अध्याय १ ला - श्लोक ३० ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तस्या तु कर्हिचिच्छौरिर्वसुदेवः कृतोद्वहः । देवक्या सूर्यया सार्द्धं प्रयाणे रथमारुहत् ॥३०॥

सांडुनिया मथुरापुरी । गोकुळा कां गेला मुरारि । या प्रश्नाची शंका दूरी । व्हावया आदरीं इतिहासा ॥८८॥
तये मथुरेमाझारीं । कोणे एके समयीं शौरी । देवकरायाची कुमारी । देवकी वरी विवाहीं ॥८९॥
झाला सोहळा दिवस चारी । बोहरें बैसोनि रथावरी । मंगलतुरांच्या गजरीं । मंडपाबाहेरीं निघालीं ॥५९०॥
नववधू देवकीसहित । वसुदेव शूरसेनाचा सुत । पयाणीं रथीं आरूढत । हर्षयुक्त स्वानंदें ॥९१॥

उग्रसेनसुतः कंसः स्वसुः प्रियचिकीर्षया । रश्मीन्हयानां जग्राह रौक्मै रथशतैर्वृतः ॥३१॥

तेव्हां उग्रसेनाचा कुमार । कंस कालनेमीचा अवतार । इच्छूनि भगिनीसि प्रियादर । अतितत्पर प्रयाणीं ॥९२॥
सुवर्णमय रथांचे शतें । वेष्टित पातला राजपंथें । अमूल्यरत्नीं रत्नखचितें । मिरवती तेथें वधुवरें ॥९३॥
भगिनीचिया प्रियकार्यार्थ । सवेग सांडूनिया आपुला रथ । धुरें बैसोनि करी सारथ्य । रश्मी गृहीत हयांचे ॥९४॥
मुकुटकुंडलें वीरकंकणें । कनकमंडित सर्वाभरणें । खङ्ग खेटक तोमर धरणें । यमदंष्ट्रादि कटिभागीं ॥५९५॥
चामरआतपत्रच्छत्र - । धारकां कंसाज्ञा स्वतंत्र । होतां सेविती तें वोहर । यथोपचारअर्पणें ॥९६॥
देवकी अत्यंत लडिवाळ । देवक पिता कन्यावत्सल । जाणोनि बाहेर प्रयाणकाल । आनंद प्रबळ ओपित ॥९७॥

चतुःशतं पारिबर्हं गजानां हेममालिनाम् । अश्वानामयुतं सार्द्धं रथानां च त्रिषट्शतम् ॥३२॥
दासीनां सुकुमारीणां द्वे शते समलंकृते । दुहित्रे देवकः प्रादाद्याने दुहितृवत्सलः ॥३३॥

ऐरावताचिया खोपे । जन्मले समसाम्य प्रतापें । अलंकारिलें जातरूपें । तेजें लोपें रविप्रभा ॥९८॥
पृष्ठीं रत्नखचित गुढारें । जैशी दिनमणीचीं बिढारें । पाखरा कंठभूषणें विचित्रें । श्रवणीं चामरें रत्नदंडी ॥९९॥
श्वेत पीत रक्त रंग । शुंडा चित्रिलिया सुरंग । अंजनें गंडस्थळांचे भाग । आणि भ्रूभंग रेखिले ॥६००॥
किंकळियां भरिती नभ । प्रावृटीं धूमयोनीचा क्षोभ । तैसे गर्जती मत्त इभ । भ्रमरीं निकुंभ सेविलें ॥१॥
ऐसे चारीशत कुंजर आंदणा ओपी राजेश्वर । अश्वरत्नें पंधरा सहस्र । वेगवत्तर नभोगामी ॥२॥
जडित रत्नांचीं पल्याणें । प्रतिस्पर्धती भास्करकिरणें । ग्रीवामौलमुखाभरणें । विद्युल्लाते लाजविती ॥३॥
अश्वसादी बैसले वरी । नर्त्तविती जीजीकारीं । मंडळें वाम सव्य भ्रमरीं । ग्रीवा चुचुकारीं थापटिती ॥४॥
इषुधी कार्मुकें खङ्गें चर्में । रत्नखचित अभेद्य वर्में । अनेक शस्त्रास्त्रांचीं नामें । तीं शौर्यकामें परजिती ॥६०५॥
मुकुट कुंडलें वनमाळा । करमुद्रिका झळकती चपळा । सैन्यश्रियेच्या हास्यकळा । दशनढाळासारिख्या ॥६॥
अठरा शतें रथ सुंदर । नवरत्नांचे मनोहर । ज्वाळमाळा मुक्ताहार । चित्रविचित्र पताका ॥७॥
माजीं वितानें नाना वर्णें । गाद्या मृदोलिया वोटंगणें । यंते धरिती प्रतोद तेणें । साट देणें वारुवां ॥८॥
रथीं बैसले लावण्यराशि । अमूल्य वस्त्राभरणें त्यांसि । शक्राभोंवतीं सुरवरांसि । शोभा जैशी चालतां ॥९॥
पद्मिणीजातीच्या सुकुमारी । देवकी सेविती किंकरी । जैशा गिरिजेतें किन्नरी । सर्वोपचारें सेविती ॥६१०॥
हेमरत्नांचीं भूषणें । नानारंगी अमूल्य वसनें । रथकुंजरप्रमुख यानें । विराजमानें दासींसि ॥११॥
इतुकें आंदण देवकीपिता । देवकीसि झाला देता । प्रयाणोत्सवीं वस्तुजाता । दे जामात्या तोषार्थ ॥१२॥

शंखतूर्यमृदंगाश्च नेदुर्दुंदुभयः समम् । प्रयाणप्रक्रमे तावद्वरवध्वोः सुमंगलम् ॥३४॥

मंगलतुरांचे मंगल ध्वनी । शंख वाजती पवित्र स्वनीं । दुंदुभिघोषें अमरां कर्णीं । अवतारकरणी सूचिली ॥१३॥
मृदंग वाजती ब्रह्मतालें । पंचमस्वरांच्या आलापमेळें । कुशळ नर्तकीचे पाळे । अंगें चपळें नाचती ॥१४॥
तुरें वाजती नानापरी । शृंगें बुरंगें मोहरीं । करणे तुतारें नफेरी । वांके भेरी गिडिविडीं ॥६१५॥
विप्र करिती वेदघोष । सिद्धगणांचे अशेष । भाट बंदी मागधांस । परमोल्हास गुणपाठीं ॥१६॥
नगर चौवारा मिरवणुक । मिरवत आनंदें सम्यक् । ठायीं ठायीं कौतुक । नाना लोक दाटले ॥१७॥
कंस वारुवां देतां साट । रथ चालिला घडघडाट । मंगळतुरांचा बोभाट । नागरी भाट गर्जती ॥१८॥

पथि प्रग्रहिणं कंसमाभाष्याहाशरीरवाक् । अस्यास्त्वामष्टमो गर्भो हन्ता यां वहसेऽबुध ॥३५॥

पथीं चालतां ऐशा गजरीं । तंव वाचा बोले अशरीरी । जैसा तारुण्यवयसीं भोगभरीं । रोग करी महाविघ्न ॥१९॥
अकस्मात गगनवाणी । पडिली कंसाचिये श्रवणीं । तेणें शंका उपजली मनीं । तें शुक मुनि बोलतो ॥६२०॥
कृतागसे मर्मोच्चार । ऐकोनि भंगे जेवीं अंतर । कां नियोगी ऐके राजमंत्र । स्वाधिकारभंगाचा ॥२१॥
कंसासि म्हणे गगनवाणी । हर्षें रथीं वाहसि वहिणी । इचा अष्टमगर्भ हानि । करील तुझिया प्राणाची ॥२२॥
अरे मूर्खा मंदमति । काय मानिली विश्रांति । ऐसें ऐकतां करी चित्तीं । शंकाशक्ति झडपणी ॥२३॥
तैसा श्रवणीं पडतां दैवशब्द । मंगला हृदयींचा आनंद । अंतरीं उपजला विषाद । महाखेद प्रकटला ॥२४॥
यश अथवा पराभव । हे हरीचेचि दोन्ही भाव । यथाधिकारें त्यांचा प्रभाव । तें लाघव परियेसा ॥६२५॥
होणार तें न चुके कल्पांतीं । दैवें अघटित अवघडें घडती । तेव्हां न दंडळी जो चित्तीं । धैर्यवृत्तिविवेकें ॥२६॥
देहधनाचा न धरी लोभ । मानभंगें न पवे क्षोभ । अपकीर्तीचा होता लाभ । जो निर्दंभ अवंचक ॥२७॥
तयासि होणार होय खरें । परंतु परिणामीं आहे बरें । अंगीकारिलिया परमेश्वरें । त्रैलोक्य भरे कीर्तीनें ॥२८॥
परंतु ऐसें विपरीत काळें । दुष्ट कैसेनि सांभाळे । जैसें उन्मत्त आंधळें । पडे आदळे आडरानीं ॥२९॥
विपरीत अदृष्ट उन्हाळा । लागतां अघटित विघ्नानळा । अविवेकवावधानमेळा । प्रळयकाळासारिखा ॥६३०॥
तेथ दुर्मतीच्या निघती ज्वाळा । कुकर्मस्फुलिंगाचा उमाळा । आकांत निरपराधें सकळां । जाळी शाळा सुखाच्या ॥३१॥
तैसा कंस दैत्यावतार । कर्णी पडतां मर्मोत्तर । विषादें विटाळलें अंतर । केला अंधार अविवेकें ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP