अध्याय २० वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गिरयो मुमुचुस्तोयं क्कचिन्न मुमुचुः शिवम् यथा ज्ञानामृतं काले ज्ञानिनो ददते न वा ॥३६॥

शरत्काळीं गिरिवर । कोठें कोठें स्रवती नीर । येर सर्वत्र कठोर । अल्प पाझर न द्रवती ॥५९॥
जैसे प्रावृट्काळीं गिरि । सर्वत्र वाहती तोयधारीं । शरदागमीं तयापरी । निर्मलनीरीं न द्रवती ॥२६०॥
पूर्वमीमांसा उपाध्याय । सर्वत्र करविती स्वाध्याय । तैसे ज्ञानी स्वप्रत्यय । लाभतां सोय न वदती ॥६१॥
कोणा एकाच्या शुद्ध भावें । कृपे द्रवोनि निजानुभवें । ज्ञानामृत करिती ठावें । कैवल्यसीमे पावविती ॥६२॥
तैसे शरत्कालीं गिरि । क्कचिद्द्रवती निर्मळनीरीं । येर विरक्तांचिये परी । सर्वप्रकारीं निर्मम ॥६३॥

नैवाविदन्क्षीयमाणं जलं गाधजलेचराः । यथायुरन्वहं क्षय्यं नरा मूढाः कुटुंबिनः ॥३७॥

शरत्काळीं उतळें जळें । नित्य आटतां जलचरां न कळे । दिवसेंदिवस आयुष्य पळे । नेणती केवळें मूढमति ॥६४॥
कुटुंबाचिये भरोवरी । लोभें भ्रमतां दिवारात्री । लागती आयुष्या कातरी । नेणती अंतरीं ते जैसे ॥२६५॥
निःशेष आयुष्याचिये अंतीं । अकस्मात मरोनि जाती । थिल्लरींचिया जलचरांप्रति । तैशीच गति जाणिजे ॥६६॥

गाधवारिचरास्तापमविंदन् शरदर्कजम् । यथा दरिद्रः कृपणः कुटुंब्यविजितेंद्रियः ॥३८॥

शरत्काळींचा तीव्रतरणि । प्रवृत्त सस्यांच्या शोषणीं । तें तें तापे सांचवणीं । होय आहळणी जलचरां ॥६७॥
जैसा दरिद्री दीन कृपण । कुटुंबवत्त्वें इंद्रियाधीन । करूं जातां यथेष्टाचरण । भोगी दारुण संताप ॥६८॥

शनैः शनैर्जहुः पंकं स्थलान्यामं च वीरुधः । यथाहंममतां धीराः शरीरादिष्वनात्मसु ॥३९॥

ठायीं ठायीं उतल्या बिदी । चिखलें मातल्या पापधी । वाळूनि जाती त्या शारदीं । होय भूशुद्धि हळूहळू ॥६९॥
तैशाच वनस्पति अपक्कता । सांडिती हळुहळु तत्त्वतां । बीजें पावती पक्कता । करीं तावितां शरदर्क ॥२७०॥
जैसे विवेकी विचारपर । अनात्मवर्गाचा परिहार । अहंताममतात्यागीं धीर । होती सधर शनैः शनैः ॥७१॥
प्रबोधशरदर्कींच्या किरणीं । ममताकर्दम जाय वाळूनी । ब्रह्माहमस्मि पक्कपणीं । ओषधि निवडोनि निडारती ॥७२॥

निश्चलांबुरभूत्तूर्ष्णीं समुद्रः शरदागमे । आत्मन्युपरते सम्यङ्मुनिर्व्युपरतागमः ॥४०॥

शरत्काळीं वातवर्ष । वारूनि होय निरभ्राकाश । सरिता पूर्वस्वरूपास । पावती अशेष सौम्यत्वें ॥७३॥
तेणें निश्चल होती जळें । समुद्र क्षोभें नुचंबळे । मौन धरूनि सौम्यलीले । तये वेळे अवलंबी ॥७४॥
वेदवेदांगपारंगत । पुरुष दैवें होय विरक्त । तो जेंवि त्यागूनि क्रियाजात । राहे मौनस्थ स्वस्वरूपीं ॥२७५॥
मग तो निजात्मसंतोष । पावोनि सांडी वेदघोष । मौन अवलंबी सावकाश । तेंवि सिंधु संपूर्णत्व ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP