अध्याय पाचवा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥  श्री गणेशाय नम: ॥
जय जय सद्गुरो अनंता ॥ पतित पावना समर्था ॥ दीन दयाळा कृपावंता ॥ मज अनाथा तारिलें ॥१॥
तुमचे कृपेविण ॥ तुमचें नकळे महिमान ॥ नाना जप तप करितां जाण ॥ नकळे खूण कोणासीं ॥२॥
तुज जाणों जातां ॥ तूं नकळशी सर्वथा ॥ कां जे तूं सर्वांआदि सर्वांपरतां ॥ म्हणवोनि जाणतां अवघड ॥३॥
तुझे कृपें तूं सोपा होशी ॥ येर्‍हवीं जपतपा नातुडशी ॥ पाहों जातां तुजशीं ॥ तरि तूं राहशी माघारा ॥४॥
आपण नाहींच होइजे ॥ तेव्हां तूं ते लाहिजें ॥ ऐसें वर्म आहे तुझें ॥ तेंण जाणिजें तव कृपें ॥५॥
जैसें सूर्यप्रकाशेंकरून ॥ सूर्य देखावा आपण ॥ तैसें तुझेंचि ज्ञान जाण ॥ तुझी खूण कळूं ये ॥६॥
तुझेनि डोळां डोळस ॥ तूं अगोचर मन बुद्धींस ॥ तूं अनेकीं एक ईश ॥ ऐसा भास झाला असे ॥७॥
तूं अरूप रूपातीत ॥ तूं जैसा तैसाचि असशी भासत ॥ तुझ्या सत्तेनें हें चालत ॥ अससी अतीत सर्वांसिं तूं ॥८॥
ऐशिया सद्गुरू दयाळा ॥ तुझी अकळ नकळेचि लीळा ॥ माझा पाळिला तुवां लळा ॥ दाखविलें डोळां स्वरूप तें ॥९॥
जें सर्वांसिं गौप्य होतें ॥ तें स्वरूप दाखविलें मातें ॥ दाउनि नेले देखण्यातें ॥ केलें ऐसें स्वरूपाचि ॥१०॥
देखत्यासिं देखतांचि जाण ॥ देखणेंचि गेले हरपोन ॥ मजमाजी नाहीं दुजेपण ॥ कोंदलें घन स्वरूपचि ॥११॥
ऐसा मज अनुभव झाला ॥ तुमचे कृपेनें संदेह गेला ॥ चौं देहांचा निवाडा वहिला ॥ करोन मला सांगावें ॥१२॥
ईश्वराचे च्यारी देह ते कोण कोण ॥ ते सांगावे विवंचोन ॥ करा पिंडाजेंहि कथन ॥ तोडा भान कल्पनेचें ॥१३॥
रत्नाकरा स्वरूप अभाव जाण ॥ सभासताहे सगुण निर्गुण ॥ स्वरूपीं पाहतां जावोन ॥ मिथ्या भान दोघांचें ॥१४॥
तुझें व्हावया समाधान ॥ मी सांगतों वेगळें करोन ॥ परि तूं हें ऐकोन ॥ काढीं मन वेगळें ॥१५॥
जैसें स्वप्न देखिजे आपण ॥ तें सांगिजे जागृत होऊन ॥ सांगतां ऐकतां मिथ्या जाण ॥ तैसेंचि हें कथन जाणिजे ॥१६॥
सांगतां सत्यासारिखेंचि वाटत ॥ श्रोता अती आदरें ऐकत ॥ सांगोन ऐकोन मानित ॥ नाहीं सत्य म्हणवोनी ॥१७॥
श्रोता वक्ता दोन्ही सत्य ॥ परि संवाद होतो तो असत्य ॥ ऐसें जाणोनि जें जें मी सांगत ॥ ते तें त्यागित जायरे ॥१८॥
कां जे वस्तु अनादि सिद्ध असे ॥ मन बुद्ध्यादिकां अगोचर असे ॥ तेथे संवाद कायसे ॥ करावे कैसे कोणे तोंडें ॥१९॥
तूं सर्वांचे आदित आहेशी ॥ तुजमाजि वस्ती पिंड ब्रह्मांडासीं ॥ सर्वां चालवोन अलिप्त अससी ॥ परि तूं सर्वांशीं अगोचर ॥२०॥
जागृतभावें स्वप्न जैसें ॥ नानापरि नसतेंचि भासे ॥ तुझ्या अज्ञानें तुज तैसें ॥ भ्रम झालासे मिथ्याची ॥२१॥
जें मिथ्याचि भ्रमभान ॥ तेथें माया झाली उत्पन्न ॥ तो ईश्वरचि आपण ॥ शिव म्हणोनि मानिता झाला ॥२२॥
शिवोहं ऐसें भावावीत ॥ तेथें निर्माण झाला हेत ॥ जैसें सूर्यापासोन जळ होत ॥ सूर्यभास त्यामाजी ॥२३॥
सूर्य जळीं भासत ॥ परि तो जळबिंबासिं अतीत ॥ साभूत दोघांतें प्रकाशत ॥ तैसें शिवत्व भासत जीवीं कीं ॥२४॥
मी जीव ऐसें जें वचन ॥ तें शिवचि भावें आपण ॥ हे शब्दचि बोलतां दोन ॥ परि एकपणें न चलेचि ॥२५॥
जैसा अरसा आपणचि धरिजे ॥ तेथें आपण आपणासिंच देखिजे ॥ तेथें जाणतें कोण आहे दुजें ॥ विचारिजे शिष्यराया ॥२६॥
आरसा तो जड अचेतन ॥ त्यातें धरिता झाला आपण ॥ तें अवलोकितां दुसरें वदन ॥ नसतांचि जाण देखिजे ॥२७॥
तैसें पूर्णत्वाचें विस्मरण ॥ तेंचि हेतूचें कारण ॥ हेतूयोगें शिवत्व पूर्ण ॥ ईश्वरचि जाण मानित ॥२८॥
शिवोहं ऐसा अभिमान ॥ तेंचि कल्पनेचें कारण ॥ त्या कल्पनेसंगें करोन ॥ आलें जीवपण शिवातें ॥२९॥
ईश्वरीं उठलें हेतूचें भान ॥ तेचि विद्या मूळ माया जाण ॥ तिच्यायोगें शिवपण ॥ नुसतेंचि जाण भासतें ॥३०॥
त्या विद्येचा अभाव ॥ तेंचि अविद्येचें वैभव ॥ त्या अविद्येमाजि बिंबला जीव ॥ तेणें ऊद्भव कल्पनेशीं ॥३१॥
परी जीव शिव दोन ॥ हें ईश्वराशीं झालें भान ॥ विद्या अविद्या योगेंकरोन ॥ नुसतेंचि जाण भासलें ॥३२॥
जीव शिवाशीं ज्याशीं ज्ञान ॥ तो ईश्वर वेगळा आपण ॥ तो अनादि चैतन्यघन ॥ असे व्यापोन सर्वांतें ॥३३॥
जैसा अवकाशामाजी अवकाश ॥ अवकाशामाजि घट मठाचा वास ॥ तैसा ईश्वरीं जीव शिवाचा भास ॥ ठाव द्वैतास नाहींच कीं ॥३४॥
शब्दींच आकाश भासताहे ॥ येर्‍हवीं तें अवकाशचि आहे ॥ पाहूं जातां भासत आहे ॥ तैशी सोय ईश्वराची ॥३५॥
तैसें बोलतां ईश्वर ॥ येर्‍हवीं तो असे परात्पर ॥ शब्द सांडितां साचार ॥ नाहीं थार ईश्वरा ॥३६॥
घटा मठाकाश आकाश ॥ महदाकाशीं याचा भास ॥ तैसा परात्परीं वास ॥ क्षरा अक्षरास जाणिजे ॥३७॥
तैसें महदाकाश संचलेंचि आहे ॥ नादेंचि आकाश होय ॥ येर्‍हवीं आकाशिं आकार काय ॥ पाहतां सोय लाहिजे ॥३८॥
आकाशीं आकार नाहीं ॥ आणि संचलें सर्वां ठाईं ॥ तैसा ईश्वर शब्दांचि पाहीं ॥ परा नेत्रें कांहीं दिसेचिना ॥३९॥
आडळेविणा आकाश असे ॥ परि तें कोणासीं न दिसे ॥ पाहतां जळामाजी भासे ॥ तें तरी येतसे करीं काय ॥४०॥
नादें आकाश कळों आलें ॥ जळीं आकाश भासलें ॥ भाषण ऐकोन टाकिलें ॥ तेव्हां संचलें महदाकाश ॥४१॥
तैसे शब्दचि बोलिजे अक्षर ॥ येर्‍हवीं नाहीं साक्षात्कार ॥ कल्पनायोगें साचार ॥ भासले क्षर अज्ञान ॥४२॥
तूं तें अससी परात्पर ॥ तुजमाजी हे क्षराक्षर ॥ शिव जीव हा निर्धान ॥ तूंचि साचार करिशी ॥४३॥
पूर्ण तें तूंचि आहेशी ॥ शिवत्वही तूंचि मानिशी ॥ जिवत्वाचें स्वप्न देखिशी ॥ सेखी अससी एकला ॥४४॥
तरिं शिवपणही ओंवळें ॥ तूं मानूं नको सोवळें ॥ विज्ञानतळीं स्नान करूनी शुद्धजळें ॥ साधिं सोवळें मुळींचें ॥४५॥
जें अनादि सिद्ध आहे ॥ त्यापासोनी हें सर्व होय ॥ उत्पत्ति प्रळयाची नेणें सोय ॥ हेतु होय निरहेत ॥४६॥
तरीं निरहेत तेंचि परात्पर ॥ हेतु तोचि अक्षर ॥ अक्षरीं जें विकार ॥ तेंचि अक्षर जाणिजे ॥४७॥
निरहेत कोण असणें ॥ तेचि जागृत अवस्था म्हणणें ॥ हेतु तोचि निद्रेचें ठाणें ॥ तेणें एकी अनेकीं भान उठत ॥४८॥
तरी हें आदिपासोन अवसानपर्यंत ॥ अवघें स्वप्नचि भासत ॥ हेतुयोगें ईश्वर देखत ॥ परि हें सत्य नाहींच कीं ॥४९॥
परि हें अवघेंचि असत्य ॥ परि तुज कळावया सांगत ॥ तूं ऐकोनियां जाईं सांडित ॥ तैसा पंथ चालिजे ॥५०॥
तुज कळावयालागोन ॥ सांगतों वेगळें करोन ॥ तूं त्यासीं जाणोन ॥ वेगळा आपण राहीं रे ॥५१॥
स्वामीचें वचन ऐकोनी ॥ बोल रत्नाकर कर जोडोनी ॥ कल्पना नाहीं माझें मनीं ॥ तुमची वाणी सफल झाली ॥५२॥
निर्विकल्पीं नाही एक ॥ कल्पनेनें भासे अनेक ॥ तुमचे कृपेनें मज हें मायिक ॥ वाटतें देख सर्वही ॥५३॥
परि सांगितल्यावेगळें कांहीं ॥ मिथ्या ते कळणार नाहीं ॥ कळल्यावेगळें त्यागसि पाहीं ॥ उदास कांहीं होवेना ॥५४॥
खोट्याविना खरें न कळे ॥ खरें जाणतां खोटें पळें ॥ म्हणवोन कृपा कीजे दयाळें ॥ सांगा वेगळें करोनी ॥५५॥
निर्विकारी विकार भान ॥ कैसें झालें उत्पन्न ॥ तें कृपालोभें आपण ॥ दावा करोन वेगळें ॥५६॥
ईश्वरीपण ईश्वरी जेणें ॥ तेचि बद्ध विद्या माया पूर्ण ॥ रत्नाकरा सावधान ॥ चित्त देउनी ऐकावें ॥५७॥
जैसी सूर्यकिरणीं कांहीं ॥ कल्पना नसेंचि पाहीं ॥ जें मृगजळें व्हावें माझ्या ठाईं ॥ तैसा ईश्वरीं नाहीं संकल्प ॥५८॥
किरणीं मृगजळ भासत ॥ परि किरण नाहीं जाणत ॥ तैसा ईश्वरीं माया भास होत ॥ परि ईश्वरीं माया नाहीं कीं ॥५९॥
मृगजळ दिसतां किरण आहे ॥ किरण मृगजळातें व्यापोन राहे ॥ तैसी माया भासतां ईश्वरीं पाहे ॥ मुळिंची सोय धरीरे ॥६०॥
किरण पाहतां मृगजळ दिसे ॥ तैसें ईश्वरी म्हणतां माया भासे ॥ न पाहतां मृगजळ नसे ॥ न बोलतां ऐसें पूर्ण ब्रह्म ॥६१॥
न पाहतां मृगजळ नाहीं ॥ किरण तो सर्वां ठायी ॥ तैसें निरहेत ब्रह्मचि पाहीं ॥ असे सबाह्य कोंदलें ॥६२॥
ज्यासिं किरणीं मृगजळ भासे ॥ तोहि किरणाजीच असे ॥ परि तों पाहतां वेगळें जळ दिसे ॥ परि हे मिथ्या ऐसें भावीत ॥६३॥
तैसें स्वरूपींच स्वयें असे ॥ परि हेतु भासणें मृगजळा ऐसें ॥ जाणोनि पिसें सांडिजे ॥६४॥
माया सत् ना असत् ॥ आणि हे सत् शाश्वत ॥ नाहीं म्हणों तरि भासत ॥ मिथ्या भूत आहे म्हणों तरीं ॥६५॥
म्हणवोन म्हणवी सदसत् ॥ ऐसा करावा कल्पार्थ ॥ सदसद्विलक्ष येथें ॥ निश्चित न भावति ॥६६॥
आणि भिन्न तरि अंगासि जडली ॥ अभिन्न तरी नाहींशी झाली ॥ तरी भिन्न भिन्न ऐशी मानिली ॥
भिन्न भिन्न लक्षि नवजाय ॥६७॥ तरी हे माया सावेव ॥ परि न देखो अवेव ॥ आतां हे निरावेव ॥ तरि सावेव प्रत्यक्ष दिसे ॥६८॥
तरि हे उभय उद्भव ॥ ऐसा कल्पावा भाव ॥ तरि हे उभयतातीत स्वयमेव ॥ येथें हाही अनुभव संभवे ॥६९॥
ऐसें द्वादश विकल्प जाण ॥ मायेचे ठायीं कल्पिती सज्ञान ॥ परि हे कांहीं निश्चय पूर्ण ॥ कवणाला न करवे ॥७०॥
करितां मायेचें विवरण ॥ वेदांनीं धरिलें मौन्य ॥ शास्त्रें भांबावलीं आपण ॥ परि नव्हे जाण निर्धारू ॥७१॥
तरीं मायेचें लक्षण ॥ हेंचि एक आहे जाण ॥ जें कल्पनेचें स्फुरण ॥ तें स्वरूपपूर्ण मायेचें ॥७२॥
जेणें माया त्यागावी ॥ तेणें कल्पना उठोंन द्यावी ॥ याचिहि खूण बरवी ॥ धरीं जीवीं रत्नाकरा ॥७३॥
संकल्पबळें करोन ॥ माया उभारि त्रिगुण ॥ तरीं कीजे बोळवण ॥ साक्षित्वें कोण निश्चयीं ॥७४॥
उत्पत्ति स्थिति संहारू ॥ मायाचि करीं साचारू ॥ तूं याचा साक्षिया होन पारू ॥ निर्विकार वेगळा ॥७५॥
आतां हें ब्रह्मांड येथें ॥ जे पुरुषाचें अंग निश्चित ॥ तयाचाहि विशदार्थ ॥ सुनिश्चित ऐकावें ॥७६॥
आतां पुरुषाचे चारि देह जाण ॥ सांगतों मी सावधान ॥ स्थूळ लिंग कारण ॥ महाकारण चौथा ॥७७॥
ब्रह्मांड तें स्थूळ देह पूर्ण ॥ हिरण्यगर्भ लिंगशरीर जाण ॥ माया ते शरीर कारण ॥ महाकारण मूळ प्रकृती ॥७८॥
जागृती अवस्था सृष्टि जाण ॥ स्थिति तेचि स्वप्न ॥ प्रबळते सुषुप्ति अवस्था पूर्ण ॥ सर्वसाक्षी ते जाण तुर्या किं गा ॥७९॥
सत्वगुण विष्णु येथें ॥ रजोगुण ब्रह्मा निश्चित ॥ तमोगुण तो उमाकांत ॥ शुद्ध सत्व सर्वेश्वर ॥८०॥
अकार उकार मकार ॥ अर्धमात्र तुर्या साचार ॥ भूर्भुवस्व निरालंब निर्विकार ॥ तूंचि साचार अससी ॥८१॥
ब्रह्मांड स्थूळ देहपूर्ण ॥ तूं त्याचा जाणता त्याहोन भिन्न ॥ हिरण्यगर्भा होन साक्षी जाण ॥ वेगळां तूं ॥८२॥
माया ते शरीर कारण ॥ तूं तिचा जाणता पूर्ण ॥ मूळ प्रकृति महाकारण ॥ तूं विलक्षण तीहूनी ॥८३॥
तूं ब्रह्मांडरूप असतासी ॥ तरीं ब्रह्मांडातें न जाणताशी ॥ तूं ब्रह्मांडापरता आहेशी ॥ म्हणवोनि जाणशी ब्रह्मांडातें ॥८४॥
अभिमानी विश्व तेजस प्राज्ञ ॥ प्रत्यगात्मा चौथा जाण ॥ तूं त्याचा जाणता त्याहोन ॥ अससी भिन्न साक्षित्वें ॥८५॥
स्थूळ भोग प्रविक्त आपण ॥ अनंद भोग अनंदा भाव जाण ॥ तूं याचा जाणता याहोन ॥ अससी आपण वेगळा ॥८६॥
प्रथम चरण द्वितीय चरण ॥ तृतीय आणि चतुर्थ चरण ॥ हे चारि चरण आपण ॥ इतुकेनि पूर्ण विराट देह ॥८७॥
हे संक्षेपें सांगितलें तुजलागोन ॥ आतां सांगतों वेगळें करोन ॥ तें तूं ऐकून आपण ॥ साक्षी होऊन राहीं रें ॥८८॥
शब्द मात्रचि मूळ प्रकृति जाण ॥ येर्‍हवीं तें ब्रह्मचि पूर्ण ॥ तें अनिर्वाच्य अनादि निर्गुण ॥ तेथें वचन ते प्रकृति ॥८९॥
विराट हिरण्य माया प्रकृति ॥ यांची सांगीतली तुज स्थिती ॥ तूं यांचा जाणता आदि अंतीं ॥ धरीं चित्तीं खूण हे ॥९०॥
जैसें घट मठीं आकाश असे ॥ परि घटा मठा लिप्त नसे ॥ तूं याचे ठाईं आपणातें तैसें ॥ अनायसें जाणी रे ॥९१॥
जैसा काष्ठामाजी पावक ॥ परि तो काष्ठ नोहेचि देख ॥ ऐसें जाणोनि सांडीं तर्क ॥ पाहें विवेक करोनी ॥९२॥
ईश्वरीं जें हेतूचें भान ॥ तेचि मूळ प्रकृति जाण ॥ याचे ठायीं ज्यांचें अधिष्ठान ॥ तें सांडोन देईं रे ॥९३॥
हें कल्पनायोगें भासत ॥ आणि निर्विकल्पीं नासत ॥ जें जें मी सांगतों तें सांडित ॥ जाय त्वरित निरहेत ॥९४॥
हें सर्व मिथ्या जाणोन ॥ कल्पना देईं रे सांडोन ॥ मी सर्वांचा साक्षी आपण ॥ ऐसें मान आपणासीं ॥९५॥
उगवतां निर्विकल्प सूर्य ॥ कल्पनेचा अंध:कार जाय ॥ जाय म्हणणें हें बोलणेंचि आहे ॥ येर्‍हवीं होय तद्रूपचि ॥९६॥
जैसें अग्नि सान्निधान करोन ॥ कापुराचें होय दहन ॥ शेवटीं अग्निही आपण ॥ नि:शेष जाण जातसे ॥९७॥
तैसें निर्विकल्पें करोन ॥ होय कल्पनेचें दहन ॥ शेवटीं निर्विकल्पता जाण ॥ होय आपण तद्रूपचि ॥९८॥
निर्विकार वस्तु आहे ॥ तें निर्विकल्पचि अनुभवासिं ये ॥ अनुभव येतांचि होय ॥ आपण स्वयें ब्रह्मचि ॥९९॥
तरी ते वस्तूचे निजध्यासें करोन ॥ निर्विकल्पता ये आपण ॥ जैशी कीटकी भृंगीचे ध्यानें करोन ॥ भृंगी जाण होतसे ॥१००॥
भृंगी तो जड शरीरीं ॥ तिचा चाळक सर्वांतरी ॥ जो व्यापक चराचरीं ॥ तो काय न करी आपणा ऐसें ॥१॥
भृंगीपेक्षां कांहीं ॥ ब्रह्मीं सामर्थ्य नाहीं ॥ परी हे नकळेचि सोई ॥ भुलली पाहीं भ्रमगुणें ॥२॥
तरीं ब्रह्मांड हें काल्पनिक ॥ निर्विकल्प नाहीं देख ॥ ऐसें जाणोनियां सांडी शोक ॥ साधीं सुख आपुलें ॥३॥
ऐसें सद्गुरूवाक्य ऐकोनी ॥ बोले रत्नाकर कर जोडोनी ॥ झाली कल्पनेची हानी ॥ मनचरणीं लीन झालें ॥४॥
ब्रह्मांडींचें केलें कथन ॥ त्यापासोन निघालें मन ॥ राहिलों साक्षी होऊन ॥ नाहीं भाव द्वैताचे ॥५॥
आतां पिंडाची स्थिती ॥ सांगा मज गुरूमूर्ती ॥ तुमचे कृपेनें स्वरूपप्राप्ती ॥ यथास्थिती झालीसे ॥६॥
मी शिवाचा जाणता सर्वां वेगळा ॥ ऐसें मज कळों आलें दयाळा ॥ मी व्यापक सकळ सकळां ॥ ऐसें कृपाळा भासलें ॥७॥
तवं सद्गुरू बोलिले आपण ॥ म्यां ब्रह्मांडाचें विवरण ॥ संक्षेपें करोन ॥ कां जें ग्रंथांतरीं सांगीतलें आहे जाण ॥ वेगळें करोन संतांहीं ॥८॥
जें एका ग्रंथीं सांगितलें आहे ॥ तेंचि आपण सांगावें काये ॥ म्हणोनि संक्षेपेंचि पाहें ॥ तुज सोय सांगितली ॥९॥
हें तूं बरवें जाणोन ॥ होय वेगळाचि आपण ॥ पिंड निराशनाची खूण ॥ ते सांगेन पुढिले अध्यायीं ॥११०॥
पांचवा अध्याय पूर्ण झाला ॥ आतां सहावा आरंभिला ॥ रामानंद म्हणे रत्नाकरा वहिला ॥ सावधान कथेला होयीं बापा ॥११॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥११२॥
इति श्रीचिदादित्य प्रकाशे दीपरत्नाकरग्रंथे ब्रह्मांडनिरसनयोगो नाम पंचमोध्याय: ॥श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु॥ओंव्या॥११२॥    ॥    
इति दीपरत्नाकर पंचमोsध्याय: समाप्त ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP