अध्याय १४ वा - श्लोक ३४ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तद्भूरिभाग्यमिह जन्म किमप्यटव्यां यद्गोकुलेऽपि कतमांघ्रिरजोऽभिषेकम् ।
यज्जीवितं तु निखिलं भगवान्मुकुंदस्त्वद्यापि यत्पदरजःश्रुतिमृग्यमेव ॥३४॥

तें भूरि म्हणजे विपुल भाग्य । पावावयां मी होय योग्य । ऐशिया अनुग्रहार्थ साङ्ग । मी श्रीरंग प्रार्थितों ॥७५५॥
इह म्हणिजे येचि ठायीं । मनुष्यलोकीं जन्म देईं । कोणी एक रंगदेहीं । होणें पाहीं मज घडो ॥५६॥
तेंही जन्म देईं वनीं । त्याही माजीं व्रजकाननीं । म्हणसी सत्यलोक सांडूनि । कां व्रजभुवनीं जन्मावें ॥५७॥
व्रजकाननीं कोण लाभ । तो अवधारू पद्मनाभ । एथ पदाब्जरेणु सुलभ । जो दुर्लभ मादृशां ॥५८॥
व्रजनिवासीं वनीं भुवनीं । त्यामाजीं सामान्य जीव कोणी । एकाचीही माझे मूर्ध्नीं । पडो उडोनि पदधुळी ॥५९॥
उंच नीच गोकुळवासी । स्वेच्छा करिती विहारासी । पदरज उडोनियां आकाशीं । पडतीं शिरीं जे ठायीं ॥७६०॥
तो पांसूंचा अभिषेक । त्यांतील मी जरी कणिका एक । लाहें तरीच भवसामर्थक । परमोत्सुक या लाभा ॥६१॥
गोकुलवासी निखिल जन । काय म्हणूनि म्हणसी धन्य । तरी ज्यांचें तनु मन धन जीवन । ठेलें रंगोन मुकुंदीं ॥६२॥
ज्याची वास्तव व्हावयां प्राप्ति । विचारीं प्रवर्तलिया श्रुति । व्यतिरेखमुखें नेति म्हणती । परी दर्शनावाप्ति नाद्यापि ॥६३॥
तो तूं सुलभ जयांपाशीं । होऊनि तच्छंदें क्रीडसी । न जाणे त्यां काय देसी । हें मज विधीसी उमजेना ॥६४॥

एषां घोषनिवासिनामुत भवान् किं देव रातेति नश्चेतो विश्वफलात्फलं त्वदपरं कुत्राप्ययन्मुह्यति ।
सद्वेषादिव पूतनाऽपि सकुला त्वामेव देवापिता यद्धामार्थसुहृत्प्रियात्मतनयप्राणाशयास्त्वत्कृते ॥३५॥

ज्यांचे कृतार्थतेचा महिमा । वर्णावया मी असमर्थ ब्रह्मा । ऋणीं निबद्ध तूं मेघश्यामा । ज्यांच्या प्रेमास्तव गमसी ॥७६५॥
म्हणसी यांचें भक्तिऋण । फेडावया असमर्थपण । माझे ठायीं देखिलें कोण । मी भगवान विश्वपति ॥६६॥
तरी एतदर्थीं ऐकें हरि । पाहतां तारतम्याची परी । ऋणोत्तीर्णतेची सामग्री । तुझे घरीं मज न दिसे ॥६७॥
जरी तूं आखलब्रह्मांडपति । अचिंत्यैश्वर्य तव संपत्ति । तरी तुजहूनि ते आरुती । हें मम मति विचारी ॥६८॥
अनंतब्रह्मांडांची पदवी । तूं नसतां ते शून्य आघवी । सांडणें करूनि उपेक्षावी । तुझिये प्राप्तीवरूनी ॥६९॥
जैसें प्राणेंवीण शरीर । जीवनेंवीण सरोवर । तुजवीण तैसें वैभव अपार । अनंतब्रह्मांडपदवीचें ॥७७०॥
सर्व वैभवां वैभव । तूं परमात्मा वासुदेव । तुजवेगळी आघवी माव । भोगगौरव गा मज ॥७१॥
तो तूं विश्वफळां फळ । येर आघवेंचि वोफळ । मा काय देऊनि गोकुळ - । वासी प्रेमळ गौरविसी ॥७२॥
व्रजस्थीं प्रेमें बांधिलासी । त्या ऋणाच्या उत्तीर्णासी । आपणावेगळें काय देसी । हें मम मतीसि न चोजवे ॥७३॥
तुजहूनि थोर पदार्थ कोण । मा तो देऊनि फेडिसी ऋण । करितां चित्तीं हें विवरण । मोह पावोन ठेलों मी ॥७४॥
म्हणसी मजहूनि सर्वही गौण । तरी आपण देऊनि फेडीन ऋण । हेंही स्वामी न घडे जाण । काय म्हणून तें ऐक ॥७७५॥
मातृप्रेमाची अवगणी । दावूनि पूतना लावी स्तनीं । इतुकियासाठीं ते पापिणी । आपणा देऊनि गौरविली ॥७६॥
पूतने दिधलें म्यां आपणा । तरी सकुटुंबा पशुपगणा । आपणा देऊनि फेडीं ऋणा । ऐसें कृष्णा जरी म्हणसी ॥७७॥
तरी पूतनाही अघबकेंशीं । आपणामाजीं मेळविसी । तैं आगळीक ते कायसी । भक्तिप्रेमासि सांग पां ॥७८॥
भोगासाठीं ओपिजे त्याग । नृपगौरवा जैं तोचि योग्य । तेव्हां तारतम्याचा भाग । पावे भंग सर्वत्र ॥७९॥
अमृत आणि ओखटवणी । मधुर अरोग पवित्र गुणीं । तुळणा पावती समानपणीं । ऐं सिंधुमथनीं वैयर्थ्य ॥७८०॥
तैशी राक्षसी पापराशि । स्तन दे कपटमातृवेशीं । इतुकेनि मानूनि ते माउशी । स्वसमरसीं मेळविली ॥८१॥
आणि जे शरीरें वित्तें चित्तें । प्रेमें सौहार्दें जीवितें । प्राणें करणें प्रिय पदार्थें । स्वार्थें परमार्थें त्वत्पर ॥८२॥
पुत्रें कलत्रें वृत्तिक्षेत्रें । आप्तस्वजनादि कुलगोत्रें । कर्माकर्में इहामुत्रें । चेष्टामात्रें त्वदर्थ ॥८३॥
तव सान्निध्यें रात्रिदिवस । नेणती पाहोनि क्रीडाविशेष । विसरोनि आपुल्या स्वकर्मास । तव प्रेमास वेधलीं ॥८४॥
कळवळूनि देती स्तन्य । पालकीं इजविती हालवून । अभ्यंगादि उद्वर्तन । अन्नपानें अर्पिती ॥७८५॥
ये रे कृष्णा कमलनयना । मेघश्यामा मनमोहना । ऐशीं घेती नामें नाना । भववेदना विसरोनि ॥८६॥
कृष्णवियोग न साहती । कृष्ण अनिमेषें पाहती । कृष्णीं रंगोनि राहती । सर्व साहती कृष्णार्थ ॥८७॥
कृष्णालागीं शुचिष्मंत । कृष्णालागीं भवीं विरक्त । कृष्णालागीं कर्मासक्त । जे अनुरक्त श्रीकृष्णीं ॥८८॥
कृष्णालागीं कामधाम । कृष्णालागीं नित्यनेम । कृष्णालागीं ज्यांचें प्रेम । भवसंभ्रम विसरले ॥८९॥
ज्यांसि कृष्ण मागें पुढें । कृष्णप्रेमें झाले वेडे । कृष्णाविण ज्यां नावडे । गाती पवाडे कृष्णाचे ॥७९०॥
कृष्णरूपें रंगले नयन । कृष्णध्यानें मन उन्मन । कृष्णवेधें अंतःकरण । उपरमोन समरसे ॥९१॥
कृष्णालागीं शौचाचार । कृष्णालागीं पदसंचार । कृष्णप्रेमें ज्यांचे कर । कर्मी तत्पर सर्वदा ॥९२॥
कृष्णप्रेमें कृष्णगुण । गाती कृष्णात्मक होऊन । कृष्णक्रीडांचें गायन । करिती कथन परस्परें ॥९३॥
ज्यां सांगतें कृष्ण जेवी । कृष्ण ज्यांतें कवळ भरवी । कृष्णहस्तींची कवळचवी । घेती शैशवीं सस्निग्ध ॥९४॥
कृष्णस्वादें कृष्णमुखा । चुंबूनि भोगिती चित्सुखा । हुंगिती कृष्णाच्या मस्तका । सामान्य तोकासारिखें ॥७९५॥
कृष्णरूपीं बांधले नयन । न येती मागुते परतोन । ठेली प्रपंच ओळखण । जे कृष्णावीण न देखती ॥९६॥
ज्यांचें कृष्णीं आलिंगन । कृष्णस्पर्शें निवती पूर्ण । कृष्ण ज्यांचे प्राशी स्तन । शयनीं रिघोन स्वानंदें ॥९७॥
एके देशीं स्पर्शमणि । लोहासि लागतां एके क्षणीं । सुवर्ण करी तेचि क्षणीं । नोहे परतोनि मग लोहो ॥९८॥
तूं श्रीकृष्ण चैतन्यमूर्ति । सर्वदा सर्वांगीं जे स्पर्शती । त्यांसि देईन आत्मप्राप्ति । म्हणतां मम मति मोहित ॥९९॥
तव संस्पर्शें चैतन्य झालें । तें काय आत्मत्वावेगळें । त्यावरी आत्मत्व देणें उरलें । कोणतें न कळे मजलागीं ॥८००॥
तव भाषणें ज्यांचे श्रवण । पूर्ण निवती आनंदोन । तव गुणकीर्तिश्रवणाहून । समाधि कोण मज न कळे ॥१॥
तुझेनि वेधें वेधले प्राण । तव वियोगें गतप्राण । तवात्मकत्वें ज्यां अभिमान । माझा कृष्ण हे ममता ॥२॥
कृष्णाचा मी पिता भ्राता । इत्यादि सुहृदत्वें अहंता । कृष्ण आमुचा ऐशी ममता । त्यां भवकथा कें उरली ॥३॥
ज्यांचें कृष्णीं अनुसंधान । चित्ता श्रीकृष्णचिंतन । स्मृति सबाह्य कृष्णस्मरण । श्रीकृष्णध्यान मानसा ॥४॥
कृष्णीं विराल्या संकल्प । अंतःकरण जें निर्विकल्प । कृष्णवेधें घेती झोंप । तेही चिद्रूप कृष्णमय ॥८०५॥
ऐसा सबाह्य ज्यां श्रीकृष्ण । अवस्थामात्रीं चैतन्यघन । त्यांसही राक्षसीच समान । आपणा देऊन गौरपणें ॥६॥
तरी भक्तीची विशेषता । कायसी एथ सर्वज्ञनाथा । ऐसें बोलोनि विधाता । म्हणे अच्युता अवधारीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP