अध्याय २० वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - तयोस्तदद्भुतं कर्म दावाग्नेर्मोक्षमात्मनः । गोपाः स्त्रीभ्यः समाचख्युः प्रलंबवधमेव च ॥१॥
कौरववंशावतंस सुमना । कृष्णलीलामृतरसपाना । मानस आणूनि श्रवणभुवना । सावधान बैसवीं ॥३१॥
परीक्षितीसि सावधान । जाणोनि व्यासाचा नंदन । म्हणे दावाग्नि प्राशून । व्रजीं भगवान् प्रविष्टला ॥३२॥
आपुलालिया सदनाप्रति । गोप गोधनें घेऊनि जाती । ते ते रामकृष्णांची कीर्ति । नूतन कथिती अद्भुत ॥३३॥
माता भगिनी वनिता दुहिता । इत्यादि स्त्रीवर्गां समस्तां । आणि पुरुषांही ग्रामस्थां । कथिती वार्ता अपूर्व ॥३४॥
म्हणती आम्हां ईषीकावनीं । गोधनेंसहित जाळितां अग्नि । करितां कृष्णासी विनवणी । तेणें वदनीं सांठविला ॥३५॥
आच्छादूनि आमुचे नयन । कृष्णें केलें दावाग्निपान । न भरतांचि अर्धक्षण । केलें मोक्षण आमुचें ॥३६॥
गाई महिषी अजा अविक । लहान थोर गोरक्षक । आलों भांडीरवटीं अचुक । नेत्रविमोक करितांची ॥३७॥
आणि प्रलंबनामा दैत्य । गोपवेशें क्रीडासक्त । होऊनि नेला रोहिणीसुत । गगनाआंत वधावया ॥३८॥
कृष्णें जाणोनि तो दुर्जन । राम केला सावधान । तेणें मुष्टिप्रहारेंकरून । विगतप्राण पाडिला ॥३९॥
उभयतांच्या अद्भुतलीला । आजि प्रत्यक्ष देखिल्या डोळां । ऐसें प्रशंसितां गोपाळां । विस्मय सकळां हृत्कमळीं ॥४०॥
गोपवृद्धाश्च गोप्यश्च तदुपाकर्ण्य विस्मिताः । मे निरे देवप्रवरौ कृष्णरामौ व्रजं गतौ ॥२॥
गोपवृद्ध आणि गौळणी । ऐकोनि गोपाळांच्या वाणी । परमविस्मयें अंतःकरणीं । म्हणती करणी अद्भुत हे ॥४१॥
बागुलाभेणें कांपती शिशु । आणि याचा हा उत्कर्षु । तरी हे कोणी पुराणपुरुष । व्रजीं निवास करूं आले ॥४२॥
बाळपणीं हे अद्भुत ख्याति । तरी हे कोण्ही निर्जरपति । वृथा मानूं निजसंतति । मोहभ्रांतीस्तव आम्ही ॥४३॥
ऐसें जाणोनि गोपगोपीं । रामकृष्ण ईश्वररूपी । भजननिष्ठेच्या साक्षेपीं । मनःसंकल्पीं प्रवर्तति ॥४४॥
तंव तो लाघवी भगवान मोह । पसरूनि लोपी ज्ञान । जैसें तमीं विद्युत्स्फुरण । क्षणें फांकोन हारपे ॥४५॥
मग यथापूर्व बालभावें । रामकृष्णांतें आघवे । मानूनि स्नेहाच्या लाघवें । धेनूंसवें पाठविती ॥४६॥
अवघियां व्रजींचिया गोपाळां । नंद निरवी उभय बाळां । म्हणे या दोघांतें सांभाळा । अवघिया वेळां सावध ॥४७॥
जातां येतां सावधपणें । रामकृष्णां न विसंवणें । बैसतां उठतां कृष्ण पाहणें । कृष्णावीण न वसिजे ॥४८॥
खातां जेवितां पाणी पितां । लेतां नेसतां देतां घेतां । चालतां बोलतां धंदा करितां । कृष्णनाथा न विसंबा ॥४९॥
देखूनि अद्भुत पराक्रम । पुढती मायेचा संभ्रम । तेणें मानिती अबलांसम । पुरुषोत्तम व्रजवासी ॥५०॥
असो लोटल्या ग्रीष्मकाळ । पुढें प्रावृट् प्रभवनशीळ । प्रवर्तलिया प्राणी सकळ । व्याप्त केवळ सुखदुःखें ॥५१॥
तया वर्षाकाळींची क्रीडा । शुक निवेदी नृपा पुढां । वृष्टिभरें आनंद गाढा । पावती पीडा जलशैत्यें ॥५२॥
ततः प्रावर्तत प्रावृट् सर्वसत्त्वसमुद्भवा । विद्योतमानपरिधिर्विस्फूर्जितनभस्तला ॥३॥
प्रलंबहनन दावाग्निपान - । कथनानंतर राया जाण । प्रावृट्काळ वर्तमान । तद्वर्णन अवधारीं ॥५३॥
विराट्पुरुषाचें जें वीर्य़ । वृष्टिरूपें स्रवतें होय । भूमिदेवी गर्भ लाहे । प्राणिमय चराचर ॥५४॥
पत्नी जाणुनियां ऋतुमती । कांत आलिंगी एकांतीं । विरहताप टाकूनि क्षिती । तैशी चित्तीं संतुष्ट ॥५५॥
गर्भ संभवलिया उदरीं । दोहद होती परोपरी । धरा तैसी सस्यभरीं । होय विकारीं विकृत ॥५६॥
चहूं खाणींमाजीं प्राणी । प्रावृट्काळीं प्रसवे धरणी । आदिपुरुषाची हे करणी । राया श्रवणीं परियेसीं ॥५७॥
प्रावृट्शब्द हा स्त्रीलिंगी । विराट् कालात्मा आलिंगी । द्यावाभूमी उभयआंगीं । सालंकृत दंपती ॥५८॥
चंद्र सूर्य परिधिमंत । नाडरीं प्रतिमंडळें बिंबत । द्यावाभूमी विस्फूर्जित । उपहासत परस्परें ॥५९॥
क्षणैक उष्ण क्षणैक अभ्र । कांहीं वृष्टि कांहीं समीर । वर्षारंभीं चमत्कार । होती विकार लघुदीर्घ ॥६०॥
सांद्रनीलांबुदैर्व्योम्नि सविद्युत्स्तनयित्नुभिः । अस्पष्टज्योतिराच्छन्नं ब्रह्मेव सगुणं बभौ ॥४॥
पुढें पुढें प्रबळ मेघ । नभीं दाटती पैं अमोघ । शुभ्र धूसर सजल साङ्ग । सवेग रंग पालटती ॥६१॥
नभ आच्छादे निबिड घनीं । माजीं गर्जना दीर्घध्वनी । विद्युल्लतांचिया स्फुरणीं । दृश्य दिसोनि हारपे ॥६२॥
चंद्र सूर्य तारांगणें । घेती अभ्रांचीं प्रावरणें । स्पष्टास्पष्टप्रभाहीनें । तेणें गुणें भासती ॥६३॥
सजल मेघांच्या येती सरी । तेव्हां झांकोनि जाती गिरि । जळें वाहती पृथ्वीवरी । चिंता अंतरीं पांथिकां ॥६४॥
जेंवि गुणमय ब्रह्म सगुण । करूनि आणी जीवपण । प्रावृट्काळीं सजल घन । लेवूनि गगन तेंवि नटे ॥६५॥
सत्त्वगुणाची विवेकमति । तैशा विद्युल्लता झळकती । रजोवल्गनांची आयति । घनगर्जितीं उपमावी ॥६६॥
तमोगुणाचेनि पाडें । सजल मेघीं गडद पडे । जीवचैतन्या सांकडें । सगुण भासे खंब्रह्म ॥६७॥
अष्टौ मासान्निपीतं यद्भूम्याश्चोदमयं वसु । स्वगोभिर्मोक्तुमारेभे पर्जन्यः काल आगते ॥५॥
सगुण ब्रह्म जीवेश्वर । उभय सादृश्यप्रकार । शुकाचार्य परम चतुर । कथनीं भूवर तोषवी ॥६८॥
ईश्वर म्हणिजे जगत्पति । जीव बोलिजे पैं नृपति । दोहीं दृष्टांतें व्युत्पति । करी दार्ष्टांती सूर्याचे ॥६९॥
प्रजांपासूनि निजशासनें । राजा अंगीकारी धनें । पुन्हा देउनि संरक्षणें । करी वर्धन प्रजांचें ॥७०॥
किंवा ईश्वर जगत्कर्मा । नेमूनि वेदाज्ञेच्या नेमा । पुन्हा फलद जाणूनि कामा । कल्पद्रुमा सम होय ॥७१॥
हेमंतादि अष्ट मास । भूमिसंबंधीं जो जलरस । किरणें आकर्षी दिनेश । नृप धन्यास ज्यापरी ॥७२॥
पर्जन्य म्हणिजे तो गभस्ति । उचित काळाची जाणोनि प्राप्ति । किरणसेवकां हातीं पुढतीं । अर्पणाप्रति प्रवर्ते ॥७३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP