अध्याय १४ वा - श्लोक १

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ब्रह्मोवाच :- नौमीड्य तेऽभ्रवपुषे तडिदंबराय गुंजावतंसपरिपिच्छलसन्मुखाय ।
वन्यस्रजे कवलवेत्रविषाणवेणुलक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय ॥१॥

पशुपांगज कवळपाणि । परी हा केवळ चक्रपाणि । ऐसा निश्चय अंतःकरणीं । करूनि स्तवनीं प्रवर्तला ॥३७॥
ईड्य म्हणिजे स्तवनायोग्य । तो तूं जगदात्मा श्रीरंग । येर अवघेंचि अयोग्य । अंतरंग तूं नसतां ॥३८॥
अगा ईड्या नौमि तुतें । ममापराध क्षमापनार्थें । तुजकारणें तोषावयातें । स्तवनें चित्तें स्तवितों मी ॥३९॥
माझिया स्तवना तूंचि अर्ह । माझा श्रेष्ठपणाचा गर्व । तुझेनि दर्शनें हरला सर्व । सुख अपूर्व मज झालें ॥४०॥
म्हणोनि माझिया सद्गुरुनाथा । तूं एक ईड्य उपनिषदर्था । अर्था स्वार्था आनि परमार्था । तूं सर्वथां आश्रय ॥४१॥
गगनगर्भीं सजलघन । तैसें ब्रह्मीं मायिक ध्यान । नटोनि छेदिला ममाभिमान । तो घनतनु मी नमितों ॥४२॥
सजलमेघीं सौदामिनीं । तैसी चित्प्रभा सर्वां करणीं । पीतांबरीं तो परिवेष्टूनि । नटनाटका तुज नमों ॥४३॥
विषयविरागें निष्काम भक्त । चिन्मात्रैक जे अनुरक्त । गुंजावतंस ते मिरवत । श्रवणासक्त श्रवणीं जें ॥४४॥
चिन्मात्रप्रभा अवलोकनीं । दृष्टि मुरडोनि रमली नयनीं । जागृतीपासूनि उन्मनी - । पर्यंत चिद्धनीं समरसली ॥४५॥
ते उघडेचि दिसती डोळे । दृश्यादि त्रिपुटीसि वेगळे । परमानंदाचे सोहळे । भोगितां ठेले समरसुनी ॥४६॥
पंचभूतादि त्रिगुणप्रभा । सांडूनि निवडला चिन्मात्रगाथा । तयाच्या परिष्वंगलोभा । साक्षित्व शोभा फेडिली ॥४७॥
ते बर्हिबर्हावरील डोळे । दृश्य न सिवोनि सोवळे । कृष्णरंगीं रंगोनि गेले । कृष्णें धरिले निजमौळीं ॥४८॥
बर्हपिच्छ गुंजावतंस । तेथील मुखीं फांके प्रकाश । वाक्यश्रवणेंसी अभ्यास । जेवी दाविती न्यास वक्त्रत्वीं ॥४९॥
लाल सभोग सुखाचे चाडे । फलपुष्पादि लांकडें । गुणाभिलाषें कवळिती कोडें । तें येथ न घडे निर्गुणीं ॥५०॥
कस्तुरी नोहे काळेपणें । कीं रसाळ नोहे पात्रगुणें । तें मसिपात्रचि उत्तमवर्णें । जेंवी रक्षणें धनबुद्धि ॥५१॥
तेवी स्वभक्ताचिया बोला । कोमल जर्वट कां वाळला । रानीचा रानट ओला पाला । परी गोविला सप्रेमें ॥५२॥
आपणा देऊनि सप्रेमळां । पालटें बोलेचि घेतला । न विसंभेचि घाली गळां । ते वनमाळा श्रीकृष्ण ॥५३॥
साक्षीवांचूनि अप्रमाण । म्हणोनि दावी श्रीवत्सचिन्ह । मुद्रांकित हृद्भूषण । तें गाहण स्वजनाचें ॥५४॥
उघड मिरवी पुढिलांसाठीं । फुकट तुलसीचिया मुष्टि । अर्पणें माझिये सवसाटि । हे त्या गोठी कळावया ॥५५॥
ब्रह्म स्वगोडी चाखावया । नटोनि आलें पशुपालया । स्वबोध दध्योदन काल्या । लांचाऊनियां लांचवी ॥५६॥
तो स्वादु भावाचा कवळ करी । स्वरतांचिये वदनीं भरी । ब्रह्मा म्हणे मी अनधिकारी । कीं तो मुरारि मज नेदी ॥५७॥
पशुवें गुंतलीं विषयचारीं । तीं वळोनी लावी स्वमोहरीं । तो विवेकवेत्र श्रीकृष्णाकरीं । पाहे नेत्रीं विरिंचि ॥५८॥
आम्नाय माथांचें विषाण । श्रीकृष्ण स्वासानिळें धमन । करूनि बोधी स्ववृत्तगण । वन निर्गुण सेवावया ॥५९॥
अकार उकार मकार । दंड कमंडलु अर्धचंद्र । सबिंदु प्रणव सप्तस्वर । धरी श्रीधर तो वेणु ॥६०॥
कवल वेत्र विषाण वेणु । हृदयीं श्रीवत्सलांछन । इत्यादि लक्ष्ममंडित कृष्ण । चतुरानन अधिवंदी ॥६१॥
सोहंसाक्षित्वाचें कठिण । फेडूनि मृदुतर चित्पदपूर्ण । भक्तानुग्रहविग्रहें सगुण । ते श्रीचरण श्री सेवी ॥६२॥
फेडूनि द्वैताची कंचुकी । सप्रेम सुखाची अळुकी । स्तनरूप ती हे वाहे धडकी । तळवा चुचुकीं मर्दितां ॥६३॥
बाळ तरणीहूनी उजवट । मृदुल रातोत्पळीचें पोट । स्मररमणीचे कोमळ ओष्ठ । त्याहूनी चोखट मृदुपद ॥६४॥
नंदनंदन पशुपांगज । इत्यादि चिन्हीं तेजःपुंज । ब्रह्मत्वाची न मोडे वोज । हें जाणोनी गुज विधि वंदी ॥६५॥
मग म्हणे जी जनार्दना । प्रतिज्ञापूर्वक करूनि नमना । स्तविसी स्वरूपा परिच्छिन्ना । तरी विश्वमोहना हें न म्हणा ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP