अध्याय आठवा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्री गणेशाय नम: ॥  
जय जय सद्गुरु अद्वैता ॥ अनिर्वाच्य अनंता ॥ माया उपाधि राहिता ॥ सर्व सत्ता तुझीच ॥१॥
तूं सर्व करोनि अकर्ता ॥ जैसें जनकर्मीं न लिंपे सविता ॥ तूं जैसा तैसाचि नियंता ॥ असी परता सर्वांहूनी ॥२॥
ऐसिया तुज नमन ॥ मी - तूंपणातें सांडोन ॥ जैसें जळीं मिळतां लवण ॥ जाय होवोनि तद्रूपचि ॥३॥
कीं काष्ठ पूजिजे पावक ॥ कीं गोडीनें पूजिजे रस देख ॥ कीं प्राणें पूजिजे लोक ॥ प्रकाशें दीपक पूजिजे ॥४॥
गंगा पूजिजे गंगोदकें जाण ॥ कापूर पूजिजे परिमळेंकरून ॥ गूळ गोडीनें पूर्ण ॥ कीजे पूजन ऐक्यत्वें ॥५॥
वायूनें पूजिजे आकाश ॥ आकाशें पूजिजे अवकाश ॥ कीं कीरणें पूजिजे सूर्यास ॥ तैसे तुम्हांस नमन माझें ॥६॥
कां परिमळें पूजिजे पुष्पांसीं ॥ पुष्पें पूजिजे पल्लवासीं ॥ पल्लवें पूजिजे वृक्षासीं वृक्षें बीजासीं पूजिजे जैसें ॥७॥
तंतूनें पूजिजे कापड ॥ कां जडत्वें पूजिजे दगड ॥ कां अज्ञानें पूजिजे झाड ॥ तैसें अखंड नमन माझें ॥८॥
जैसें स्थंडिलें पूजिजे पृथ्वीसीं ॥ अलंकारें पूजिजे हेमासीं ॥ कां घरें पूजिजे ग्रामासीं ॥ तैसें तुम्हांसीं नमन माझें ॥९॥
कां राजा पूजिजे राजोपचारें ॥ शब्द पूजिजे अर्थांतरें ॥ कां घर पूजिजें ध्वारें ॥ पोथी अक्षरें पूजिजे जैसी ॥१०॥
सरितें पूजिजे सागरासीं ॥ कां रसें पूजिजे फळासीं ॥ कां अभ्रें पूजिजे गगनासीं ॥ तैसें तुम्हांसीं नमन माझे ॥११॥
देव पूजिजे देवपणें ॥ भक्त पूजिजे भावानें ॥ हरि पूजिजे हरिकीर्तनें ॥ तैसें नमनें नमन हें ॥१२॥
पर्वत पूजिजे तृणांकुरीं ॥ चंद्र पूजिजे अमृतकरीं ॥ मेघ पूजिजे जळधारीं ॥ तैसें निर्धारीं नमन हें ॥१३॥
भावानें पूजिजे देश ॥ वेदवाक्यें पूजिजे वेदास ॥ जैसा तीर्थमहिमा तीर्थास ॥ सहज पूजे जडलासे ॥१४॥
कळे पूजिजे कळावंत ॥ बळें पूजिजे बळवंत ॥ आंधारें पूजिजे रात ॥ प्रकाशें जोत पूजिजे तैशी ॥१५॥
धारें पूजिजे तरवार ॥ योगें पूजिजे योगेश्वर ॥ वीरश्री पूजिजे सुर ॥ तैसा व्यवहार नमनासीं ॥१६॥
ब्रह्मचर्यें ब्रह्मचार्‍यासी ॥ गृहस्थाश्रमें गृहस्थासी ॥ वानप्रस्थें वामनप्रस्थासीं ॥ संन्यासकर्में संन्याशासिं पूजिजे ॥१७॥
स्त्री पूजिजे तारुण्यें ॥ तारुण्य पूजिजे कामभोगानें ॥ काम पूजिजे विषयानें ॥ तैसें करणें नमन माझें ॥१८॥
दृष्टीनें पूजिजे रूपासीं ॥ श्रवणें पूजिजे शब्दासीं ॥ शब्दें पूजिजे मनासीं ॥ नामें शरीरासीं पूजिजे ॥१९॥
शरीरें पूजिजे प्राणासीं ॥ प्राणें पूजिजे जीवासीं ॥ जीवें पूजिजे शिवासीं ॥ शिवें पूर्णासी पूजिजी ॥२०॥
पूर्ण जो तो सदा पूर्ण ॥ जो विषमीं असे समान ॥ ज्यासी नाहीं आदि अवसान ॥ तेथें मी - तूंपण कैसें गा ॥२१॥
जेथें मी तूंसी ठाव नाहीं ॥ तेथें पूजा पूजन करिसी काई ॥ जैसें पूजन सागरीं कल्लोळ पाहीं ॥ परि अभेद सोई धरिली ॥२२॥
जरी नाहीं द्वैतासाठीं ठाव ॥ तरी पूजा पूजेचें वाढविलें वैभव ॥ परी एकपणें संचला स्वयमेव ॥ ऐसें लाघव तुझें देवा ॥२३॥
ऐसिया तुज नमस्कार ॥ माझें निवालें अंतर ॥ सांगा कारण देहाचा उपाव ॥ सविस्तर करोनिया ॥२४॥
तुजवेगळें मज कोणी ॥ पाहतां न दिसे जनीं वनीं ॥ तूंचि माझी जनक जननी ॥ सांगा करोनि वेगळें ॥२५॥
तुज वेगळे जे सायास ॥ ते ते सर्वही होत क्लेश ॥ ऐसा झाला मज विश्वास ॥ म्हणवोनि आस केली तुझी ॥२६॥
तवं सद्गुरु म्हणती सावधान ॥ तूं पुसतोस अद्वैत होवोन ॥ वेडा होतोसी जाणोन ॥ धन्य धन्य तूं एक ॥२७॥
जाणोनि पुसिंलें गुरूसीं ॥ परमार्थी म्हणावा त्यासीं ॥ जे जाणोनी धरिती अहंतेसीं ॥ तेचि भवपाशीं पडियेले ॥२८॥
जें जें सद्गुरुसी वंचिलें ॥ तेंहि ज्ञानाभिमानातें धरिलें ॥ ज्ञानाभिमानें आपुलें ॥ कांहीं केलें नव्हेचि ॥२९॥
म्हणोनि ज्ञानाभिमानातें सांडोनी ॥ जो लीन होय सद्गुरु - चरणीं ॥ तो भक्तांमाजी मुगुटमणी ॥ पवित्र अवनी त्याचेनी ॥३०॥
तरी आतां सावध वहिला ॥ सांडोनिया मी - तूंपणाला ॥ मी ब्रह्म ऐसें मानोनी आपणाला ॥ सावध वहिला होईं रे ॥३१॥
ऐक बापाकारण शरीर ॥ हृदयाचें बिहार ॥ सुषुप्ति अवस्था साचार ॥ मात्रा प्रकार तेथें असे ॥३२॥
अभिमानी प्राज्ञ ॥ आणि भोग तमोगुण ॥ इतुकें कारणाचें लक्षण ॥ तत्वगणना त्यासीं नाही ॥३३॥
तरी तूं हृदय नव्हेसी आपण ॥ तूं सुहृदया जाणता भिन्न ॥ तूं सुषुप्ति अवस्थेपासोन ॥ साक्षित्वें जाण वेगळा ॥३४॥
तूं सुषुप्ति जरी असतासी ॥ तरी सुखें निजलों हें न जाणतासी ॥ जाणसी म्हणोनि वेगळा आहेसी ॥ सत्य वचनासी मानावें ॥३५॥
तूं मकार मात्रा नव्हेसी ॥ मकार मात्रातें जाणसी ॥ तूं स्वप्रकाश ब्रह्म आहेसी ॥ पाहें आपणासी आपण ॥३६॥
विश्व अभिमानी प्राज्ञ ॥ तेही तूं नव्हेसी आपण ॥ तूं त्याचा जाणता त्याहोन ॥ वेगळा जाण साक्षित्वेंसी ॥३७॥
आनंद भोगही तूं नव्हेसी आपण ॥ तूं त्याचा जाणता त्याहोन ॥ वेगळा जाण आहेसी ॥ साक्षित्वें अससी वेगळा ॥३८॥
तूं तमोगुण नव्हेसी आपण ॥ तुझेनी तमोगुणा गुणपण ॥ तूं गुणातीत निर्गुण ॥ सर्व कोंदून उरलासी ॥३९॥
म्हणवोन तूं कारण न होसी ॥ कारणाचा साक्षी आहेसी ॥ तूं स्वप्रकाशें तेजोरासी ॥ तूं जाणसी सर्वांतें ॥४०॥
सत्त्व रज तमोगुण ॥ तूं यांचा जाणत यांहोन भिन्न ॥ तूं गुणातीत निर्गुण ॥ साक्षी पूर्ण सर्वांचा ॥४१॥
स्थूल सूक्ष्म कारण ॥ त्यांचे सांगीतलें विवरण ॥ तूं याचा साक्षी आपण ॥ तुर्या जाण चौथा नव्हेसी ॥४२॥
जागृती स्वप्न सुषुप्ती ॥ तुर्या साक्षी तिघांप्रती ॥ तिची महाकारणीं वस्ती ॥ ही स्थिति सांगतों ॥४३॥
आतां चतुर्थदेह महाकारण ॥ मुर्धा यांचे आहे स्थान ॥ तुर्या अवस्था साक्षी पूर्ण ॥ निश्चया जाण त्रिपुटीचें ॥४४॥
प्रत्यगात्मा अभिमानी तेथें ॥ आनंदाभाव भोग निश्चितें ॥ निर्गुण अर्धमात्रा तेथें ॥ एवं भूत चतुर्थ देह ॥४५॥
तरी तूं महाकारण हीन होसी ॥ महाकारणाचा जाणता आहेसी ॥ म्हणवोन तूं महाकारणातें जाणसी ॥ तुज यासीं नातें नाहीं ॥४६॥
तुर्यावस्था जे साक्षी पूर्ण ॥ तूं त्या तुर्येचा जाणता आपण ॥ तुझेनी तुर्या प्रकाशमान ॥ तूं भिन्न तिजहोनी ॥४७॥
तुर्यारूपचि तूं असतासी ॥ तरी तुर्वेचें साक्षित्व न जाणतासी ॥ म्हणवोनि तू तूर्या नव्हेसी ॥ ब्रह्म आहेसी स्वत:सिद्ध ॥४८॥
जें जें जाणवेमाजि आलें ॥ तें तें तुर्येनें जाणितलें ॥ तुज जाणू जातां जाणीव गेलें ॥ अनिर्वाच्य उरलें तें तूं गा ॥४९॥
प्रत्यगात्मा तूं नव्हेसी ॥ प्रत्यगात्म्याचा साक्षी तूं आहेसी ॥ म्हणवोन प्रत्यगात्म्यातें जाणसी ॥ संदेह यासीं नसेच कीं ॥५०॥
तूं आनंदावभास न होसी ॥ आनंदाभासाएं प्रकाशसी ॥ अर्धमात्रेतें जाणसी ॥ कैसा होसी अर्धमात्रा ॥५१॥
जें जें मन बुद्धीस आलें ॥ तें तें ओंकारापासोन झालें ॥ तें सर्वत्वां जाणितलें ॥ ते प्रकाशिलें तुझेनी ॥५२॥
रजोगुणापासोन जें जें झालें ॥ तें तें त्वां सर्व जाणितलें ॥ सत्वगुणें जें पाळण केलें ॥ तेंहि झालें ज्ञान तुज ॥५३॥
तमोगुणाचें जें संहारण ॥ तेंही तूं जाणसी आपण ॥ तुर्या जे वेगळी तिहीहून ॥ तूं विलक्षण अससी गा ॥५४॥
पिंड ब्रह्मांडाचें कारण ॥ हा ओंकारचि जाण ॥ तूं ओंकाराहून ॥ वेगळा आपण अससी तूं ॥५५॥
जें जें ओंकारापासोन झालें ॥ तें तें त्वां स्वप्नचि देखिलें ॥ तेथें जीव शिव भासले ॥ विसरे आपण आपणासीं ॥५६॥
स्वप्नामाजी झाला ब्राह्मण ॥ अथवा देखेच हीन ॥ परि तें मिथ्याचि जाण ॥ तैसें भान जीवशिवांचें ॥५७॥
तरी जीव आणि शिव ॥ हें आत्मभ्रमाचें वैभव ॥ जें जें जाणवलें तें तें सर्व ॥ जैसी माव रोहिणी ॥५८॥
गंधर्वनगरीचें आवार ॥ कीं चित्रामाजी असिवार ॥ जावोनियां वांझ कुमार ॥ वायेमार केला असे ॥५९॥
नपुंसकाची कन्या जाण ॥ सती निघाली आपण ॥ खद्योत तेजाचा अग्नि करोन ॥ झाली जळोनी भस्मचि ती ॥६०॥
हें जैसें असत्य भाषण ॥ तैसीं प्रकृति पुरुष जाण ॥ तैसें जाणोनि आपण ॥ नाहीं होवोनी राहीं रे ॥६१॥
तुज असतां सर्व आहे ॥ हें तुझें तूं विचारूनी पाहें ॥ सांडोनी प्रपंचाची सोय ॥ साक्षी पाहें सर्वांचा ॥६२॥
तूं आपुलें पूर्णत्व विसरसी ॥ म्हणवोनी मी देहचि मानिसी ॥ देह मानितां ब्रह्मांडासी ॥ सहजसीं अडकला ॥६३॥
सांडितां देहाचें भान ॥ ब्रह्मांडासीं पूसे कोण ॥ म्हणवोन सांडीं अभिमान ॥ साक्षी होवोन राहीं रे ॥६४॥
जें जें ब्रह्मांडामाजी आहे ॥ तें तें पिंडींच पाहे ॥ पिंड त्यागितां ब्रह्मांड जाये ॥ साक्षी राहें संचला ॥६५॥
अरे हा भ्रमें भ्रम वाढला ॥ पिंड ब्रह्मांड भ्रमाचा घाला ॥ भ्रम त्यागितांचि भ्रम गेला ॥ तोहि वहिला सांगतों ॥६६॥
एक आत्मभ्रमें भासली ॥ येथें ईश्वरें पंचीकृतें केलीं ॥ त्यांपासोन वहिलीं ॥ स्थूळें झालीं अनंतें ॥६७॥
महातेजाचे प्रभेंकरोन ॥ कर्दम शोषला स्वभावेकरून ॥ मग निर्मिलीं ब्रह्मांडें अगण्य ॥ तूं साक्षी पूर्ण सर्वांचा ॥६८॥
लिंगदेह देवतामय ॥ त्याचें स्थूल शरीर देह होय ॥ म्हणवोनी अवयवसमूह ॥ रचिलीं पाहें ब्रह्मांडें ॥६९॥
सप्तपाताळ श्रीचरण ॥ तेथें त्रिविक्रमाचें अधिष्ठान ॥ याचा जाणता तूं आपण ॥ भ्रमेंकरोन भुलूं नको ॥७०॥
पाताळ जें सातवें ॥ तें विराटाचें पादतळ जाणावें ॥ प्रपदें तीं रसाळ भावें ॥ ऐकावें साक्षित्वें ॥७१॥
गुल्फद्वय महातळ जाण ॥ जंघा तळातळ आपण ॥ सुतळ जानुयुगुळ खूण ॥ जाणता पूर्ण तूंचि याचा ॥७२॥
वितळ आणि अतळ दोनी ॥ हें जाणे उरुयुगळस्थानीं ॥ कटिदेश महितळ मानीं ॥ तूं साक्शित्वपणें जाणसी ॥७३॥
एवं सप्तपाताळ तूं नव्हेसी ॥ सप्तपाताळाचा जाणता आहेसी ॥ सांडोनियां देहभावासी ॥ सहजेसीं राहें रें ॥७४॥
वृणगूल्म तृण ॥ ती या रोमावळी जाण ॥ गंगादि नाना सरिता जाण ॥ ती नाडीचक्र पूर्ण कीं ॥७५॥
सागर हे सातही ॥ ते विराटाचें उदर पाहीं ॥ याचा जाणता यास कांहीं ॥ संबंध नाहीं मुळींचा ॥७६॥
तेथें वडवानळ तेंचि जठर ॥ तूं याचा जाणता याहोनि पर ॥ तूं साक्षित्वें व्यापक निर्विकार ॥ जाणसी विचार सकळांचा ॥७७॥
नभोमंडळ तें नाभिस्थान ॥ ज्योतिर्लोक वक्ष:स्थळ जाण ॥ महर्लोक कंठ खूण ॥ की जे जतन साक्षित्वेंसी ॥७८॥
वदन ते जनलोक ॥ तपलोक तें ललाट देख ॥ सत्यलोक तें मस्तक ॥ तूं प्रकाशक सर्वांचा ॥७९॥
इंद्रलोक ते हात जाण ॥ इंद्रासी जेथें अधिष्ठान ॥ तूं याचा जाणता आपण ॥ दिशा ते खूण कर्णरंध्राची ॥८०॥
तरणी ते नेत्र ॥ दांत ते पुत्र कलत्रें ॥ यम तो दाढ सत्य खरें ॥ तूं अससी पर याहोनी ॥८१॥
वरुण ते जिव्हा जाण ॥ प्रजापतिलोक शिश्न ॥ निरृतीलोक गुदस्थान ॥ तूं विलक्षय याहोनी ॥८२॥
जळवृष्टिं तेंचि रेत ॥ तूं याचा जाणता याविरहित ॥ हें तुझे अज्ञानें तुज भासत ॥ परि तें सत्य नव्हें कीं ॥८३॥
ऐशा चौर्‍याशीं लक्षयोनी ॥ असती ब्रह्मांडचि त्रिभुवनीं ॥ त्यासमवेत त्रिभुवनीं ॥ त्यासमवेत त्रिभुवनीं ॥ ब्रह्मांड म्हणोनि बोलिजे ॥८४॥
ऐसा ब्रह्मांडगोळ जाण ॥ झाला हा पंचभूतापासोन ॥ तूं याचा प्रकाशक आपण ॥ सांडीं भान कल्पनेचें ॥८५॥
पृथ्वीपासोन नभापर्यंत जाण ॥ दहा दहा अधिक गुण पूर्ण ॥ त्याहोन अधिक दशगुण ॥ अहंकार असे आपण कीं गा ॥८६॥
अहंकारापासोन दशगुण अधिक ॥ महत्तत्व पांघरूण देख ॥ ऐसीं सप्तावरणें कंचुक ॥ ब्रह्मांड देख बोलिजे ॥८७॥
जैशी ब्रह्मांडींची रचना ॥ तैसीच पिंडींची रचना ॥ म्हणोनियां दोघांजणा ॥ जाणता पूर्ण तूंचि एक ॥८८॥
ऐसी ब्रह्मांडींची एकदाटी ॥ उपजलीसे मायेचे पोटीं ॥ ऐसी हे तत्त्वसृष्टीची गोष्टी ॥ भ्रमें चावटी वाढली ॥८९॥
पिंडब्रह्मांड जें मायेपासोन ॥ तें मायिक जाण ॥ रज्जूस सर्पापरि होय भान ॥ परि तें अज्ञानें वाढिलेंसे ॥९०॥
परि अज्ञान तेंचि अज्ञान झालें ॥ कां जें देहचि मी मानिलें ॥ देहसंगें भांबावलें ॥ त्याचें केलें निरसन ॥९१॥
तूं पिंडब्रह्मांडापासोन ॥ वेगळाचि अससी जाण ॥ वेगळाचि म्हणतां तुजविण ॥ रितें स्थान न दिसेचि ॥९२॥
आब्रह्मस्तंभपर्यंत ॥ तूंचि व्यापक अससी निभ्रांत ॥ तुज नेहीं आदिअंत ॥ सांडीं हेत आपुला ॥९३॥
तुझ्या हेतें तुजला ॥ देह - संकल्पाचा भ्रम झाला ॥ मग मानोनि घेसी बद्धतेला तेणें भासला जीव दृश्य ॥९४॥
त्या जीवदशेचे योगेंकरून ॥ प्रपंच झाला म्हणे आपण ॥ त्याचें करितां संगोपन ॥ होती जाण सुखदु:खें ॥९५॥
सुख होतां सुखावे ॥ डोल्त असे स्वभावें ॥ कवडी न सुटे जीवें ॥ भरला हाव धनाचा ॥९६॥
धन मिळवितां कांहीं ॥ पापाचा कंटाळा नाहीं ॥ कामीक भजन करीं पाहीं ॥ सुख नाहीं तिळ एक ॥९७॥
स्वर्गासिं जाणें आहे ॥ म्हणवोनि करी उपाये ॥ तुळाभार करींत आहे ॥ आपली सोय विसरला ॥९८॥
ऐसें मुक्त असतां बद्ध झाला ॥ संकल्प विकल्पानें भरला ॥ म्हणवोन जीव ऐसा भासला ॥ देहसंगाला धरितां ॥९९॥
जैसें जळीं आपण देखोन ॥ बोंबा मारी बुडालों म्हणोन ॥ करुणा करी काढा लवकरोन ॥ तैसे बंध देहसंगें ॥१००॥
हा दृष्टांत तुजला ॥ पूर्वी असे सांगीतला ॥ त्याचा तुज हेतु दिसला ॥ विचारीं वहिला होय कीं नोहे ॥१॥
जैसी भवंड ये ज्यासीं ॥ तो भोंवला देखे सर्वांसीं ॥ देहसंगें जीवासी ॥ दशा तैसी झालीसे ॥२॥
निर्जीवासी जीवविलें ॥ म्हणवोन जीव नांव पावलें ॥ जैसें घटीं जें बिंबलें ॥ तेंचि बोलिलें घटाकार ॥३॥
घट असतां घटाकाश ॥ घट नसतां आकाश ॥ तैसा देहसंगें ईश्वरास ॥ जीव भास झालासे ॥४॥
आकाशीं घटाकाश नाहीं ॥ परिं घटयोगें भासे पाहीं ॥ तैसें ईश्वरीं जीवित्व नाहीं ॥ परि जीवसोई भासत ॥५॥
अविद्येचे अंगीं जीवपण ॥ भ्रमेंचि करोनी भासे जाण ॥ परि हें स्वप्नापरी त्यागोन ॥ द्रष्टा होऊन राहें रे ॥६॥
जैसे क्षीरनीरास ॥ निवड करी राजहंस ॥ तैसा वस्तूचा केला तुज भास ॥ झाला प्रकाश कीं नाहीं ॥७॥
जरी भ्रम असेल कांहीं ॥ तरी बोलावें लवलाहीं ॥ ब्रह्मानुभव झाला कीं नाहीं ॥ सांग सोई आपली ॥८॥
तुज बोध होय जेणेंकरोन ॥ तैसें सांगितलें वेगळें करोन ॥ तोडिलें चौदेहांचें बंधन ॥ वेगळा आपण झाला कीं नाहीं ॥९॥
हा घोडा हा राउत ऐसा ॥ अनुभव करोन दिलारे तैसा ॥ जेणें तुटे नाना सायासा ॥ नकळे सहसा जपतपा ॥११०॥
तीर्थव्रत अनुष्ठान ॥ देवि देवता होम हवन ॥ केल्या न कळेच खूण ॥ ते ते पूर्ण सांगीतला ॥११॥
जें मन बुद्ध्यादिकां अगोचर ॥ परा वाचा नेणे पार ॥ जें निर्गुण निर्विकार ॥ तें साचार सांडीं ॥१२॥
जो आदिअवसानीं ॥ राहिलासे संकोचोनी ॥ हारपलीं प्रकृति पुरुष दोन्ही ॥ तें तुजलागोनी सांगितलें ॥१३॥
त्वंपद तत्पद जाण ॥ मिळालीं असिपदीं जावोन ॥ उर्वरींत उरलें जें पूर्ण ॥ तें तुजलागीं सांगीतलें ॥१४॥
जीव शिव माया ब्रह्म ॥ आत्मभ्रांतीचा महाभ्रम ॥ ते निरसोनि आत्माराम ॥ वस्तूचें वर्म सांगीतलें ॥१५॥
कर्म करोनि अकर्ता ॥ भोग भोगोनी अभोक्ता ॥ देही असोनि विदेहता ॥ ती कथा सांगितली ॥१६॥
जेणें व्यासादि बोधिले ॥ तेंचि म्यां तुज सांगीतलें ॥ आतां सांग काहीं उरलें ॥ काज झालें कीं नाहीं ॥१७॥
सद्गुरु वचन ऐकोनी ॥ बोले रत्नाकर कर जोडोनी ॥ मी वेगळा झालों सर्वांपासोनी ॥ नाहीं संदेहो ॥१८॥
मी सर्वातीत झालों ॥ सर्व व्यापूनि उरलों ॥ माझा मज मी भासलों ॥ तुम्हीच अंगीकारिलें जेव्हां पैं ॥१९॥
तुमचे कृपेचें महिमान ॥ वर्णितां वेदीं धरिलें मौन्य ॥ शास्त्रे भांबावलीं जाण ॥ नकळे खूण कोणासीं ॥१२०॥
तुझे कृपेवीण कांहीं ॥ तुझी नकळेचि सोई ॥ तूं सर्वांसीं अगोचर पाहीं ॥ तर्क सर्व हे हरपले ॥२१॥
तुझें मनेंवीण मनन ॥ मुखेंवीण स्तवन ॥ कांहीं न होयी जे आपण ॥ मग उरे पूर्ण तें तूंचि ॥२२॥
पिंड ब्रह्मांडाचा भ्रम झाला ॥ तो तुमचे कृपेनें सर्व गेला ॥ जळीं लवणाप्रमाणें मिळाला ॥ प्रसंग घडला असे कीं ॥२३॥
आतां मी नाहीं मज आंत ॥ अवघा सद्गुरू भासत ॥ प्रगटली प्रकाशजोत ॥ झाला अंत मीतूंपणाचा ॥२४॥
ऐसीया सद्गुरु निधाना ॥ तुझा महिमा नकळाचि कोणा ॥ म्हणवोन भवजन्माची यातना ॥ भोगिती नाना मूढमती ॥२५॥
एकीं धरितां ज्ञानाभिमान ॥ म्हणती आम्हीं वेदसंपन्न ॥ सद्गुरु काय सांगेल ज्ञान ॥ आम्ही वित्पन्न सर्व पदार्थीं ॥२६॥
जेणें सांगीतलें गायत्रीसीं ॥ तोचि सद्गुरु आम्हांसीं ॥ ऐसें म्हणोनी सद्गुरुसीं ॥ सर्वस्वेंसीं अंतरले ॥२७॥
परि ओमित्येकाक्षरंब्रह्म ॥ हें त्यांसीं नकळेची वर्म ॥ नाना उपासनेचा भ्रम ॥ काम्य कर्में करिताती ॥२८॥
आपणा आपणासीं जाणत ॥ आणि दुसरियासीं जाणों जात ॥ तेणेंचि होत असे भ्रांत ॥ नाहीं हे आपुला ॥२९॥
देहचि मी म्हणवोन मानिला ॥ तेणें जीव दशे आला ॥ जीवदशें सद्गुरुला ॥ प्राणी अंतरला सहजचि ॥१३०॥
ज्यासीं नकळे सद्गुरुचें महिमान ॥ तो पागावला नरदेहा येऊन ॥ नाना व्युत्पत्तीनें कथी ज्ञान ॥ तेंहि जाणावावचि ॥३१॥
जैसीं पोरें खेळ खेळती ॥ पात्रीं भोजना बैसती ॥ परस्परें आदरक करिती ॥ जेवा म्हणती एकमेकां ॥३२॥
वाढणारा आदर करितां ॥ एक म्हणती झालों तृप्त ॥ तैसे सद्गुरुविना ज्ञान कथित ॥ परि सत्य तें नसेच कीं ॥३३॥
पोरें लाडामाजी जेविलीं ॥ परि पोटें नाहीं भरलीं ॥ तैसींण सद्गुरुविण ज्ञानकथनी केली ॥ परि कल्पना गेली नाहीं कीं ॥३४॥
जोंवरी कल्पना गेली नाहीं ॥ तोंवरी ज्ञान तें अज्ञान पाहीं ॥ कां जेणें नेणे अनुभव सोई ॥ नकळें कांहीं हित त्यासी ॥३५॥
सद्गुरुविना ऐसी ॥ प्राणी पडिले अपभ्रंशीं ॥ तुमचे कृपेनें मज दीनासी ॥ भ्रांती मानसीं नसे कीं ॥३६॥
सुखदु:ख मनेंकरून ॥ बद्धमुक्त मनेचि जाण ॥ त्या मनाचें केलें निरसन ॥ ब्रह्मपूर्ण झालों कीं ॥३७॥
तुम्हीं पूर्वीं जें जें सांगितलें ॥ तें मज प्रत्ययास आलें ॥ चौदेहांतें निरसलें ॥ वेगळें केलें मज स्वामी ॥३८॥
ध्रुवासी अढळपद दिधलें ॥ त्याहोन मज थोर केलें ॥ कां जें जन्ममरणाचें भय हरलें ॥ ब्रह्मत्व आलें आंगास्सीं ॥३९॥
जें जें आलें आकारास ॥ तें तें पावलें नाशास ॥ ध्रुवपद काय अविनाश ॥ गेली नि:शेष कल्पना ॥१४०॥
ध्रुवपदही नांवातें पावलें ॥ एक अविनाश वस्तुचि उरलें ॥ जें गुह्याचे गुह्य बोले ॥ जें सखोल सर्वांहोनी ॥४१॥
तें गुह्य मज सांगोन ॥ केलें स्वयेंचि ब्रह्म पूर्ण ॥ आतां नाहीं द्वैतभान ॥ कोंदलें घनस्वरूप ॥४२॥
आत्मप्रचित शास्त्रप्रचित ॥ आणि सद्भाष्यवेदांत ॥ जेथें बोधे माझें चित्त ॥ तें त्वरित केलें स्वामी ॥४३॥
जें प्राप्त दत्त गोरक्षासी ॥ निवृत्ती ज्ञानदेवासीं ॥ मुक्ताई चांगदेव पर्येसीं ॥ ज्या ज्ञानासीं अनुसरले ॥४४॥
आणिक सिद्ध साधक ऋषिमुनी ॥ व्यास सनकादिक आदिक रोनी ॥ स्वयेंचि ब्रह्म राहिले होवोनी ॥ तें गुह्य मजलागोनी सांगीतलें ॥४५॥
थोर केला उपकार ॥ ब्रह्मरूप भासे चराचर ॥ मीही असे त्याच माझार ॥ गेला विकार भ्रांतीचा ॥४६॥
जैसी कंठींची माळा ॥ जैसी स्मरिजे घननीळा ॥ तो भूमी पडतां सर्प काळा ॥ लोकां सकळां भासला ॥४७॥
सर्प सर्प म्हणवोन ॥ झालेती कंपायमान ॥ पहातां दीप आणोन ॥ माळा म्हणवोनी वोळखिली ॥४८॥
तैसें हे अवघेंचि ब्रह्म ॥ परि मायेचा झाला होता भ्रम ॥ तो पाहतां ज्ञानदीपें करोन ॥ आत्माराम कोंदला ॥४९॥
जैसा गेला सर्पभासाचा कंटाळा ॥ मग माळ ती घातली गळां ॥ तैसें मज झालें कृपाळा ॥ भासलें डोळां स्वरूपे तें ॥१५०॥
जैसें गगनीं होतें आभाळ ॥ तें विरोनी गगनचि झालें केवळ ॥ तैसा भ्रम जावोनियां सकळ ॥ भासली निर्मळ वस्तुचि ॥५१॥
गगनामाजी आभाळ झालें ॥ त्यासी ब्रह्म गगनें व्यापिलें ॥ तैसें दृश्य भासलें ॥ परंतु संचलें ब्रह्मचि ॥५२॥
सागरींचे तरंग ॥ मिळोनी सागरीं झालें भंग ॥ तैसें ब्रह्मीं आटलें जग ॥ उरलें चांग स्वरूप ॥५३॥
जैसें नगचि सोनें झालें ॥ तैसें जगचि ब्रह्मत्वा आलें ॥ मी - तूं पणाचें भान उडालें ॥ असें संचलें परब्रह्म ॥५४॥
ऐसा मज अनुभव झाला ॥ तुमचे कृपेनें संदेह गेला ॥ आतां मीच माझा उरला ॥ ठाव द्वैताला नसेच कीं ॥५५॥
आतां द्वैत तेंचि अद्वैत झालें ॥ जैसें सर्पत्व रज्जूचें गेलें ॥ कीं स्वप्न जागृतीत आटलें ॥ एक उरलें परब्रह्म ॥५६॥
उरलें आणि नाहीं ॥ हेही कल्पना दुजी नाहीं ॥ मी तूं जातां सर्वांठायीं ॥ सहजचि पाहीं संचलें ॥५७॥
आतां मीतूंपण झालें एक ॥ गेलें अनेकाचें स्वप्नदेख ॥ उरलें स्वरूप प्रकाशक ॥ अनुभव सुख लाभतां ॥५८॥
जोंवरी स्वरूपानुभ्व झाला नाहीं ॥ तोंवरीं हें न कळेचि काहीं ॥ ऐसें मज कळो आलेंचि पाहीं ॥ तुमचे पायी लागतां ॥५९॥
स्वामीरूप तें उघडेंचि आहे ॥ जैसें तैसें प्रकाशलें पाहें ॥ सर्व व्यापोनी लिप्त नोहे ॥ जें जाणताहे सर्वांतें ॥१६०॥
जें स्वप्रकाश कोंदलें ॥ जेणें सर्वांतें देखिलें ॥ त्यातें जन कैसे वंचिलें ॥ नवल वाटलें मजलागीं ॥६१॥
जें मनाचें मन ॥ चित्ताचें चित्त जाण ॥ बुद्धीचा बोधक आपण ॥ त्यातें जन कैसे चुकले ॥६२॥
जो प्राणाचा प्राण देख ॥ जो इंद्रियांचा चाळक ॥ जो अर्काचाही आदि अर्क ॥ त्यासीं लोक नेणती ॥६३॥
त्याचे सत्तेनें वर्तताती ॥ ज्यामाजी नित्य आहेती ॥ त्या स्वरूपातें नेणती ॥ हे स्थिति अपूर्व ॥६४॥
जैसें जळामाजी मस्त्य असोन ॥ नेणती जळालागोन ॥ तैसें ब्रह्मीं असतां आपण ॥ काय म्हणोन चुकले ॥६५॥
वेदशास्त्रेंही पढती ॥ असे पुराणाची व्युत्पत्ती ॥ चौसष्टी कळाजे जाणती ॥ तेही नेणती स्वरूप तें ॥६६॥
कां जें स्वरूपातें जाणते ॥ तरी शब्दब्रह्मीं न भरते ॥ साक्षी होउन असते ॥ ते टाकते देहअभिमाना ॥६७॥
देहअभिमान आहे म्हणवोन ॥ प्राप्त नाहीं कळतें पूर्ण ॥ स्वयें असतां ब्रह्म आपण ॥ काय म्हणोन चुकले ॥६८॥
जे ज्ञाते आपणा म्हणविती ॥ दुजयातें उपदेश करिती ॥ गीता भागवत वाचिती ॥ परी अहंकृति न जाय ॥६९॥
स्वरूपाची खूणा सांगती ॥ आणि स्वरूपस्थितीनें न रहाती ॥ हें उकलोनियां गुरूमूर्ति ॥ मजप्रति सांगावें ॥१७०॥
जे जे कांहीं नेणती ज्ञानासी ॥ त्यांची वार्ता कायसी ॥ जाणती ते भुलले आपणासीं ॥ व्यापकातें नेणती ॥७१॥
तुम्ही म्हणाल पुढती पुढती ॥ कां पुसतोस मूढमती ॥ तुज सांगितली जे स्थिती ॥ तेचि प्रचीति राहे रे ॥७२॥
स्वामींनी जो केला उपदेश ॥ तेणें मज झाला प्रकाश ॥ ठाव नाहीं दृश्य भावसेन ॥ वस्तु सर्व कोंदली ॥७३॥
मी झालों नि:संदेह आतां ॥ उडाली द्वैताची वार्ता ॥ परी पुसले ते सद्गुरुनाथा ॥ सर्व वृत्तांत सांगावे ॥७४॥
तवं सद्गुरु बोलिले आपण ॥ रत्नाकरा तूं तों माहाअज्ञान ॥ तुझा तूंहि पाहें विचारोन ॥ मग तूं प्रश्न करीं सुखें ॥७५॥
जोंवरी तुज अनुभवा आलें नव्हतें ॥ तोंवरी काय कळत होतें ॥ देह मी मानोन विषयातें ॥ अति आर्ते सेविसी ॥७६॥
तें तूं काय विसरलासी ॥ जें मला पुसों लागलासी ॥ जैसा रंक पावला राज्यासीं ॥ रंकपणासीं विसरला ॥७७॥
जो आपण झाला सुखी ॥ तो म्हणे हे काय म्हणवोन दु:खी ॥ तैसी तुझी होतां ओळसी ॥ गेलासि कीं विसरोनी ॥७८॥
जो प्याला असे अमृत ॥ तो म्हणे हेच कां मरत ॥ तैसी तुझी झाली स्थित ॥ म्हणवोन पुसत अससी ॥७९॥
जो राहिला सूर्यापाशीं ॥ त्या नाहीं दिवस निशी ॥ तुझी दशा झाली तैसी ॥ म्हणवोन नेणसी मागील तें ॥१८०॥
उदराबाहेर बाळ येता ॥ नेणे उदरामाजील व्यथा ॥ तैसें तुज झालें रे सुता ॥ ब्रह्मानुभवता लाधलीसे ॥८१॥
तूं तों स्वतां ब्रह्म झालासी ॥ म्हणवोन ब्रह्मरूप जन देखसी ॥ हें ज्ञान प्राप्त नाहीं जनासी ॥ तें यासी काय जाणे ॥८२॥
जैसें धन आहे घराभोतरीं ॥ तें लिहिलें आहे वहिवरी ॥ जें चवथ्या कोपर्‍यासीं निर्धारीं ॥ कढईभरी आहे कीं ॥८३॥
तें वाचितांचि झालें समाधान ॥ परी न जायचि दुर्बळपण ॥ तैसें विद्याभ्यास करितां जाण ॥ नोहे ज्ञान सर्वथा ॥८४॥
चारी कोपरे घरासी जाण ॥ परी तें कोणते कोपर्‍याशीं आहे धन ॥ हें त्यासी नाहीं ज्ञान ॥ म्हणवोन दुर्बळ ते ॥८५॥
तैसी नाना विद्यांची व्युत्पत्ती ॥ वेदशास्त्रादि पढती ॥ त्याचा अन्वयातें चुकले ॥ तैसें झालें विद्वांसा ॥८७॥
स्वयें ब्रह्मचि आहेती ॥ नित्य ब्रह्मामाजीच असती ॥ जैसे पक्षी गगनीच उडती ॥ परी ते नेणती गगनातें ॥८८॥
कापूर नेणे परीमळासीं ॥ साखर नेणेचि गोडीसीं ॥ दीप नेणे प्रकाशासीं ॥ दशा तैसी झाली जनां ॥८९॥
आकाश नेणे अवकाशालागोन ॥ अग्नीसीं नेणे इंधन ॥ त्याचें करितां मंथन ॥ प्रगटे आपण अग्नि तों ॥१९०॥
ज्या काष्टीं प्रगटला पावक ॥ त्या काष्ठातें जाळोन करी राख ॥ तैसें ब्रह्मज्ञानें होय देख ॥ तर्कातर्क जळालेती ॥९१॥
तैसें गुरुज्ञानें करितां शब्दमंथन ॥ तेथें अनुभवाच्या प्रगटे हुताशन ॥ तेणें शब्दब्रह्मातें जाळोन ॥ झाला आपण नाहींच ॥९२॥
जोंवरी काष्ठासीं काष्ठपण ॥ तोंवरीच अग्नि आपण ॥ काष्ठ नि:शेष जातां जळोन ॥ जाय विझोन आपणही ॥९३॥
तैसा जोंवरी आहे देहाभिमान ॥ तोंवरीच शब्दब्रह्माचें भान ॥ उठतां चौंदेहाचें ठाण ॥ शब्द जाण नि:शब्द होये ॥९४॥
जोंवरी शब्द नि:शब्द झाला नाहीं ॥ तोंवरी ज्ञान तेंचि अज्ञान पाहीं ॥ जैसे वेडे स्मरण करितां कांहीं ॥ परि नाहीं भावभक्ती ॥९५॥
आधीं आत्मत्वाचें विस्मरण ॥ तोचि भूतसंचार जाण ॥ त्यावर विद्याभिमानाचें मद्यपान ॥ मग शब्दब्रह्म आपण जल्पत ॥९६॥
तरी त्याचें जें जें जल्पण ॥ तें तें अविद्याचि मिथ्या जाण ॥ ऐसें जाणोनी आपण ॥ सहज होवोन राहें रे ॥९७॥
तरी ब्रह्म पूर्वीं सहजचि आहे ॥ त्यामाजी हें सहजचि होये ॥ तूं हें सहजचि पाहें ॥ सांडी सोय द्वैताची ॥९८॥
सहज सांडों सायास करिती ॥ तरी तूं आपणा आपण वंचिसी ॥ ऐसें जाणोनियां सहजासीं ॥ कल्पांतेंसीं सांडों नको ॥९९॥
सहजायेवढे सुख ॥ नाहीं नाहीं गा देख ॥ सायासासारिखें दु:ख ॥ पाहतां त्रैलोकीं न दिसेचि ॥२००॥
पुढिल्यासी जाणे जाईजे ॥ तरी जाणत्यासी अंतरीजे ॥ म्हणवोन जाणणें सांडोन सहजे ॥ राहतांचि लाही सुखातें ॥१॥
ब्रह्म स्वत: सिद्ध शाश्वत ॥ सहजचि सहज प्रकाशत ॥ तुझा सांडोनियां आतां हेत ॥ सहजस्थिति साधी रे ॥२॥
जेव्हां मनबुद्ध्योदिकांतें निरशिलें ॥ तेव्हां जाणें सहजचि गेलें ॥ जैसें सूर्य जातां मावळे ॥ किरणें गेलीं हरपोनी ॥३॥
जेव्हां किरणचि हरपलें ॥ तेव्हां मृगजळचि नाहीं झालें ॥ तैसें मनादिक त्यागितां सर्व गेले ॥ अविनाश उरलें सहजेंचि ॥४॥
तरी तूं सहज जाणोन ॥ सांडीं कल्पनेचें भान ॥ राहें सहजचि होवोन ॥ अध्याय झाला पूर्ण येथोनी ॥५॥
सदा चिदआनंद ॥ बुडाला त्रिपुटीचा भेद ॥ त्वंपद आणि तत्पद ॥ उडालीं शुद्ध असिपदासीं ॥६॥
सद्रूप जें संचलें ॥ तें त्वां साक्षित्वें जाणितलें ॥ चित्त जें चिद्रूपा आलें ॥ तें प्रकाशिलें तुझेनी ॥७॥
सदा चिदाची जे ऐक्यता ॥ त्या आनंदाचा तूं जाणता ॥ हें सहजी सहजचि सुता ॥ न करिता हेत असे ॥८॥
ध्येय ध्यान आणि ध्याता ॥ तूं या तिघांतें जाणता ॥ ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता ॥ तूं प्रकाशिता सर्वांचा ॥९॥
म्हणोन जाणोन नेणता होइजे ॥ जैसें स्वप्नातें विसरिजे ॥ तैसें जाणोनि सहजीं सहजें ॥ आपण राहिजें निश्चयीं ॥२१०॥
ऐसें ऐकोनि वचन ॥ बोले रत्नाकर कर जोडोन ॥ सांगा सहजचि खूण ॥ कृपा करोनी दयाळा ॥११॥
सहज सहजापासोन ॥ होत असे निर्माण ॥ ऐसें स्वामी बोलिले वचन ॥ तें लवकरोनी सांगावें ॥१२॥
अध्याय पूर्ण झाला येथोनी ॥ पुढें बैस सावध होवोनी ॥ सांगेंन पुढिले कथनीं ॥ तुझी आळ मी पुरवीन ॥१३॥
आठवा अध्याय पूर्ण झाला ॥ आतां नववा आरंभिला ॥ रामानंद म्हणे रत्नाकराला ॥ चित्त कथेला देईं बापा ॥१४॥
या अध्यायीं हेंचि कथिलें ॥ कारण महाकारण निरसिलें ॥ आत्मस्थितीस सांगीतलें ॥ वस्तु एकली एकत्वें ॥१५॥
चौं देहांचें बंधन ॥ भ्रमेंचि पडलें होतें जाण ॥ त्या भ्रमाचें करोन हवन ॥ ब्रह्म पूर्ण केलें तें ॥१६॥
पहिल्या अध्यायापासोन ॥ तिसरे अध्यायाचें अवसान ॥ बोध केलाचि शब्देंकरून ॥ परी मानोनी पाहिलें ॥१७॥
अनुभवोनि पाहिलें जंव ॥ तों अवधानें गिळिलें सर्व ॥ शब्द ब्रह्माच्या वैभवें ॥ सैन्य ठाव पुसिला ॥१८॥
शब्द ब्रह्मापासोन ॥ पुसली अनिर्वाच्याची खूण ॥ तो चौथ्या अध्यायीं जाण ॥ अनुभव पूर्ण सांगितला ॥१९॥
जो अनुभव होतां प्राप्त ॥ ज्ञानदृष्टि प्रकाशत ॥ अनेकीं एकचि भासत ॥ झाला अंत हेतूचा ॥२२०॥
हेतूचा निर्हेतु झाला ॥ देहींच ब्रह्मत्वा आला ॥ तो बोध चौथीयामाजि झाला ॥ तेणें हरपला संदेह ॥२१॥
पांचव्यापासोन आठव्यापर्यंत जाण ॥ केलें ब्रह्मांडाचें निरसन ॥ सर्व बंधनातें तोडोन ॥ साक्षी पूर्ण केलासे ॥२२॥
तें साक्षित्व आप्लें जाणोन ॥ राहावें सहजींसहज होवोन ॥ तूं पुढिलें अध्यायीं सांगोन ॥ बोले खूण रामानंद ॥२३॥
हा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ एथें मी तूंपणा होय अंत ।॥ ब्रह्म भासे सदोदित ॥ ऐसी स्थिति या ग्रंथाची ॥२४॥
या ग्रंथाचें करितां पठण ॥ आपलें आपणा होय दर्शन ॥ पिंड ब्रह्मातें निरसोन ॥ ब्रह्म पूर्ण होय तें ॥२५॥
या ग्रंथाचें लाघव ऐसें ॥ स्वयेंचि जीवब्रह्म दिसे ॥ मीतूंपणाचें मूळ नासे ॥ आत्मा भासे प्रकाशरूप ॥२६॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ रामानंद बोले पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोद चालिला ॥२७॥
इति श्रीचिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकर ग्रंथे सर्वनिरसनयोगो नाम अष्टमोध्याय: ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP