अध्याय १४ वा - श्लोक २१ ते २२
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
को वेत्ति भूमन् भगवन् परात्मन् योगेश्वरोतीर्भवतस्त्रिलोक्याम् ।
क्क वा कथं वा कति वा कदेति विस्तारयन् क्रीडसि योगमायाम् ॥२१॥
भूमन् ऐसें संबोधन । कीं तूं अचिंत्य गुणपरिपूर्ण । तुझें जन्मादि कर्माचरण । जाणे कोण साकल्यें ॥४१५॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । म्हणोनि म्हणिजे तुज भगवान । कीं सामान्यरूपें अवतरोन । करिसी गहन प्रताप ॥१६॥
स्पर्शों नेदितां अहंता । होसी दुष्टदुर्मदहंता । कीं तूं प्रकृतीहूनि परता । आत्मा तत्त्वता त्रिजगाचा ॥१७॥
प्रकृत्यादि जें अनित्य । प्रकाशितां तूं आत्मा सत्य । परात्मत्वें तूं अलिप्त । उभय व्याप्त म्हणोनी ॥१८॥
दांतातळीं ओष्ठ पडे । कीं जिव्हा अवचटें सांपडें । तेथ आत्मत्व दोहींकडे । धरणें न घडे अहंता ॥१९॥
चुकली आपुले रहाटीसी । तेणें दुःख ओष्ठजिव्हेसी । व्यापकत्वें चैतन्यासी । अलिप्त दोहींसी राहणें ॥४२०॥
तैसेंचि धर्मभंगें दुष्ट । भोगिती अपयशादि कष्ट । ते तूं भोगिसी धरूनि नट । परी अस्पृष्ट उभयत्वा ॥२१॥
अनहंकारें होय कैसें । योगमायेच्या आवेशें । मुळीं अहंता स्पर्शली नसे । परी होतसे अवघेची ॥२२॥
योगप्रतापाची शक्ति । लाहोनि योगी सृष्टि करिसी । योगेश्वर तूं योगपति । अचिंत्यशक्ति अखिलात्मा ॥२३॥
ऊति म्हणिजे तुझिया लीला । कोठें कैशा कित्येक वेळां । कित्येक करिसी हो गोपाळा । कोण्या काळा हें न कळे ॥२४॥
भूत भविष्य वर्तमान । कृष्णलीला परिज्ञान । लोकत्रयीं तुजवांचून । कोणास जाण मुकुंदा ॥४२५॥
योगमाया विस्तारून । स्वयें क्रीडसी चैतन्यघन । वृथा आमुचा पदाभिमान । तुज नेणोन गोविंदा ॥२६॥
एथ शंका करिसी हरि । माझिया अवतारांची थोरी । अगाध अपार अचिंत्य खरी । कळल्यावरी भव कैंचा ॥२७॥
ऐसें असतां प्रपंच पुन्हा । कां पां यथार्थ भासे मना । ये शंकेच्या निरसना । बोले वचना विरिंचि ॥२८॥
तस्मादिदंजगदशेषमसत्स्वरूपं स्वप्नाभमस्तधिषणं पुरुदुःखदुःखम् ।
त्वय्येव नित्यसुखबोधतनावनंते मायात उद्यदपि यत्सदिवावभाति ॥२२॥
साच तूं एक चैतन्यघन । अचिंत्यानंतगुणपरिपूर्ण । या कारणास्तव जग हें जाण । तुजचि समान भासतसे ॥२९॥
जग हीं दोनचि अक्षरें । जन्ममरनसूचनापरें । जातं गच्छति या प्रकारें । व्यारणकारें निगदिलीं ॥४३०॥
तुझ्या ठायींच उद्भवत । पुन्हां तुजमाजीं सांठवत । यथार्थ ऐसेंचि भासत । तो वृत्तांत अवधारीं ॥३१॥
ज्याचि दर्पणें त्याचि ऐसें । कार्यकारणत्वें प्रकाशे । तेंवि असत्स्वरूप जग हें असे । तुझेनि भासे सद्वत ॥३२॥
स्वप्नामाजि वास्तव बुद्धि । अस्त पावोनि हारपे शुद्धि । यथार्थत्वें स्वप्नोपाधि । मानी त्रिशुद्धि ज्यापरी ॥३३॥
तूं परमात्मा सच्चिदानंद । तैसाचि प्रपंचा वाटेव विशद । सत्य सचेत आणि सुखद । कारण बोध व्यत्यासें ॥३४॥
दृष्टीपुढें विश्व दिसे । अकल्प तैसेंचि आभासे । यालागीं वाटे सत्य ऐसें । सविश्वासें करणज्ञा ॥४३५॥
येती जाती संवादती । होती वर्तती क्रीडा करिती । यालागीं चैतन्यप्रतीति । जीवाप्रती दृश्याची ॥३६॥
मधुरस्तवनीं वाटे सुख । मृदुस्पर्शनीं वाटे हरिख । रम्य ईक्षणीं परम तोख । जिव्हे मोदक प्रियरस ॥३७॥
घ्राणीं सुगंधसुखाची गोडी । मानसीं कामाची आवडी । तैशीच कर्मेंद्रियांची प्रौढी । स्वसुखीं रूढी दाविती ॥३८॥
जो तूं सच्चिदानंदानंत । विश्वही भासे तद्गुणयुक्त । वास्तव पाहतां हें अनित्य । जड अचेत बहुदुःखी ॥३९॥
नित्यसुखबोध तनूच्या ठायीं । नसतीच दृश्याची नवाई । मायेस्तव भासोनि पाहीं । बुडवी डोहीं भ्रमाचे ॥४४०॥
पुरु म्हणिजे बहुत दुःखें । सुखासाठीं कवळितां हरिखें । अमृतबुद्धि घेतां विखें । जेवीं घातकें मग होती ॥४१॥
प्रिय षड्रस रसनेप्रति । अम्लें पित्तें प्रकोपती । मधुरें श्लेष्माची उत्पत्ति । कृमि क्षोभती जठरस्थ ॥४२॥
तैसेंचि कटुतिक्तरूक्षयोगें । जागृत होइजे वातवर्गें । तृष्णा मेह नेत्ररोगें । लवणप्रसंगें क्षोभिजे ॥४३॥
रसना रसालागीं झुरे । रस सेवितां रोगें भरे । भाविलें सुख न दिसे खरें । दुःख न सरे चिरकाळ ॥४४॥
ऐसा सर्वेंद्रियाद्वारा । भासोनि संसार गोडिरा । बुडवी दुःखाच्या सागरा - । माजीं सवें चोरासारिखा ॥४४५॥
एवढ्या दुःखाब्धीचें तरण । करावया कोणा आंगवण । तुझें सत्यस्वरूपज्ञान । घटजासमान या शोखी ॥४६॥
तेंचि सत्यस्वरूप कैसें । ज्याचेनि बोधें भवाब्धि नासे । वास्तव होय जैसें तैसें । परिसा विखनसें निगदिलें ॥४७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP