अध्याय २० वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


धेनवो मंदगामिन्य ऊधो भारेण भूयसा । ययुर्भगवताहूता द्रुतं प्रीत्या स्नुतस्तनीः ॥२६॥

वनीं प्रवेशोनि श्रीहरि । स्फुरितां मंजुळ मोहरी । ध्वनिलाघवें सप्तस्वरीं । धेनु हकारी सन्निध ॥७॥
अद्यापि कित्येक गोरक्षक । तेणें मार्गें अंतर्मुख । धेनु करूनि नादसुख । भोगिती निष्टंक वनवासीं ॥८॥
धेनु सवत्सा नूतन । मंद चालती हुंबरून । कांसा दाटल्या दुग्धेंकरून । वोरसें स्तन पाझरती ॥९॥
कृष्णमुखींचें आवाहन । सवेग धांवती परिसोन । पाहती श्रीकृष्णाचें वदन । टंवकारोन सप्रेम ॥२१०॥

वनौकसः प्रमुदिता वनराजीर्मधुच्युतः । जलधारा गिरेर्नादानासन्ना ददृशे गुहाः ॥२७॥

हर्षनिर्भर अंतःकरणीं । देखे वनौकसांच्या श्रेणी । वनराजी मधुश्रावणी । चक्रपाणि देखतसे ॥११॥
धारावंत पाहे गिरि । गुहा गर्जती तेणें गजरीं । ऐशीं अनेक कौतुकें नेत्रीं । पाहे मुरारि ऋतुलक्ष्मी ॥१२॥
वनीं प्रवेशला श्रीहरि । गोधनाचिया हुंकारगजरीं । आनंदोनि पुलिंदनारी । पाहती सादरीं सान्निध्यें ॥१३॥
तैसा श्रीहरी आपुल्या नेत्रीं । कृपेनें पाहतां पुलिंदनारी । हर्षनिर्भरा शरीरीं । धन्य संसारीं मानिती ॥१४॥
राजी म्हणिजे काननहारी । सन्निध येतांचि श्रीहरि । हर्षा पावोनि अंतरीं । बाह्यमधुधारीं पाझरती ॥२१५॥
तैसाचि गोवर्धन पर्वत । समीप जाणूनि अनंत । अंतरीं होऊनि हर्षयुक्त । धारा स्रवत पाझर ॥१६॥
तया धारांचें पतनध्वनि । भरती निकटगुहावदनीं । तेणें मुखें कृष्णस्तवनीं । गिरि तोषूनि प्रवर्ते ॥१७॥
वनीं आला जाणोनि कृष्ण । सादर होऊनि पुलिंदीगण । असता झाला हर्शायमाण । हें व्याख्यान दुसरें ॥१८॥
तैशीच काननपरंपरा । करिती झाली मधुपाझरा । गोवर्धनही अंबुधारा । स्रवता झाला आनंदें ॥१९॥
तया धारांचा पतननाद । गुहा प्रतिशब्द करी विशद । अंतरवेत्ता श्रीगोविंद । देखोनि प्रमोद पावतसे ॥२२०॥

क्कचिद्वनस्पतिक्रोडे गुहायां चाभिवर्षति । निर्विशन् भगवान् रेमे कंदमूलफलाशनः ॥२८॥

कोणे एके पर्वतप्रांतीं । तिंतिड्यादि वनस्पति । त्यांचे कोटरीं निर्गम क्षिति । देखोनि श्रीपति प्रवेशे ॥२१॥
सर्वत्र वर्षत पाऊस । आश्रयूनि तो निर्जल देश । कंदमूळफळातें भक्ष्य । कल्पूनि विशेष क्रीडति ॥२२॥
कोठें पर्जन्याची सरी । येतां गुहामाजि हरि । प्रवेशोनि क्रीडा करी । कंदमूलफळ भक्षी ॥२३॥
वनस्पतिकोटरें कपाटीं । गुहा असती त्या तळतटीं । तेथें प्रवेशोनिया जगजेठी । क्रीडे वृष्टि वर्षतां ॥२४॥

दध्योदनमुपानीतं शिलायां सलिलांतिके । संभोजनीयैर्बुभुजे गोपैः संकर्षणाऽन्वितः ॥२९॥

मेघ ओसरतां जला निकटीं । शिला पाहूनि गोमटी । बैसे श्रीकृष्ण जगजेठी । भवंती थाटी गडियांची ॥२२५॥
दध्योदनाची शिदोरी । स्निग्ध बांधिली होती घरीं । ते काढोनि तये अवसरीं । भोजन आदरी सप्रेमें ॥२६॥
संकर्षणेंशीं एकवट । प्राणसखे घेऊनि निकट । दध्योदनाचे स्वादिष्ठ । कवळ प्रविष्ट त्यां करी ॥२७॥
नानारुचिकरा कोशिंबिरी । अनेक लवणशाकांच्या परी । रायतीं मेतकुटें सांबारीं । लेहन करी त्या ग्रासीं ॥२८॥
नित्य वनभोजनलीले । ज्या गडियांशीं जैसा खेळे । त्यांचे तैसे पुरवी लळे । कवळें कवळें नर्मोक्ति ॥२९॥

शाद्वलोपरि संविश्य चर्वितो मीलितेक्षणान् । तृप्तान् वृषान् वत्सतरान् गाश्च स्वोधोभरश्रमाः ॥३०॥

रामगोपांशीं चक्रपाणि । जेवितां स्मरे अतःकरणीं । जैसें झालें वत्साहरणीं । तें ये क्षणीं झणें होय ॥२३०॥
म्हणोनि गोधनां सांभाळी । तंव तीं बैसलीं शाद्वळीं । तृप्त होऊनि सुखकल्लोळीं । करिती सकळीं रोवंथ ॥३१॥
वृषभ वांसुरें धाकुटीं । गोर्‍हे काल्हवडी पारठीं । सर्व गोधनें घाटीं मोठीं । कृपादृष्टि हरि पाहे ॥३२॥
नवप्रसूता वोहाभारें । गाई श्रमतां वनसंचारें । तृप्त होऊनि कोमळचारें । अत्यादरें रोवंथती ॥३३॥
दृष्टि झांकूनि विषयात्मक । योगमुद्रेनें अंतर्मुख । कृष्णध्यानीं लावूनि लक्ष । निमीलिताक्ष्ग गोधनें ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP