मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दीप रत्नाकर| अध्याय सहावा दीप रत्नाकर अनुक्रमणिका प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा आरती अष्टक अध्याय सहावा श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर. Tags : deep ratnakarpothiramanandदीप रत्नाकरपोथीमराठीरामानंद अध्याय सहावा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नम: ॥ जय जय सद्गुरुराया ॥ शशिप्रकाशका ज्ञानसूर्या ॥ अज्ञान तम नासोनियां ॥ दावीं पाउलें आपुलीं ॥१॥ तुमचे पायांचे दर्शनें ॥ हारपोनि गेलें मी - तूं पण ॥ उरलें ब्रह्म चैतन्यघन ॥ ऐसा महिमा तव कृपीचा ॥२॥ केलें ब्रह्मांडचें निरसन ॥ आतां पिंडाचें करावें आपण ॥ जेणें हरे भेमभान ॥ कृपा पूर्ण करावी ॥३॥ तवं सद्गुरु बोलिले वचन ॥ होईं बापा सावधान ॥ बैसें एकाग्र करूं नमन ॥ आईक वचन एकभावें ॥४॥ आतां त्रिपद महा वाक्याचा ॥ विचार सांगतों मी साचा ॥ जेणें तुझे जीवींचा ॥ भ्रम भेदाचा हरेल ॥५॥ तरी त्वंपद तत्पद दोन्ही ॥ असिपदीं मेळवोनी ॥ तेथें जीव शिवांची मिळणी ॥ अहिक्यपणें होतसे ॥६॥ त्वंपद म्हणजे जीवात्मा ॥ असिपद म्हणे परमात्मा ॥ तत्पद म्हणजे शिवात्मा ॥ अनुवाक्यें तदात्मा बोलिजे ॥७॥ तत्पद म्हणजे दोपरी ॥ शबल शुद्ध अवधारी ॥ त्वंपद निर्धांरी ॥ शुद्ध लक्ष अंतरीं धरीं खूण ॥८॥ करून ऐसा अंगिकार ॥ जो करी सृष्टीचा व्यापार ॥ तो परमात्मा सर्वेश्वर ॥ तो सबळ तत्पदार्थ ॥९॥ माया उपाधि वेगळा जाण ॥ तो निष्प्रपंच निर्मळ मान ॥ तो परम पुरुष आपण निर्गुण ॥ तेचि खूण शुद्ध तत्पदार्थ ॥१०॥ ऐसा जो परमात्मा आपण ॥ ऐक्य करोनियां जाण ॥ शबल शुद्ध जीवात्मा खूण ॥ सावधान सांगतों ॥११॥ स्थूल सूक्ष्म कारणीं गुंतला ॥ अविद्या काम कर्में वेष्टिला ॥ संसार वंश दुर्हावला ॥ तोचि बोलिला शबल तत्पदार्थ ॥१२॥ स्थूल सूक्ष्म कारणापासोनी ॥ जो सुटला आपणा देखोनी ॥ राहिला अविद्यातीत होऊनी ॥ तो जाण मनीं त्वंपदार्थ ॥१३॥ दोहींचा शबलांश सांडोनि ॥ शुद्ध लक्षांश घेईजे आपले मनीं ॥ असिपाद होइजे पूर्ण होऊनी ॥ तेचि खूण मानी आहिक्येचे ॥१४॥ दोहींचा शबलांश मिथ्या जाणून ॥ शुद्ध लक्षांश घेईजे आपण ॥ तरीच तुटॆ देहबंधन ॥ धरीं खूण जीवीं हे ॥१५॥ तरी त्वंपद शोधन कैसें ॥ तेंही मी तुज सांगत असें ॥ सावध होवोनियां बैसें ॥ सांडीं कल्पनेचें ॥१६॥ तूं आपणासिं विसरोन ॥ म्हणसी मी स्थूळचि आपण ॥ भ्रमें भुलोनियां आपण ॥ घेसी बंधन करोनियां ॥१७॥ जैसा शुक नळिकेंत गुंतला ॥ तैसा तुज भ्रम जाहला ॥ त्या भ्रमें मी देह मानिला ॥ तेणें झाला घात तुझा ॥१८॥ माझा देह ऐसें म्हणसी ॥ साक्षित्वें आपुले आपणा दाविसी ॥ परि हें नकळे तुजसी ॥ आपण आपणासीं विचार ॥१९॥ माझें शिर नयन ॥ माझें मुख माझे कान ॥ माझे हात माझे चरण ॥ साक्षिपण दाविसी ॥२०॥ माझा हात मोडला म्हणसी ॥ परि मीच मोडिलें ऐसें न म्हणसी ॥ मी वेगळा ऐसें दाविसी ॥ परि भ्रमें चित्तीं मानेची ॥२१॥ माझा प्राण माझा जीव ॥ माझा आत्मा माझा शिव ॥ माझें न माझें वैभव ॥ ऐसा भाव दाविती ॥२२॥ वाग्वाणी सत्य वदत ॥ आपणा वेगळा दावित ॥ परि हा नाहीं जाणत ॥ कां जे रत विषयीं ॥२३॥ तूं देहावेगळा आहेसी ॥ परि मिथ्या देहममता धरिसी ॥ मी वेगळा कैसें म्हणसी ॥ तेंही तुज सांगतों ॥२४॥ स्थूल शरीर नेत्र स्थान ॥ जागृत अवस्था रजोगुण ॥ विश अभिमानी आपण ॥ तूं यांहूनि वेगळाचि ॥२५॥ पंच महाभूतांपासाव ॥ झाले स्थूल शरीरावयव ॥ तयाचाहि सांगतों भाव ॥ करीं जीव सावध ॥२६॥ काम क्रोध लोभ मोह भय ॥ हे आकाशाचे गुण पाहें ॥ तुज यासिं नातें काय ॥ परि देहेंमोहें मानिशी ॥२७॥ तूं आकाशाचा जाणता ॥ आकाशाहोनि परता ॥ सर्वत्र तुझी सत्ता ॥ आकाश तत्वतां नव्हेसी ॥२८॥ तूं आकाश जरी असतासि ॥ तरी आकाशातें न जाणतासि ॥ आकाशाचें ज्ञान तुजपासिं ॥ म्हणवोनि आहेसि वेगळा ॥२९॥ आकाश सर्वांतें व्यापक ॥ तें आकाश तुजमाजी देख ॥ तूं अनेकीं अससी एक ॥ प्रकाशक सर्वांचा ॥३०॥ तूं म्हणसी मज झाला काम ॥ परि तूं कामाचा साक्षि निष्काम ॥ तूं सर्वत्र आत्माराम ॥ वस्तु परम तेंचि तूं ॥३१॥ सर्वत्र भासे आत्माराम ॥ उडेल द्वैतभावाचा भ्रम ॥ मग तो कामच होय निष्काम ॥ सर्व सुगम आहे बापा ॥३२॥ जे म्हणती मी देहचि असें ॥ द्वैत योग्य कामपिसें ॥ त्यां तेंचि द्वैत दिसत असे ॥ भरें सोसे अज्ञान ॥३३॥ तरि हें ज्ञान सांडोन ॥ तूं म्हणसी साक्षी आपण ॥ द्वैत भावाचें मिथ्या भान ॥ तेव्हां कामाचें भान उठेल ॥३४॥ संगात्संजायते काम: ॥ हें गीता बोलतें वर्मवर्म ॥ तरि तो संदेहाचा परम ॥ तेणेंचि काम उडत ॥३५॥ तूं म्हणसी मी देह नोहे कांहीं ॥ देहें हा भ्रम मात्रचि पाहीं ॥ जैसा सर्प रज्जूच्या ठायीं ॥ भासोनि नाहीं सत्य तें ॥३६॥ किरणें भासे मृगजळ ॥ परि तें अवघेंचि पोकळ ॥ सिंपी रूपेचि केवळ ॥ विचारितां सकळ वावचि ॥३७॥ तैसें देह हें भान ॥ भासे परि मिथ्याचि जाण ॥ ऐसी ज्यासीं कळोनि आली खूण ॥ तोचि धन्य संसारीं ॥३८॥ स्वरूप तो अरूप अनाम पाहीं ॥ तेथें ज्ञानाचें न चले कांहीं ॥ मन बुद्धी सरीग नाहीं ॥ ऐसें सबाह्य कोंदलें ॥३९॥ तें विज्ञान स्वरूप आहे ॥ तेथें ज्ञानाचा लय होय ॥ ज्यासिं दृश्यभास मिथ्या होय ॥ तेंचि पाहें ज्ञान कीं ॥४०॥ दृश्य मिथ्यासे भासलें ॥ तेथं कामाचें कांहीं न चाले ॥ देखा काम तेंचि निष्काम झालें ॥ अविनाशी उरलें परब्रह्म ॥४१॥ जें जें मनबुद्धीस अगोचर ॥ तें तें दृश्यचि साकार ॥ तें त्यागितां कामासि थार ॥ त्रैलोक्यामाझारी नाहींच कीं ॥४२॥ म्हणवोनि अनुभवेंकरून ॥ नाहींच होइजे आपण ॥ तरीच होइजे समाधान ॥ झालें निरशन कामाचें ॥४३॥ जेथें कामास उठाव नाहीं ॥ तेथें क्रोध कैंचा कांहीं ॥ तूं साक्षी होऊनि राहीं ॥ क्रोधचि पाहीं अक्रोध होय ॥४४॥ क्रोध झाला अक्रोध ॥ तेव्हां शोकाची उडाली शुद्ध ॥ मग उरला सच्चिदानंद ॥ असे अगाध साक्षित्वें ॥४५॥ तूं शोकमोहातें जाणसी ॥ शोक मोहापर आहेसी ॥ ऐसें जाणोनियां मानसीं ॥ साक्षी आपणासीं जाण रे ॥४६॥ काम क्रोध शोक मोह भय जाण ॥ तूं यांचा साक्षीं याहूनि भिन्न ॥ पूर्णब्रह्म तें तूं आपण ॥ धरीं खूण जीवीं हे ॥४७॥ तूं आकाशाचा साक्षी आहेसी ॥ म्हणवोनी आकाशाच्या गुणातें जाणसी ॥ तूं स्वप्रकाश तेजोराशी ॥ धरीं मानसीं खूण बाहे ॥४८॥ झालें आकाशाचें निरसन ॥ आतां वायूचें करितों कथन ॥ तूं हें अति आदरें मनीं धरून ॥ साक्षी होऊन राहे रें ॥४९॥ धावन चलन आणि संकोचन ॥ प्रसरण आणि निरोधन ॥ हे पांचही झाले वायुपासोन ॥ तूं याहोनि वेगळा ॥५०॥ तूं वायूचा साक्षी आहेसी ॥ तुझ्या सत्तेनें चलन वायूसीं ॥ वायू न जाणे तुजसीं तूं त्याशीं अलिप्त ॥५१॥ धावन चलन संकोचन ॥ तूं यांचा जाणता याहूनि भिन्न ॥ प्रसरण आणि निरोधन ॥ यांचें ज्ञान तुजला ॥५२॥ तूं हेंच जरीं असतासी ॥ तरी याचिया कर्मा न जाणतासी ॥ तूं स्वत:सिद्ध आहेसी ॥ हें स्वप्न देखसी देहसंगें ॥५३॥ तरी हें मिथ्या जाणून ॥ सांडी याचा अभिमान ॥ राहें साक्षी होवोन ॥ झालें निरशन वायूचें ॥५४॥ पुढें व्हावें सावधान ॥ तूं तेज नव्हेसेसे रे आपण ॥ तुझेनी तेजातें तेजपण ॥ तूं विलक्षण त्याहूनि ॥५५॥ क्षुधा तृषा निद्रा जाण ॥ आळस संग तेजाचे गुण ॥ तूं विलक्षण त्याहून ॥ अससी भिन्न साक्षित्वें ॥५६॥ तूं क्षुधादिक असतासि तरि याचिचा कर्तृत्वा न जाणसी ॥ तूं स्वयंप्रकाश या सर्वांसि ॥ लिप्त नससी कोणातें ॥५७॥ तुझेनि तेजें तेज ॥ तूं तेजाचें निज तेज ॥ हें अंतरीचें सांगतों गुज ॥ जाणोन सहज राहें बाप ॥५८॥ तूं क्षुधातृषेतें जाणसी ॥ सुखें निजलों म्हणसी ॥ साक्षित्वें आळसासी ॥ जाणत अससी स्वप्रकाशें तें ॥५९॥ तूं जळ नव्हेसि आपण ॥ तुझेनि जळाला जळपण ॥ तूं जळाचा साक्षी जळाहून ॥ विलक्षण साक्षित्वें ॥६०॥ लाळ मूत्र शोणित पूर्ण ॥ मज्जा रेत आपण हीं झालीं जळापासोन ॥ त्याचें ज्ञान तुजला ॥६१॥ तूं या सर्वांचा जाणता ॥ अससी सर्वांहूनि परता ॥ सांडोन याची अहंता ॥ साक्षी आतां राहेरे ॥६२॥ तूं पहिलाचि साक्षी आहेसी ॥ परि भ्रमगुणें नेणसी ॥ तूं एक व्यापक सर्वांशीं ॥ अलिप्त अससी साक्षित्वें ॥६३॥ रोम त्वचा मास अस्थी ॥ पांचवि ती नाडी निश्चिती ॥ इतुके पृथ्वीचे गुण असती ॥ एवं स्थिती देहाची ॥६४॥ तूं पृथ्वीची पृथ्वी आपण ॥ तुझेनी पृथ्वीसीं पृथ्वीपण ॥ म्हणोन पृथ्वीचे कर्मांस जाण ॥ साक्षी करोन आणसी ॥६५॥ तूं रोमादिकांचा जाणता ॥ अससी सर्वांहूनि परता ॥ सांडोन यांची अहंता ॥ साक्षी आतां होईंरे ॥६६॥ पृथ्वी नव्हेसी कठिणपणें ॥ तूं जळ न होसी द्रवत्वगुणें ॥ तूं तेज नव्हेसी दाहक लक्षणें ॥ साक्षी राहाणें शिष्यवत्सा ॥६७॥ चंचळत्वें वायु नव्हसी ॥ तूं व्यापक आकाशासीं ॥ म्हणवोन सर्वांतें जाणसी ॥ धरीं मानसीं खूण हे ॥६८॥ एवं पांचापासाव पंचवीस झालीं ॥ तें तुवां साक्षित्वें जाणितलीं ॥ मी तूं गुण ऐसी बोली ॥ बोलतां आली थोर लाहान ॥६९॥ पांचापासोन पंचवीस ॥ येणें आकार झाला स्थूळास ॥ तूं जाणता जागृतीस ॥ पांचा रंगांस वोळखिसी ॥७०॥ पृथ्वीचा रक्तवर्ण असे ॥ जळ श्वेतवर्ण भासे ॥ अग्नि श्यामवर्ण भासे ॥ वायु परियेंसीं निलवर्ण ॥७१॥ आकाशातें पीतवर्ण दिसत ॥ तूं या रंगाचा जाणता रंगातीत ॥ तुझेनें हे रंग शोभत ॥ साक्षिभूत वेगळा तूं ॥७२॥ गगनीं अच्छिद्रता धर्म ॥ अवकाश तें कर्म ॥ शब्दगुण परम ॥ वेद नाम श्रोत्रासीं ॥७३॥ गगनाचे धर्म कर्म गुण । तूं साक्षित्वें जाणसी आपण ॥ ऐसें जाणोनि मन ॥ त्यापासोन काढिलें ॥७४॥ पवनीं धर्म चांचल्यता ॥ वाहणें कर्म तत्वतां ॥ गुण शब्द स्पर्शता ॥ श्रोत त्वचेसीं तत्वता वेद्य ॥७५॥ यातेंही तूं जाणसी ॥ म्हणऊन हें तूं नव्हेसी ॥ तूं मूळींचा साक्षि आहेसी ॥ धरीं मानसीं खूण हे ॥७६॥ तेजीं उष्णता धर्म ॥ पंचाननादिक कर्म ॥ शब्द स्पर्शे तप हें कर्म ॥ गुण परम तेजीं ॥७७॥ तें जरी तेज असतासि ॥ तरी तेज कर्मातें जाणतासि ॥ तूं साक्षित्वें वेगळा अससी ॥ सांडोन यासीं उतावेळ ॥७८॥ श्रोत आणि त्वचा जाण ॥ तिसरे ते नयन ॥ तेजीं वेद्य आपण ॥ जळ लक्षण आयकावें ॥७९॥ जळीं धर्म द्रवत्व ॥ क्लेदनादिक कर्म तेथ ॥ शब्द स्पर्श रूप रस येथ ॥ तूं जाणत साक्षित्वें ॥८०॥ श्रोत त्वचा नयन ॥ चौथी ते जिव्हा जाण ॥ यांशीं वेद्य आपण ॥ हें लक्षण जळाचें ॥८१॥ तूं याचा जाणता ॥ याहोनियां अससी परता ॥ ऐसें जाणोनियां तत्वतां ॥ साक्षी आतां होयीं रे ॥८२॥ पृथ्वीचा धर्म कठिणत्व ॥ धारणादिक कर्म तेथ ॥ पांच गुण वर्तत ॥ शब्दादि सत्याविषयीं ॥८३॥ ऐसीच पांचासी जाण ॥ वेद्य असें आपण ॥ श्रोत त्वचा नयन ॥ जिव्हा घ्राण हे पांच ॥८४॥ तूं पृथ्वी नव्हेसेसे आपण ॥ पृथ्वी कर्माचा जाणता पूर्ण ॥ म्हणोन या कर्मालागोन ॥ साक्षी करोन जाणसी ॥८५॥ जागृती अवस्थेमाजि जें भासत ॥ तें तें अससी तूं जाणत ॥ म्हणोन तूं जागृती अतित ॥ मानीं सत्य वचनातें ॥८६॥ उंच नीच भूमिका जाणसी ॥ आपलें पारखें वोळखिसी ॥ माझें तुझें म्हणतोसी ॥ परि अससी वेगळा ॥८७॥ स्वर्गनरकाचें ज्ञान ॥ नाना तीर्थव्रत अनुष्ठान ॥ देवि देवता पुरें पर्यटण ॥ हें ज्ञान जागृतीस ॥८८॥ चार खाणी चार वाणी ॥ चौर्याशीं लक्ष जीवयोनी ॥ नाना शब्दब्रह्मांडाची मांडणी ॥ यांचे जागृतीलागोनी ज्ञान असे ॥८९॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण ॥ जागृतीस याचें ज्ञान ॥ तूं जागृतीहोन विलक्षण ॥ जाणसी खूण साक्षित्वें ॥९०॥ तूं विप्रादिकां जाणसी ॥ तुझेनि ब्राह्मणत्व ब्राह्मणासीं ॥ ब्राह्मणाचें कर्म जाणसी ॥ ब्राह्मण नव्हेसी सत्यत्वें ॥९१॥ तूं क्षत्रिय नव्हेसी आपण ॥ क्षत्रियासीं तुझेनि क्षत्रियपण ॥ तूं क्षत्रिय धर्मापासोन ॥ वेगळा जाण साक्षित्वें ॥९२॥ तूं वैश्य नव्हेसी सत्य जाण ॥ तूं वैश्याचा जाणता आपण ॥ वैश्यकर्मास अलिप्तपण ॥ साक्षी पूर्ण सकळांचा ॥९३॥ तूं शूद्रहि नव्हेसी ॥ शूद्रकर्मातें नातळसी ॥ म्हणोन वेगळा तूं सर्वांसीं ॥ धरीं मानसीं खूण हे ॥९४॥ तूं चारी आश्रमा जाणसी चहूं आश्रमां वेगळा आहेसी ॥ साक्षित्वें सकळां चाळविसी ॥ जेवि लोहासि चुंबक ॥९५॥ सप्तपाताळ स्वर्ग एकवीस ॥ सत्यलोक वैकुंठ कैलास ॥ दाहि दिशा देव सर्वांस ॥ जाणे सकळांस जागृतीं ॥९६॥ स्त्री - पुरुष भाव भक्ती ॥ नाना विद्येची वित्पत्ती ॥ या सर्वांस जाणती ॥ एक जागृती सत्य मानीं ॥९७॥ जागृतीस जें जें जाणवलें ॥ तें तें जागृती बरोबर गेलें ॥ तुझें रूप असे संचलें ॥ तें जाणवलें जातही ॥९८॥ तूं विश्वअभिमानी नव्हेसी ॥ विश्वअभिमानी याचा साक्षी आहेसी ॥ म्हणवोनियां त्यातें जाणसी ॥ धरीं मानसीं खूण हे ॥९९॥ तूं रजोगुण नव्हेसी ॥ रजोगुणाचा साक्षी आहेसी ॥ म्हणवोनि रजोगुणाचे कर्मां जाणसी ॥ संदेह मानसीं धरूं नको ॥१००॥ स्वर्ग नरकाचें सुख ॥ हें रजोगुणाचें देख ॥ रजोगुणीं एक अनेक ॥ नसता शोक वाढविला ॥१॥ नाना प्रकारचें ज्ञान ॥ चौदा विद्या चौसष्ट कला जाण ॥ गीत प्रबंध राग ज्ञान ॥ रजोगुणें विस्तारलें ॥२॥ चार वाणी चार खाणी ॥ चौर्याशीं लक्ष जीव जनीं ॥ पुण्य पाप सुख दु:ख मांडणी ॥ रजोगुणापासोन झालेत कीं ॥३॥ आदिपासोन अवसानापर्यंत ॥ हा रजोगुणचि समस्त ॥ जिव शिव माया ब्रह्म म्हणत ॥ वाद करीत रजोगुण ॥४॥ जें जें मन बुद्धीस आलें ॥ तें तें रजोगुनापासोन झालें ॥ ऐसें जाणोनि आपलें ॥ हित पहिलें करीं रे ॥५॥ तरी रजोगुण त्यासींच म्हणणें ॥ जो आपणासीं आपण नेणे ॥ एकीं अनेक जाणणें ॥ हेंचि करणें रजोगुणाचें ॥६॥ मग भ्रमें भ्रम वाढत ॥ तेणें अभिमान जडत ॥ अभिमानें होतो घात ॥ यातायात चौर्यांशींची ॥७॥ आपुलें साक्षित्व विसरोनी ॥ मी देहीच घेती मानोनी ॥ या खोट्या अभिमानें करूनी ॥ होत हानि प्राण्याची ॥८॥ आपणा आपण विसरला ॥ म्हणोन देहच मानिला ॥ तेणेंचि पडला ॥ भवार्णवीं ॥९॥ अहं ब्रह्मास्मि हा अभिमान ॥ येणें होइजे पावन ॥ अहं देह ममताचि जाण ॥ होय भान द्वैताचें ॥११०॥ तें द्वैत नानापरी ॥ एकीं अनेक तर्क करी ॥ जैसें कनकबीज सेविल्यावरी ॥ उगेच वैखरी जल्पवाद ॥११॥ अद्वा तद्वा बोलत ॥ वाउगेंचि असे जल्पत ॥ तैसी नाना मतांतरीची स्थिति ॥ असे भासत देहसंगीं ॥१२॥ देहसंग हेंचि कनकबीज ॥ येणेंचि भ्रांत होतसे तुज ॥ म्हणवोनि मी तुज ॥ सांगतों गुज जीवींचें ॥१३॥ रजोगुणाची यत्ता बारे ॥ ऐसीं चिन्हें होती बारे ॥ रजोगणुच्या कर्मातें जाणसी तूरें ॥ अससी साचार वेगळाचि ॥१४॥ रजोगुणापासोनि जें जें झालें ॥ तें तें रजोगुणाबरोबर गेलें ॥ हें त्वांचि जाणीतलें ॥ तुझें व्यापिलें एक तेजें ॥१५॥ तूं सर्वांचा प्रकाशक ॥ अनेकीं अससी एक ॥ परी देहसंगें वेढले शोक ॥ नसताचि देख अभिमान ॥१६॥ तरी स्थूल देह शरीर नव्हेसी ॥ स्थूळ शरीराचा जाणता आहेसी ॥ नातें नाहीं तुज यासीं ॥ धरीं मानसीं खूण हे ॥१७॥ अरे शरीरासी जात गोत ॥ शरीरासी नांवरूप शोभत ॥ स्त्रीपुत्रादि समस्त ॥ जाण सत्य शरीरासीं ॥१८॥ शरीर तूं नोहे ॥ माया शरीरासि ते तुझी काय ॥ ऐसें जाणोन सावध होय ॥ साक्षी राहें शरीराचा ॥१९॥ स्त्रीपुत्र आदि धन ॥ येणेंचि शरीरासि ते तुझी काय ॥ ऐसें जाणोन सावध होय ॥ साक्षी राहें हान भजनाची ॥१२०॥ शरीरीं आल्याचें सार्थक ॥ कृष्णभक्ति करावी एक ॥ तें सांडोनियां विषयसुख ॥ हर्षें मूर्ख सेविती ॥२१॥ विषयसुखाची प्राप्ती ॥ धनाविना नव्हे कल्पांतीं ॥ तें धन मिळावया उपाय करिती ॥ तेहि स्थिती सांगतो ॥२२॥ एक नाना विद्या अभ्यास करिती ॥ काव्य व्याकरणें पढती ॥ द्रव्याशा धरून चित्तीं ॥ पुराण सांगती मंदबुद्धी ॥२३॥ काव्यशक्ति पढोनि वित्पत्ती केली ॥ परि आत्मबुद्धी नाहीं संचरली ॥ म्हणोनियां भांबावली ॥ प्रपंचें पडली बळेंचि ॥२४॥ सुखदु:ख प्रारब्धाआधीन ॥ ही वेदशास्त्रें सांगती खूण ॥ परि हा विषयीं भुलला आपण ॥ तें मनन करिची ॥२५॥ विषय सेवोनियां झाला मस्त ॥ म्हणोन काम्यकर्मातें करीत ॥ स्वर्गइच्छा मनीं धरित ॥ पशु वधीत म्हणोनियां ॥२६॥ ते आपणासीं जाणते ॥ तरि ते निष्काम कर्म करिते ॥ पशुहिंसेतें त्यागिते ॥ अखंड असते अनुभवें ॥२७॥ शांतिक्षमेतें धरोन ॥ वैराग्ययुक्त करित भजन ॥ विवेकें सांडिते अभिमान ॥ साक्षी होवोनि राहते ॥२८॥ सुखदु:ख प्रारब्धाआधीन ॥ बळेंसी प्राप्त यत्नेकरून ॥ आपण करावें तें मिथ्या जाण ॥ हें असतें ज्ञान तयासीं ॥२९॥ तरी तें प्रयत्नातें सांडोन ॥ प्रपंछ मिथ्यासा जाणोन ॥ स्वहित घेत करोन ॥ नसतें भान देहाचें ॥१३०॥ हें चिन्ह जयासि नाहीं ॥ तो पढतमूर्ख पाहीं ॥ नाना पुराण वित्पत्ती तेही कसें न कांहीं हित केलें ॥३१॥ म्हणवोन ते अज्ञान मंदमती ॥ ते आपण नेणती ॥ म्हणोन फळाशा कर्म करिती ॥ ते वंचिती आपणा ॥३२॥ शरीरभोगासाठीं नाना तपाची आटाआटी ॥ नाना उदीम करणी खोटी ॥ धरिती पोटीं धरून लोभ ॥३३॥ धन मेळवावया आपण ॥ न विचारी पाप पुण्य ॥ नाना ज्ञानातें वेंचोन ॥ मेळवी धन महालोभी ॥३४॥ एक हरिदास म्हणविती ॥ कथा करून द्रव्य घेती ॥ एक भूत - भविष्य - वर्तमान सांगती ॥ लोभ चित्तीं धरूनिया ॥३५॥ ज्या नामें होय हित ॥ तें धनासाठीं विकित ॥ तेणें आपणा आपण वंचित ॥ झाला घात म्हणोनियां ॥३६॥ जे विद्याभ्यास जाणती ॥ उपनिषद भाष्य पाहती ॥ दुसरियासी उपदेश करिती ॥ तेहि शिणती देहसंगें ॥३७॥ तेही अदृष्टासीं नेणती ॥ म्हणवोनि देह आशा करिती ॥ त्या मूर्खाची काय गती ॥ जे न जाणती वेदशास्त्र ॥३८॥ जे वेदशास्त्रांचे जाणते ॥ तेही भुलले आपणातें ॥ तूं साक्षित्वें जाणोनियां तें ॥ स्वरूप तें पाहेरे ॥३९॥ स्त्रीसाठीं नाना उपाय ॥ करिताति परि ते अवघेचि वाव ॥ संततीपासीं जडला जीव ॥ परमार्थ सर्व विसरला ॥१४०॥ देह स्त्रीसुखासीं विकला ॥ देवपितरांसी विन्मुख जाहला ॥ वंचोन मातापितयांला ॥ नग बायलेला करितसे ॥४१॥ बरवे स्त्रियेसीं अलंकार ॥ वस्त्रें लेववी सुंदर ॥ ठमकत चाले जों जों नार ॥ तों तों आंत निवे त्याचें ॥४२॥ जों जों स्त्री हावभाव दावित ॥ तों तों मनामाजी संतोषत ॥ स्त्रीचि एक मानित आप्त ॥ तिच्या ऐकत हितगोष्टी ॥४३॥ जैसें भक्ताचें प्रेम देवाचे ठायीं ॥ तो देवाविना नेणेचि कांहीं ॥ तैसा जडला स्त्रियेच्या ठाईं ॥ लाज नाहीं लैकिकाची ॥४४॥ लौकिक लाज सांडोनी ॥ झाला निर्लज्ज मनीं ॥ बायलेच्या गोष्टी धरी मनीं ॥ ती स्फुंद स्फुंदोनी रडतसे ॥४५॥ तुम्हीं ऐका हो आतां ॥ ज्यासी तुम्ही देवासारिखे मानितां ॥ तो म्हातारा तुमचा पिता ॥ असे आतां कातवला ॥४६॥ तरी मी तुम्हापाशीं नाहीं सांगत ॥ कां जे तुमचें दु:खिती चित्त ॥ आतां झाला फार अंत ॥ मज घरांत राहवेना ॥४७॥ तुमचें माझें आहे एक चित्त ॥ म्हणोनि म्यां सोसिलें बहुत ॥ माझें तुम्हांस वाटत नाहीं सत्य ॥ नाहीं सांगत तुम्हापासीं ॥४८॥ उदंड माता - पिता असती ॥ परि ऐसे कोठें नसती ॥ रात्रं - दिवस करकर करिती ॥ नाहीं विश्रांति क्षणभरी ॥४९॥ एकप्रकारें संसार भला ॥ तुमची माता गांजिते मला ॥ उठतां बैसता मारिती डोळा ॥ आतां मला सोसवेना ॥१५०॥ तुमची म्हातारी कठीण बहुत । श्वानापरी असे भुंकत ॥ धाकुटे मुलावरी फार चित्त ॥ तुम्हातें धरित दूर पैं ॥५१॥ तुम्हीं जें जें आणितां मेळवोन ॥ तें तें देतां त्यांपासीं नेवोन ॥ परी शेवटीं धूळ तुमचें वदनीं ॥ मजलागोनी कळतें हें ॥५२॥ आतां जें आहें तें जीती खावोनी ॥ मग वेगळा काढितील निर्वाणीं ॥ तरी आतांचि कां न विचारावें मनीं ॥ ऐसें ती लाज सांडोन बोलत ॥५३॥ जे जे कर्जदार येती ॥ ते ते तुम्हातें कष्टी करिती ॥ परी त्यांचे नहीं चितीं ॥ धन सांठविती चोरूं चोरूं ॥५४॥ आतां तुमची बहिण आली ॥ तिसी वीस रुपयांची बोळवण केली ॥ तुमचे भावानें मला शिवी दिधली ॥ रांडे म्हणोनी उगाचि ॥५५॥ रांड रांड वेळोवेळां म्हणती ॥ तुमचे मरणाची इच्छा करिती ॥ पोट न भरे तरी खावी माती ॥ परी हे स्थिति सोसवेना ॥५६॥ माझीं तान्हीं पोरेंबाळें ॥ त्यांचे जावळास तेल न मिळे ॥ मागतां वटारिती डोळे ॥ मजसीं बळें भांडताती ॥५७॥ ऐसें ऐकोनि स्त्रियेचें वचन ॥ तें सत्यचि मानी आपण ॥ जैसी वेदाची आज्ञा प्रमाण ॥ संतजन मानिती ॥५८॥ होती जिवासी उदार ॥ परी वेदाचा न करिती आव्हेर ॥ तैसा स्त्रीवचनाआधीन नर ॥ मानी उत्तर स्त्रियेचें ॥५९॥ जें जें स्त्री सांगतसे ॥ तें तें हांसत मानितसे ॥ मग अबोला धरीतसे ॥ भांडत असे घरांत ॥१६०॥ मायबापासी धिक्कारी ॥ अखंड भावंडातें मारी ॥ उगाचि कलह करी ॥ घरोघरीं फिरत ॥६१॥ बोलविलीया सुधा न बोलत ॥ तूं तूं मात्यापित्यांसी करित ॥ आप्तवर्गासी सांगत ॥ मज घरांत राहवेना ॥६२॥ भोजनीं बसल्या अन्न ॥ पोटभरी न खाय आपण ॥ म्हणे मी घरदार टाकून ॥ जाईन होऊनि अतीत ॥६३॥ जीव गेला तरी कांहीं ॥ मज घरांत राहणें नाहीं ॥ अखंड दांतकसाळी करी पाही ॥ परी न धरी सोय हिताची ॥६४॥ मग मातापित्यांतें त्यागोनी ॥ वेगळा रहातो जाऊनी ॥ देह मीं म्हणतां ऐसी वाणी ॥ सत्य म्हणे होतसे ॥६५॥ म्हणोन देहसंगें दु:खाची राशी ॥ देहसंगें प्रीती स्त्रियेसीं ॥ देहसंगें सुखदु:खासीं ॥ प्राणी अनायासें भोगित ॥६६॥ देह जरी नाशिवंत जाणता ॥ तरी विषयसुखीं उदास असता ॥ भगवद्भजनचि करिता ॥ सांडिता देही अहंतेतें ॥६७॥ देहासीं देश परदेश ॥ देहासीं भागविलास ॥ मातापिता सर्वांस ॥ या देहास लागलीं ॥६८॥ देहासी बाळ तरुण्य जाण ॥ देहासी वार्धिकपण ॥ तूं याचा जाणता याहोन ॥ साक्षी पूर्ण अससी रे ॥६९॥ देहा नाधरिता अभिमान ॥ म्हणती मज पाहिजे संतान ॥ मज मागें घरधन ॥ यासी राखण पाहिजे ॥१७०॥ मागें आपलें नाम घेणार नाहीं ॥ म्हणवोनि तळमळ करिती पाही ॥ मग त्यासी उपाय कांहीं ॥ करितां अपायीं पडताति ॥७१॥ स्त्रीपिंपळाभोवतीं भोंवंडित ॥ नाना दैवतें उपासित ॥ मज पुत्र होईळ कीं नाहीं पुसत ॥ अखंड भ्रमिष्ठ मन त्यांचें ॥७२॥ ब्रह्मगिरीसीं प्रदक्षिणा ॥ दोघेजण करिती जाणा ॥ पुत्रकाम धरूनियां मना ॥ गेली आपण विसरोन ॥७३॥ नागबळ नारायणबळ ॥ करिती लोवान धन पुष्कळ ॥ संतानासाठी करिती तळमळ ॥ काळवेळ न जाणती ॥७४॥ ऐसें यानें झालें संतान ॥ तरी म्हणती आम्हीच धन्य ॥ वेचिती धन आणि धान्य ॥ गुडी जाण उभारिती ॥७५॥ द्वारीं तोरणें बांधिती ॥ घरोघरीं हरिखीं वाटिती ॥ कोणातेंही चित्तीं नाणिती ॥ हर्षती मनामाजी ॥७६॥ देहसंगाचें सुख ॥ भोगीं होय हरिख ॥ कांहीं होतां दु:ख ॥ करी शोक आपण ॥७७॥ इंगळाचे शेजेवरी ॥ सुखें निद्रा लागे जरी ॥ तरीच देहसंगें निर्धारी ॥ भोगिती संसारीं सुख प्राणी ॥७८॥ गंधर्वनगरा माझारी ॥ वांझपुत्र नांदेल जरी ॥ देहसंग बापा तरी ॥ सुख निर्धारी तरी पावे ॥७९॥ मृगजळाचें लाधतें उदक ॥ सिंहातें मारिता जंबुक ॥ खद्योततेजाचा दीपक ॥ दोप्रहरीं देख दिसत ॥१८०॥ स्वप्नींचें राज्य जागृतासीं ॥ जरी भोगिता प्राणी हर्षी ॥ तरी देहसंगें यासीं ॥ सुख प्राण्यासी होय कीं ॥८१॥ देहसंगें दु:खाची खाणी ॥ देहसंगें थोर हानी ॥ ऐसें जाणॊनिया मनीं ॥ साक्षी होवोनि राही रे ॥८२॥ या देहा भरावरी ॥ पडतां चौर्यायशींच्या फेरी ॥ जात गोत निर्धारी ॥ देह भरी सुखदु:ख ॥८३॥ आपलें पारखें देहासी ॥ तूं तो साक्षी देहाचा अससी ॥ ऐसें जाणोनियां मानसीं ॥ सांडी वेगीं रत्नाकरा ॥८४॥ देह जड मूळ अज्ञान ॥ याचा कायसा अभिमान ॥ हें काळासीं वाटलें आहे भान ॥ क्षणक्षणा जातसे ॥८५॥ म्हणोन आपुलें कांहीं नाहीं ॥ हें पराधीन असे पाहीं ॥ ऐसें जाणोनियां तूंही ॥ सावध होयीं उतावेळ ॥८६॥ तरी आतां देहसंगातें सोडोन ॥ तूं नि:संग होय आपण ॥ तेव्हांचि होसी पावन ॥ धरीं खूण जीवीं हें ॥८७॥ देह आकारमात्रचि भासत ॥ अंतीं जेथिंचा तेथें मिळत ॥ एक अविनाश वस्तुचि राहत ॥ काढीं चित्त म्हणोनियां ॥८८॥ ज्यांपासोन जें उत्पन्न ॥ तें तेथेंचि जाय मिळोन ॥ कैसें म्हणसी तरी सावधान ॥ तेहि खूण अवधारी ॥८९॥ गंधरूपें धरणी ॥ प्रवेशली जीवनीं ॥ जीवनरूपें करूनी ॥ तेजीं जाऊन मिळाली ॥१९०॥ तेजरूप प्रकाशें येथें ॥ पवनीं असे प्रकाशते ॥ पवन वश्य रूप यथार्थे ॥ गगनांत प्रवेशे ॥९१॥ एवं उरला आकाश ॥ तेंही उरे शब्दास ॥ तो शब्द तन्माक्षास ॥ तोही प्रवेशे महातमीं ॥९२॥ तम अहं - कारीं विरत ॥ अहंकार ब्रह्मीं लयातें पावत ॥ जैसें गगन अभ्रात ॥ विरोनि होत गगनचि ॥९३॥ जैसें जळीं लवण मिळतां ॥ जळचि होय तत्त्वतां ॥ तैसा ब्रह्मानुभव पाहतां ॥ अहं पाहतां न दिसे ॥९४॥ हें भासे परी नाशिवंत ॥ ऐसें जाणोनि काढीं रे चित्त ॥ संदेह असेल तरी त्वरित ॥ पुस मातें रत्नाकरा ॥९५॥ सद्गुरूवाक्यें ऐकोनी ॥ बोले रत्नाकरा कर जोडोनी ॥ मज सोडवीं स्थूळापासोनी ॥ धन्य वाणी तुमची हे ॥९६॥ मी आपणासीं नेणोन ॥ देहचि मी म्हणत आपण ॥ लटिकाचि धरिला होता अभिमान ॥ तें बंधन तोडियलें ॥९७॥ आतां झालों देहातीत ॥ मी अविनाश देही नाशवंत ॥ माझे पुरले मनोरथ ॥ झालें चित्तीं समाधान ॥९८॥ मी मुळींचा देहातीत आहें ॥ परि भुललों होतों माया - मोहें ॥ माझें माझें म्हणोनियां सोये ॥ होतों पाहें चुकलों ॥९९॥ आतां झालों निर्भय ॥ लाधली साक्षित्वाची सोय ॥ जन्ममरणाचें भय ॥ माझें पाहें चुकलें ॥२००॥ मी स्थूळाचा जाणता ॥ असें स्थूळाहोनि परत ॥ नि:संदेह झालों आतां ॥ सांगा कथा लिंगदेहाची ॥१॥ जें जें स्थूलाचें आश्रित ॥ तें तें स्थूलाबरोबर गेलें समस्त ॥ मी तों आदिमध्य अवसानरहित ॥ असें सदोदित संचलें ॥२॥ आतां लिंगदेहाची स्थिती ॥ मज सांगावी गुरूमूर्ती ॥ जेणें वाढे माझी मती ॥ तें निगुती सांगावी ॥३॥ तवं सद्गुरू म्हणती सावधान ॥ पुढील अध्यायीं सांगेन ॥ अध्याय झाला पूर्ण ॥ स्थूलाचें कथन संपलें ॥४॥ जैसे गांव घरजन ॥ सहजचि टाकलें जाण ॥ तैसें स्थूल टाकितां अदृश्यालागुन ॥ सहजें करोनी टाकिलें ॥५॥ राजा टाकित कटक ॥ ज्ञाति टाकितां सोयरिक ॥ धन त्यागितां सर्व सुख ॥ सहज देख चालिलें ॥६॥ तैसें स्थूलाचें करितां निरसन ॥ स्थूल तें स्थूलाबरोबर गेलें जाण ॥ जें जें आकारा आलें तें आपण ॥ सहज करोन टाकवलें ॥७॥ ऐसें परिसतां चित्तीं ॥ निरसली सकळ भ्रांति ॥ मीच सकळां आदि अंती ॥ ऐसें प्रतीती बाणलें ॥८॥ ये ब्रह्मज्ञानें करूनी ॥ ब्रह्म तेजस्वी होऊनि ॥ संतुष्ट होय प्राणी ॥ ऐकतां कानीं वाचितां ॥९॥ तोचि यशस्वी होय ॥ दु:ख दरिद्र जाय ॥ कीर्ति त्याची होय ॥ इहलेक परलोकीं ॥२१०॥ पुढें उत्तम निरूपण ॥ तें ऐकावें सावधान ॥ संदेह भ्रांति नाशोन ॥ होय पावन ब्रह्मचि ॥११॥ हा अध्याय संपतां ॥ ऐसी जाहली इतुकी कथा ॥ पुढें ऐकावें श्रोतां ॥ विचार पुरता मना आणा ॥१२॥ हा ऐकतां भावार्थ ॥ जोडेल परम पुरुषार्थ ॥ परमार्थें त्याचे चुकती अनर्थ ॥ सत्य भावार्थ परिसतांचि ॥१३॥ साहावा अध्याय पूर्ण झाला ॥ आतां सातवां आरंभिला ॥ रामानंद म्हणे रत्नकराला ॥ चित्त कथेला देई बापा ॥१४॥ चुके चौर्याशींची यातायात ॥ हा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ जेणें आत्मा होय हस्तगत ॥ हरे भ्रांत संसाराची ॥१५॥ तो या दीपरत्नाकरें भासे ॥ सर्व संदेह जेणें नासे ॥ ब्रह्मत्वास येती प्राणी ॥१६॥ ज्या देहाभिमानें करोनी ॥ ब्रह्मत्व गेलें हरपोनी ॥ तो हा दीपरत्नाकर पाहतां प्राणी ॥ सहजपणीं पावत ॥१७॥ जें सर्वांसीं गुह्य होतें चोरिलें ॥ तें या दीपरत्नाकरें प्रकट केलें ॥ जें श्रीगुरूकृपें अनुभवासीं आलें ॥ तें सांगितलें तुजलागीं ॥१८॥ हें गुह्य जीवीं धरोन ॥ राहें साक्षी होवोन ॥ रामानंद बोले खूण ॥ सावध रत्नाकरा ॥१९॥ सिद्धानंदाचेनि पसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥२२०॥ इति श्रीचिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकरग्रंथे स्थूलदेहानिरसनयोगोनाम षष्ठोध्याय: ॥६॥इति दीपरत्नाकर षष्ठोsद्याय: समाप्त । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP