धरणी । प्रेमळाचे अंतःकरणीं । नांदे करणीं प्रकटोनी ॥३४०॥
ते मग होती विश्ववंद्य । त्यासी न भजती तेचि निंद्य । ऐसा भक्तिमहिमा आद्य । सप्रेम वंद्य परस्परें ॥४१॥
यालागीं सर्वांसि हेचि खूण । सप्रेम पढावे हरीचे गुण । श्रवण कीर्तन नामस्मरण । करिती श्रीकृष्ण घररिघे ॥४२॥
कृष्णचरणीं जडल्या मन । तेव्हां कृष्णचि अवघे जन । सहजींसहज कृष्णार्पण । प्रकटे भजन अहेतुक ॥४३॥
ऐशी प्रावॄट्शरत्काळीं । कृष्णें केली बाळकेलि । शुकें कथिली नृपाजवळी । तो हृत्कमळीं निवाला ॥४४॥
तें हें भागवत अजस्र । संख्या अष्टादशसहस्र । परमहंसासि प्रियकर । स्कंध विचित्र दशम हा ॥३४५॥
प्रावॄट्शरत्काळ दोन्ही । उपमाविशेषविशेषणीं । आणि बळराम चक्रपाणि । क्रीडले वनीं कथिलें ॥४६॥
पुढिले अध्यायीं गोपिकांसी । कृष्ण आठवितां मानसीं । जैशा करिती संवादासी । तो रायासि शुक सांगे ॥४७॥
तये कथेचे श्रवणयात्रे । घेऊनि यावें अवधानमात्रे । संवादसंगमीं मज्जतां श्रोत्रें । चिन्मात्र गात्रें पूतत्वें ॥४८॥
पूर्णब्रह्म नारायण । तदनुगृहीत चतुरानन । अत्रि तयाचा नंदन । अत्रिसूनु श्रीदत्त ॥४९॥
अत्रिपादप्रसादलब्ध । दत्तात्रेय महासिद्ध । त्याचा अनुग्रह प्रसिद्ध । जनार्दन स्वामीतें ॥३५०॥
वायुपुराणीं इतिहास । ब्रह्मविद्येचा उपदेश । नारदें केला श्रीदत्तास । अत्र्यादेशपूर्वक ॥५१॥
श्रीरामासी अनुग्राहक । वशिष्ठाज्ञेनें श्रीकौशिक । हाही तैसाचि विवेक । परंपरात्मक जाणती ॥५२॥
जनार्दनकृपेनें सनाथ । एकनिष्ठ तो एकनाथ । ज्याचे घरीं द्वारकानाथ । सेवास्वार्थसाधक ॥५३॥
एकनाथकृपावरद । पूर्ण लाधला चिदानंद । तेणें बोधिला स्वानंद । सुखसंवाद सन्मात्र ॥५४॥
तया स्वानंदसुखाचा ठाव । तो सद्गुरु गोविंदराव । पादोदकें दयार्णव । अगाध भरिला गोविंदें ॥३५५॥
गुरुतीर्थाची आवडी ज्यासी । तिहीं देऊनि अवधानासी । श्रवणमार्गें कैवल्यकाशी । यात्रासिद्धि साधावी ॥५६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायाम दयार्णवानुचरविरचितायां प्रावृट्शरत्कालवर्णनं नाम विंशोऽध्यायः ॥२०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४९॥ टीका ओव्या ॥३५६॥ एवं संख्या ॥४०५॥ श्रीगुरुशिवाय नमः ॥ ( विसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १०९६३ )
विसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP