अध्याय १ ला - श्लोक ११ ते १४
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
व्रजे वसन्किमकरोन्मधुपुर्यां च केशवः । भ्रातरं चावधीत्कंसं मातुरद्धाऽतदर्हणम् ॥११॥
वसति करूनि व्रजपुरीं । कैशी लीला करी हरि । पुढें मधुपुरीमाझारीं । कोणे परीं विचरला ॥११॥
आणीक संशय असे एक । सांगा तयाचा विवेक । मातुलहननाचा अविवेक । सर्वज्ञासि कां घडला ॥१२॥
मातुल साक्षात्पितृस्थानीं । ज्यासि अधिकार पिंडतर्पणीं । त्यासि मारूनि अनर्ह करणी । चक्रपाणि कां करी ॥१३॥
देहं मानुषमाश्रित्य कति वर्षाणि वृष्णिभिः । यदुपुर्यां सहावात्सीत्पत्न्यः कत्यभवन्प्रभोः ॥१२॥
घेऊनि मनुष्यदेहाची बुंथी । किती अब्दें केली वसति । वृष्णींसहित द्वारावरती । मथुरेप्रति निवास ॥१४॥
किती झालीं अंतःपुरें । कैशीं तयांचीं स्वयंवरें । तीं मज कृपेचेनी सागरें । सविस्तर सांगावीं ॥४१५॥
सूर्य निवारी जैसें तम । दुःख निवारी पुरुषोत्तम । पाप निवारी हरीचें नाम । प्रश्नविभ्रम तेंवीं करा ॥१६॥
एतदन्यच्च सर्वं मे मुने कृष्नविचेष्टितम् । वक्तुमर्हसि सर्वज्ञ श्रद्दधानाय विस्तृतम् ॥१३॥
इतुके पुशिले प्रश्न मुनी । आणीक स्फुरती निरूपणीं । ते ते सविस्तर माझे श्रवणीं । कृपा करूनि घालावे ॥१७॥
अगाध कृष्णविचेष्टित । परिसावया आर्त्तभूत । चातकन्यायें माझें चित्त । वचनामृत इच्छितसे ॥१८॥
तूं बोलावया वक्ता समर्थ । सर्वज्ञ आणि प्रेमभरित । मी अत्यंत श्रद्धावंत । आर्त्तभूत श्रवणार्थी ॥१९॥
म्हणाल ऐकतां सविस्तर । श्रमें उबगेल तुझें अंतर । तरी तुमच्या वचनामृताचा तुषार । तो आधार मम प्राणा ॥४२०॥
नैषाऽतिदुःसहा क्षुन्मां त्यक्तोदमपि वाधते । पिबन्तं त्वन्मुखम्मोजच्युतं हरिकथामृतम् ॥१४॥
जे का प्राणाची रीणघेणी । लक्षूणि ठाके उभी वायणीं । कंहीं न पवतां जाचणी । करी विटंबणी ते ऐका ॥२१॥
जरा येणार उत्तरवयसीं । ते आणूनि भेटवी एके दिवशीं । विकार करी इंद्रियांसि । कासाविसी प्राणांत ॥२२॥
असतां पांगुळ होती पाय । अंगींची शक्ति गळूनि जाय । वाचा बेंबळ होऊनि ठाय । जिचा घाय लागतां ॥२३॥
कृश करी शरीर सकळ । अस्त पावेल्र रूपशील । उपजे क्रोधाग्नीचा ज्वाळ । लज्जा अत्काळ हरपे ॥२४॥
सत्कर्माचा करी रोध । अपवादाचा न मानी बाध । न रुचे अमृततुल्यबोध । आत्मवाद नावडतीं ॥४२५॥
सकळ भोगांची करी धुळी । विवेक घाली पायांतळीं । सुहृदयस्नेहाची करी होळी । दोषमाउली जे क्षुधा ॥२६॥
जे जठराग्नीची ज्वाळ । तुच्छ करी प्रलयकाळ । सकळ कळा होती विकळ । मध्यान्हकाळ पातल्या ॥२७॥
ज्ञान वैराग्य चातुर्य । वीर्य शौर्य हरपे धैर्य । वर्णावर्णाचें विचार्य । सर्व कार्य पारूषे ॥२८॥
जिच्या भयें पावले व्यथा । शस्त्रघाय साहती माथां । समुद्रीं रिघती उदरार्था । जे सर्वथा दुःसह ॥२९॥
जिच्या प्रतापें स्वामीसेवक । जिणें केले रावरंक । देवांमानवा लाविली भीक । जे निष्टंक निष्ठुर ॥४३०॥
व्याघ्र वृश्चिक महासर्प । त्यांचें भय न धरिती अल्प । वघड गडाचे साक्षेप । खटाटोप विद्यांचे ॥३१॥
पोट भरावयाचे साठीं । दांभिक तपाची आटाटी । एक रिघलेकपटी । पोटासाठीं कर्मठ ॥३२॥
जटामुंडी केशलुंचन । काषायांवर नग्न मौन । एक करिती पर्णाशन । केले दीन क्षुधेनें ॥३३॥
क्षुधेसाठीं शिष्यगुरु । क्षुधेसाठीं स्त्रीभ्रतारु । क्षुधेसाठीं राज्यभारु । येरांयेरु मीनिती ॥३४॥
जरीं क्षुधेचा नसता आधि । तरी कोण कोणा मानिता कधीं । पाषाण तैसे समानबुद्धि । सर्व निरूपाधिअसतो ॥४३५॥
किती मृत्तिका उकरिती । किती विष्ठा विसर्जिती । नीचतर कर्में करिती । हे विपत्ति क्षुधेची ॥३६॥
हळाहळ घेऊं शके । महत्त्व टाकूनि मागवे भीके । परि क्षुधेचा भडका साहों शके । ऐसा न देखों बळियाढा ॥३७॥
ऐशी अतितर दुःसह क्षुधा । मातें तिची न बाहे बाधा । तेही उपपत्ति प्रसिद्धा । ऐकें सिद्धा मुनिवर्या ॥३८॥
चातक लक्षी जेवीं घना । तो नातळे भूजीवना । देवो वर्षतां अंबुकणा । प्राणतर्पणा तो करी ॥३९॥
चातक लक्षी जेवीं घना । तो नातळे भूजीवना । करी घनाचें चिंतन । दुजें ध्यान तो नेणें ॥४४०॥
भर्तृप्रीतीचा हृदयीं तोष । होतां दुःसह सासुरवस । न वाटे पांडवां वनवास । कृष्णकृपेच्या तुषारें ॥४१॥
तैसा निराहार मी त्यक्तोद । परि मज स्पर्शों न शके खेद । मुखांबुजींचा अमृतस्वाद । तेणें आनंद मज तुझा ॥४२॥
वदनांबुजींचें निःसृतामृत । श्रवणवदनें प्राशन करीत । तेणें स्म्तोषभरित चित्त । म्हणूनि त्वरित निरूपा ॥४३॥
कृष्णकीर्ति तुमच्या वदनें । परिसतां तहानभूक विसरणें । यदर्थीं नवल मानिजेल कोणें । जे एथींचें नेणें रसपान ॥४४॥
लोह वेधे अयस्कांतें । जडही धांवे तेणें पंथें । हरिकीर्तनीं जीं सचेतें । जीवंतचि प्रेतें न रुचतां ॥४४५॥
हरिकीर्तनाची गोडी । लागतां वृत्ति होय वेडी । मोक्षसुखाची निरवडी । कोण परवडी विशयांची ॥४६॥
हरिकीर्तनीं रंगतां रंगीं । संसारसुखाचीं धगी । कदा आतळों न शके आंगीं । सुख सर्वांगीं कोंदाटे ॥४७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 25, 2017
TOP