अध्याय १४ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीमद्गोविंदसद्गुरुमूर्तये नमः ॥
गोविंदसद्गुरु प्रणतांचिया । तुज नमो जी देवतानिचया । हृदया वसवूनि आमुचिया । स्वपदाचिया प्रेमा दे ॥१॥
गोशब्दार्थें परादि वाणी । वेत्ता स्वसत्तासंवेदनीं । गोविंद या हेतु म्हणोनि । वदला मूर्ध्नि श्रुतीच्या ॥२॥
शब्द आकाशींचा म्हणती । ऐशी लौकिकी जरी वदंती । तरी घागरीं मडकीं आत्मस्थिति । चर्चा करिंती परस्परें ॥३॥
सत्यें प्रकाशिलें ऋत । तें परादिवैखरीपर्यंत । शब्द शब्दार्थी वर्ते सूनृत । येर अनृत भवभान ॥४॥
सूनृत सत्येंसी अभिन्न । सत्य सन्मात्र चैतन्य । सत्यज्ञानमनंतपूर्ण । ब्रह्मनिर्वाण कैवल्य ॥५॥
बीजापासूनि निघे मोड । तो बीजेंसी अनिवड । पुढें पुढें वाढोनी वाढ । करी निवाड बीजत्वा ॥६॥
बीज दाऊनि भूस हरपे । वस्तु दाऊनि शब्द लपे । प्रपंच मोजितां शब्दमापें । निजात्मरूपें स्वयें उरिजे ॥७॥
म्हणोनी शब्दपाठी पोटीं । शब्दवितां तूं वेदमुकुटीं । गोविंदनामें करूनियां ठी । उमजे गोठी सदसद् ॥८॥
परंतु शरणागताविण । तुझें सर्वत्र दुर्लभपण । कूर्मी प्रसवलियावांचून । सुधावलोकन न फवे कीं ॥९॥
म्हणोनि सद्गुरो प्रणतपाळा । तुझिये कृपेचा सोहळा । भक्तां लाभे सप्रेमळा । इतरां कुशलां तो न फवे ॥१०॥
विष्णु सर्वज्ञ व्यापकपणें । परी तो तुझेनि स्वांतःकरणें । विपरीत स्फूर्तींचें जाणणें । लेऊनि रक्षणें प्रवर्ते ॥११॥
सत्यसंकल्प भूमिके - । माजि जो परमानंद पिके । तो चंद्रमा न मोवेखे । विश्व पीयूखें निववीत ॥१२॥
इत्यादि देवतासमूह । प्रचुर चिन्मात्रनिग्रह । अमोघ सुकृताचा संग्रह । तवानुग्रह त्या सुभगां ॥१३॥
सद्गुरूपासूनी ब्रह्मविद्या । ..................... । न सोडी कल्पांतीं अविद्या । जे कां निंद्या निंदत्वीं ॥१४॥
उदकीं बुडोनि कोरडा । जैसा मृगजळींचा पाणबुडा । कीं भानु नोळखे प्रकट पुढां । तेंवी उघडा जात्यंधु ॥१५॥
तैसे अविद्यासंवृत सर्वज्ञ । त्यांचेंचि ऐसें भेदज्ञान । येर अभेदभावें जे अनन्य । ते नेणती भिन्न गुरु ब्रह्म ॥१६॥
शर्करा पूजूनिया यथाविधि । मिष्टता मागे वरसिद्धि । ऐशी ज्याची कोमल बुद्धि । तो गुरु आराधी ब्रह्मार्थ ॥१७॥
सद्गुरूवेगळें भावी ब्रह्म । त्याचा आकल्प न वचे भ्रम । ध्यानाराधनें आमुचा काम । श्रीपादप्रेम स्वामीचें ॥१८॥
चकोरां चंद्रेंसि वोळखी । करणें तन्मात्रीं अलुकी । निजांघ्रीं प्रेमा नैसर्गिकि । वरें पोरवी मम प्रभो ॥१९॥
हें ऐकोनि म्हणती गुरु । स्तवनांमिसें हा प्रेमादरू । येर्‍हवीं कृपेचा पाझरू । स्तवनोद्गारू हा स्फुरवीं ॥२०॥
जैसि मुकुलितें कुमुदवनें । फांकवी चंद्राचें चांदिणें । तेवी प्रेमाचें अभिलाखणें । स्फुरे वर (?) नको ॥२१॥
तरी हा सप्रेम कृपायोग । अनादिसिद्ध नैसर्गिक । परस्परें अचुक ऐक्य । येर मायिक नेणती ॥२२॥
म्हणोनि तुझा सफळचि काम । सांडूनि प्रार्थनासंभ्रम । स्वीकारूनि आज्ञा नियम । व्याख्यान सुगम चालवीं ॥२३॥
दशमामाजी चतुर्दश । ब्रह्मस्तुति परम रहस्य । अर्थ उकलूनि सुगमभाष्य । कीजे आदेश हा येथ ॥२४॥
ऐसे आज्ञेच्या वाक्सुमनीं । वर्षतां सद्गुरु साम्राज्यदानी । दयार्णवाच्या नम्र मूर्ध्नि । तों त्या प्रसूनीं पूजिला ॥२५॥
मग म्हणे जी देशिकेंद्रा । लपवीं स्थापूनि वक्त्रत्वमुद्रा । घालूनि अवधानामृत चारा । ग्रंथविचारा विवर ॥२६॥
तथास्तु म्हणोनि अमृतकरें । मौळ स्पर्शोनि स्नेहसुभरें । मुख निरीक्षता आदरें । निरा अक्षरें मुहुरलीं ॥२७॥
आतां तेणें रसाळपणें । ब्रह्मस्तुतीचें उपलवणें । घेऊनी अवघीं करणज्ञानें । श्रवणीं थाणें वसों द्या ॥२८॥
अद्भुत देखोनी कृष्णमहिमा । मोहग्रस्त झाला ब्रह्मा । पूर्व आगंतुक स्मरणधर्मा । निश्चय कर्मा असमर्थ ॥२९॥
मग हंसावरूनि पृथ्वीवरी । स्ववपु कनकदंडापरी । लोटूनि अष्टाक्ष अश्रुधारीं । श्रीकृष्णांघ्री अभिषेकी ॥३०॥
नंदनंदन कवळपाणि । प्रकट देखिला जैसा नयनीं । त्यातें नमूनि त्याचे स्तवनीं । पद्मयोनि प्रवर्तला ॥३१॥
पहावया कृष्णमहिमान । आपण आचरलों दौर्जन्य । तेणें सभय कंपायमान । करी स्तवन साशंक ॥३२॥
स्तवूं परमात्मा सुरवर्य । क्षमा करवूनि निज अनार्य । तदनुग्रहें सृजनकार्य - । करणीं धुर्य पुन्हा झाला ॥३३॥
इतुकी कथा चतुर्दशीं । शुक निवेदी औत्तरेयासी । मुमुक्षु भोक्ते त्या रसासि । तिंहीं पंक्तीसि बसावें ॥३४॥
जेणें नाट्यें वेधिला विधि । वेधें भोगूनि सुखसमाधि । पुढती लोहोनि मनोबुद्धि । मग ते वंदीं निज ध्येय ॥३५॥
तें विधीचें उपास्य ध्यान । परिसें परीक्षिति सावधान । श्रोतीं मनाचें करूनि नयन । श्रवणीं रिघोन तें पहावें ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP