अध्याय १ ला - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
इत्युक्तः स खलः पापो भोजानां कुलपांसनः । भगिनीं हन्तुमारब्धः खङ्गपाणिः कचेऽग्रहीत् ॥३६॥
स्नेह सांडूनि वाट चाले । देहलोभें टाकी पाउलें । यश कीर्ति पुण्य लाहे । अमृततुल्य पामरा ॥३३॥
गगनवाणीच अर्थ चित्तीं । धरूनि खवळे खल दुर्मति । भोजकुळासि अपख्यातिं । पापमूर्ति दुरात्मा ॥३४॥
ईश्वरें केलें तें होणार । त्यासि चुकवावया अविचार । दुर्मति अविवेकप्रकार । केला विचार तो ऐका ॥६३५॥
अभ्र धूम्राचा विकार । तेणें मेघें भंगेल घर । म्हणोनि मारी थोर ढोर । धूम्र संहार करावया ॥३६॥
तैशी मारीन हे धाकुटी । मग कैंचे गर्भ उपजती पोटीं । आठवा तयाचे शेवटीं । होऊनि निवटी मज कोण ॥३७॥
ऐसें चिंतूनि उताविळा । करें ओढोनि करवाळा । बळें छेदूं पाहे गळा । केशकवळा झोंबत ॥३८॥
प्रवर्त्तला भगिनीघाता । देहरक्षण मानूनि हिता । निंद्यकर्माची न मनीं चिंता । निर्लज्जता निष्ठुर ॥३९॥
तं जुगुप्सितकर्माणं नृशंसं निरपत्रपम् । वसुदेवो महाभाग उवाच परिसान्त्वयन् ॥३७॥
सूर्योदयापुढें प्रभात । कीं मेघापुढें हरिश्चंद्रवात । तैसा कृष्णावतारहेत । भाग्यवंत वसुदेव ॥६४०॥
होतां श्रीमंत बिढार । आधीं शृंगारिती मंदिर । पुढें येऊनि किंकर । यथाधिकार वोळगती ॥४१॥
तैसे सकळ उत्तम गुण । भरले वसुदेवीं येऊन । उदरा येईल श्रीभगवान । हें कारण तयाचें ॥४२॥
शांति क्षमा दया पूर्ण । चातुर्य अमृतोक्तिभाषण । वीर्यशौर्याचें कालज्ञान । धैर्यधारण गांभीर्य ॥४३॥
ऐशी अनंतगुणसंपत्ति । सुरवर सुकृतें जे इच्छिती । वसुदेवातें सहजस्थिती । झाली प्राप्त कृतपुण्यें ॥४४॥
जैसा दरिद्री बांधितां घर । लाहे पूर्वजांचें भांडार । काम पूर्वपुण्यें देवतावर । लाहे इतर साधितां ॥६४५॥
तैसे वसुदेवाचे गुण । महाभागपदें गहन । शुक बोलिला तें व्याख्यान । श्रोते सज्ञान जाणती ॥४६॥
वसुदेवाचे जन्मकाळीं । आनक दुंदुभी अंतराळीं । देवीं वाजवूनि सकळीं । संज्ञा केली तं नाम ॥४७॥
तो महाभाग वसुदेव । जाणोनि कर्माचा अभिप्राव । सांतवावयाचें लाघव । शब्दगौरव बोलत ॥४८॥
वसुदेव उवाच - श्लाघनीयगुणः शूरैर्भवाग्भोजयशस्करः । स कथं भगिनीं हन्यात् स्त्रियमुद्वाहपर्वणि ॥३८॥
साम बोधी पंच लक्षणें । संबंध लाभ उपकरणें । अभेद आणि गुणकीर्त्तनें । दोन्ही लक्षणें भेदाचीं ॥४९॥
इहलोकींचें मरणभय । पुढें यमयातना होय । भेद द्विविध अभिप्राय । विदित होय ज्या रीतीं ॥६५०॥
वसुदेव म्हणे कंसराया । गुणीं श्लाघ्य तूं लोकत्रया । त्या तुज ऐशी निंद्य क्रिया । स्पर्शावया पातली ॥५१॥
सकळ भूमंडळींचे शूर । तुझिया गुणाचे अलंकार । ल्यावयालागीं निरंतर । निजव्यापार नियमिती ॥५२॥
तूं भोजकुलींचा कुलदीप । विख्यात यश कीर्ति प्रतप । तुज निष्पापासि पाप । हा संकल्प अयोग्य ॥५३॥
सामान्य जंतूंचें एकशत । वधितां एक कुक्कुटघात । शतकुक्कुटें एक बस्त । बस्तशतसम एक धेनु ॥५४॥
शतधेनुवधाचें पाप । तें एक नरहत्येचें रूप । शत नरहत्यांचें अल्प । अघ अमूप ब्रह्महत्या ॥६५५॥
ब्रह्महत्या शतभरी । वीरहत्येची पावे सरी । त्याहूनि स्त्रीवधाची थोरी । बहुतापरी आगळी ॥५६॥
त्यांहीमाजी साक्षात् भगिनी । पितरांहूनि अयोग्य हननीं । तथापि विवाहपर्वणि । वधितां गणी अघ कोण ॥५७॥
लक्ष्मी आणि नारायण । विवाहीं वधूवरें समान । त्रैलोक्यवधाचें पाप जाण । लाभ कोण केलिया ॥५८॥
जेणें भगिनीस्नेह राहे । निष्पाप यशोलाभही आहे । कृतोपकार या विवाहें । मीही लाहें अभिवृद्धि ॥५९॥
एक देह वांचवणें । त्रैलोक्यवधाचें पाप घेणें । जळो जिणें अश्लाघ्यवाणें । काय कारण वांचोनि ॥६६०॥
तो तूं कैसा भगिनीवध । करूं पहासि धर्मकोविद । उभयलोकीं बुधाबुध । अश्लाघ्यवाद बोलती ॥६१॥
म्हणसी वांचावया प्राण । करावें पुत्रदाराअर्पण । तरी यदर्थीं निरूपण । सावधान परियेसीं ॥६२॥
मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते । अद्य वाऽब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः ॥३९॥
जितुके जन्मवंत प्राणी । मृत्यूपासूनि सुटले कोणी । नाहीं ऐकिले आपुले कर्णीं । शास्त्रीं पुराणीं अश्रुत ॥६३॥
देह जन्मल्याही आधीं । मृत्यु लागला त्रिशुद्धि । देहा विसंबेना कधीं । पाहे अवधि कर्माची ॥६४॥
धातयाही जातां शरण । देहवंतां न चुके मरण । यत्नें केलिया संरक्षण । सार्थक कोणतें तें सांगें ॥६६५॥
राया श्रियाळाचा सुत । बाळपणींच पावला मृत्य । मृत्यु पावोनि झाला अमृत । कीर्तिवंत उजळिला ॥६६॥
अकीर्तीनें शताब्दवरी । वांचोनि निरर्थक स्म्सारीं । कालसर्पाचियापरी । देहविवरीं कोंडोनि ॥६७॥
तथापि वांचवितां देहो । जोडे पुण्याचा संग्रहो । पुण्यसुखाचा लवलाहो । उभय लोकीं भोगणें ॥६८॥
पापें यातना फार घडती । नरकीं अनेक विपत्ति । जेणें जोडे हे दुर्गति । तें कां चित्तीं धरावें ॥६९॥
देहे पंचत्वमापन्ने देही कर्मानुगोऽवशः । देहान्तरमनुप्राप्य प्राक्तनं त्यजते वपुः ॥४०॥
देह पडतां वर्तमान । जरी देह न होता नूतन । तरी हें असो आचरण । देहरक्षणप्रलोभें ॥६७०॥
तैसें येथ दुर्लभ काय । होतां प्रारब्धकर्मक्षय । देह पडण्याआधीं होय । नूतन देह संप्राप्त ॥७१॥
आयुष्याचिये शेवटीं । देही लागे कर्मापाठीं । घेऊनि कृतकर्म कोपटी । पूर्वपर्णकुटी विसर्जी ॥७२॥
N/A
References : N/A
Last Updated : April 25, 2017
TOP