अध्याय २० वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मार्गा बभूपुः संदिग्धास्तृणैश्छन्ना ह्यसंस्कृताः । नाभ्यस्यमानाः श्रुतयो द्विजैः कालहता इव ॥१६॥

प्रावृट्काळीं वृष्टिभरें । तृणें वाढती पैं अपारें । मार्गज्ञान तेणें न स्फुरे । पथकांतारें समसाम्यें ॥२७॥
प्राचीनमार्गपरिज्ञान । लोपोनि दुष्पथ भासे रान । वार्षिकीं चालों न शकती जन । तेणें धोरण बुजालें ॥२८॥
वृक्षपाषाणसीमादि लक्ष । संदिग्ध मार्गें चालती दक्ष । येर अबळें तोचि पक्ष। धरणीकक्ष तुडविती ॥२९॥
जैसें दुष्काळें जठरासाठीं । द्विजीं धावतां अन्नापाठीं । न बैसोनि श्रुतीच्या पाठीं । व्यासंगराहटीं गुंतले ॥१३०॥
तया द्विजांचा श्रुतिप्रणीत । सन्मार्ग होय जैसा उपहत । तृणाच्छन्न तो असंस्कृत । अभ्यासवर्जित अक्षुण्ण ॥३१॥
दुष्काळयोगें मलिनाचार । तेणें लोपती श्रुतिसंस्कार । तये काळींचे ब्राह्मणकुमार । त्यां तो आचार दृढ होय ॥३२॥
भक्ष्याभक्ष्य ग्राह्याग्राह्य । त्याच्यात्याज्यविचार राहे । पोट भरे ज्या उपायें । तो तैं होय निजमार्ग ॥३३॥
तृणें मार्ग आच्छादिती । तेंवि निगमाचार लोपती । गति अभ्यास खुंटती । बुजोनि जाती अक्षुण्ण ॥३४॥

लोकबंधुषु मेघेषु विद्युतश्चलसौहृदाः । स्थैर्यं न चक्रुः कामिन्यः पुरुषेषु गुणिष्विव ॥१७॥

वर्षाकाळींचें कौतुक । पुन्हा अपूर्व वर्णी शुक । त्यामाजीं दृष्टातें विवेक । घेती साधक स्वहितार्थ ॥१३५॥
लोकबंधु मेघ सजळ । सगुण सजळ शिखंडिप्रिय । विद्युल्लता पुंश्चलीप्राय । स्थिर नोहे स्वकांतीं ॥३६॥
जैशा योषिता स्वैरिणी । पुरुष जोडल्या उत्तमगुणी । तेथ न भजोनि चंचलपणीं । यथेष्टाचरणीं दुर्वृत्ता ॥३७॥
तैशा मेघीं चपळ चपळा । जेंवि कटाक्षे पुंश्चली अबळा । सुखप्रकाश दावूनि डोलां । देती सोहळा अंधतमीं ॥३८॥

धनुर्वियति माहेंद्रं निर्गुणं च गुणिन्यभात् । व्यक्ते गुणव्यतिकरेऽगुणवान् पुरुषो यथा ॥१८॥

इंद्रधनुष्य भासे गगनीं । रहित प्रत्यंचा जें अगुणी । गमे टणत्काराचे ध्वनीं । सज्जिलें गुणीं ज्याबद्ध ॥३९॥
जैसें निर्विकार निर्गुण । ब्रह्म सन्मात्र संपूर्ण । गौणप्रपंच पांघरूनि । भासे सगुण सर्वात्मा ॥१४०॥
तैसें निर्गुण शक्रचाप । टणत्कारोनि वर्षे आप । तेणें भासे सप्रताप । सज्जरूप सगुणवंत ॥४१॥

न रराजोडुपश्र्छन्नः स्वज्योत्स्नाराजितैर्घनैः । अहंमत्या भासितया स्वबासा पुरुषो यथा ॥१९॥

प्रावृट्काळीं न शोभे शशी । नभीं फांकोनिही स्वप्रभेसी । मेघ दाटती प्रबलतेसी । इंद्रप्रभेसी छादक ॥४२॥
शुद्धसत्त्वाचीं चंद्रकिरणें । झांकोळती सजल घनें । उदयास्तही कोण्ही नेणें । तमें चांदिणें लोपलिया ॥४३॥
अनंतैश्वर्य परमात्मा । माजी झांकतां अविद्याभ्रमा । देहबुद्धीची होय अमा । निजात्मपरमा लोपोनी ॥४४॥
जीव जैसा निजात्मविसरें । इहामुष्मिक मानी खरें । अष्टमदांच्या आविष्कारें । ज्ञान न स्फुरे वास्तव ॥१४५॥
देहबुद्धीच्या अभिमानें । ज्ञाता कर्ता भोक्ता म्हणे । असंग अमृत असतां नेणे । तैसा घनें शशी लोपे ॥४६॥

मेघागमोत्सवा हृष्टाः प्रत्यनंदन् शिखंडिनः । गृहेषु तप्ता निर्विण्णा यथाऽच्युतजनागमे ॥२०॥

प्रावृट्काळीं मेघ सजळ । देखोनि तोषती कलापिमेळ । सन्मुख धांवती प्रेमविह्वळ । करिती कल्लोळ स्वानंदें ॥४७॥
जैसे संसारी विषयासक्त । त्रितापदुःखें होती विरक्त । त्यांसि भेटतां अच्युतासक्त । आनंदभरित ज्यापरी ॥४८॥
विजातीय कवळूनि मोहो । आत्मबुद्धि पार्थिवदेहो । विषयसुखांचा करितां लाहो । त्रितापदाहो झळंबला ॥४९॥
वणवां पडलिया पाडसा । दाही दिशा भवें वळसा । तैसे शिरकळे कर्मफांसा । विश्रांतिलेशा नेणती ॥१५०॥
त्यांसि अच्युतजनागमन । अवर्षणीं जैसा घन । कीं मरतया अमृतपान । दैवें आणून योजिलें ॥५१॥
अच्युतजनांचे संगति - । मात्रें तापत्रय भंगती । भजनप्रेमा बाणे चित्तीं । बोधे विश्रांति स्वसुखाची ॥५२॥
गीत नृत्य हरिकीर्तनें । आनंदाश्रु ढळती जीवनें । प्रेम संवाद स्फुंदनें । मज्जनोन्मज्जनें स्वानंदीं ॥५३॥
तैसे सजल मेघासमोर । हर्षोत्साहें धांवती मयूर । करिती नृत्य गीत केकार । आनंदाश्रु विसर्जिती ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP