अध्याय १ ला - श्लोक १ ते ७
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
राजोवाच - कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः । राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतम् ॥१॥
राजेंद्र म्हणे जी योगींद्रा । वाङ्मयामृतवदनचंद्रा । आल्हाद होय चित्तचकोरा । श्रवणनयनीं प्राशितां ॥४३॥
चंद्र सूर्य वंश दोन्ही । त्यांचे विस्तार कथिले मुनि । दोही वंशांचे चूडामणि । अनेक राजे वर्णिले ॥४४॥
त्यांचें अत्यद्भुत चरित्र । श्रवणें लोकत्रय पवित्र । तृप्ति न मानिती माझे श्रोत्र । प्रश्न विचित्र वांछिती ॥२४५॥
जंववरी तृप्ति नाहीं पोटीं । तोंवरी भोक्ता लाळ घोंटी । आत्मप्राप्ति नसतां हट्टी । साधनसंकटीं शिणेना ॥४६॥
तरी न टाकतां गंगे । रिघालिया पोहणें लागे । तृषा न बोलतां मागे । जल तषार्त पुनः पुनः ॥४७॥
तैसें सुमंगल कृष्णकीर्तन । कृष्णजन्मकर्मगुण । श्रवणादरें स्फुरे प्रश्न । अतृप्त श्रवण न निवती ॥४८॥
यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम । तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंस नः ॥२॥
नवमस्कंधपरिसमाप्ति । समासें कथिली कृष्णकीर्ति । तेणें श्रवणां न पवे तृप्ति । म्हणोनि आर्ति वाढतसे ॥४९॥
सकळ धर्मां जन्मस्थान । नाहुषभार्गवीचें गर्भरत्न । सोमवंशीं कुळभूषण । परम धन्य यदुराव ॥२५०॥
तो यदुवंश बरवे परीं । श्रवण करावा अत्यादरीं । तेथ अवतरोनि श्रीहरि । लीला करी अलौकिक ॥५१॥
त्या विष्णूचीं विशद चरितें । मुनिसत्तमा समस्त मातें । प्रशंसीं तें प्रशस्त चित्तें । श्रवणपात्रीं समर्पीं ॥५२॥
अवतीर्य यदोर्वंशे भगवान्भूतभावनः । कृतवान्यानि विश्वात्मा तानि नो वद विस्तरात् ॥३॥
सकळ भूतांचा भावन । तो यदुवंशीं श्रीभगवान । विश्वात्मा आणि क्रियावान । सांगें संपूर्ण तें आम्हां ॥५३॥
सकळ सुखांचा सुखाब्धि । तो यदुवंशीं कैवल्यनिधि । अवतरोनि नाटकविधि । कवणे बुद्धी आचरला ॥५४॥
यश लक्ष्मी औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । जेथ षड्गुणांचें गांभीर्य । तो सुरवर्य भगवान ॥२५५॥
तेणें पराजय आणि दीनता । कार्पण्य आणि आसक्तता । अज्ञान आणि पराधीनता । कैशी तत्त्वतां दाखविली ॥५६॥
जो कां स्वयें भूतभावन । तयासि कुटुंबाभिसर्जन । पुत्रपौत्रबंधुस्वजन । पशुसदनकोशादि ॥५७॥
देव मनुश्य असुर । त्रिगुणात्मक चराचर । खेचर भूचर जलचर । जंगम स्थावर आब्रह्म ॥५८॥
लक्ष चौर्यांशीकारणी । अपार सृष्टि पृथग्योनि विश्वात्मा विश्व व्यापूनि । अभिन्नपणीं एकला ॥५९॥
तयासि कैसे शत्रुमित्र । कैसें तयासि कुलगोत्र । कैसें वय साचें चरित्र । हें विचित्र सांगावें ॥२६०॥
म्हणाल सांगतां सविस्तर । श्रवणीं होईल अनादर । तैसें नव्हेजी चरित्र । उत्तम श्लोकगुणाचें ॥६१॥
त्रिगुणात्मक त्रिविधजनीं । बद्धमुमुक्षुमुक्तपणीं । विषयीं फळीं आत्मज्ञानीं । प्रीति वाढे विरोधें ॥६२॥
बद्ध नायके ब्रह्मज्ञान । मुमुक्षु नायके विषयकथन । मुक्त दोहींसि उदासीन । नित्य निमग्न स्वानंदीं ॥६३॥
उत्तमश्लोकगुणानुवाद । त्रिविध करी एकविध । मोडी त्रिविधपणाचा भेद । परमानंद प्रकटवी ॥६४॥
निवृत्ततर्षैरुपगीयमानाद्भवौषधाच्छ्रोत्रमनोऽभिरामात् ।
क उत्तमश्लोकगुणानुवादात्पुमान्विरज्येत विना पशुघ्नात् ॥४॥
तृष्णारहित सनकादिक । कपिल कपर्दी नारदप्रमुख । उत्तमश्लोकगुणांचे घोक । गाती ऐकती सर्वदा ॥२६५॥
प्रत्यक्षासि काय प्रमाण । स्वामी नित्य मुक्त सर्वज्ञ । कथिती उत्तम श्लोकगुण । तें मज जीवन त्यक्तोदा ॥६६॥
त्रिविध तापज्वरें तपाले । भवबंधनीं बद्ध झाले । मोक्ष इच्छिती मुमुक्षु भले । तिहीं घेतलें औषध ॥६७॥
सद्गुरुसद्वैद्य धडफुटा । देतां उत्तमश्लोकगुणांचा काढा । होतां भवरोगाचा झाडा । केला रोकडा उपचार ॥६८॥
एक सप्तक तुमच्या मुखें । म्यां हें दिव्यौषध घेतलें निकें । पुष्टता तुकितां माझेनि तुकें । अनंत ब्रह्मांडें न तुकती ॥६९॥
भगवच्चातुर्यलीलाक्रीडन । ऐकोनि चमत्कारती विषयी जन । हरिगुणीं वेधतां श्रवण । मननोन्मन तत्काळ ॥२७०॥
ऐसें समस्तांचें जीवन । यथाधिकारें वदती जन । कोण उपेक्षी भगवद्रुण । एक पशुघ्नावांचोनि ॥७१॥
आत्मघातक अज्ञान पशु । पशुत्वें पशुहत्या करी विशेषु । तया उत्तमश्लोकगुणीं त्रासु । अनधिकारें दुर्भाग्यें ॥७२॥
जेथ खाती तेथ हगती । भक्ष्याभक्ष्य न विचारिती । पुत्र मातेवरी चढती । अगम्य न म्हणती पशुत्वें ॥७३॥
पशुघ्न कंठीं घाली सुरी । तैसें मरण आदळे उरीं । तंववरी विषयाचा सोस करी । त्रास अंतरीं उपजेना ॥७४॥
गगनींहूनि पडे पाषाण । तया व्यापक न कळे गगन । जडत्वें पावे अधःपतन । न करी उत्प्लवन खगाऐसा ॥२७५॥
तैसें अज्ञान अहंताजडत्वें पशु । तयासि हरिगुणाचा न रुचे लेशु । म्हणूनि उपेक्षिती हा विशेषु । कथणें न लगे बहुतेक ॥७६॥
उभाभ्यामेव पक्षाभ्यां यथा खे पक्षिणां गतिः । तथैव ज्ञानकर्माभ्यां परं विन्दन्ति योगिनः ॥५॥
जैसा दो पक्षांच्या फडत्कारें । विहंग ऊर्ध्वगति संचरे । पूर्वोत्तर पक्षीं भरे । योगी तसै चित्सुखीं ॥७७॥
नेणे पूर्वपक्षीं शुद्धकर्म । उत्तरपक्षीं ज्ञानवर्म । उभयपक्षहीन भ्रम । कल्पांतींही निरसेना ॥७८॥
ऐशी पक्षहीन गति । तयासि पाषाण वदती । नरदेह गगनींहूनि च्यवती । अधोगति अंधतमीं ॥७९॥
असोत पशु कां पशुघ्न । जया नावडती हरिगुण । किमर्थ वाढवूं व्याख्यान । श्रोते सज्ञान जाणती ॥२८०॥
माझे पूर्वज हरीनिकटीं । हरि रक्षी त्यां नानासंकटीं । मीही ऐकें हे कुळकटी । म्हणोनि पोटीं उत्कंठा ॥८१॥
पितामहा मे समरेऽमरंजयैर्देवव्रताद्यातिरथैस्तिमिंगलैः ।
दुरत्ययं कौरवसैन्यसागरं कृत्वाऽतरन्वत्सपदं स्म यत्प्लवाः ॥६॥
गोविंदकथा मंगलमूर्ति । मंगलारंभीं मंगलकीर्ति । हरिगुणांची मंगल स्मृति । उदयीं शांति विघ्नांची ॥८२॥
आत्महंते कां पशुघाती । तया हरिगुणीं नुपजे रति । वांचूनि त्रिविध जे त्रिजगतीं । कृष्णकीर्ति द्विरेफ ॥८३॥
श्रीहरि आमुचें कुळदैवत । अभीष्टवरद पूर्वजार्चित । म्हणोनि हरिगुणीं चित्त निरत । नान्यासक्त सर्वदा ॥८४॥
मत्पूर्वजांची पुण्यकीर्ति । जेणें विस्तारिली त्रिजगतीं । पठणें श्रवणें तरले किती । पुढें तरती अकल्प ॥२८५॥
म्हणोनि ब्रह्मशापें दुर्मरण । अधोगतीस कारण । ते निवारे श्रीकृष्णगुण - । पुण्यश्रवणकीर्तनें ॥८६॥
मंदर मज्जतां क्षीरार्णवीं । धांवा केला ब्रहमदि देवीं । कमठावतरें तारिला जेवीं । अधोगतीपासूनि ॥८७॥
ब्रह्मा भेडसावूनि शंखें । निगम हरूनि अधोमुखें । सागरीं बुडवितां दुःखें । लोकत्रय दाटलें ॥८८॥
तैं मत्स्यविग्रहें वेदोद्धरणीं । सिंधु डहुळी चक्रपाणी । शंख मर्दूनि वामपाणीं । वाद्य करूनि वागविला ॥८९॥
असंख्यात भवार्णवीं । अधोगती पचतां जीवीं । कृष्णस्मरणें तरले जेवीं । कुरुसैन्याब्धि पांडव ॥२९०॥
माझे पितामह पांडव । तरले कौरवसैन्यार्णव । तुच्छ करूनि वत्सपद इव । श्रीकृष्णनाथप्रतापें ॥९१॥
तो सैन्यसिंधु अतिदुस्तर । संग्रामवर्त्त भयंकर । द्रोण कर्ण अतिरथी वीर । मकर नक्र शल्यादि ॥९२॥
कृपाचार्य महाबाहो । भूरिश्रवा विकर्ण ग्राहो । अश्वत्थामा प्रलयदाहो । वडवानळ ज्यामाजीं ॥९३॥
अमर जिंकूनि लंकानाथें । संयोजिलें निजदास्यातें । कार्तवीर्यें दशकंठातें । धरूनि निगडीं बांधिलें ॥९४॥
शाखामृगादि श्वापद हरि । विनोदें रक्षिती राजमंदिरीं । रावणही त्याचपरी । कारागारीं जो योजी ॥२९५॥
तया कार्तवीर्या रणीं । एकला जिंकी परशुपाणि । तोही भृगुपति स्वयंपणीं । भीष्मदेवें जिंकिला ॥९६॥
जेणें संग्रामीं कुरुक्षेत्रीं । प्रतिज्ञापूर्वक जिंकिला हरि । चक्र धरविलें पहातां वीरीं । ऐशी थोरी भीष्माची ॥९७॥
कृष्ण सुरासुरांचा जेता । तो जिंकिला क्षण न लगतां । अमरजयाचिया अर्था । देवव्रता बोलिजे ॥९८॥
तो देवव्रत आदिकरूनि । वीर जलग्रह जिये जीवनीं । तो सैन्यार्णव तुच्छ करूनि । गोष्मदप्राय लंधिला ॥९९॥
तया पांडवांची पुण्यनौका । श्रीकृष्ण तैलोक्यतारिका । कीर्तिश्रवणें मजही रंका । तेचि नावे बैसवीं ॥३००॥
पूर्वजांचिया जुनाट गोष्टी । ऐकोनि श्रवणीं हांव पोटीं । प्रत्यक्ष माझी ही अंगयष्टि । अस्त्रसंकटीं रक्षिली ॥१॥
द्रौण्यस्त्रविप्लुष्टमिदं मदङ्गं संतानबीजं कुरुपाण्डवानाम् ।
जुगोप कुक्षिंगत आत्तचक्रो मातुश्च मे यः शरणं गतायाः ॥७॥
जेणें द्रौण्यस्त्रापासूनि वांचविलें । तैहूनि तन्निष्ठचि मन झालें । त्या कृष्णाचें कीर्तन भलें । श्रवण करविलें पाहिजे ॥२॥
म्हणाल द्रौण्यस्त्र तें कवण । अंगव्याप्तीस काय कारण । तरी हें सौप्तिकपर्वीचें संक्षेपकथन । विचक्षण परिसोत ॥३॥
कुरुक्षेत्रीं कौरव बळी । पांडवहस्तें पडले सकळी । गांधार जानुभग्न घायाळी । रणमंडळीं पहुडला ॥४॥
सैन्य मारिलें अकरा क्षौणी । उरेल कृतवर्मा कृप द्रौणि । प्राणभयें घोरारण्यीं । ठेले लपोनि वटवृक्षीं ॥३०५॥
दोघे निद्रित पावोनि श्रमा । पितृदुःखार्त अश्वत्थामा । धृष्टद्युम्नाच्या हननकामा । चिंताचंडि पूजितसे ॥६॥
तंव त्या वटीं वायस कोटी । सुखें निद्रित निशीच्या पोटीं । तेव्हां काकशत्रु उलूक हटी । एकला निवटी बहुकाकां ॥७॥
देखोनि अश्वत्थामा वेगें । कृपुकृतवर्म्यां करी जागें । काकउलूकांचा वृत्तांत सांगे । म्हणे ऐसें निजांघें करीन मी ॥८॥
तया कृपाचार्यें सांगोनि नीति । वारितां नायके पुरुषार्थी । पिता मारिला तैशा रीतीं । पितृघाती मारीन ॥९॥
आजि पांडव आणि पांचाळ । शिबिरीं निद्रिंत मारीन सकळ । म्हणूनि निघाला उतावीळ । भोजमातुला घेऊनि ॥३१०॥
शिबिरद्वारीं महद्भूत । प्रकटोनि वारिला द्रोणसुत । गिळिलीं शस्त्रास्त्रें समस्त । गर्वहत तो झाला ॥११॥
तेणें स्तविलें कालाग्निरुद्रा । करुणा आली भालनेत्रा । मार्ग देऊनि शिबिरद्वारी । खङ्ग दिधलें द्रौणीतें ॥१२॥
खङ्ग लाहूनि भर्गदत्त । शिविरीं प्रवेशे द्रोणसुत । द्वारीं रक्षणा ठेविले गुप्त । कृपाचार्य कृत्वर्मा ॥१३॥
दुर्योधन पदतां रणीं । पांडवां घेऊनि चक्रपाणि । गेला पूजावया भवानी । भविष्यकरणी जाणता ॥१४॥
शिखंडी धृष्टद्युम्न । द्रौपदीपुत्र पांचही जाण । असंख्य उरलें पांडवसैन्य । घाला घालूनि मारिलें ॥३१५॥
निद्रित मारिले महावळी । शिबिरें जाळूणि केली होळी । पळतां मारिलें द्वारपाळीं । एवं सकळ आटिलें ॥१६॥
धृष्टद्युम्नाचा सारथी । दैवें पळाला गुप्तगति । तेणें सांगतां पांडवांप्रति । महारथी क्षोभले ॥१७॥
तंव कृपाचार्य यादव द्रौणि । पांडवभयें प्राणरक्षणीं । तिहीं मार्गी तिघी जणी । महा पळणी मांडिली ॥१८॥
द्वारके पळाला कृतवर्मा । कृपाचार्य गेला निजाश्रमा गंगातटीं अश्वत्थामा । ब्रह्मकर्मा संपादी ॥१९॥
द्रौपदी आणि धर्म ग्लानीं । देखोनि भीमार्जुनचक्रपाणि । धांवणी करितां देखे द्रौणि । ईषिका मंत्रूनि तो सोडी ॥३२०॥
पांडवांचा कुलक्षयो । इच्छूनि द्रौणि द्रोणतनयो । द्रौण्यस्त्र प्रेरितां अस्त्रवायो । गगनगर्भी चौताळे ॥२१॥
पांडवर रक्षिले पद्मनाभें । द्रौणि अस्त्रोपसंहरण न लभे । तेव्हां मम मातेच्या गर्भें । अस्त्रप्रभें पीडिजे ॥२२॥
तो हा पांडवकौरववंश - । वृद्धीसि माझा देह अंश रक्षिला जैसा कां हुताश । श्रौतेष्टीच्या गोपने ॥२३॥
अस्त्रें पीडितां गर्भगोळ । माझी माता अति व्याकुळ । हृदयीं चिंतूनि गोपाळ । शरण तत्काळ रिघाली ॥२४॥
तेव्हां सचक्र रिघूनि कुशीं । द्रौण्यस्त्रबाधेपासूनि रक्षी । माझा देह मज मी साक्षी । विश्वीं परीक्षीं रक्षका ॥३२५॥
यालागीं परीक्षिति नाम । माझें ठेवी पुरुषोत्तम । त्याचे लीलेचा अनुक्रम । जन्मकर्म परिसवीं ॥२६॥
N/A
References : N/A
Last Updated : April 25, 2017
TOP