मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दीप रत्नाकर| अध्याय तिसरा दीप रत्नाकर अनुक्रमणिका प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा आरती अष्टक अध्याय तिसरा श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर. Tags : deep ratnakarpothiramanandदीप रत्नाकरपोथीमराठीरामानंद अध्याय तिसरा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नम: ॥ जय जय सद्गुरू समर्था ॥ दीनदयाळा कृपावंता ॥जेणें ब्रह्मबोध होईल चित्ता ॥ तेंचि आतां करावें ॥१॥ तुम्ही मागें निरूपण केलें ॥ तेणें माझें समाधान झालें ॥ पुन: सांगा गुह्य आपुलें ॥ जेणें बोधिले थोर थोर ॥२॥ नाना उपचार केले प्रेतासीं ॥ तें काय जाणे त्यासी ॥ तैसें स्वामी सांगताति आदरेंसीं ॥ परी मज गुह्यास नेणवे ॥३॥ म्हणोन आत्मज्ञानाविण ॥ मी असें प्रेतरूप जाण ॥ स्वामी श्रृंगारिती शब्दरत्नेंकरून ॥ तें मजलागीं काय होय ॥४॥ तरी आतां ज्ञानदृष्टि देऊन ॥ प्रकाश करा पूर्ण ॥ मग जैसें कराल निरूपण ॥ तें तें जाणा ठसेल ॥५॥ पिंड त्यागिल्यानें ब्रह्मांड जातें ॥ ऐसें स्वामी सांगती मातें ॥ तरी कैसें त्यागावें पिंडातें ॥ तें माझें मज नकळेचि ॥६॥ पिंड त्यागिल्यानें गती ॥ माझी काय होईल गुरूमूर्ती ॥ मज म्यां असावें कोणे स्थिती ॥ तें मजप्रती सांगावें ॥७॥ पिंड त्यागिल्याने आपण ॥ मी कोण्या स्थळी राहें जाऊन ॥ हें सांगावें विवरून ॥ वेगळे करून कृपाळुवा ॥८॥ ऐसें ऐकोन वचन ॥ बोलिला सद्गुरू निधान ॥ रत्नाकरा सावध होऊन ॥ ऐक निरूपण पुशिले तें ॥९॥ त्वां पुशिलें मज ऐसें ॥ पिंडातें त्यागावें कैसें ॥ जेणे ज्ञानदृष्टि प्रकाशे ॥ जसें असेल तसें सांगावें कीं ॥१०॥ करा ज्ञानाचा प्रकाश ॥ जेणें होय अज्ञानाचा नाश ॥ ऐशा केलें सदिच्छेस ॥ तरी परिस सावधान ॥११॥ पिंडातें कैसें त्यागावें ॥ त्यागुनी कैसें असावें ॥ ऐसें पुशिलें त्वां भावें ॥ तेंही स्वभावें सांगतों ॥१२॥ तरी तूं काय आहेसि रे अज्ञान ॥ आतां तुज करूं सज्ञान ॥ मागें केलें होतें निरूपण ॥ तें तूं विसरून गेलासी ॥१३॥ अज्ञान म्हणसी काई ॥ जेथें काहीं भास नाहीं ॥ तूं मनबुद्ध्यादिक जाणसी पाहीं ॥ तुज सोई नकळेचि ॥१४॥ तूं सर्व साक्षी सर्वापरता ॥ ज्ञानरूपेंचि आहेसी सुता ॥ भ्रमगुणे अज्ञानता ॥ झालासि मानिता देहमोहें ॥१५॥ अज्ञान आदींच असावें ॥ तरी ज्ञानेंचि नासावें ॥ ऐसें नाहीं गा स्वभावें ॥ व्यापक तूंचि तुझे ठाईं ॥१६॥ आत्मा प्रकाशरूप घन ॥ सबाह्य अंतरीं व्यापक पूर्ण ॥ त्यामाजी अज्ञान जाण ॥ राहावया स्थान कोणे ठाईं ॥१७॥ प्रकाशामाजी अंध:कार ॥ राहावया कैंचा थार ॥ तैसें ब्रह्मीं अज्ञान साचार ॥ कोण पामर बोलूं शके ॥१८॥ अनंत ब्रह्मांड भरून उरलें ॥ तेथें ब्रह्मांड कोठें थारलें ॥ अज्ञान ऐसें जें बोलिलें ॥ तें वायां गेलें बागुला ऐसें ॥१९॥ हा बागुल ऐसें भेडासाविती ॥ परि बागुल कोठें न देखती ॥ तैसी अज्ञानाची स्थिती ॥ जाण चित्तीं रत्नाकरा ॥२०॥ मृगजळ ऐसें बोलती ॥ परी जळ न दिसे एकही तरी ॥ तैसें अज्ञान शब्द म्हणती ॥ परी अंतीं ज्ञानचि ॥२१॥ वांझपुत्र ऐसें म्हणती ॥ परी हें सत्य नसे प्रतीती ॥ तैसें अज्ञान जाण चित्तीं ॥ प्राणी बोलती भ्रमगुणें ॥२२॥ अज्ञान होतां ज्ञान झालें ॥ ज्ञान म्हणतां अज्ञान गेलें ॥ ज्ञानपणही सांडितां संचलें ॥ विज्ञान पहिलें आथिलें ॥२३॥ अनिर्वाच्य तरी विज्ञान ॥ शब्दें बोलिलें यासी ज्ञान ॥ तरी तूं शब्दातीत आपण ॥ सांडीं भान भ्रमाचें ॥२४॥ तरी तूं सर्वांच्या आदी आहेसी ॥ सीतउष्णतेवीण प्रकाशलासी ॥ मनबुद्धीशीं अगोचर होसी ॥ वार्ता कायसी पिंडाची ॥२५॥ मुळीं तुज पिंडाचि नाहीं ॥ मग तूं सांदिसी काई ॥ आतां नाहीं म्हणोन राहीं ॥ आकार सोई मिथ्याचि ॥२६॥ तुझा तुज ठाव नाहीं ॥ मग पिंड कैंचा काई ॥ कारणावीण कार्य पाहीं ॥ कोण्या ठायीं होईल ॥२७॥ आदीं कारण असावें ॥ मग त्यापासून कार्य व्हावें ॥ हें तों नाहींच स्वभावें ॥ मिथ्यारूप नांवें मिरविती ॥२८॥ सर्प म्हणोनी मारिली हाक ॥ त्वरित मिळाले बहुत लोक ॥ लटिकाचि करिती, शोक ॥ मग मारावया संकल्प करिताती ॥२९॥ शस्त्र घेऊनियां हातीं ॥ मारावयासी धुंडाळिती ॥ दीप आणोनि जों पाहाती ॥ तों न देखती सर्पातें ॥३०॥ होतां दीपाचा प्रकाश ॥ झाला सर्व भ्रमाचा नाश ॥ मारावया जो केला सोस ॥ तो अवघा फोस पडला असे ॥३१॥ म्हणती येथें सर्पचि नाहीं ॥ आम्हीं मारावें कोणा कोई ॥ शस्त्रें ठाईंच्या ठाईं ॥ सकळेंही ठेविलीं ॥३२॥ तैसें आत्मानुभवावीण ॥ उठे देहसंकल्पाचें भान ॥ मग त्याच्या नाशास्तव जाण ॥ नाना प्रकारें करोनी ॥३३॥ नाना जप तप अनुष्ठान ॥ तीर्थयात्रादि करितां जाण ॥ वेदशास्त्रांचें पठण ॥ देहनिरसन करावें ॥३४॥ पाहतां गुरूमुखें करून ॥ चौं देहांचें हरपे भान ॥ तेथें स्थूळाची गणना कोण ॥ देह निरसन करावया ॥३५॥ अनिर्वाच्य वस्तूच्या ठाईं ॥ देहादिकांचा भ्रम झाला पाहीं ॥ तों ज्ञानप्रकाश ठाईंचा ठाईं ॥ भयें तो आटला असे ॥३६॥ नामरूपातीत कीं माया ॥ हे भ्रमखोली शिरावया ॥ स्वरूपीं नाहीं पाहावया ॥ कैची आया येईल ॥३७॥ आदीं कांहीं असावें ॥ त्यापासून उत्पन्न व्हावें ॥ नाहीं तेथें काय म्हणावें ॥ कैसे वदावे वैखरी ॥३८॥ बीजाविण वृक्ष जाण ॥ कैंचा होईल उत्पन्न ॥ प्राणाविणें शरीर चलन ॥ नोहे जाण निश्चयें ॥३९॥ उदकाविणें कण ॥ कैसे होते उत्पन्न ॥ कणाविण प्रणपोषण ॥ मिथ्या जाण सर्वथा ॥४०॥ पीतिविणें प्रेम ॥ सद्गुरूविना क्षेम ॥ कल्पनेविना कम ॥ भक्तिविण मेघश्याम कोण म्हणे ॥४१॥ सूर्याविण प्रकाश ॥ प्रकाशाविण जगदाभाद ॥ भसाविण संतोष ॥ कैसा चितास होईळ ॥४२॥ कर्माविण फळ ॥ मेघाविण जळ ॥ स्वानाविन निर्मळ ॥ जातीविना कुळ होय कीं ॥४३॥ वेदाविण आचारू ॥ विवेकाविण विचारू ॥ वैराग्यविण संसारू ॥ कोण पारू सोडूं शकें ॥४४॥ देवाविण देऊळ ॥ मातृकाविण वाग्जाळ । अग्निविण ज्वाळ ॥ कैंची उज्वळ उठेल ॥४५॥ नेत्राविण देखणें ॥ देखणेंविण अवलोकन ॥ अवलोकनाविण भासन ॥ मिथ्या जाण सर्वही ॥४६॥ निद्रेविण स्वप्न ॥ जागृतीविण देहाभिमान ॥ देहाभिमानाविण हान ॥ होय कोठून प्राण्यासी ॥४७॥ ज्ञानाविण कीर्ति ॥ भावाविण शक्ति ॥ भक्तिविण सद्गुरूप्राप्ती ॥ नोहे कल्पांतीं सत्यत्वें ॥४८॥ गुरूविण ज्ञान ॥ ज्ञानविण विज्ञान ॥ विज्ञानाविण प्राप्त पूर्ण ॥ नाहींपण कैसें ये ॥४९॥ वाद्याविण नाद ॥ पुष्पाविण सुगंध ॥ कळल्याविण बोध ॥ कोण शुद्ध करील ॥५०॥ सिद्धाविण साधक ॥ देवाविण भक्ति देख ॥ स्वामीविण सेवक ॥ सुखाविण सन्मुख कोण होय. ॥५१॥ कार्य कारणाविण ॥ नोहे नोहे सत्य जाण ॥ हे अवघी वाटली भ्रमण ॥ धरी मनीं खूण हे ॥५२॥ देह नसतां छाया कैंची देखिजे शिष्यराया ॥ तैसी पुरुषासीं माया ॥ कैंची आया येईल ॥५३॥ निर्विकार मनबुद्धी अगोचर ॥ येथें मायेचा विकार ॥ नर पामर कल्पिती ॥५४॥ निर्विकार वस्तूंचे ठाईं ॥ विकार लक्षिती पाहीं ॥ त्यासी त्याची शुद्धि नाहीं ॥ तें काय सत्य असे ॥५५॥ जैसी भोंड येई ज्यशी ॥ तो भोंवत देखे सर्वांशी ॥ तेणेंबरळत देखे मानसीं ज्याशीं त्याशीं बोंबाई ॥५६॥ म्हणे ही सृष्टि खालीं वर येत ॥ पडलों असें मी पेवांत ॥ माझ्या कुटुंबाचा झाला घात ॥ हांक मारीत म्हणोनी ॥५७॥ हें पृथ्वीतळ एक होऊं पाहात ॥ एकवीस स्वर्ग डळमळित ॥ ऐसें म्हणोनि हांका मारित ॥ तरी तें सत्य काय असे ॥५८॥ तो आपण स्वयें फिरत ॥ म्हणोन आपणा ऐसें देखत ॥ ज्ञानमय हें सर्व देखत ॥ अवघें असत्य म्हणोनी ॥५९॥ तैसा आत्मभ्रांतीं भ्रमला ॥ तेणें निर्विकारीं विकार दाविला ॥ ब्रह्मीं अहंभास झाला ॥ भ्रम वाढला तेणें गुणें ॥६०॥ मग जीव शिव माया ब्रह्म ॥ हा आत्मभ्रांतीचा महाभ्रम ॥ नाना देव देवता नेम ॥ वृथा भ्रम वाढला ॥६१॥ सद्गुरूक्रुपें स्वानुभव ॥ तेणें भ्रांतिं झाली वाव ॥ जैसें सूर्योदयीं तम सर्व ॥ सांडी स्वभाव आपुला ॥६२॥ प्रकाश होतां अंधारें ॥ प्रकाश लोप होय बारे ॥ तैसा आत्मानुभवें भ्रम सरे ॥ स्वयें उरे प्रकाश ॥६३॥ भ्रम तोचि झाला निभ्रम ॥ कीं जी वस्तु सर्वांचें धाम ॥ वस्तु जाणतां म्हणे मी आत्माराम ॥ सूक्श्म वस्तु मीच माझा ॥६४॥ मी आदि अनादी परता ॥ मजमाजी नाहीं द्वैताची वार्ता ॥ सांडोनि वाक्यत्वाची कथा ॥ नाहींच तत्त्वतां हेतु असे ॥६५॥ आपण नाहीं होतां ॥ सर्व नाहींच रे सुता । आपण नसता ब्रह्मीं तत्त्वतां ॥ झाला देखता इच्छेतें ॥६६॥ आपण असतां ब्रह्मी इच्छा भासे ॥ आपण नसता ब्रह्मीं ठाव नसे ॥ मग प्रळ्यांबूचें उदक जैसें ॥ संचलें असे अनादि ॥६७॥ नदी वापी कूप तळी जाण ॥ सर्वांचें झालें निसंतान ॥ तैसें नाना भेदांचे भान ॥ हारपोनियां गेलें असे ॥६८॥ आत्मानुभवाचा प्रळयसागर ॥ त्यामाजी बुडालों चराचर ॥ झाली वस्तु निर्विकार ॥ नाहीं थार इच्छेसीं ॥६९॥ म्हणोनी ब्रह्मीं जे इच्छा स्थापिती ॥ तेचि जाणावें मंदमती ॥ ते आपुलें विकार नेणती ॥ ब्रह्मी वस्ती विकारा ॥७०॥ ब्रह्म स्वत:सिद्ध शाश्वत ॥ स्वप्रकाश सदोदित ॥ तेथें इच्छा उठावया सत्य ॥ अवकाश तीतें नाहींच कीं ॥७१॥ ब्रह्माचे इच्छेपासून ॥ जरी हें होतें निर्माण ॥ तरी हें नाशातें पावतें जाण ॥ असे आपण शाश्वत ॥७२॥ सत्यापासून असत्य ॥ नोहे नोहे गा सत्य ॥ तूप घुसळोनी कांजी काढित ॥ हा वृत्तांत खोटाच कीं ॥७३॥ तैशी स्वरूपीं इच्छा झाली ॥ ती वाउगीच अवघी बोली ॥ आत्मभ्रांत ही सत्य मानिली ॥ जी कळली आपणाशीं ॥७४॥ म्हणती ब्रह्मीं इच्छा झाली ॥ ती इच्छा मायेनें व्यापिली ॥ माया त्रिगुण ते प्रसवली ॥ त्रिगुणी भासली सृष्टि सर्व ॥७५॥ ऐसें वाउगेंचि म्हणती ॥ तेणें मतवादी प्रवर्तती ॥ आपणा आपण नेणती ॥ भ्रमिस्थ होती देहसंगें ॥७६॥ तरी त्या भ्रमिस्थाचें वचन ॥ तें अवघेंचि अप्रामण ॥ जाणती अनुभवें आपण ॥ जे पावन गुरूदास ॥७७॥ सद्गुरूकृपेविण कांहीं ॥ द्वैतभावना जाणार नाहीं ॥ जैसा प्रकाशीं अंधार पाहीं ॥ ठाईंचें ठाईं आटत ॥७८॥ प्रकाश नसतों अंधारे ॥ आइताचि असे बार ॥ तैसी सद्गुरूविण द्वैतभुल रे ॥ देह अहंकार वाढत ॥७९॥ अहंकाराचे योगेंकरून ॥ माया ऐसें बरळाये आण ॥ जैसें भ्रमिस्थें केलें मद्यपान ॥ करी अप्रमाण जल्पवादी ॥८०॥ विधीचें शास्त्र गेलें सुटोन ॥ विसरला आपआपण ॥ शब्दग्रामीं फिरे म्हणोन ॥ जीव शीव जाण बडबडी ॥८१॥ तरी तेंचि अवघें वाव ॥ जैशी रोहिणीची माव ॥ कीं वांझपुत्र ऐसें नांव ॥ मिथ्या सर्व जाणिजे ॥८२॥ जागृत अभाव निद्रा भासे ॥ तैसी स्वरूपाभावें माया दिसे ॥ जागृत होतां निद्रा नासे ॥ अनुभवीं नसे माया तैसी ॥८३॥ निद्रा जागृतीं तल्लीन झाली ॥ तैशी ब्रह्मीं माया मिनली ॥ ब्रह्मों ब्रह्मरूपचि झाली ॥ आली गेली वावचि ॥८४॥ अविद्या म्हणजे काई ॥ जेंवि देहीं भानचि नाहीं ॥ तेथें निरसनाची सोई ॥ कोणे ठाई करावी ॥८५॥ असावें तरी निरसावें ॥ नाहीं तेथें काय करावें ॥ शब्द सांडोनि नि:शब्द व्हावें ॥ माया स्वभावे नाहींची ॥८६॥ माया हा शब्दचि जाण ॥ परि नसे सत्यपण ॥ वांझ सुनेशी न्हाणिते आपण ॥ तैसें हें वचन मिथ्याच कीं ॥८७॥ जैसें दर्पणामाजील धन ॥ तें भासमात्रेचि झालें जाण ॥ स्वप्नींचें राज्यपण ॥ जाय हरपोन जागृतीं ॥८८॥ नामरूप इतकीच माया ॥ ही वाढली भ्रमें करूनियां ॥ आत्मभ्रांति भुलली वायां ॥ नाना उपायें करूनि ती ॥८९॥ त्या उपायासीं अपाये ॥ करूं जाता होत आहे ॥ कां जे चुकली मुळींच सोये ॥ म्हणोनि होय कासाविस ॥९०॥ तरी हा भ्रमचि वाढला ॥ म्हणोनी जीवदशेसी आला ॥ तूं मिथ्या जाणोनि याला ॥ मानीं आपणाला मुक्तचि ॥९१॥ स्वप्नामाजी स्वर्गा गेला ॥ अथवा नरकामाजी पडला ॥ सत्य मानील या बोला ॥ तोचि गांजला सुखदु:खीं ॥९२॥ तरी हें हेतुयोगें सर्व भासे ॥ निर्हेतें ब्रह्मचि असे ॥ स्वानुभवीं जाणोनि ऐसें ॥ राहतसे निर्हेत ॥९३॥ तरी आतां हें तुज योग्य कोण ॥ ब्रह्मा आलें जीवपण ॥ तेणें वेढला देहाभिमान ॥ परी हें जाण वाउगेंचि ॥९४॥ आपलें आपणातें नेणतेपण ॥ तेंचि हेतूंचें कारण ॥ तेणें जीवदशेचे भान ॥ नसतेंचि जाण वाटलें ॥९५॥ जैसा चंद्र तरी एक ॥ परी जीवनायोगे होय अनेक ॥ तैसें हेतुयोगें जीवित्व देख ॥ काल्पनिक भासत ॥९६॥ ते कल्पना मावळली ॥ म्हणजे जीवदशा हारपली ॥ जैसें जीवन आटतां बिंबें गेलीं ॥ चंद्री जाहलीं चंद्ररूप ॥९७॥ चंद्र कांहीं जळीं आला नाहीं ॥ परि पाहतां भासे पाहीं ॥ न पाहतां ठाईंच्या ठाईं ॥ तैशी सोई जीवाची ॥९८॥ पाहतां जळीं चंद्र दिसे ॥ एरव्हीं तो आकाशींच वसे ॥ तैसा कल्पनेनें हे जीवदशे ॥ ब्रह्म असे स्वत:सिद्ध ॥९९॥ जोंवरी दृश्य आणी दर्शन ॥ तोंवरी भेदाचें भान ॥ दृश्यपण तेंही गिळोन ॥ हेतु जिंकोन राहिजे ॥१००॥ आतां निरहेत होतां जाण ॥ हरपतां दृश्यदर्शन ॥ ऐसी जे कां आहे खूण ॥ ते सावधान सांगतों ॥१॥ रत्नाकरा तुझी प्रीत ॥ मज आहे रे बोलावीत ॥ तेथें घालोनियां चित्त ॥ आपुलें हित करावें ॥२॥ मागें सांगितलें हें तुजला ॥ तूं सांडीं देहसंगाला ॥ त्यामध्यें कथेचा विस्तार झाला ॥ मायेचा वर्णिला अभाव ॥३॥ कार्य कारणाविण ॥ कोठोनि होईळ निर्माण ॥ याचें करितां विवंचन ॥ कथा जाण वाढविली ॥४॥ शब्द बोलतां द्वैत भासे ॥ एरव्हीं अद्वैत असे ॥ वायुसंगें जळतरंग जैसे ॥ ते माझे मतें नव्हेचि ॥५॥ जैसा वायु नसतां सागर ॥ निश्चळ असे निरंतर ॥ तैसें शब्दापूर्वी साचार ॥ असे निर्विकार संचलें ॥६॥ शब्द द्वैताद्वैतीं गेले ॥ शद्ब शुभाशुभीं प्रवर्तले ॥ शब्दे अनुमान ठेविलें ॥ ऐसें पडलें द्वैतभेदीं ॥७॥ म्हणोनि शब्द सांडोनि आतां ॥ नि:शब्दातें होय अनुभविता ॥ जैसा कापूर शब्द होय घेतां ॥ परिमळ तत्त्वतां अनुभवें ॥८॥ परिमळ आहे चित्त ॥ परी कापूर ऐसें बोलत ॥ तैसा नि:शब्दीं ठेऊनि हेत ॥ करीं हित आपुलें ॥९॥ पट ऐसें बोलावें आपण ॥ परी कापूसचि आहे जाण ॥ गूळ म्हणतां गोडीपूर्ण ॥ सहज करोनी बोलती ॥११०॥ नग म्हणतां हेम आहे ॥ तैसे माया म्हणतां ब्रह्मचि आहे ॥ शिव म्हणतां पूर्ण स्वयें ॥ अनुभव राहे संचोनी ॥११॥ नाम म्हणतां अनाम ॥ तैसा जग म्हणतां राम ॥ ऐसें शब्दीं निशब्द वर्म ॥ जाणती परम साधु ते ॥१२॥ एक म्हणतांचि अनेक ॥ अनेक म्हणतांचि एक ॥ या शब्दाचें जें नि:शब्द सुख ॥ तेंचि देख घेईजे ॥१३॥ सगुण म्हणतांचि निर्गुण ॥ निर्गुण म्हणतांचि सगुण ॥ मी म्हणतांचि तूंपण ॥ सहज करूनी सिद्ध झालें ॥१४॥ शुभ म्हणतां अशुभ जाण ॥ स्तुतीमाजी निंदावचन ॥ फळें घेतां बीजपूर्ण ॥ सहज कळोन आलेसें ॥१५॥ बीज म्हणतां वृक्ष ॥ ब्रह्म म्हणतांचिं मोक्ष ॥ अभाव म्हणतां प्रभाव प्रत्यक्ष ॥ असे साक्षीसी साक्षित्वें ॥१६॥ श्लोक म्हणतां अर्थ ॥ सहजचि आले त्यांत ॥ तैसें शब्द नि:शब्द सुखांत ॥ आहे वित्त संचले ॥१७॥ स्वरूपीं शब्दाचें न चले कांहीं ॥ शब्दें कल्पना वाढली पाहीं ॥ त्या कल्पनें एक अनेक पाहीं ॥ नाहीं ते ठाईं वाढविलीं ॥१८॥ जोंवरी शब्दाचें भान ॥ तोंवरी कल्पनेचें अधिष्ठान ॥ जोंवरी निद्रा तोंवरी स्वप्न ॥ सहज जाण भासत ॥१९॥ या कल्पनेच्या योगें करून ॥ मुक्त असतां भासे बंधन ॥ शुकनलिकेपरी होय जाण ॥ घेतसे मानून बंधनातें ॥१२०॥ जैसा राजा स्वप्नीं मजुर झाला ॥ तो तृणासाठीं वना गेला ॥ तेथें वाघ देखो भ्याला ॥ त्वरें उठला गडबडोनी ॥२१॥ जागृत होऊनि पाहतां ॥ तों अवघीच झाली मिथ्य वार्ता ॥ तैसी शब्दयोगें अनेकता ॥ जीव कल्पिता झालासे ॥२२॥ तो शब्द म्हणेल कोण ॥ तरी ईश्वरी अहंपण ॥ तेंचि मूळमायेचें अधिष्ठान ॥ जेथून भान कल्पनेचें ॥२३॥ हा कल्पनेचा संचार भासे ॥ निर्विकल्पीं कांहींच नसें ॥ जागृत होतां स्वप्न जैसें ॥ पाहतां नसे कोठेंचि ॥२४॥ संकल्प सहज आपण ॥ ईश्वर देखतसे स्वप्न ॥ तो जीव होऊनि अनेण ॥ देखशी भिन्न साचार ॥२५॥ अनंत ब्रह्मांडें आदिकरून ॥ देखता झाला स्वप्न ॥ जीव शिव माया ब्रह्म पूर्ण ॥ आला आपण विस्तारला ॥२६॥ ईश्वर आपले भ्रमें आपण ॥ संकल्प उठला सहज करोन ॥ जैसें न कल्पितां स्वप्न ॥ नसतेंच जाण दिसतसे ॥२७॥ अहं ब्रह्मास्मीति वचन ॥ येणेंचि आलें दुजेपण ॥ तेचि मूळ माया जाण ॥ ईश्वर म्हणोनि बोलिजे ॥२८॥ ईश्वर संकल्प म्हणोन ॥ शिवत्वा आला आपण ॥ शिवत्व संकल्पें जाण ॥ जीवत्व संपूर्ण भासलें ॥२९॥ जीवत्वसंकल्पें देह झाला ॥ देहसंकल्पें प्रपंच आला ॥ प्रपंचयोगें अभिमान वाढला ॥ अभिमानें भोगूं लागला सुखदु:ख ॥१३०॥ असें कल्पनेनें केलें ॥ कांहीं नसतांचि भासविलें ॥ निर्विकल्प होतांचि गेलें ॥ जागृत झाल्या स्वप्नाऐसें ॥३१॥ तरी तुझ्याच कल्पनेनें तुजला ॥ एकीं अनेकीं भास झाला ॥ तूं साक्षी जाणसी याला ॥ मानीं बोल सत्यचि ॥३२॥ म्हणून कल्पनेपासून सृष्टि झाली ॥ कल्पनेनें नाना मतें केलीं ॥ एकीं अनेकता भासली ॥ असे विस्तारली सर्वही ॥३३॥ कल्पनेनें स्वर्गनरक ॥ कल्पनेनें सुखदु:ख ॥ कल्पनेनें मिथ्यामायिक ॥ नुसतेंचि देख वाढविलें ॥३४॥ कल्पनेनें जातगोत ॥ कल्पनेनें देवदैवत ॥ कल्पनेनें भूतप्रेत ॥ यातायात चौर्यांशींची ॥३५॥ कल्पनेनें भ्रम वाढे ॥ कल्पनेनें विवेक उडे ॥ कल्पनेनें ज्ञान बुडे ॥ पडे बिरडे ब्रपंचाचें ॥३६॥ कल्पनेनें अनाचार ॥ कल्पनेनें वर्णसंकर ॥ कल्पनेनें कलह फार ॥ वाढे विकार नसताचि ॥३७॥ नाना जप तप अनुष्ठान ॥ हे कल्पनेनें वाढविले आपण ॥ म्हणोनि कल्पनेनें निर्दळण ॥ करितां पूर्ण अविनाश ॥३८॥ ऐसी कल्पना दु:खदायी ॥ स्वरूप अज्ञानें वाढली पाहीं ॥ म्हणोनि आत्मतत्वें लीन राहीं ॥ धरीं सोय निर्विकल्प ॥३९॥ रज्जूचे अभावें सर्पभान ॥ तैशी कल्पना वाढे जाण ॥ कल्पनेपासून भ्रम उत्पन्न ॥ सहजें करोनि वाढत ॥१४०॥ एक काळा सर्प म्हणती ॥ एक असत्य हें बोलती ॥ हा गव्हाळ नाग दिसतो ओरडती ॥ एक हांसती खदखदां ॥४१॥ एक म्हणती ही धामण ॥ दुजा म्हणें हें मिथ्या वचन ॥ दुतोंडें आहे जाण ॥ पाहा उघडोनि डोळे ॥४२॥ ऐसें परस्परें वाद करिती ॥ एकमेकांतें हेळसिती ॥ दीप घेवोनियां पाहती ॥ मग राहती तटस्थ ॥४३॥ कां जो ज्याणीं तर्क केला ॥ तो तो अवघाचि वाया गेला ॥ तैसा नाना मतांचा गलबला ॥ मिथ्या वाढला भ्रमगुणें ॥४४॥ रज्जु सर्पाचें कारण ॥ तोचि अंधकार झाला जाण ॥ तेंचि अनिर्वाच्य जें वचन ॥ भ्रमांचें कारण तेंच कीं ॥४५॥ तरी वाच्यांशें लक्षांश ॥ अनुभवें घेई त्यास ॥ तेणें कल्पनेचा होईजे नाश ॥ भासे स्वप्रकाश वस्तूतें ॥४६॥ लक्षांश ज्यासीं प्राप्त ॥ ते शब्दब्रह्मीं झाले रत ॥ जीवशिव तैसें म्हणत ॥ माया जाण सत्यचि हें ॥४७॥ फुकाचा करिती वाद ॥ नाहीं परवस्तूचा भेद ॥ त्यासीं त्याची नाहीं शुद्ध ॥ झालें अंध वाच्यांशें ॥४८॥ एक जीव शिव ब्रह्म म्हणती ॥ दुजे त्यांतें धि:कारिती ॥ ते शिवची स्थापिती ॥ असें निंदिती इतरांते ॥४९॥ एक मायाचि स्थापिती ॥ मायापूजा पूजनें करिती ॥ मद्यमांसादि भक्षिती ॥ मुक्त म्हणती आम्ही झालों ॥१५०॥ मुख्य कल्पनेनें कारण ॥ मी मुक्त हेंचि जाण ॥ तेणें बद्ध होय आपण ॥ भ्रमभान वृद्धि पावे ॥५१॥ त्या भ्रमें बद्धता भासे चित्तीं ॥ मग मुक्ततेचे उपाय करिती ॥ त्या उपायामाजी विकार उठती ॥ आपले मतीं पाखांडें ॥५२॥ वस्तु निर्गुण निर्विकार ॥ मनबुद्धि अगोचर ॥ परा वाचा नेणे पार ॥ तेथें विकार स्थापिती ॥५३॥ नेति नेति वेद ॥ साही शास्त्रांची गेली बुद्ध ॥ कां जे वस्तु अनिर्वाच्य अनाद्य ॥ तेथें कायसा बोध वैखरीचा ॥५४॥ जीव शिव माया ब्रह्म ॥ हें वैखरी वाच्य दृश्य परम ॥ अनिर्वाच्य आत्माराम ॥ अति सूक्ष्म अदृश्य ॥५५॥ तरी अदृश्य म्हणजे कायी ॥ ऐसा संदेह धरिसी कांहीं ॥ म्हणोन सांगतों कांहीं ॥ सावध होईं रत्नाकरा ॥५६॥ जें जाणण्यामध्यें आलें ॥ तें दृश्य अवघें बोलिलें ॥ जें जाणण्यापरतें राहिलें ॥ तेंचि संचिलें अदृश्य ॥५७॥ अंत:करणाविणें केलें मनन ॥ अनुभवाविणें अनुभवावें आपणें ॥ अवकाशरूप राहिजे होऊन ॥ नाहींपण योजोनी ॥५८॥ आपणा आपण विसरोन ॥ नाहीं होणें आपण ॥ हेचि अनुभवाची खूण ॥ संत जाण अनुभविती ॥५९॥ हेतज्ञान नाहीं त्यांसी ॥ मग नानापरी भाविती वस्तूसीं ॥ भ्रमें भुलोन आपणासी ॥ बळेंचि मताशीं स्थापिती ॥१६०॥ मी मुक्त असें भाविती मनीं ॥ सहज कल्पना उठे झणीं ॥ त्या कल्पनेनें केली हानी ॥ मी तूं दोन्हीं वाढलीं ॥६१॥ त्या मीतूंचे योगें करून ॥ भ्रमें भ्रम वाढविती जाण ॥ तेणें मताभिमान ॥ सहजें सहज होत असे ॥६२॥ एक मुद्रा सत्य मानिती ॥ एक आसनेंचि साधती ॥ एक अंतरिक्षी पहाती ॥ तेथें देखती चक्राकार ॥६३॥ एक म्हणती सोहंब्रह्म ॥ एकीं ध्यानीं धरिला नेम ॥ एक करिती जप होम ॥ ऐसा नेम वाढला असे ॥६४॥ दृश्याशीं जाणों जाती ॥ परी जाणत्यासीं नेणती ॥ ऐसे भ्रमले मंदगती ॥ प्राण चढविती ब्रह्मांडीं ॥६५॥ ऐसे भ्रमले ते नेणों किती ॥ ही कल्पनेनें केली ख्याती ॥ म्हणोन निर्विकल्प होतां चित्तीं ॥ सुखप्राप्ति होय कीं ॥६६॥ म्हणोनि निर्विकल्प होतां आपण ॥ कल्पना जाय हरपोन ॥ जैसें जळीं पडतां लवणं ॥ जाय विरोन तात्काळ ॥६७॥ ब्रह्म निर्विकल्प एक ॥ माया भासे काल्पनिक ॥ ऐसें जाणोनि सांडीं शोक ॥ साक्षी देख तूंचि तुझा ॥६८॥ तूं आपुलें पूर्णत्व सांडून ॥ बद्धता घेसी मानून ॥ ही गुह्याची गुह्य खूण ॥ तुजलागीं सांगितली ॥६९॥ ज्या ज्ञानेंकरून ॥ होईजे तात्काळ पावन ॥ हरे भयभयाचें भान ॥ नाहीं होऊनि राहिजे ॥१७०॥ जें आदीं आणि अवसानीं ॥ राहिलें असे व्यापुनी ॥ जेणें करूनि ऋषि मुनी ॥ ब्रह्म होऊनियां गेले ॥७१॥ व्यास आणि वाल्मिक ॥ नारद आणि शुक ॥ विश्वामित्र वसिष्ठादिक ॥ झाला जनक विदेही ॥७२॥ जेणें उद्धव अर्जुनाशीं ॥ बोधितां झाला हृषीकेशी ॥ जें वसिष्ठें श्रीरामासीं ॥ अति आदरें सांगितलें ॥७३॥ श्रीरामें लक्ष्मणाप्रती ॥ जें बोलियलें नाना युक्तीं ॥ जेणें भीक्ष्म विदुराचे चित्तीं ॥ ब्रह्मस्थिति बोधिली ॥७४॥ ऐसें अनंत अपरंपार ॥ ज्याच्यानें पावले पार ॥ तेंचि म्यां तुज साचार ॥ सांगितलें सार निवडून ॥७५॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ ज्यांच्या ज्ञानें निरंतर ॥ करून सृष्टिचा व्यापार ॥ असती साचार साक्षित्वें ॥७६॥ रत्नाकरा तेंचि तुज ज्ञान ॥ सांगितलें विवंचून ॥ हें चित्तीं धरूनियां आपण ॥ नाहीं होऊन राहिजे ॥७७॥ नाहीं होऊनी राहसी ॥ तरी तूंचि सर्व आहेसी ॥ ठाव नाहीं मायेशी ॥ धरीं मानसीं खूण हे ॥७८॥ ऐसें गुरूवाक्य ऐकून ॥ बोले रत्नाकर कर जोडून ॥ मज दयाळा हातीं धरून ॥ बाणे खूण ऐसें करावें ॥७९॥ स्वामीं सांगितलें आपण ॥ तूं आहेशी ज्ञानघन ॥ अज्ञान घेशी मानोन ॥ माया जाण काल्पनीक ॥१८०॥ तरी माया मायिक ॥ अज्ञान तेंचि ज्ञान देख ॥ तूंचि अससी सर्वव्यापक ॥ अनेकीं एक संचला ॥८१॥ हें ऐकतां स्वामीचें वचन ॥ विवेकयुक्त केलें श्रवण ॥ मन करून पाहतां आपण ॥ ब्रह्मत्व पूर्ण आंगा येतसे ॥८२॥ ब्रह्मभावें ब्रह्मत्व येतसे ॥ अभावें ब्रह्मत्व जातसे ॥ भावाभावातीत असे ॥ तें कृपावंतें सांगावें ॥८३॥ गोष्टि ऐकोन झालों तल्लीन ॥ परी माझें मज नाहीं दर्शन ॥ म्यां निर्विकल्प व्हावें आपण ॥ तरी खूण नकळेचि ॥८४॥ जैशी जळीं मिठाची होतां मिळणी ॥ तें जळरूपचि होय तत्क्षणीं ॥ तैशीं निर्विकल्पता कोणे स्थानीं ॥ कल्पनेलागीं करावें ॥८५॥ तें स्थूळ या देहीं आपण ॥ मज सांगावें वेगळें करून ॥ जेणें निर्विकल्प होय मन ॥ ते खूण सांगावी ॥८६॥ जें संकल्पविकल्परहित ॥ जेथें बुडालें द्वैताद्वैत ॥ अनिर्वाच्य शब्दातीत ॥ जेणें निरहेत होइजे ॥८७॥ मज हा आदीं करा साक्षात्कार ॥ जेणें निवे माझें अंतर ॥ मग शब्दब्रह्माचा विचार ॥ सारा तुज कळेल ॥८८॥ जैसें धुळाक्षर बाळकाशीं ॥ लिहून शिकवावे आदरेंसी ॥ मग पोथी देतां त्यापाशीं ॥ अति हर्षे वाचित ॥८९॥ मूळीं धुळाक्षराचें नाहीं ज्ञान ॥ आणि गीता दिली वाचावया आपण ॥ तैसें स्वामीहीं केलें मजलागोंन ॥ पूर्णज्ञान सांगितलें ॥१९०॥ जैसा अज्ञानी नेणे पोथीसी ॥ तैसा मी नेणें शब्दज्ञानासीं ॥ सांगा ओंकार रविवरणासीं ॥ जेणें स्वरूपाशीं जाणिजेल ॥९१॥ जो सायासें सेवी स्तवन ॥ तयापुढें ठेविलें पक्वान्न ॥ तें काय होय तयालागून ॥ पडेल घन निश्चयें ॥९२॥ प्रौढापुढें पात्र मांडितां ॥ तो आपला आपण होय जेविता ॥ बाळकापुढें पात्र असतां ॥ परी भक्षितां नयेचि ॥९३॥ तैसें व्यासादिकांच्या पंगती ॥ मज बैसविलें गुरूमूर्तीं ॥ परी मी अज्ञान मंदमती ॥ अनुभवस्थिति नेणेंचि ॥९४॥ स्वामींनीं सांगितलें तें सत्य ॥ परी नाहीं अनुभवा येत ॥ त्या बाळापरी मज होत ॥ पुरवा आर्त कृपानिधी ॥९५॥ जैशी क्षुधा लागलिया बाळा ॥ तो रडोंण लागे वेळोवेळां ॥ त्याशीं मुखीं ग्रास घालूनि लळा ॥ पुरवीं कृपाळा सद्गुरु ॥९६॥ तैसें स्वामी कीजे आतां ॥ सांगा गुह्यज्ञान कथा ॥ जेणें बाणे चित्ता ॥ तेंचि समर्था करावें ॥९७॥ बाळक मातेपाशीं जाण ॥ मागों गेलें सिद्धान्न ॥ मातेनें दिशलें कोरान्न ॥ म्हणे जेवीं करून स्वयंपाक ॥९८॥ जें मुखीं घांस घालूं जाणत नाहीं ॥ तें स्वयंपाक करील काई ॥ तैसेंच केलें स्वामीहीं ॥ मज हे कळेना सोय कीं ॥९९॥ तंव सद्गुरू म्हणती आपण ॥ बरवां करूं जाणसी प्रश्न ॥ तुझ्या बोलें माझ्या मना जाण ॥ आल्हाद पूर्ण होतसे ॥२००॥ जैसा पौर्णिमेचा चंद्र ॥ देखोनि भरतें दाटे समुद्र ॥ तैसें मज झालें साचार ॥ तुझें उत्तर ऐकतां ॥१॥ या अध्यायीं हेंचि निरूपण ॥ माया अज्ञानाचें निरसन ॥ ब्रह्म व्यापक ज्ञानघन ॥ असें कोठून राहिलें ॥२॥ माया हें मायिक ॥ अज्ञान हें ज्ञानचि देख ॥ भासलें तें मिथ्या शोक ॥ ऐसा विवेक केला असे ॥३॥ तें तूं सत्य जाणोन ॥ पुढें होईं रे सावधान ॥ पुढिल्या अध्यायीं सांगेन ॥ करीं मन एकाग्र ॥४॥ तृतीय अध्या पूर्ण झाला ॥ आतां चतुर्थ आरंभिला ॥ रामानंद म्हणे रत्नाकरा वहिला ॥ चित्त कथेला दीजे बापा ॥५॥ हा ग्रंथ अपूर्व आहे ॥ हे संसारपंथीं घातली पाहे ॥ जो नर सद्गुरूशीं शरण जाय ॥ निर्भय होऊनियां ॥६॥ जे सद्गुरूचरणीं अंकिले ॥ जे देहभावासी विसरले ॥ तेचि या सुखासी पावले ॥ इतर राहिले पाहत ॥७॥ जे शमदमीं आळशी ॥ वैराग्य नाहीं मानशीं ॥ या ग्रंथींचें रहस्य त्यांशी ॥ कल्पांतेशीं नकळे ॥८॥ हे आहेत महाराष्ट्र बोल ॥ परि अनुभवीं अंतीं सखोल ॥ ते अनुभवीं संतोषतील ॥ शांति असेल ज्यांमाजी ॥९॥ इति श्रीदीपरत्नाकर ग्रंथ ॥ गुह्याहूनि गुह्यसार ॥ हें उपनिषदांचें जिव्हार ॥ संत चतुर जाणती ॥२१०॥ इति श्रीचिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकरग्रंथे ॥ माया अभाव योगे नाम तृतीयोsध्याय: ॥३॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ओंव्या॥२१०॥ ॥ ॥॥ इति दीपरत्नाकर तृतीयोsध्याय: समाप्त: ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP