अध्याय १ ला - श्लोक ८ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


वीर्याणि तस्याखिलदेहभाजामन्तर्बहिः पूरुषकालरूपैः ॥
प्रयच्छतो मृत्युमुतामृतं च मायामनुष्यस्य वदस्व विद्वन् ॥८॥

चराचरात्मा चक्रपाणि । सकल देहवंत प्राणी । त्यांस भवमोक्शाचा दानी । त्याची करणी अनुवादा ॥२७॥
कोणा ओपी मोक्षसुख । कोणाप्रति भवदायक । त्याचा यथामति विवेक सकौतुक नृप बोले ॥२८॥
जैसा अश्मगर्भीचा अयःपिंड । परीस पूर्वावस्थे करी खंड । पळार्धें खंडीचा होय खंड । हेम लोखंड मग नव्हे ॥२९॥
सरिता मिळालिया गंगे । काष्ठें चंदनाचेनि संगें । हरळ वैरागप्रसंगें । थोरी नुतरे मागुती ॥३३०॥
वस्तुसामर्थ्यें ऐशीं जडीं । किती सांगावीं लक्षकोही । अंगीकारूनि हातींचें सोडी । ऐशी प्रौढी न देखीं ॥३१॥
जो चराचरात्मा श्रीकृष्ण । तेणें गर्भीं केलें रक्षण । त्या परीक्षितीचें अंतर्ज्ञान । शब्दें कोण अनुवादे ॥३२॥
म्हणूनि परीक्षिति विष्णुरात । वक्ता योगींद्र शुक समर्थ । श्रोते वक्ते पुण्यवंत । इत्थंभूत प्रश्नोक्ति ॥३३॥
चिंतामणीची वेदिका भली । वरी कल्पतरूची साउली । तेथ विश्रामती त्यां दुर्बळी । शक्रही म्हणूं शकेना ॥३४॥
तैसेंची येथेंही पहा नयनीं । श्रोते वक्ते पूर्वज्ञानी । जगदुद्धारककथाश्रवणीं । विमुखपणीं विपरीत ॥३३५॥
ऐके परीक्षिति सांगे शुक । अंतरात्मा श्रीहरि एक । तरी कोणासि मोक्ष देख । संसारदुःख कोणासि ॥३६॥
सर्वीं समान  श्रीभगवंत । एका अमृत एका मृत्य । या वैषम्या हाचि हेत । वासनाजनितसंस्कार ॥३७॥
जैसा सूर्यप्रकाश घन । नेत्रेंद्रियासि प्रकाशून । स्वसन्मुखां वास्तवज्ञान । भाए भिन्न विमुखत्वें ॥३८॥
सुविद्या अविद्या दोन्ही शक्ति । ज्ञानाज्ञानरूप ज्या वृत्ति । एक कैवल्यसुखाची दात्री । एक बुडविती संसारीं ॥३९॥
शुद्धस्वव्रूपीं अनवधान । तेंचि दोहींचें जन्मस्थान । अन्वयव्यतिरेकें ओळखणें । प्रवृत्ति आणि निवृत्ति ॥३४०॥
आतां प्रवृत्तीचें रूप । शुद्ध स्वरूपींचा संकल्प । मायानियंता साक्षिरूप । सर्वज्ञत्व पातला ॥४१॥
तोचि ईश्वर पूर्ण ज्ञाता । एकाकी न रमे हें मानितां । बहुत्व व्हावें हें इच्छितां । इच्छाशक्ति संभवली ॥४२॥
तिचे पोटीं झाले त्रिगुण । तिहीं अवस्थांचे अभिमान । जनन पालन संहरण । कर्माचरण फळभोगें ॥४३॥
रजोगुणें मर्त्यलोक । सत्त्वें स्वर्गादि अनेक । तमें तामिस्र तिर्यक । महानरक अंधतम ॥४४॥
त्रिगुणात्मक अहंकार । तेणें दृढाविला संसार । माझें तुझें थोडें फार । भव दुस्तर वाढला ॥३४५॥
अविद्या ही मोहमाय । पंच भूतें पंच विषय । अहंबुद्धि विजातीय तापत्रय भोगवी ॥४६॥
माझा देह माझी कांता । माझी माता पिता भ्राता । पुत्र मित्र क्षेत्र ममता । बहिर्मुखता अविचारें ॥४७॥
रजोगुणाचिया क्षोभार्थ । इहलोकींचा विषय स्वार्थ । साभिलाषें सर्व पदार्थ । जोडी अनर्थ अविवेकें ॥४८॥
लाभालाभ हर्षामर्ष । शत्रुमित्र खेदतोष । पापपुण्य दोषादोष । हा विशेष दुःखद ॥४९॥
धनसंग्रहीं दुःख पावे । धनरक्षणीं तें दुणावे । धनविनाशेंही बुडावें । दुःखडोहीं आकल्प ॥३५०॥
संतानार्थ दाराभरण । संतानवृद्धी करितां शीण । अवज्ञा करितां संतान । वाटे प्राण द्यावा परिणामीं ॥५१॥
दुःखें कीजे विद्याभ्यास । विद्यासिद्धि वाद विशेष । तत्परिपाकीं ब्रह्मराक्षस । विद्याक्षोभें होईजे ॥५२॥
ऐसे संग्रह अनेक । करितां वधिंतां हरितां दुःख । भोग भोगूं बहिर्मुख । नाना लोक पावती ॥५३॥
तमोगुणाची प्रवृत्ति । निद्रा तंद्रा आवडे चित्तीं । प्रमादें वर्ते घातपातीं । अधोगति मग भोगी ॥५४॥
सत्त्वगुणें प्रवृत्तिक्षोभ । शास्त्राभ्यासें ज्ञानलाभ । अष्ट मदें वाढे दंभ । करी आरंभ कर्माचा ॥३५५॥
श्रेष्ठ जाति श्रेष्ठ कुल । श्रेष्ठ विद्या श्रेष्ठ शील । रूपयौवन अंगंचिं वळ । घनमद केवळ आठवा ॥५६॥
येची अर्थीं सकाम साधनें । पुण्यें जोडावीं महायत्नें । स्वर्ग पावोनि सुख भोगणें । अप्सरामृतविमानें ॥५७॥
ऐशी प्रवृत्ति सत्त्वगुणें । तों देव करिती नाना विघ्नें । नहुषादिकां अधःपतन । अमरां मरणें न चुकती ॥५८॥
रसना भुलोनि मीन गळीं । गुंतोनि पातला निर्जल स्थळीं । जीवना मुकला तळमळी । हे भवजाळीं आहाळणी ॥५९॥
कैंचा स्वर्ग कैंचें सुख । मृत्यु संसार घोर दुःख । जननें मरणें बहिर्मुख । हीनविवेक भोगिती ॥३६०॥
त्यासि काळरूपें हरि । बुडवी संसारसागरीं । अविद्याभ्रांति विशेष पसरी । असोनि अंतरीं चोरला ॥६१॥
वास्तव ज्ञान अस्तावलें । अविश्वासाचें अभ्र आलें । नास्तिक्यता गडद पडिलें । काळें केलें काळवरवें ॥६२॥
काम्यकर्मठ खद्योतक । कुतर्कजल्प जल्पती भेक । तेथ आंधळें आठवी लोक । कोण विवेक तयांचा ॥६३॥
दुःखदायक दुर्मती । दुर्मतीच्या अनेक वृत्ति । तितुक्या काळरूपीं होती । बहुवचनोक्ति नृप बोले ॥६४॥
आता अंतर्यामीं पुरुषरूप । करी प्रवृत्तीचा आटोप । निवृत्तिमार्गीं लावी दीप । जो आकृप मोक्षद ॥३६५॥
तें व्याख्यान यथामति । जें विशद बोले परीक्षिति । सावधान कीजे श्रोतीं । प्राकृतोक्तिपीयूषा ॥६६॥
निशाणी लावूनि स्वर्गा जाणें । ऐसें जोडल्या न वचिजे कोणें । विमुख त्याचें भाग्य उणें । कोटि गुणें पितरेशीं ॥६७॥
असो तयांची कोण मात । तेथें श्रोते तुम्ही संत समर्थ । कृपाकटाक्षें सारस्वत । मूढमतींत प्रकटवा ॥६८॥
लेप्य लेख्याचिया श्रेणी । स्वअवलोकें प्रकटवी तरणि । कीं द्रष्टा जेवीं आपुल्या नयनीं । मुख दर्पणी उपजवी ॥६९॥
तेवीं अवधान देऊनि संतीं । वक्तृत्वाथिली माझी मति । करूनि बोलवा प्रश्नोक्ति । प्राकृतोक्ति निर्दोष ॥३७०॥
एथ किमर्थ कडसणी । माता बाळाचे अन्याय न गणी । गुणचातुर्य अलंकरणीं । तेवीं शिकवणी संतांची ॥७१॥
नाहीं शिकवणी अवकाश । इंधनीं लागतां हुताश । आपणां ऐसें करी त्यास । नित्य निर्दोष निज तेजें ॥७२॥
तंव संत म्हणती धीरा । दयार्णवाचिया अनुचरा । गोविंदवरदोक्तीचा चारा । श्रवणपाखरां घालीं कां ॥७३॥
तरी ऐका जी सावधान । आतां निवृत्तीचें लक्षण । अंतर्यामीं रमारमण । सुप्रसन्न जे क्षणीं ॥७४॥
अनादि संसारीं भगवान । जीवांचीं नाना कर्में भोगवून । अवशिष्टकर्मवासने प्रवर्त्तन । करी आपण स्वसत्ता ॥३७५॥
तेव्हां प्रवृत्तिमार्गें पावे शीण । चित्तीं विश्वास उपजे पूर्ण । निष्काम ईश्वराराधन । करी संपूर्ण स्वकर्म ॥७६॥
वर्णाश्रमें स्वधर्मनेम । ईश्वराज्ञा अलोट परम । नित्य आचरतां निष्काम । पुरुषोत्तम संतोषे ॥७७॥
कृपाळू होतां अंतर्यामीं । विरक्ति उपजे सर्व कामीं । विष्ठा भक्षून श्वान वमी । तेवीं उभयधामी कंटाळे ॥७८॥
म्हणे सर्वही नाशवंत । अविनाश सुखी कोण एथ । म्हणोनि शोधी नित्यानित्य । रमाकांत सेवूनि ॥७९॥
हरीविण न धरी विषयचाड । हरीविण न मानी शास्त्रें गोड । हरीविण संसार काबाड । वृथा बडबड सुखाची ॥३८०॥
कनक कांता कुटुंब सकळ । मानी हरीवीण होपळ । हरिप्रेमें सर्व काळ । कंठी वेळ एकांतीं ॥८१॥
कल्पना प्रकटे इंद्रियद्वारा । तेव्हां सृष्टीचा उभारा । मिथ्या स्वर्गादि पसारा । कोणता खरा सुखभोग ॥८२॥
सत्त्वें प्रकाशिलें कर्तया । रजोगुणें सर्व क्रिया । तमोगुणें बाह्य कार्या । गौणमाया अविद्या ॥८३॥
अविद्याभ्रमें चैतन्य झांके । बाह्य शिकविलें तें शिके । जेंवीं बाह्य रंग घेतां उदकें । वस्त्रादिकें पालटती ॥८४॥
तैसें होय चैतन्यनाथा । शिके वेदशास्त्रींच्या बाह्य कथा । स्वर्ग नरक नाना पंथा । भोगी व्यथा नाथिल्या ॥३८५॥
देव वैकुंठीं कैलासीं । देव क्षीराब्धिनिवासी । देव तीर्थक्षेत्रवासीं । व्रतोपवासीं तो भेटे ॥८६॥
देव भेटे योग करितां । देव भेटे पशु मारितां । देव भेटे पृथ्वी फिरतां । रानोवनीं गिरिदरां ॥८७॥
स्वर्ग नरक भोग मोक्ष । बाह्य अविद्या हे अशेष । देहइंद्रियें अवस्थांस । पहातां फोस अविद्या ॥८८॥
पिंड ब्रह्मांड गुणाचें कार्य । गुण्कारण समवाय । हें अनित्य मायामय । जेथूनि होय तें नित्यं ॥८९॥
नित्य निर्गुण परब्रह्म । तेथ अनित्य अविद्याभ्रम । ऐसें उमजवी पुरुषोत्तम । जो निष्काम फलभोक्ता ॥३९०॥
तो अंतर्यामीं जगज्जीवन । भजनस्वधर्में सुप्रसन्न । होऊनि प्रकटी निजात्मज्ञान । समाधान शमषट्क ॥९१॥
शम म्हणजे वासनाक्षय । तो अनित्यबोधेंचि दृढ होय । देहाध्यसिं विषय सोय । ते दमेंद्रिय निरोधी ॥९२॥
विषयापासूनि आवरी वृत्ति । फिरवी इंद्रियांची प्रवृत्ति । प्राण स्थिरावी प्रत्यगावृत्ति । उपरमस्थिति मानसा ॥९३॥
ऐसा करितां मनोजय । सद्गुरुप्रसादें आम्नाय । भजतां एकाग्रता होय । समाधि लाहे स्वानंदें ॥९४॥
तुटलें विवर्त्ताचें भान । रुचलें स्वरूपानुसंधान । नित्यानंदेंमन उन्मन । स्वानंदघन सर्वदा ॥३९५॥
तो जिताची अमृत होय । मिथ्या विवर्त देहगेह । लटिकें देह मरेल काय । होय जाय ते भ्रांति ॥९६॥
ऐसा परमामृतरस । ओपी अंतर्यामीं आदिपुरुष । तेणें मायामनुष्यवेश । धरूनि अशेष क्रीडला ॥९७॥
त्या कृष्णाचीं वीर्यशौर्ये । कीर्तिप्रतापगणगांभीर्यें । लीलाविग्रहें केलीं कार्यें । तीं मुनिवर्यें सांगावीं ॥९८॥
अंतर्यामीं कैवल्यदानी । बाह्यप्रवृत्ति सांडूनि । अंतर्यामीं कथाश्रवणीं । आस्था मम मनीं उपजवा ॥९९॥
आतां ऐका प्रश्न विशेष । संकर्षण जो कां शेष । रोहिणीगर्भकोशीं अंश । आदिपुरुष प्रभूचा ॥४००॥
बल गद आणि सारण । दुर्मद विपुल ध्रुव जाण । रोहिणीगर्भी वसुदेव पूर्ण । करी निर्माण औरस ॥१॥
कीर्तिमंत भद्रसेन । भद्र आणि चौथा सुषेण । मृदु आणि संतर्दन । संकर्षण सातवा ॥२॥
यांसि आठवा श्रीकृष्ण । पूर्णब्रह्म सनातन । दैत्यांतक भूभारहण । हें निरूपण स्वामीचें ॥३॥

रोहिण्यास्तनयः प्रोक्तो रामः संकर्षणस्त्वया । देवक्या गर्भसंबंधः कुतो देहान्तरं विना ॥९॥

रोहिणीगर्भीं संकर्षण । पूर्वीं बोलिलेति आपण । देवकीगर्भीं रेवतीरमण । संबंध कोण उमजावा ॥४॥
देह सोडूणि देहांतरीं । जन्म देवकीच्या जठरीं । एक देह दोघींच्या उदरीं । कोणे परीं संभवे ॥५॥
ऐशी आशंका उपजली । ती स्वामीस निवेदिली । आणीकही प्रश्नावलि । ते ऐकिली पाहिजे ॥६॥
सर्व ऐकोनि मनीं धरा । तत्तत्मसंगें संशय हरा । जाणोनि माझिया अधिकारा । निरूपण करा शुकस्वामी ॥७॥

कस्मान्मुकुंदो भगवान्पितुर्गेहाद्व्रजं गतः । क्क वासं ज्ञातिभिः सार्धं कृतवान्सात्वतां पतिः ॥१०॥

षड्गुणैश्वर्यसंपन्न । मायानियंता श्रीभगवान । त्यासि कंसाचें भय कोण । कां व्रजभुवन सेविलें ॥८॥
सकल सुखांचा सुखकंद । यालागीं नामें तो मुकुंद । ज्ञातीसहित परमानंद । कोठें विशद नांदला ॥९॥
सात्वतर्षभ भक्तपति । तेणें कोठें केली वसति । तेथें तेथें लीला किती । केली तें तें निरूपा ॥४१०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP