अध्याय १४ वा - श्लोक ३६ ते ३७
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तावद्रागादयः स्तेनास्तावत्कारागृहं गृहम् । तावन्मोहोंऽघ्रिनिगडो यावत्कृष्ण न ते जनाः ॥३६॥
सदृढ ब्रह्मचर्यादि नेम । यथोक्त करूनि गृहस्थाश्रम । वानप्रस्थादि सक्लेश कर्म । जे निष्काम आचरले ॥८॥
रागद्वेषादि तस्कर । घातक षड्वैर्यांचा मार । त्यांचा करोनिया संहार । झाले निष्ठुर निर्मम जे ॥९॥
पायीं श्रृंखला ममता मोह । गृहरूपें जें कारागृह । तेथ विचंबतां सस्नेह । बळें निस्नेह जे झाले ॥८१०॥
तोडूनि मोहाचें पदबंधन । फोडूनि ममताबंदिसदन । सर्वसंन्यासें भरलें रान । जिंकूनि मन मुनिवर्य ॥११॥
पावावया मत्सन्निधि । सबाह्य खंडली सर्वोपाधि । त्यांसि जे मत्प्राप्तिसिद्धि । मी निरवधि ओपितसें ॥१२॥
व्रजौकसांची अनृणावाप्ति । ते म्यां ओपितां आत्मप्राप्ति । तूं कां मानिशी अपर्याप्ति । ऐसें श्रीपती जरी म्हणसी ॥१३॥
तरी ऐकें गा वत्सपवेषा । त्यासीच रागादि देती क्लेशा । जे ग भजती तुज परेशा । भेददुराशा सांडोनी ॥१४॥
तोंवरीच ते रागादि दोष । तस्कररूपें देती क्लेश । जंववरी तव भक्तीचा लेश । न करी प्रकाश हृत्कमळीं ॥८१५॥
तंववरीच देहगेह । गोंवी होऊनि कारागृह । तंवचि अंघ्रिनिगड मोह । जंव न जडे स्नेह तव भजनीं ॥१६॥
अभेदभजनें निजांतर । भरतां गृहचि हरिमंदिर । राग होय प्रेमादर । मोह तो अंकुर करुणाएचा ॥१७॥
भक्तियोगें जो सुखलेश । तेथ जाऊनि बैसे द्वेष । भेद देखोनि उपजे त्रास । तैं नाशी रोष त्या द्वैता ॥१८॥
सर्वात्मकत्वें लोभावेश । ओपी पूर्णत्वाचा तोष । निर्मद अमत्सरांचे पोष्य । मदमत्सर म्हणविती ॥१९॥
कृष्णा तावकी जनता नाहीं । तोंवरीच हे बाधक पाहीं । तंव जनाचे लागती पायीं । करिती सर्वही परिचर्या ॥८२०॥
ज्याच्या भयें कर्मसंन्यास । करूनि सोशिती वनवास । भयदा भजनें त्या केलें दास । हा विशेष भजनाचा ॥२१॥
नाकीं कानीं कां नेत्रबुबुळीं । गुह्योपस्थीं जिव्हामूळीं । लक्ष ठेवूनि योगी बळी । जिंकिती फळी शत्रूंची ॥२२॥
म्हणोनि तें खंडज्ञानें । दृश्यद्वेषाच्या अभिमानें । विगतरागही भरती रानें । संगाभेणें जनांच्या ॥२३॥
भक्त अन्वयबोधशाली । सबाह्य लक्षूनि श्रीवनमाळी । भेदभ्रमाची करूनि होळी । सुखसुकाळीं क्रीडती ॥२४॥
म्हणोनि ऐशिया व्रजौकसांसी । मज नेणवे काय देसी । किंवा त्यांच्या आनृण्यासी । स्वयें अवतरसी जरि म्हणों ॥८२५॥
यांसि द्यावया योग्य नाहीं । यास्तव पुत्रादिरूपें पाहीं । मी अवतरोनि त्यांचे गेहीं । होईल कांहीं उत्तीर्ण ॥२६॥
प्रपंच निष्प्रपंचोऽपि विडंबयसि भूतले । प्रपन्नजनतानंदसंदोहं प्रथितुं प्रभो ॥३७॥
निष्प्रपंच जो तूं शुद्ध । सप्रपंचही नटसी मुग्ध । भक्तच्छंदें क्रीडा विविध । करिसी आनंद ओपावया ॥२७॥
भूमंडळीं मर्त्यलोकीं । सम दाविसी सामान्य तोकीं । अथवा विडंबासारिखी । क्रीडा नाटकी प्रकटिसी ॥२८॥
त्यासि इतुकेंचि कारण । प्रपन्न म्हणिजे निजांघ्रिशरण । जनता ते त्याची मंडळी पूर्ण । ते सुखसंपन्न करावया ॥२९॥
अनेक आनंदाचा राशि । आनंदसंदोह म्हणिजे त्यासी । तो प्रकटावया प्रपन्नापाशीं । स्वयें क्रीडसी विडंबें ॥८३०॥
प्रभो या संबोधनाचा अर्थ । अनंतमायावी समर्थ । स्वभक्तऋणाच्या परिहारार्थ । करिसी अनंत नटलीला ॥३१॥
हें तों तुझें अमोघ देणें । परी माझिया चित्तालागीं न मनें । किमर्थ म्हणतां नारायणें । माझें बोलणें ऐकावें ॥३२॥
अनन्यभावें अवंचक । जे कां भक्त निष्कामुक । त्यांचा कपटें जाल्या तोक । उत्तीर्ण विवेक केंवि घडे ॥३३॥
एथ कपट म्हणसी काय । तरी देवकीसी म्हणोनि माय । तीसि बांधोनि पुत्रस्नेहें । जासी लवलाहें गोकुळा ॥३४॥
एथ यशोदानंदासी । पुत्रस्नेहें बांधलेंसी । सांडूनि मथुरे जेव्हां जासी । दुःखराशी तैं यांतें ॥८३५॥
यांतें रक्षीन संकटीं । म्हणसी तरी ते न घडे गोठी । संकटें तुझेचि लागलीं पाठी । हीं उफराटीं तुज रडती ॥३६॥
लालनमिषें तव सेवन । तेणें आधींचि वाढे ऋण । कैसा होशील उत्तीर्ण । मजलागून हें न कळे ॥३७॥
व्रजौकसांचा सातां श्लोकीं । महिमा बोलिला चतुर्मुखीं । तो उपसंहारूनि आपुलेविखीं । पुढें ती श्लोकी प्रार्थितसे ॥३८॥
म्हणे तूं स्वामी श्रीभगवान । तुझे अचिंत्य अनंत गुण । काय देशी त्यां म्हणोन । मजलागून उमजेना ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP