अध्याय १ ला - श्लोक ५६ ते ६०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - स्वसुर्वधान्निववृते कंसस्तद्वाक्यसारवित् ।
वसुदेवोऽपि तं प्रीतः प्रशस्य प्राविशद्गृहम् ॥५६॥

देवकीचा वाढे स्नेहो । माझा सौहार्दनिर्वाहो । तुज विजयाचा उत्साहो । चिरायु देहो होईल ॥६१॥
शुक म्हणे परीक्षिति । ऐशी वसुदेवाचे एयुक्ति । ऐकोनिया भोजपति । आपुले चित्तीं विवरीत ॥६२॥
म्हणे देवकी दीन केवळ । वसुदेव पुण्यात्मा स्नेहाळ । त्यांचे पोटींचा अष्टम बाळ । तोचि काळ मजलागीं ॥६३॥
तरी त्या गर्भाचें अर्पण । करितांचि मृत्यूचें निवारण । देवकीचें चुकविलें मरण । परमधन्य वसुदेव ॥६४॥
ऐसें विवरूनिया कंस । जाणोनि वाक्याचा सारांश । सोडूनि देवकीचा केशपाश । केला सकोश निजखङ्ग ॥८६५॥
देवकीवधाहूनि परतला । पूर्वस्नेह अवलंबिला । म्हणे भावोजी भला भला । विवेक कथिला मजलागीं ॥६६॥
धन्य वसुदेवा विवेकनिधि । चुकविली माझी प्रमादबुद्धि । मज बोधिलें तेचि विधि । पुढें कल्याण चिंतावें ॥६७॥
वसुदेव म्हणे कंसराया । तुझिया आयुष्यवृद्धिकार्या । कुर्वंडीन माझी काया । जायातनयांसमवेत ॥६८॥
दोघां हृदयीं आलिंगून । कंसें नेत्रा आणिलें जीवन । वसुदेवदेवकीही स्फुंडन । स्नेहवर्धन हरिमाया ॥६९॥
मग वारुवां देतां साट । रथ चालिला घडघडाट । मंगळतुरांचा बोभाट । स्तोत्रपाठ बंदींचा ॥८७०॥
ऐशिया विनोदविचित्रगजरीं । वोहरें मिरविलें मथुरापुरीं । नेऊनि वसुदेवाचे घरीं । मग नोवरी उतरली ॥७१॥
यथाविधि श्रीपूजन । ब्राह्मणासि भूरि दान । त्यागें विद्योपजीवी जन । उपायन सुहृदांसि ॥७२॥
आज्ञा घेऊनि भोजपति । जातां निज मंदिराप्रति । वसुदेवही अतिप्रीतीं । बोळवीत निघाला ॥७३॥
वारंवार वर्णी गुण । स्निग्ध मधुर प्रिय भाषण । कंस पावविला सदन । आला आपण निजभुवना ॥७४॥

अथ काल उपावृत्ते देवकी सर्वदेवता । पुत्रान्प्रसुषुवे चाष्टौ कन्यां चैवानुवत्सरम् ॥५७॥

देवकी लाहोनि पट्टराणी । वसुदेव आनंदनिर्भर मनीं । मधुकर लाघोनि आमोद पानीं । जेवीं पद्मिणी न विसंवे ॥८७५॥
तेवीं वसुदेव भूपाळ । देवकीवीण अर्धपळ । कंठूं न शके उतावीळ । श्रीमुखकमल न्यहाळी ॥७६॥
उमा इंदिरा सरस्वती । लोपामुद्रा अरुंधती । अनसूयादि शची रति । महासती ज्या नारी ॥७७॥
तया देवकीची एकी कळा । समान तुकितां न्यून सकळा । देवकीची अनंत लीला । देवता सकळा जीमाजीं ॥७८॥
उमारमादि ज्या ज्या सती । त्या पृथक्गुणांच्या गौण शक्ति । अनंतगुणांची विश्रांति । महासती देवकी ॥७९॥
सर्व देवतांचें मूळ । ते मूळमायेसी सत्ताबळ । जयाचें तो श्रीगोपाळ । जठरीं बाळ जयेचे ॥८८०॥
एवं सर्वदेवगुणमयी । देवकीच विश्वविजयी । वसुदेवाचिये गुणालयीं । भाग्योदयीं व्यवहारे ॥८१॥
दंपतीचें पूर्वर्जित । स्वमुखें सांगेल भगवंत । तें तृतीयाध्यायीं व्यक्त । श्रोते समस्त परिसोत ॥८२॥
ऐसें कित्येक काळवरी । स्वानंदाच्या विलासभरीं । सुखें क्रीडतां संसारीं । गरोदरी ते झाली ॥८३॥
अंतर्वत्नीचा सोहळा । न वाटे वसुदेवभूपाळा । गर्भार्पण कंसकाळा । या वाग्ज्वाळा स्मरोनि ॥८४॥
प्रसूतिकाळ झालिया प्राप्त । प्रथम जन्मला कीर्तिमंत । ऐसे प्रसवली अष्टसुत । जगन्माता देवकी ॥८८५॥
कन्या सर्वांहूनि धाकुटी । सुभद्रा जन्मली देवकीपोटीं । इतुकी सांगोनिया गोठी । कंसरहाटी शुक सांगे ॥८६॥
प्रतिवत्सरानुवत्सर । एक एक प्रसवे कुमार । ऐसें झाले अष्ट पुत्र । तें चरित्र परियेसा ॥८७॥

कीर्तिमंतं प्रथमजं कंसायानकदुंदुभिः । अर्पयामास कृच्छ्रेण सोऽनृतादतिविह्वलः ॥५८॥

आनकदुंदुभि वसुदेव । ज्याचें अमोघ वैभव । ज्याचे जन्मकाळीं देव । परमोत्सव पावले ॥८८॥
सत्त्वसंपत्तीचे गुण । जेथ प्रकटले संपूर्ण । म्हणॊनि तेथ स्वानंदघन । श्रीभगवान प्रकटेल ॥८९॥
तो वसुदेव आपण । कीर्तिमंत प्रथम नंदन । जन्मतांचि कंसार्पण । करी नेऊन सदनासि ॥८९०॥
करूनि सत्यसंरक्षण । पुत्र केला कंसार्पण । दुःख हृदयींचें दारुण । धैर्य धरूनि साहिलें ॥९१॥
सतय तेथेंचि भगवंत । हा वसुदेवाचा सिद्धांत । असत्य तेथें नरकपात । दुःख अनंत भोगिजे ॥९२॥
म्हणोनि सत्याच्या पाळणें । बालक काळामुखीं देणें । नाहीं कळवळिला कारुण्यें । कोण्या गुणें तें ऐका ॥९३॥

किं दुःसहं नु साधूनां विदुषां किमपेक्षितम् । किमकार्य कादर्याणां दुस्त्यजं किं धृतात्मनाम् ॥५९॥

वासुदेव सद्गुणाधिष्ठान । दारापुत्र सदनधन । शेखीं अर्पूनि निजप्राण । करी रक्षण सत्याचें ॥९४॥
पुत्रदारासदनमोह । साधूसि केउला दुःसह । भगवत्प्राप्तीचा जेथ रोह । तेथ प्रवाह धैर्याचा ॥८९५॥
वुद्वद्वृंदचूडामणि । नित्यानित्यविवेकखाणी । स्वप्नाकार प्रपंचहानि । देखोनि मनीं दुखवेना ॥९६॥
तो पुत्रस्नेह नापेक्षी । ना इहामुत्र तरी अपेक्षी । सत्य सन्मार्गें स्वधर्म रक्षी । कर्मसाक्षी फलत्यागी ॥९७॥
कंस केवीं बाळें मारी । ऐशी आशंका न कीजे चतुरीं । कदर्य तितुका काय एक न करी । आसुरीप्रकृतिमंत जो ॥९८॥
असो वासुदेव सुविचार । सत्यरक्षणीं तत्पर । विवेकबळें धरूनि धीर । झाला निष्ठुर सुतदानीं ॥९९॥
परंतु मातेचा कळवळा । सहस्रधा पित्याहूनि आगळा । प्राप्त होतां विषम काळा । जननी बाळा निपेक्षी ॥९००॥
पशुपक्ष्यादि नाना जाति । माता प्रतिपाळी संतति । पिता विषयांचिये विश्रांति । भोगूनि रति वेगळा ॥१॥
गर्भवासीं असतां बाळ । मातेसि करी दुःखें विकळ । मरणाहूनि प्रसूतिकाळ । दुःखकल्होळदायक ॥२॥
बाळपणींचें अति दुःख । माता सोसूनि मानी सुख । माते ऐसा कळवळा देख । पितृप्रमुख नेणती ॥३॥
गर्भधारण पोषण । करूनि न मानी दुःख दारुण । तये मातेचें उत्तीर्ण । आजन्म पूर्ण हों न शके ॥४॥
ऐशिया सामान्य माता जनीं । देवकी तो जगज्जननी । ते बाळ देतां कालवदनीं । कळवळूनि न हटे कां ॥९०५॥
तरी बीज घेऊनि टाकिती भूस । रस घेऊनिया बाकस । तैसा आत्मनिष्ठांपुढें फोस । दृश्यभासविवर्त्त ॥६॥
आत्मनिष्ठे व्यवस्थित । तेचि धृतात्मे यथार्थ । त्यांसि दुस्त्याज्य पदार्थ । कॊण तो एथ विचारा ॥७॥
आत्मनिष्ठा करूनि दृढ । मृषा भ्रमाचें कावाड । इहामुत्र नसतां गोड । कोण अवघड त्यागाचें ॥८॥
अमूल्य वारू आतुडे वनीं । देखूनि दरिद्री तोष मानी । प्राणहीन कळतां मनीं । प्रेमा ग्लानीं पारुषे ॥९॥
तैसें सभ्रांत शास्त्रश्रवण । तेणें इहामुत्रीं प्रेमा गहन । जें अवास्तव परोक्षज्ञान । अभिरंजन त्यां तेथें ॥९१०॥
जे कां केवळ चरमदेही । ते न मज्जती मोहडोहीं । देवकी चरमदृशाचि पाहीं । दुस्त्याज्य कांहीं  ते न मानी ॥११॥
असो वसुदेव आपण । बाळक करितां कंसार्पण । तेव्हां त्याचें द्रवलें मन । तें निरूपण शुक सांगे ॥१२॥

दृष्ट्वा समत्वं तच्छौरेः सत्ये चैव व्यवस्थितिम् । कंसस्तुष्टमना राजन्प्रहसन्निदमब्रवीत् ॥६०॥

शुक म्हणे गा परीक्षिति । ऐशी यथार्थ ब्रह्मस्थिति । जे देखोनि दुर्जनमति । तेही होती द्रवीभूत ॥१३॥
कंस केवळ दुष्टात्मा । होणार बलिष्ठतेचा महिमा । तथापि हृदयीं प्रकटली क्षमा । तो हा गरिमा निष्ठेचा ॥१४॥
वसुदेव शूरसेनाचा बाळ । यथोक्तसौहार्द स्नेहाळ । देखोनि कंसही कृपाळ । होऊनि कोमळ बोलतो ॥९१५॥
देखोनि त्याचें समत्व । सत्यसंरक्षणीं दृढत्व । कंस संतुष्ट सौम्यत्व । स्मित वक्तृत्व आदरी ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP