अध्याय तेरावा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्री गणेशाय नम: ॥
जय जय सद्गुरु शुद्ध सूक्ष्मा ॥ जय जय सद्गुरु विश्वधामा ॥ जय जय सद्गुरु अनामा ॥ तूं अगमां निगमां नेणेवेचि ॥१॥
तूं सर्वांतें प्रकाशसी ॥ तुजमाजी वास आकाशासी ॥ तूं मनबुद्ध्यादि नेणसी ॥ आणि अससी व्यापकत्वें ॥२॥
तुसीं व्यापकत्वासीं नवलपरी ॥ नकळत भरलासी चराचरीं ॥ मजही देखिलें तुजमाझारी ॥ सबाह्यांतरीं तूंचि माझे ॥३॥
आतां मीपण झालें वाव ॥ अवघाचि श्रीगुरुराव ॥ हरपलीं रूप नांवें सर्व ॥ जैसे मृगजळ वाव दिसोन आलें ॥४॥
ऐसें मज अनुभवा आलें ॥ आतां मज अभयदान दिधलें ॥ जें पुढिलें अध्यायीं सांगेन पुशिलें ॥ तें सांगितलें पाहिजे ॥५॥
कैसी क्षत्रियांची आचारस्थिती ॥ विधियुक्त सांगावी निरूती ॥ जेणें बाणे माझे चित्तीं ॥ तें गुरुमूर्ती करावें ॥६॥
तंव सद्गुरु म्हणे सावधान ॥ तूं एकाग्र करीं मन ॥ ऐक क्षत्रिय धर्मालागुन ॥ जेणें समाधान होय पैं ॥७॥
क्षत्रिय म्हणिजे काई ॥ जेथें द्वैतबुद्धीचा भाव नाहीं ॥ देह असोनी विदेही ॥ तेचि पाहीं क्षत्रिय पूर्ण ॥८॥
सौर्यतेजें निपुण ॥ मीतूंपण करी निसंतान ॥ अहं ब्रह्म जाणोन ॥ करी पाळण स्वधर्माचें ॥९॥
जीव शिव मायाब्रह्म ॥ हा भवभ्रांति महाभ्रम ॥ जेणें अंतरे आत्माराम ॥ होय भ्रम नसतांचि ॥१०॥
संसार - रमामाजी फिरत ॥ ज्ञानशास्त्रें करी द्वैताचा घात ॥ जैसा सूर्य अंधारीं येत ॥ असे फिरत स्वतेजें ॥११॥
सूर्य जेव्हां उदयास ये ॥ तेव्हां अंधारें प्रकाश होये ॥ ऐसें द्वैत तें अद्वैत पाहे ॥ क्षेत्रीं करिताहे ये रिती ॥१२॥
चौदेहांचे चार घाट ॥ तोडोनि केले सपाट ॥ आत्मनगरा जावया वाट ॥ केली नीट स्वानुभवें ॥१३॥
अधर्मातें छेदून ॥ करी धर्माचें पाळण ॥ राहे सर्वसाक्षी होवोन ॥ हाचि जाण क्षात्रधर्म ॥१४॥
धर्म म्हनिजे काई ॥ ज्या आपुली शुद्धिच नाहीं ॥ देहबुद्धीनें वर्तती पाहीं ॥ अधर्म सोई हेचि गा ॥१५॥
सर्व अशाश्वत मानोन ॥ करी जो विषयसेवन ॥ जो धरी देहाभिमान ॥ अधर्म जाण हाचि कीं ॥१६॥
विधिविहित सांडोनी ॥ अविहित वर्ततो जनीं ॥ अशुभचि वदे वाणी ॥ हेचि खाणी धर्माची ॥१७॥
मीं माझें म्हणवूनी ॥ अवघें सत्यचि मानी मनीं ॥ निंदी तीर्थव्रतांलागुनी ॥ अधर्म करणी हेचि कीं ॥१८॥
मी माझें म्हणवूनी ॥ स्वधर्म सांडोनी अधर्म करणी ॥ एकत्वासीं नसे मानी ॥ हेचि खाणी अधर्माची ॥१९॥
देव - ब्राह्मणांतें निंदिती ॥ वडिलांची मर्यादा न पाळिती ॥ साधुसंतांतें निंदिती ॥ पहा स्थिति अधर्माची ॥२०॥
मनामागें धांवत ॥ करूं नये तेंचि करित ॥ देहाभिमानें कुंथत ॥ तोचि सत्य अधर्म कीं ॥२१॥
मातापित्यातें दूषिती ॥ स्त्रीच्या आधीन होती ॥ कामक्रोध - लोभातें धरिती ॥ हेचि स्थिति अधर्माची ॥२२॥
आत्मस्तुति पराची निंदा ॥ अखंड प्रवर्तती वादा ॥ आवडीनें करिती विषयधंदा ॥ हाचि प्रबुद्धा अधर्म कीं ॥२३॥
नरदेहासारिखें निधान ॥ प्राप्त झालें बहुत पुण्येकरून ॥ आणि न करी साधन ॥ तोचि जाण अधर्म ॥२४॥
आत्मसाधना वेगळें करणें ॥ तो तो अधर्मचि जाणणें ॥ म्हणोन क्षत्रिय न म्हणणें ॥ याचा जेणें उच्छेद कीजे ॥२५॥
जो आपण निरुपाधि होईल ॥ तोचि दुसर्‍या उपाधास छेदिल ॥ हें अनुभवी जाणतील ॥ ज्यासी असेल श्रीगुरुकृपा ॥२६॥
श्लोक ॥ इंद्रियार्थं मनोयाति संसारो मोहकारणाम् ॥ निर्जितश्वेंद्रियग्रामो सशूरो रणपंडित: ॥१॥ टीका ॥ इंद्रिय अखंड विषयचिंतन ॥ जेथें जेंथे जाय मन ॥ हेंचि मोहाचें लक्षण ॥ सत्य वचन मानावें ॥२७॥
इंद्रियग्रामापासून ॥ मन परतवी विवेकेंकरून ॥ राहे साक्षी होऊन ॥ तोचि जाण महाशूर ॥२८॥
इंद्रियें हेंचि परचक्र जाण ॥ हेंचि विषयशास्त्रीं करिती भांडण ॥ येणें मारिले थोर थो जाण ॥ किती म्हणोन सांगावें ॥२९॥
क्षत्रियासीच म्हणणें ॥ इंद्रियविषय उच्छेद केलें जेणें ॥ एकात्मतेनें राज्य करणें ॥ तोचि जाणणें महाशूर ॥३०॥
जेथें दुसर्‍यासी नांव नाहीं ॥ सर्वभूतीं एकात्मता पाहीं ॥ मानापमान नेणे कांहीं ॥ तोचि पाहीं महाशूर ॥३१॥
आत्मस्तुति परनिंदा ॥ प्राणांतीं न करी कदा ॥ वंदी वडील प्रबुद्धां ॥ हरिभजनीं शुद्ध तोचि शूर ॥३२॥
जो निंदाद्वेषाचा त्याग करी ॥ सर्वांभूतीं प्रेम धरी ॥ दुष्ट कर्मांचा छेद करी ॥ तो निर्धारीं महाशूर ॥३३॥
चौदेहांतें छेदूनी ॥ ठाव करी ज्ञान गेहीं जाऊनी ॥ राहे सर्वत्र व्यापोनी ॥ जाण तोचि महाशूर ॥३४॥
परकांता मातेसमान ॥ परद्रव्य म्हणे पाषाण ॥ चाले स्वधर्म स्थापोन ॥ तोचि जाण महाशूर ॥३५॥
ब्राह्मणाचें करी पाळण ॥ वेदमर्यानुदाल्लंघी आपण ॥ प्रजेचें करी संरक्षण ॥ तोचि जाण महाशूर ॥३६॥
जे अधर्म करतील जन ॥ त्यांसी करितो शिक्षा आपण ॥ स्वधर्मीं लावी बळेंचि जाण ॥ हें कर्मपुण्य क्षत्रियांचें ॥३७॥
विधियुक्त कर्माचे डांगोरे पिटोनी ॥ सन्मार्गीं लागी सर्वांलागुनी ॥ अविहित वर्ततां तत्क्षणीं ॥ साक्षीपणें दंडिती ॥३८॥
शत्रूसी सदा सन्मुख ॥ सामर्थ्ये वर्ते देख ॥ प्रजा रक्षूनि परम सुख ॥ तेचि चोख क्षत्रिय वदती ॥३९॥
यजन आणि अध्ययन ॥ तिसरें करी दान ॥ हें विधियुक्त कर्म क्षत्रियां जाण ॥ तेथें पावन तो होय ॥४०॥
यजन म्हणिजे यज्ञ करित ॥ मन बुद्ध्यादिकां असें होमित ॥ अज्ञान पशूतें वधीत ॥ पूर्णाहुती वालीत देहाभिमान ॥४१॥
असें यजन करोनी ॥ तृप्त करीं देव पितरांलागोनी ॥ वेदाध्ययन करी आदरेंकरूनी ॥ अर्पी दानीं सर्वही ॥४२॥
याचकां स्वइच्छें दान देतसे ॥ तन मन धनांसी उदासीन असे ॥ परोपकारीं आळस नसे ॥ वेचीतसे जीवित्वा ॥४३॥
हेचि विधियुक्त क्षात्रनीती ॥ येणेंचि संतुष्ट श्रीपती ॥ आणि होय मोक्षमुक्ति ॥ यातायाती चुके येणें ॥४४॥
ऐसिया चिन्हीं ज्याचें वर्तणें ॥ त्यासीच क्षत्रिय म्हणणें ॥ इतुकें नाम लक्षण जाणणें ॥ तोचि बोलणें नीतिपंथ ॥४५॥
जे उत्तम कुळींचे असती ॥ ते न्यायनीतीनें चालती ॥ आणि अविधीं जे वर्तती ॥ त्यांसीं यातायाती न चुके ॥४६॥
न देव - ब्राह्मण मानिती ॥ आणि विधियुक्त ते स्थापिती ॥ तेचि उत्तम कुळींचें बोलिजेती ॥ ते आदि अंतीं सावधान ॥४७॥
जैसा पतंग उडी घालित ॥ परि नाहीं मरणाहेत ॥ तैसा परमचक्रावरी लोटत ॥ जैसा केसरी जाय गजदळीं ॥४८॥
आदित्याचें झाड जैसें ॥ सूर्यासन्मुख होतसे ॥ तैसा शत्रूस विन्मुख नसे ॥ धैर्य असे मेरूचे परी ॥४९॥
आकाश पडतां कोसळून ॥ परी न ढळे ज्याचें मन ॥ विपत्तीकाळ आलिया जाण परी सत्वा हाण न करीच ॥५०॥
अखंड व्याहाळी खेळत ॥ परी दुष्ट सावजातें मारित ॥ परी तो पराक्रम न सांडित ॥ जसा पंचानन ॥५१॥
व्याघ्र अथवा लांडगे जाण ॥ यांसी वधी प्रयत्नेंकरून ॥ कां जे फिरत सावजातें करी हनन ॥ म्हणोनी रान शुद्ध करी ॥५२॥
कोणेही जीव नेदी दु:ख ॥ इच्छी सर्वांसी सुख ॥ सुखी करी सर्व लोक ॥ तोचि देख क्षात्रधर्म ॥५३॥
असो सांगतां क्षात्रनीती ॥ ग्रंथ वाढेल अद्भुती ॥ म्हणोनी सांगितलें किंचिती ॥ तें मत वेदशास्त्रांचें ॥५४॥
कृषी गोरक्ष वाणिज ॥ हें वैश्याचें कर्म सहज ॥ त्याचा निवाडा करूनि तुज ॥ सांगतों बीज हिताचें ॥५५॥
कृषि करणें तें ऐसी मतेसीं ॥ प्रतिपादी वेदशास्त्रांसीं ॥ जेणें संतुष्टे हृषीकेशी ॥ चुके चौर्‍यांयशीं खेपा पैं ॥५६॥
हें औटहात क्षेत्रजाण ॥ जें महापिकाचें अधिष्ठान ॥ जैसेंचि पेरावें तैसेंचि आपण ॥ फळपूर्ण पावावें ॥५७॥
अद्भुत भाग्य हें क्षेत्र साधलें ॥ परी मनोभावें पाहिजे वहिलें ॥ येथें ज्यांहीं आळस केले ॥ ते गेले अधोगती ॥५८॥
हें पडलें बहुतां दिवसाचें रान ॥ माजी वाढलें तृष्णेचें तृण ॥ अशौची बुद्धि जाण ॥ मन साकुंधें करोनी व्यापिलें ॥५९॥
लोभाचे वृक्ष वाढले ॥ गगना शिवावया गेले ॥ वरी इच्छेचे वेळू लागले ॥ ते फळा आले कामनेनें ॥६०॥
तेथें ममतेच्या बाभुळा जाण ॥ कल्पनेचे कांटे असती तीक्ष्ण ॥ देह अभिमानाचे दगडेंकरून ॥ क्षेत्र पूर्ण व्यापिलें ॥६१॥
चिंचेच्या चिंचा अमूप असती ॥ कामक्रोधादिमाजी वसती ॥ मग मृग बहुत चमकती ॥ कोल्हे भुंकती मींतूंपणाचे ॥६२॥
जीव शिव मायाब्रह्म ॥ हें वेळवाचें बेट पूर्ण ॥ ऐसें क्षेत्राचें करितां कथन ॥ कथ जाण वाढेल ॥६३॥
यासीं एक उपाय आहे तो जाण ॥ प्रथम वैराग्य अग्नि चेतवून ॥ तो या रानास जाळोन ॥ भस्म पूर्ण करील ॥६४॥
माजी कामक्रोधादिकचे आहेती ॥ ते अग्नि लागतांचि पळती ॥ मग येर जे पक्षी राहती ॥ त्यांची समाप्ति करावी ॥६५॥
तें कैसें म्हणाला तरी आपण ॥ तरी ऐकावें सावधान ॥ विचाराचे कुर्‍हाडेकरून ॥ करावें च्छेदन वृक्षाचें ॥६६॥
मग शमदमाचे बैल लाऊन ॥ विवेकाचे नांगर जुंपोन ॥ मग आकाशालागुन ॥ काढावया आपण लागवेगें ॥६७॥
एक विवेक नांगरावीण कांहीं ॥ क्षेत्र शुद्ध होणार नाहीं ॥ क्षेत्र शुद्धीविण पाहीं ॥ पिकाची सोई लाभेना ॥६८॥
मग सद्गुरुवेव्हार करून ॥ विज्ञान बीज घ्यावें आपण ॥ तें सोहंभावाचें तिफणें करून ॥ पेरावें पूर्ण एकनिष्ठें ॥६९॥
भोवती शांतिकुंपण करुनी ॥ निंदास्तुतीचीं ढोरें वळोनी ॥ कोहं भावाचे पक्षी उडवूनी ॥ शेत महा जतन राखावें ॥७०॥
नाना तर्कांचे तस्कर येती जाण ॥ ते मारावे बुद्धिबळें आपण ॥ ऐसें निर्विकल्प शेत राखोन ॥ पीक आपणे घेइंजे ॥७१॥
मग आपण जें नाहीं होणें ॥ त्या विळियानें शेत शौंगणें ॥ मग बोध खळियामाजी आणणें ॥ मग मळणें अष्टभावें ॥७२॥
त्रिगुणाची तिपाई आणून ॥ वरी तुर्याटी घेऊनी जाण प्रेमप्रीति त्यावरी उभें राहून ॥ उपणावें आपण एकनिष्ठें ॥७३॥
समता बुद्धीचें टोपलें ॥ ते माजी भरोनी उपणिलें ॥ दृश्यभूस उडोनी गेलें ॥ अनिर्वाच्य पडलें धान्याखालीं ॥७४॥
जें जें विचारामाजे आलें ॥ तें भूसचि बोलिलें ॥ जें मनबुद्धीपर राहिं ॥ तें संचलें धान्य कीं ॥७५॥
अनंत ब्रह्मांड आदिकरोनी ॥ धान्याची सिग गेली फोडोनी ॥ याचा मापारी एक सद्गुरु मानोनी ॥ इतरां लागोनी न मोजवे ॥७६॥
ऐसें पीक ज्याचे हाता आलें ॥ त्याचें भवजन्मींचें दरिद्र गेलें ॥ आत्मानुभव याचें वैभव आलें ॥ सुख झालें अमुप ॥७७॥
अशी जे कृषि करिती ॥ तेचि मनुष्यजन्माचें फळ घेती ॥ हे अध्यात्मकृषि करिती ॥ यथा निगुती सांगीतली ॥७८॥
प्रथम वैश्याचें कर्म ॥ जेणें संतोषे पुरुषोत्तम ॥ आतां गोरक्षाचें कर्म ॥ अति उत्तम ऐकावें ॥७९॥
गो म्हणिजे गाई ॥ ते हें आकारा इंद्रियें पाहीं ॥ हा विवेक ठेऊनियां ठाईं ॥ लागावें सोई हिताच्या ॥८०॥
हातीं ज्ञानाची काठी घेउनी ॥ चारावी निरंजनीं नेउनी ॥ जेथें दुजियाची पाहीं त्या स्थानीं ॥ तेथें आपण स्थिर कीजे ॥८१॥
विषयशेतीं रिघों न द्यावी ॥ गेलिया पावे दु:ख पदवी ॥ काळा नेउनी देहखोडा गोवी ॥ तेणें पावती विपत्ती थोर ॥८२॥
देहखोड्यामाजी पडले ॥ ते थोर विपत्ती वरपडे झाले ॥ चिंतेच्या कोरड्यावरी झोडिलें ॥ कल्पनेच्या घातले कोठडींत ॥८३॥
तेथच्या कडीमाजी शेतदार ॥ दिवाण दंडीचा साचार ॥ एकाक्षण माझार ॥ करी थोर विटंबना ॥८४॥
त्याचे विटंबनेची स्थिती ॥ किती सांगावी तुजप्रती ॥ मज तुज नेउनी गर्भीं टाकिती ॥ तेथिंची विपत्ती बोलवेना ॥८५॥
मुखीं भरलें मूत्रपुरीष ॥ खारट आंबट डोहाळे होती मातेस ॥ ते चटके बसती अंगास ॥ तैसा प्रतिदिवसीं मारा करिती ॥८६॥
ऐसा नवमासपर्यंत ॥ होतसे थोर आकांत ॥ मग त्यापासोन सोडित ॥ बेडी गोवित देहाभिमानाची ॥८७॥
काम - क्रोध - लोभाची सांखळ ॥ अखंड करीतसे खळखळ ॥ स्त्रीपुत्रादि कन्यासकळ ॥ लाविले सबळ मागें मागें ॥८८॥
ते ममतेच्या टेंगावरी घेती ॥ अभिमानाचे शिरीं दगड देती ॥ मीतूं उठी बैस करिती ॥ विकल्पाचा मारा पैरावरी ॥८९॥
षड्किकार हेचि चोपदार ॥ विश्रांति नाहीं क्षणभर ॥ ते अखंड करिती तृष्णेचा मार ॥ ऐसे थोर थोर नागविले ॥९०॥
शब्द - स्पर्श - रूप - रस जाण ॥ गंध तो पांचवा संपूर्ण ॥ त्यासीं अखंड दिवाणाची राखण ॥ तेथें गुरु गेलिया कोण सुख पावें ॥९१॥
त्यासी मोठी अटू आहे ॥ म्हणून वेगीं सावध होये ॥ सांडोनी विषयशरीराची सोये ॥ निरंजनी जाय घेऊनी ॥९२॥
जे जे इंद्रियाविषयाची इच्छा करिती ॥ ते ते ज्ञानी बोलाविती मागुती ॥ बोध कोठड्यांत निगुती ॥ यथास्थिति कोंडावी ॥९३॥
अकरा गाई त्या कोण कोण ॥ ऐसें करितां अनुमान ॥ तरी तेही सांगतों खूण ॥ सावधान परिसावी ॥९४॥
नेत्र त्वचा जिह्वा जाण ॥ पांचवें श्रवण इंद्रिय जाण ॥ हें ज्ञान इंद्रियस्थान ॥ ऐसें सावधान कर्मेंद्रिय ॥९५॥
शिश्न आणि पाद गुद ॥ वाचा कर्मेंद्रियें शुद्ध ॥ या दाहांचा तुज केला बोध ॥ अकरावें प्रसिद्ध मन हें ॥९६॥
हें मन बहु ओढाळ आहे ॥ येणें ठकविलें बहुतांसी पाहें ॥ म्हणोनि विवेकबळें मनामागेंचि राहें ॥ तेणें सुख हें लाहेसी ॥९७॥
मन सर्वांचे मोहकारी ॥ दाहाजन धांवती माघारी ॥ म्हणोनि आधींच आंवरी ॥ निरंजनामाझारी लीन होय ॥९८॥
यालागीं इंद्रियरक्षण करणें ॥ हें वैश्यांचें दुसरें कर्म जाणणें ॥ येणें चुकें भवभयाचें पेणें ॥ उठे ठाणें द्वैताचें ॥९९॥
तिसरें वणिजकर्म जाणें ॥ सवंग घेऊनि महाग विकणें ॥ येणें करूनि निर्वाह करणें ॥ ती लक्षण अवधारीं ॥१००॥
भक्तिपेठेसीं जाउनी ॥ भावाचें भांडवल करोनी ॥ घेतसे कृष्णनामाचीं नाणीं ॥ फिरे घेउनी छप्पन्नदेशीं ॥१॥
जनाची अविद्या घेतसे ॥ आणि कृष्णनाम देतसे ॥ भरला याचि हव्यासें ॥ उदीम करीत एकनिष्ठें ॥२॥
या उदीमासी हार नये ॥ आणि जन्ममरण दरिद्र जाये ॥ महासुखाचें भाग्य लाहे ॥ सभाग्यें हे सोय लाधते ॥३॥
इतर जे कृषिवाणिज्य जाण ॥ ते शरीराचें करावें रक्षण ॥ शरीर तें नाशिवंत जाण ॥ फळ कोण उदिकाचें ॥४॥
शरीराचें अशन वसन ॥ तें तों असे प्रारब्धाधीन ॥ म्हणोनी स्वहिताचा करावा प्रयत्न ॥ तेणें भवभान चुके पैं ॥५॥
यावरी वैश्याची कर्मजाती ॥ जे वेदशास्त्र प्रतिपादिताती ॥ जेणें होय मोक्षप्राप्ती ॥ आतुडे श्रीपति याची देहीं ॥६॥
परिचर्यात्मक कर्म ॥ हें शूद्राचें स्वाभाविक कर्म  ॥ सर्वत्रीं पाहोनी आत्माराम ॥ सेवा प्रेमें करावी ॥७॥
काया वाचा आणि मन ॥ हीं हीं भजनीं लावावीं संपूर्ण ॥ अखंड करावें रामस्मरण ॥ रिकामें एक क्षण नसावें कीं ॥८॥
कृष्णरूप सर्व जाणोनी ॥ वंदावें सर्व भूतांलागोनी ॥ द्वैतभावनेतें सांडोनी ॥ जावें लोटांगणीं चराचर ॥९॥
हें परिचर्येचें लक्षण ॥ इतर तें संपादन ॥ जे बाह्य व्यवहार करिती जाण ॥ तेणेंकरूनी हित नोहे ॥११०॥
पोटासाठीं परिचर्या ब्राह्मण करिती ॥ मग इतरांची कोण गती ॥ म्हणोनी करावी भगवंतभक्ती ॥ अहंकृति सांडोनियां ॥११॥
चहूं वर्णांचें कर्म सांगीतलें ॥ जें सद्गुरुकृपें अनुभवा आलें ॥ आपुले देहींच पाहिजे पाहिलें ॥ ज्यासी झाले गुरुज्ञान ॥१२॥
स्थूळ देहचि शूद्र जाण ॥ सेवा न होय स्थूळ देहाविण ॥ अनुभवी जाणतील खूण ॥ इतरांलागोनी न कळेचि ॥१३॥
तीर्थ व्रत अनुष्ठान ॥ देवी देवता संतसेवन ॥ पोथी पुराण कथा कीर्तन ॥ स्थूळाविण नव्हेचि ॥१४॥
परिचर्यादि जें जें कर्म होत ॥ तें तें स्थूळावीण नव्हे सत्य ॥ भावभक्ति हरिचरणीं रत ॥ होय सत्य स्थूळायोग्य ॥१५॥
म्हणोनी स्थूळ सत्यचि जाण ॥ ऐसें जाणोनी सेवेसीं आपण ॥ हें देहावेगळें नव्हे पावन ॥ सत्य वचन मानावें ॥१६॥
तरी शुभाशुभापासोनी ॥ हिरोनि लावावें हरिभजनीं ॥ सर्व भूमीं एकभाव धरोनी ॥ स्वहित करोनी घ्यावे रें ॥१७॥
स्थूळयोगें भक्ति होये ॥ म्हणोनी हें बहुत बरवें आहे ॥ भक्तीविण हें अपवित्र पाहें ॥ धरावी सोय भक्तीची ॥१८॥
स्थूळेंकरोनी परिचर्या जाण ॥ म्हणोनी शुद्धत्त्व जाणावें आपण ॥ लिंग देह तो वैश्य जाण ॥ हेंहि विवरण सांगतों ॥१९॥
मन बुद्धी अहंकार ॥ हें लिंगदेहाचें भांडवल साचार ॥ इंद्रियांचे योगें करी व्यापार ॥ सुखदु:ख अपार भोगविती ॥१२०॥
जैसें वैश्य जोडितां धन ॥ अति आल्हाद आपण ॥ कांहीं तोटा होतां जाण ॥ दु:ख पूर्ण मानित ॥२१॥
म्हणोनी सुखदु:खाचे भरोभरी ॥ लिंगदेह पडे साचारी ॥ नाना कल्पनेच्या उठती लहरी ॥ म्हणोनी निर्धारीं वसे हें ॥२२॥
म्हणोनी वैश्याचें कर्म सांगीतले ॥ तें लिंगदेहीं पाहिजे योजिलें ॥ जेणें हित होय आपुलें ॥ तेंचि वहिलें करावें ॥२३॥
कारणदेह तोचि क्षत्रिय जाण ॥ तेथें दुजियाचें नाहीं भान ॥ एकांत नांदे आपण ॥ धरी खूण मानसीं ॥२४॥
महाकारण तोचि ब्राह्मण ॥ म्हणूनि तिन्ही देहांचें त्यासी ज्ञान ॥ शुभाशुभ आपण ॥ सर्वसाक्षी होऊन वेगळा ॥२५॥
जैसें ब्राह्मणासी तिहीं वर्णांचें ज्ञान ॥ आणि तिन्हीं वर्ण त्याआधीन ॥ तैसेंचि महाकारण आपण ॥ जाणोनी खूण धरीं वेगीं ॥२६॥
वेदशास्त्रादिकरोन ॥ काव्य व्याकरण ज्योतिषी संपूर्ण ॥ शुद्ध ब्रह्मीं अति निपुण ॥ तेंचि महाकारण जाणिजे ॥२७॥
महाकारणीं तूर्यावस्था आहे ॥ ते सर्वांसी जाणताहे ॥ जाणोनी साक्षी राहे ॥ म्हणोनी ब्राह्मण होय महाकारण ॥२८॥
अनुभवी जाणती मनीं ॥ जे लीन असती सद्गुरुचरणीं ॥ नकळेचि इतरांलागुनी ॥ देहाभिमानी विवादती ॥२९॥
जे शुद्धीब्रह्मीं निपुण ॥ आणि असती मनधीन ॥ देहचि म्हणती आपण ॥ त्यांसीं ज्ञान नकळेचि ॥१३०॥
ते नानापरीचे वाद सांगती ॥ परी आपण न वदावें त्यांप्रती ॥ न्यायमीमांसा प्रतिपादिती ॥ परी नेणती अनिर्वाच्य ॥३१॥
म्हणोनी जे वाद करिती ॥ ते सत्य जाणोनी वंचिती ॥ अति आदरें कथेप्रती ॥ सावध श्रोतीं होइंजे ॥३२॥
जें जें मनें कल्पिलें ॥ तें वैखरीनें बोलाविलेम ॥ तें तें नाशिवंत जाणीतलें ॥ अविनाश उरलें अनिर्वाच्य ॥३३॥
हा माझी युक्ति नव्हे कथनीं ॥ हा ज्ञानेश्वर वदतो वचनीं ॥ चारी वर्ण चहूं देहीं स्थापूनी ॥ स्वहित करोनी घेइंजे ॥३४॥
चार देह चारी वर्ण ॥ मी चौदेहांचा चाळक जाण ॥ आदि मध्य अवसान ॥ चौघांचें ज्ञान मजपाशीं ॥३५॥
मी चौंदेहांचा जाणता ॥ असें चौघांहूनी परता ॥ मी नांवरूपाहूनी तत्त्वतां ॥ माझी सत्ता सर्वत्रीं ॥३६॥
ऐसी अखंड भावना करून ॥ निरहित होइंजे आपण ॥ अवघे मीचि जाणोन ॥ आपण नाहीं होवोनी राहिजे ॥३७॥
हेचि अनुभवाचि खूण ॥ येणें होइंजे पावन ॥ रत्नाकरा असेल अनुमान ॥ तरी वचन बोलावें ॥३८॥
स्वामी बोलें अशीं कांहीं ॥ उरी राहिलीचि नाहीं ॥ लाधली अनुभवाचि सोई ॥ सांगितलें अनुभवात्मक ॥३९॥
चहूंवर्णांचीं कर्मे सांगितलीं ॥ तीं चौंदेहांचे ठायी योजिलीं ॥ माझे आशंकेची हानि झाली ॥ कल्पना गेली नि:शेष ॥१४०॥
आतां जो जो तर्क करणें ॥ तो आपण आपणा वंचणें ॥ म्हणोनी मौन्य माया पडणें तेणेंचि पावणें सुखातें ॥४१॥
आतां संशय उरला नाहीं ॥ कांहीं असेल तें स्वामींनीं सांगावें तेंही ॥ तुम्हावेगळें मज पाहीं ॥ न दिसेचि कांही सृष्टीसी ॥४२॥
दिसणेंचि उडालें ॥ प्रांजळ बुद्धीपरी झालें ॥ मीतूंपण हें झगडलें ॥ एक उरलें अविनाश ॥४३॥
आतां अवघा मीचि झालों ॥ मजमाजी मीचि भासलों ॥ पुढें कर्तृत्वा नाहीं उरलों ॥ असें केंदलों सर्वत्रीं ॥४४॥
स्वामी आणि सेवकपण ॥ हेंहि गेलें हरपोन ॥ अवघें भासलें चैतन्यघन ॥ येथें कोणें कोण पुजावें ॥४५॥
पूजक आणि पूजिता ॥ अद्वैतीं द्वैतभावता ॥ न दिसेचि पाहतां ॥ आपुले हिता वंचिलें ॥४६॥
आतां स्तुति न करणें ॥ मनें कांहीं न कल्पणें ॥ पूजा कांहीं न करणें ॥ उगेंचि असणें हें बरें ॥४७॥
शिष्य आणि गुरूपण ॥ याचेंही उडालें भान ॥ तवं सद्गद हांसोन ॥ बोलिले काय युक्ति ॥४८॥
रत्नाकरा तूं तों महाअज्ञान ॥ म्हणोनी गेलें गुरुचें गुरुपण जोंवरी आहे शरीरभान ॥ तोंवरी सद्गुरुसेवन करावें ॥४९॥
याचाही विचार ॥ सांगेन पुढिले अध्यायीं साचार ॥ मन करोनियां स्थिर ॥ होईं सादर कथेसीं ॥१५०॥
हा ग्रंथ दीपरत्नाकर ॥ येथें सांगीतला सारासार ॥ जेणें उतरिजे पार ॥ तेंचि निर्धार केलेंसें ॥५१॥
ते शिष्यावस्थेचें जीवन ॥ जेणें ब्राह्मण होइजे आपण ॥ ज्ञानाचें जरी समाधान ॥ वैराग्यें जाण वैराग्य होय ॥५२॥
विवेकहीना विवेकप्राप्ति ॥ मतिहीनांसी होय मती ॥ अभक्तांसी लागे भक्ति ॥ हा ग्रंथ अवधारिलिया ॥५३॥
गोड्या ग्रंथाचें निरूपण ॥ श्रवणेंचि होइजे पावन ॥ हरे भवभयाचें भान ॥ तुटे बंधन चौंदेहांचें ॥५४॥
जेणें बाळकांसी बोध होय ॥ ऐसें निरूपण ॥ सांगीतलें पाहें ॥ हे संसारपंथींची सोय ॥ सांगीतली पाहें सद्गुरुनें ॥५५॥
ऐसा सद्गुरु दयाळा ॥ करी भक्तांचा प्रतिपाळ ॥ मोक्ष देत तात्काळ ॥ ऐसा कृपाळ दयानिधी ॥५६॥
गुरुचा पांगळा ॥ तो सांभाळवेना कोणाला ॥ तो भणगा गांजिला ॥ त्रैलोक्यामध्यें ॥५७॥
तो देवाचा सांडिला ॥ अंतें जो गांजिला ॥ गुरुप्रतिपाळ त्याला ॥ बाळकासमान जाण ॥५८॥
गुरूचें पद थोर ॥ श्रेष्ठ असे अपार ॥ असे मोक्ष सत्वर ॥ देतसे पैं शिष्यासीं ॥५९॥
ऐसा सद्गुरुश्रेष्ठ ॥ मोठें भवभय अरिष्ट ॥ दूर करि महासंकट । सद्गुरुराव दयाळू ॥१६०॥
जे येथींचें जीवन घेती ॥ ते त्रिविध तापेंसीं निवती ॥ ब्रह्मभावें सर्वभूतीं ॥ होयभक्ति तात्काळ ॥६१॥
हे आनंद निरूपण निजधाम ॥ हें सूक्ष्माहूनी अति सूक्ष्म ॥ हें विश्रांतीचें विश्राम ॥ बोले वर्म रामानंद ॥६२॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंदे पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥१६३॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकर ग्रंथे गुरुशिष्य - संवादे चातुर्वर्ण्यनिर्णयो नाम त्रयोदशोsध्याय: ॥१३॥ ॥ ओंव्या १६३ ॥ श्रीमज्जदीश्वरार्पणमस्तु ॥ शुभंभूयत् ॥    ॥    ॥
इति दीपरत्नाकर त्रयोदशोsध्याय: समाप्त ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP