अध्याय दहावा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्री गणेशाय नम: ॥
 ॐ नमोजी सद्गुरुराया ॥ निर्गुण निरामया ॥ भवच्छेदका करुणालया ॥ तुझिया पायां दंडवत ॥१॥
तूं जैसा तैसाच अससी ॥ आदि मध्य अवसान नाहीं तुजपासीं ॥ तुझा पार नकळे कवणासीं ॥ तूं सर्वांसीं अगोचर ॥२॥
कांहीं जाणों जाताति तुजला ॥ तरी तूं नकळसी कवणाला ॥ कां जे नेणवे बुद्ध्यादिकांला ॥ तर्क बुडाला जाणवेचा ॥३॥
कां जे तूं सर्वांचे आदी ॥ तुजा महिमा नेणवे वेदीं ॥ मज सहजीं कुंठित इतरांची बुद्धी ॥ तूं अनादि विश्वंभरा ॥४॥
ऐसिया तुज नमन ॥ माझें करावें समाधान ॥ मागिले अध्यायीं दिधलें अभयदान ॥ जें सांगेन पुढिले अध्यायीं ॥५॥
तें ऐकावया चित्त ॥ माझें झालेंसे उदित ॥ तुम्ही तों दीनदयाळवंत ॥ सांगा हित होय जेणे ॥६॥
माझे मनोरथ पूर्ण केले ॥ चौ देहांतें निरसलें ॥ साक्षी करोनि ठेविलें ॥ आतां उरलें तें सांगा ॥७॥
तुम्हीं जों जों सांगतां कथा ॥ तों तों हर्ष वाटतो चित्ता ॥ मज कल्पना नाहीं आतां ॥ गेली अहंता नि:शब्दा ॥८॥
जैसा सूर्योदय होतां ॥ तारांसमवेत चंद्रमा असतां ॥ तेज लोपे जाण चित्ता ॥ झालें समस्तां विकारा ॥९॥
रात्रीं चंद्राचा प्रकाश होये ॥ दिनोदयीं चंद्रीं समावे ॥ चंद्र होतां दर्शन नोहे ॥ तैसें झालें मनादिकां ॥१०॥
कर्म करावें आपण ॥ तेव्हां शरीरच करावें ठाण ॥ शरीर मी म्हणतांच जाण ॥ विकार उत्पन्न होताती ॥११॥
तरी शरीरीं कर्म करावें कैसें ॥ हें कांहीं ज्ञान नसे ॥ सांगा जैसें असेल तैसें ॥ कृपावशें दयानिधी ॥१२॥
ऐसी ऐकोनि विनवणी ॥ बोले सद्गुरु चूडामणी ॥ बैस सावध होवोनी ॥ सांगतों करूनि वेगळी ॥१३॥
तूं जंव जंव पृच्छा करिसी ॥ तंव तंव आल्हाद वाटे सांगावयासी ॥ पारणें झालें वाचेसीं ॥ मज मानसीं सुख झालें ॥१४॥
वाचेसी उपास पडला होता ॥ कां जे कोण्हीही होय पुसता ॥ बहुत भाग्यें भेटलासी श्रोता ॥ होईं आतां सावध ॥१५॥
अरे जो सद्गुरुचा अंकित ॥ जो झाला देहातीत ॥ देहीं साक्षित्वें असत ॥ जैसें घरांत दीपक ॥१६॥
घरांची राहटी नानापरी ॥ दीप तो कांहींच न करी ॥ तैसें निवर्ततें शरीरीं ॥ तूं वेगळा निर्धारीं अससी कीं ॥१७॥
हें तूं काय जाणत नाहींस ॥ कां जें आत्मसत्तें वर्तन शरीरास ॥ तूं चालवोनी सर्वांस ॥ अससी अविनाश वेगळा ॥१८॥
तूं अनादि वेगळा आहेसी ॥ परी देहसंगें भुललासी ॥ आतां सांडोन संदेहासीं ॥ करीं कर्मासीं आदरें ॥१९॥
ज्यासीं नाहीं आत्मत्वाचें ज्ञान ॥ तो म्हणे मी कर्म न सांडीन ॥ ज्ञानी कर्म करिती आदरेंकरून ॥ साक्षित्वें जाण वेगळे असती ॥२०॥
नित्य नैमित्य कर्म करिती ॥ साक्षित्वें शरीरीं वसती ॥ जेथींचें तेथें स्थापिती ॥ कोणे रीती तें सांगतों ॥२१॥
जैशी स्फटिक शिळा ज्या रंगावरी ठेविली ॥ तैसीच असे भासली ॥ परी रंगरूपे नाहीं आली ॥ करिती वहिलीं कर्मे तैसीं ॥२२॥
गंगावनावरी देख ॥ ठेविला जरी स्फटिक ॥ तुकडे दिसती अनेक ॥ परी स्फतिक फुटला नाहीं ॥२३॥
जें जें कांहीं कर्म करी ॥ तैसाच दिसे शरीरीं ॥ परी साक्षित्वें अंतरी ॥ असे निराधारी वेगळा ॥२४॥
ज्या ज्या वेळे जें जें कर्म ॥ तें तें करी धरूनि प्रेम ॥ जना वाटतो सकाम ॥ परि तो निष्काम अंतरीं ॥२५॥
जैसी सकाम कर्मे प्रीती ॥ तैसींच ज्ञानी आदरें करिती ॥ साक्षित्वें कर्मा नोहे लिप्ती ॥ इतर कुंथती कर्माभिमानें ॥२६॥
जे आपुलें साक्षित्व नेणती ॥ तेचि कर्माभिमानें कुंथती ॥ जे साक्षित्व जाणती ॥ ते राहती वेगळेचि ॥२७॥
शरीरकर्मे वर्ततसे पाहीं ॥ परी त्यासीं वर्तणें नाहीं ॥ अभ्र धावें आकाशाचे ठायीं ॥ धावणें नाहीं आकाशा ॥२८॥
आभाळचि येत जातसे ॥ तरी आकाश जैसें तैसें ॥ तैसें कर्म शरीरीं भासे ॥ ज्ञाता नसे लिप्त तेथें ॥२९॥
अभ्र असे गर्जना करित ॥ परी आकाश नाहीं कांपत ॥ तैसें झालें शरीर कर्मांत ॥ नाहीं भीत निश्चयीं ॥३०॥
आकाशीं दिवस रात्र येती जाती ॥ परी आकाशाची न पालटे स्थिति ॥ तैसे ज्ञाते कर्म करिती ॥ इतर भ्रमती देहसंगे ॥३१॥
जैसी कुलालचक्रीं बैसली माशी ॥ चक्र भोंवे परी ते जैसी तैसी ॥ तैसें शरीर करी कर्मासी ॥ परी तो साक्षित्वेंसी अचल ॥३२॥
तैसे ज्ञाते कर्माला ॥ जैसा रथीं जो आरूढला ॥ तो बैसका न मोडतां फिरोन आला ॥ असे संचला साक्षित्वें ॥३३॥
ज्ञानी निर्हेत कर्म करित ॥ कां जे वेदमर्यादा पाळित ॥ अज्ञानां आचरोनी दावित ॥ कर्मा लावित बाळ्या भोळ्या ॥३४॥
ज्ञाता कर्म न करी कांहीं ॥ तरी मूर्ख न लागे ते सोई ॥ ऐसें जाणोनियां पाहीं ॥ कर्म देहीं करीतसे ॥३५॥
जैसे आंधळे आडमार्गी पडले ॥ ते डोळस याहीं मार्गीं लाविले ॥ तैसें ज्ञात्यांनीं करूनि दाविलें ॥ लाविले अज्ञजन मार्गीं ॥३६॥
आंधळियासीं पेण्यासी न्यावें ॥ तरी आंधळ्याबरोबर चालावें ॥ उच्च नीच सांगावें ॥ करों पाहावें हित त्याचें ॥३७॥
तैसें ज्यांसीं नाहीं अंतर्ज्ञान ॥ ते अज्ञान आंधळे जाण ॥ ते धरिती अविद्येचें आडरान ॥ कां जे भान नाहीं आपुलें ॥३८॥
ज्ञाता आपुलें सर्व जाणत ॥ म्हणोनी त्यांसीं मार्ग दावित ॥ येर्‍हवीं तो कर्मातीत ॥ मिथ्या भासत कर्म त्याचें ॥३९॥
आंधळे मार्गीं चालत ॥ परी उच्च नीच नाहीं दिसत ॥ तेणें झडा असे खात ॥ मग बरळत तेणें दु:खें ॥४०॥
मी ज्ञाता अति चतुर ॥ मजहूनि कोणी नाहीं थोर ॥ वेदभक्त पाठांतर ॥ असे साचार मीच पैं ॥४१॥
मी एक आचरणशीळ आहें ॥ माझ्या दृष्टीस मजसम कोणीच नये ॥ ऐसा अभिमान करिताहे ॥ झडा खाये दचकत ॥४२॥
शरीराची प्रतिष्ठा होतां ॥ हर्ष मानी फार चित्ता ॥ कांहीं निंदा ऐकतां ॥ करी आकांत तात्काळ ॥४३॥
जाणून तरी निंदा करी ॥ दुष्टता भासली अंतरीं ॥ माझ्या आचाराची सरी ॥ पृथ्वीवरी नसेचि कीं ॥४४॥
मी काव्य व्याकरण जाणताहें ॥ ज्योतिषी मीं तो होय ॥ वेदशास्त्रीं प्रवीण पाहे ॥ ऐसा झाडा करूनि सांगतों ॥४५॥
मीच एक काव्यकर्ता ॥ चौसष्टी कळांचा जाणता ॥ रागज्ञानी पुरता ॥ ऐसा होय रचिता मी ॥४६॥
जेणें शरीरासीं महत्त्व होये ॥ तें तें करितां हर्ष पाहे ॥ जारण मारण शिकताहें ॥ झाडा करी ऐसीया परी ॥४७॥
मताभिमान वागविती ॥ आपुलालीं कर्मे स्थापिती ॥ तीर्थ व्रतें दूषिती ॥ ते जाण चित्तीं जात्यंध ॥४८॥
गुरु म्हणविती आपणासी ॥ ज्ञान सांगे दुसरीयासीं ॥ करणी न करी तैसी ॥ त्यासी निश्चयेंसीं झडा की ॥४९॥
ज्ञातृत्वाचा मिरविती अभिमान ॥ म्हणती आम्ही अग्निहोत्री आपण ॥ आम्हां ऐसा दुसरा आहे कोण ॥ ऐसा जाण झडा खाये ॥५०॥
लागले झडेच जिव्हाळीं ॥ तेणें अंतरीं तळमळी ॥ मग करी तो वाचाळी ॥ आम्ही बळी सर्व पदार्थीं ॥५१॥
ते देहदुर्गम जाण ॥ तेथें अज्ञान अंधारीं गुंतोन ॥ पुढें रीघ नव्हे त्यालागुन ॥ बडबड म्हणोन करीतसे ॥५२॥
तेथें ममतेचा वणवा लागला ॥ भ्रांतिधूम्रें घाबरला ॥ चिंतादरडींत जावोन पडला ॥ तेणें झाला अत्यंत दु:खी ॥५३॥
त्या दु:खे चडफडोनी पडत ॥ मग भलतें बरळत ॥ तें देखोन ज्ञात्याचें चित्त ॥ कळवळा करी सत्वर ॥५४॥
त्यास मार्ग दावावा म्हणोन ॥ ज्ञाता दावी अभ्यासोन ॥ वेदशास्त्र आज्ञा पाळोन ॥ साक्षी होवोन करित ॥५५॥
जो त्रिगुणातीत झाला ॥ साक्षित्वें कर्मभक्ति करूं लागला ॥ कां जो बोध व्हावा जनांला ॥ म्हणोनि लागला भक्तिपंथा ॥५६॥
नित्य नैमित्य करोनि दाखवी ॥ अज्ञानासी मार्ग दावी ॥ भक्तिकर्माची आवडी जीवी ॥ पाहे सर्वीं एक आत्मा ॥५७॥
जैसा बहूरूपी सोंगें आणित ॥ प्रसंगासारिखी संपादनी करित ॥ तें सोंग जगासी दावीत ॥ परी मी भावीत सोंग नव्हें ॥५८॥
ज्या ज्या जातीचें सोंग आणित ॥ तैसा चि बोल बोलत ॥ परी सोंग आणि बोलावीत ॥ ऐसा जाण साक्षित्वें ॥५९॥
सोंगाभिधान धरून ॥ संपादनी करी आदरेंकरून ॥ तैसा ज्ञाता कर्म करी जाण ॥ परी आपण वेगळा ॥६०॥
इकडे वेदद्रोह चुकला ॥ जना उपकार फार झाला ॥ ऐसें जाणोनि वहिला ॥ करी कर्माला रत्नाकरा ॥६१॥
ऐसें सद्गुरुवाक्य ऐकोनी ॥ बोले रत्नाकर कर जोडोनी ॥ संदेह नाहीं तुमचे वचनीं ॥ परी एक विनवणी असे माझी ॥६२॥
कर्माचा निर्णय करोन ॥ सांगीतलें मजलागुन ॥ तेणें झालें समाधान ॥ कर्म भिन्न आपणाहूनी ॥६३॥
शरीर त्रिगुणयोगें चालत ॥ कर्म त्रिगुणापासोन होते ॥ मी तों असें त्रिगुणातीत ॥ असे जाणत सकळांसी ॥६४॥
शरीर आणि मजसीं ॥ नातें नाहीं सहसीं ॥ या शरीराच्या कर्मासीं ॥ कैसें न मी होईन लिप्त ॥६५॥
ज्या जातींत शरीर झालें ॥ तेथेंचि विधियुक्त कर्म लागलें ॥ जैसे नग जेथींचे तेथिले ॥ शोभा आपुले स्थळीं देती ॥६६॥
ऐसें मज बोधा आलें ॥ शरीर कर्म करितांचि भलें ॥ कां जें शरीर कर्मापासाव झालें ॥ म्हणोनि लागलें कर्म त्यासी ॥६७॥
एक स्वकर्माचा त्याग करिती ॥ इतर कर्म आचरती ॥ त्यांसी काय कळों आलें गुरुमूर्ती ॥ तें मजप्रती सांगावें ॥६८॥
अरे बापा जे कर्मत्याग करिती ॥ तेचि वेदबाह्य बोलिगेती ॥ ते अज्ञान मंदमती ॥ आत्मस्थितीस भुलले ॥६९॥
एक आत्मत्वावांचोन ॥ कर्म तेंचि अकर्म जाण ॥ कां जे म्हणे देहचि मी आपण ॥ मग फळाशा कर्णीं कर्म करी ॥७०॥
फळाशा जेथें अमुप देखती ॥ त्यातेंचि बहु आदराती ॥ आत्मत्वातें असत्य मानिती ॥ म्हणोनी त्यागिती महामूर्ख ॥७१॥
नित्यनैमित्य कर्म सांडी । जावोन बैसे प्रसन्न कराया नवचंडी ॥ मुख्य गायत्रीची नाहीं गोडी ॥ आवडी असे इतर जपां ॥७२॥
जें शब्दबीजाचें ब्रह्म ॥ जें आनंदाचें निजवर्म ॥ जें गुह्याचें गुह्य परम ॥ होय ब्राह्मण शूद्राचा ॥७३॥
जेणें शूद्राचे झाले ब्राह्मण ॥ जी वेदाची जननी जाण ॥ ब्रह्मादिक ती आधीन ॥ जी कारण सर्वांची ॥७४॥
अरे हें शरीर अपवित्र ॥ मळमूत्राचें माहेर ॥ अस्थिमांसाचें कोठार ॥ असे घर दुर्गंधीचें ॥७५॥
हें विकाराचें आयतन ॥ जें मोहभ्रमांचें कारण ॥ जें कल्पनेचें अधिष्ठान ॥ जें पैं खाण दु:खाची ॥७६॥
उत्तम सेवावें पक्वान्न ॥ त्यासी दुर्गंधी लागे संगेंकरून ॥ हें ऐसें अपवित्र परी पवित्र जाण ॥ हें महिमान गायत्रीचें ॥७७॥
जेणें गायत्रीचें अधिष्ठान ॥ तो हरिहरांतें वंद्य जाण ॥ म्हणोनि विष्णूनें आपण ॥ लत्ताप्रहार सोशिला ॥७८॥
जेणें थोर थोर दैत्य ॥ मारोनि केला नि:पात ॥ तो काय निर्मळ भगवंत ॥ सोसिल लाथ भृगूची ॥७९॥
जो निर्गुण गुणासीं आला ॥ जो अरूपीं रूपासीं भासला ॥ तो अनम्या नाम बोलिला ॥ तो ब्राह्मणातें मानित ॥८०॥
ऐसें ज्या गायत्रीचें महिमान ॥ त्या मंत्राशीं नेणती मूखे ब्राह्मण ॥ कामनीक मंत्र जपती जाण ॥ आदरें करोनी मंदमती ॥८१॥
जो अर्धमातें छेदोन ॥ करी धर्माचें पाळण ॥ जो सर्वत्रीं व्यापक भगवान ॥ तो ब्राह्मण जाण मानीतसे ॥८२॥
सांडोनि कामधेनूचें दोहन ॥ दोही अजागल स्तन ॥ साखर ती सांडोन ॥ धुळी भक्षण करीतसे ॥८३॥
तैसें सांडोनी गायत्रीसी ॥ आणि जपती इतर मंत्रासीं ॥ पिंपळ तोडोनी भांगेसीं ॥ अति आदरें लाविती ॥८४॥
सांडोनियां मिष्टान्न ॥ हाडावरी धावें श्वान ॥ कल्पतरू उपडोन ॥ करी रोपण एरंडाचें ॥८५॥
परीस सांडोनियां कवडी ॥ कस्तूरी टाकोनि विष्ठा चिवडी ॥ तैसी गायत्री सांडोनियां प्रौढी ॥ मंत्रवेडीं जपताती ॥८६॥
श्लोक ॥    ॥ ओंकार: पितृरूपेण गायत्री मातरस्तथा ॥ माता पिता न जाणाति ब्राह्मण:श्वानरेतज: ॥८७॥
पहिला शूद्र होता ॥ ब्राह्मण जन्म होय सामर्थ्यता ॥ ये जन्मींची गायत्री माता ॥ आणि पिता ओंकार ॥८८॥
जे मातापित्यांसी नेणती ॥ इतर देवी देवता भजती ॥ नाना यंत्रमंत्रें शिकती ॥ तेचि जाण चित्तीं महापापी ॥८९॥
गायत्री मंत्रातें सांडोन ॥ जो इतर मंत्राचें करी पठण ॥तो श्वानाचें रेत जाण ॥ घरोघरीं म्हणोनी फिरतसे ॥९०॥
ते घरोघरीं म्हणसी कोण ॥ तेही सांगतों सावधान ॥ ओमित्येकाक्षरंब्रह्म जाण ॥ वेद आपण बोलत ॥९१॥
त्या ओंकाराचें करितां विवरण ॥ स्वयेंचि ब्रह्म होईजे आपण ॥ भेदाभेदातें सांडोन ॥ राहे व्यापोन सर्वांतें ॥९२॥
आदि मध्य अवसान ॥ हें ओंकारामाजी आहे जाण ॥ वेद झाले ओंकारापासोन ॥ त्याचें ज्ञान साच कीं ॥९३॥
सर्वांचे आदि ओंकार ॥ सर्व ओंकारामाझार ॥ सद्गुरुवांचोनि निर्धार ॥ नव्हे साचार सत्यत्व ॥९४॥
अकार उकार मकार ॥ अर्धमात्रा साचार ॥ एवं हा चतुष्पदी ओंकार ॥ दावितो घर निर्गुणाचें ॥९५॥
एका सद्गुरुवांचोन ॥ न होय ओंकाराचें ज्ञान ॥ ओंकाराचे ज्ञानाविण ॥ ब्राह्मणपण शोभेना ॥९६॥
नाना शास्त्रांची व्युत्पत्ती ॥ केल्यानें नकळे ओंकारस्थिती ॥ एका सद्गुरुवांचोनि कल्पांती ॥ ओंकाराप्रती नेणिजे ॥९७॥
ओंकारातें जाणितलें ॥ ब्राह्मण ब्राह्मणत्वा सत्य झालें ॥ ओंकार गायत्रीतें नेणती ते गेले ॥ अधोगती निश्चयें ॥९८॥
ते अधोगति चुकविती ॥ ऐसें ज्यासीं आवडे चित्तीं ॥ तेणें सद्गुरुसेवा करावी निश्चितीं ॥ अहंताजाती सोडावी ॥९९॥
म्हणोन गायत्रीतें सोडों नये ॥ इतर मंत्रातें जपों नये ॥ ऐसेंच वेद बोलताहे ॥ परि तें गुह्य न कळेचि ॥१००॥
जे गायत्रीचें नेणती महिमान ॥ तेचि कर्मभ्रष्ट जाण ॥ ज्यामाजी वसे द्वैतभान ॥ तेचि आयतन पापाचें ॥१॥
ओंकाराचें विवरण करिते ॥ तरी ते आपण ब्रह्म होते ॥ अजपाचा जप जपते ॥ ते असते व्यापकत्वें ॥२॥
जे व्यापकत्वा विसरले ॥ तेचि कर्मभ्रष्ट बोलिले ॥ तेचि वेदीं निवडोनी सांडिले ॥ जे आपणा गेले विसरोनी ॥३॥
जे आपणा आपण नेणत ॥ तेचि गायत्री मंत्रा विसरत ॥ इतर मंत्रातें जपत ॥ अखंड रहाती देहसंगें ॥४॥
नित्य नैमित्य कर्म करणें ॥ आपुल्या साक्षित्वा न विसरणें ॥ रत्नाकरा तेंचि जाणणें ॥ स्वकर्म म्हणे तेंचि ॥५॥
जें स्वकर्मातें विसरणें ॥ आणि काम्यकर्मातें करणें ॥ नाना मंत्र यंत्रासीं करणें ॥ तेंचि जाणणें अधोवती ॥६॥
षट्कर्मे ब्राह्मणपण ॥ तेंचि ब्राह्मणाचें भूषण ॥ वेदाची आज्ञा हेचि जाण ॥ धरीं खूण जीवीं हे ॥७॥
तरी षट्कर्में कोण कोण ॥ तें सांगावें स्वामी वेगळे करून ॥ माझें झालें समाधान ॥ तुमचे वचन ऐकतां ॥८॥
जी जी तुम्ही सांगतां कथा ॥ तेणें संतोष वाटे चित्ता ॥ षट्कर्मे कोणती ताता ॥ विचारूनी आतां सांगावीं ॥९॥
तुम्ही गायत्रीचें केलें स्थापन ॥ इतर मंत्राचें केलें निरसन ॥ तेणें झालें समाधान ॥ परि तैसे जन न चालती ॥११०॥
बटुक भैरव खंडेराव ॥ गणेश भवानी मंत्रांचें गौरव ॥ जपतपादि नर सर्व ॥ स्थूळ वैभव इच्छिती ॥११॥
नित्य नैमित्याची बोळवण ॥ आचार क्रियेचें भान ॥ सद्विद्यांचें उडालें ठाण ॥ धावें मन दशदिशीं ॥१२॥
मन दाही वाटा धांवत ॥ आपण बैसला ध्यानस्थ ॥ बाह्य सोंग ऐसें दावित ॥ लोकां लावित आवडी ॥१३॥
लटकाच टिळा आणि माळा लटकाच देवपूजेचा सोहळा ॥ नागवावया बायामोळ्या ॥ पिटीत टाळ्या पाखांडमतें ॥१४॥
लटकेंच करी कथाकीर्तन ॥ चित्तीं धनाशा धरून ॥ रसिक लाविती निरूपण ॥ जेणें करूनी जन रिझे ॥१५॥
तान मान नृत्य करिती ॥ हाव भाव दाखविती ॥ परि एकात्मता नाहीं चित्ती ॥ म्हणोनी होती फजीत ॥१६॥
निरूपण रामायण भारत ॥ अमुपचि आडकथा सांगत ॥ लटकेंचि तोंड किवळवाणें करी ॥ परि मनीं हेत धनाचा ॥१७॥
दुसर्‍यासीं सांगे निरूपण ॥ बाप हो सांडां अभिमान ॥ सर्वत्रीं व्यापक नारायण ॥ विचारूनी गुरुमुखें ॥१८॥
तुम्ही सांडावी चिंता ॥ नारायण आपणासी रक्षिता ॥ लाज न वाटे देशावरां जातां ॥ इतरां बोधितां गोड लागे ॥१९॥
न करावी निंदा आणि द्वेष ॥ असावें विषयीं उदास ॥ ऐसें सांगे सकळांस ॥ चित्तीं आस धनाची ॥१२०॥
सांगता गोड लागे मनीं ॥ परी करोनी दाखविना कोणी ॥ ऐसी जनांची करणी ॥ विचित्र म्हणोनि सांगों किती ॥२१॥
नाना विद्येची वित्पत्ती ॥ काव्य व्याकरण पढती ॥ भूत भविष्य सांगती ॥ तेही धरिती धनाशा ॥२२॥
जे वेताळ झोडिंग साधिती ॥ मढीं स्मशानीं बांधिती ॥ तेही धनाशा धरिती ॥ ऐसी गति सर्वांची एकचि ॥२३॥
जे रामकृष्ण गोविंद गाती ॥ तेही धनासाठीं गुरुमूर्ती ॥ आनंदमयें जे नाचती ॥ तेही मिलविती धनातें ॥२४॥
धन मिळवावया भांड ॥ जैसा सरवदा बोलवी तोंड ॥ तैसे विद्यावाद उदंड ॥ पुरवावया कोड देहाचें ॥२५॥
एकवेळ कोटवेळ कोट म्हणती ॥ एक उदो उदो उच्चारिती ॥ परी धनाशा चित्तीं ॥ तेचि स्थिति विद्वांसाची ॥२६॥
एक आत्मारामीं पूर्णज्ञानीं झाले ॥ एक वांझेसी पुत्र देऊं लागले ॥ एक त्रिलोक फिरोनी आले ॥ ते बोलिले थोर साधु ॥२७॥
गीता भागवत वाचिती ॥ परी पालटेना पूर्वस्थिती ॥ हें काय गुरुमूर्ती ॥ तें मजप्रती सांगावें ॥२८॥
बारे तूं हें काय पुससी ॥ जो नेणे आपणासी ॥ तो जरी पढला वेदशास्त्रासी ॥ परी अनुभवासी चुकला ॥२९॥
एक सद्गुरुकृपेविण ॥ नकळे अनुभवाची खूण ॥ जोंवरी नव्हे अनुभवज्ञान ॥ तोंवरी ज्ञान अज्ञान कीं ॥१३०॥
काव्य व्याकरणादि पढती ॥ नाना कवित्व करिती ॥ झाली वेदशास्त्रीं वित्पती ॥ परी नेणती आपणातें ॥३१॥
विद्याबळें करिती वटवट ॥ वित्पत्तीनें भरती पोट ॥ परी अवघेचि झाले कष्ट ॥ कां जे आत्मदृष्टि नसेचि कीं ॥३२॥
जोंवरी निराशा बाणली नाहीं ॥ तोंवरी विद्यावंताप्रती वटवटी पाहीं ॥ कां जे आत्मप्राप्ती नेणिजे कांहीं ॥ म्हणोनी सोई चुकले ॥३३॥
शरीर प्रारब्धाधीन ॥ होणार होईल प्रयत्नेंविण ॥ हें जरी असे त्यांसी ज्ञान ॥ तरी धनाशा आपण न इच्छिती ॥३४॥
धनाशें कथाकीर्तनें केलीं ॥ अथवा शस्त्रास्त्रें पढितलीं ॥ परी अवघींच वायां गेलीं ॥ अंधा लाधली अनर्घ्य वस्तू ॥३५॥
त्यांस जरी आपुलें ज्ञान असतें ॥ तरी देहा मी न म्हणते ॥ सहज होवोनी राहते ॥ कृष्णार्पण करिती कीर्तना ॥३६॥
त्यांहीं देह मीच मानिला ॥ म्हणोन आशा वरपड झाला ॥ आशासंगें ठाव द्वैताला ॥ सहज झाला असे कीं ॥३७॥
त्यांहीं जे जे विद्या केली ॥ ते ते अवघीच वायां गेली ॥ जैसीं अंधासीं रत्नें लाधलीं ॥ तेणें सांडिलीं खडे म्हणोनियां ॥३८॥
अंधापुढें सूर्यप्रकाश ॥ नेत्राविण काय त्यास ॥ तैसा अनुभवाविण शास्त्राभ्यास ॥ त्यासीं काय सुख देईल ॥३९॥
अंधासीं किरणस्पर्श करून ॥ सूर्योदयाचें होय ज्ञान ॥ तैसें शब्दज्ञानातें अज्ञान ॥ सुख आपण मानिती ॥१४०॥
अंधासीं सूर्य उगवल्याचें ज्ञान ॥ परी परिच्छिन्न नाहीं दर्शन ॥ म्हणोनी उच्चनीच नकळेचि ज्ञान ॥ मग केलें ठाणें एक जागीं ॥४१॥
कोणी हातीं धरूनी चालविती ॥ उच्च नीच भूमिका सांगती ॥ परी अंधाशी चालतां गती ॥ नसे चित्तीं निर्भयता ॥४२॥
तो जपत पुढें चालत ॥ परी झाडतवा असे खात ॥ तैशी वेदआज्ञे हीन क्रीडा करित ॥ परी नाहीं जाणत प्रारब्धा ॥४३॥
वेदशास्त्रें उदंड सांगती ॥ अंधा ज्ञान नकळे स्थिती ॥ म्हणोनी ज्ञानाभिमान वागविती ॥ तेणें वंचिती आपणा ॥४४॥
कीं मर्कटासीं रत्नभूषण ॥ काय होय त्यालागुन ॥ तैसें आत्मभ्रांतासीं वेदाध्ययन ॥ तें त्यालागोन काय होय ॥४५॥
मर्कटें रत्नाचा अव्हेर केला ॥ तैसा वेदशास्त्रें दुर्‍हावला ॥ कथाकीर्तनें करूं लागला ॥ परी लोभें गेला अधोगती ॥४६॥
जैसे मोराअंगीं सर्व डोळे जाण ॥ परी पहावयाचे ते भिन्न ॥ तैसा झाला उदंड वित्पन्न ॥ परी आत्मज्ञान नेणेचि ॥४७॥
पिच्छाचे डोळियानें जरी दिसतें ॥ तरी गुरुवीण वेदींचें रहस्य प्राप्त होतें ॥ वेदींचें रहस्य नकळे ज्यातें ॥ त्याते कर्मातें काय पाहावें ॥४८॥
तैशी जोंवरी आत्मदृष्टि नाहीं ॥ तोंवरी गुह्य न कळेचि कांहीं ॥ एक आत्मज्ञानेंविण पाहीं ॥ विफळ सर्वही जाणिजे ॥४९॥
जे चर्मचक्षूनें देखती ॥ ते बाह्यव्यवहार सत्य मानिती ॥ म्हणोनी बाह्यकर्म करिती ॥ जना दाविती आम्ही ऐसें ॥१५०॥
तरी ते अज्ञान भोळे ॥ त्यांसीं तें कांहींच नकळे ॥ त्यांनीं विद्यावित्पत्तीचें बळें ॥ धन मिळें तें केलें कीं ॥५१॥
मग ज्या प्रयत्नें मिळे धन ॥ तेंचि करिती आदरें करून ॥ जैसें मिष्टान्न सांडोनी श्वान ॥ दुर्गंधी चिवडी आदरें ॥५२॥
जैसें श्वान हाड तोंडी धरी ॥ वारूं जाय त्यावरी गुरगुरी ॥ तैसा देहाभिमान करी ॥ स्वहितावरी हेत नसे ॥५३॥
अस्थिमांसाचें शरीर असे ॥ तेंचि मी म्हणोनी भरला सोसें ॥ म्हणोनी श्वानापरी दिसे ॥ भुंकत असे शब्दब्रह्म ॥५४॥
शुभ अशुभ कांहीं ॥ श्वानासी जैसें भान नाहीं ॥ तोंड घाली भलतेच ठाईं ॥ लाज नाहीं कोणाची ॥५५॥
तैसेंच याला झालें असे ॥ द्रव्य मिळवावया भरला सोसें ॥ कर्म शुभ अशुभ करीतसे ॥ हेत नसे स्वहिताचा ॥५६॥
जैसा श्वानासी वर्णावर्ण नाहीं ॥ तैसें यासीं कर्माकर्म नकळे कांहीं ॥ धनासाठी स्वहिताची सोई ॥ विसरला पाहीं निलाजरा ॥५७॥
परी बापुडा असें नाहीं जाणत ॥ कां स्थूळसौख्या अवघे नाशवंत ॥ वेदशास्त्र पढोनि आपलें हित ॥ घेवो त्वरित करोनी ॥५८॥
अवतारादिक तेही गेले ॥ येणें कां शाश्वत मानिले ॥ जे आपुल्या स्वहितासी वंचिले ॥ त्यांसी आलें काय कळों ॥५९॥
जैसा खरासी उकर्डा प्रीत ॥ बेडूक चिखल चिवडित ॥ उष्ट्र कांटेच भक्षित ॥ गोचीड प्रशित रुधिरातें ॥१६०॥
त्वचेच्या आड दुग्ध आहे ॥ परी तें गोचिडासीं काय होये ॥ तैसा देहाभिमानें पाहें ॥ रुधिर प्राशिताहे प्रपंचातें ॥६१॥
आत्मत्वाचें सांडोनी क्षीर ॥ भक्षी प्रपंचाचें रुधिर ॥ ऐसे आत्मभ्रमें भ्रमले नर ॥ करिती करकर शब्दब्रह्म ॥६२॥
जैसें मृगजळा देखोन ॥ संतोषती मृगें आपण ॥ धांवती सत्य उदक टाकोन ॥ तेचि गति जाण देहलोभें ॥६३॥
मृगजळावरी धांवती ॥ परी जळ न लाभे एक रती ॥ तैसी देहलोभ्याची झाली गती ॥ जाय अंतीं नासोनी ॥६४॥
जैसें इंद्रधनुष्य म्हणती ॥ परी त्यास सत्य नसे प्रतीती ॥ तैसाच संसार जाण चित्तीं ॥ परी नेणती अज्ञान ॥६५॥
जे असत्यासीं सत्य मानिती ॥ ते अज्ञान मंदमती ॥ जें जें ते कर्म करिती ॥ तें तें जाण चित्तीं अप्रमाण ॥६६॥
जैसें भ्रमिष्ठें केलें मद्यपाना ॥ त्यावरी केलें वृश्चिकें दंशना ॥ मग त्याची जे जे कल्पना ॥ ते ते अप्रमाण जाणिजे ॥६७॥
आधींच अज्ञान अवघे जन ॥ त्यावरी विद्यामदाचें केलें पान ॥ विंचू डसला देहाभिमान ॥ मग विषय तिडकें व्यापिलें ॥६८॥
त्या विषय तिडका अति भारी ॥ शमन नोहे कवणपरी ॥ तेणें आकांत वर्तला भारी ॥ मग फळांशा करिती नाना चेष्टा ॥६९॥
तरी देहअहंतेचें जें कर्म ॥ तो तो जाण रे अधर्म ॥ जैसें अशौच्य जपतां मंत्रनाम ॥ फळ उत्तम नोहेचि ॥१७०॥
बीजयुक्त मंत्र आहे ॥ फळही उत्तम होये ॥ पार अशौच्य जपताहे ॥ फळ नोहे उत्तम ॥७१॥
जरी अंतरशुद्धीनें मंत्र जपता ॥ तरी उत्तम फळीं फळा येता ॥ अशौच्यें सर्व बीज निर्फळता ॥ पुढें घाता ठेविलें ॥७२॥
तैसें अपवित्र देह पापराशी ॥ जें भरलेंसे नरकमांसीं ॥ तें मीचि म्हणोनि कर्मांसीं ॥ तेचि निश्चयेंसीं अपवित्र ॥७३॥
आपुलें साक्षित्व विसरला ॥ देह मीच म्हणोन मानिला ॥ मग फळाशा कर्म करूं लागला ॥ अशौच्य बोलिला तो एक ॥७४॥
सर्वत्रीं व्यापक एक आहे ॥ त्याची कोणी नेणती सोये ॥ बाह्य व्यवहार चालताहे ॥ तोचि आहे अशौच्य ॥७५॥
जाणे वेदशास्त्रांसी वित्पत्ती ॥ परी नाहीं गेली अहंकृती ॥ आपुलें महत्त्व मिरविती ॥ तें तें जाणविती अशौच्य ॥७६॥
जें मन बुद्ध्यादिकां अगोचर ॥ परा वाचा नेणे पार ॥ तेथें भाविती विकार ॥ तेचि साचार अशौच्य ॥७७॥
निर्गुणीं उपाधी स्थापिती ॥ एकीं अनेक भाविती ॥ स्थिरता नाहीं चित्तीं ॥ हेचि स्थिति अशौच्याची ॥७८॥
जें जें मनबुद्धीस आलें ॥ तें तें सर्वही सत्य मानिलें ॥ कल्पनें करूनी झालें ॥ तेंचि बोलिलें अशौच्य ॥७९॥
धनाशा करूनी चित्तीं ॥ कथा कीर्तनें करिताती ॥ लोभ ज्याच्या फार चित्तीं ॥ तेचि स्थिति अशौच्याची ॥१८०॥
जंव गेला नाहीं देहाभिमान ॥ तोंवरी हा अशौच्य जाण ॥ करितां वेदशास्त्रांचें पठण ॥ फळ कोण तयासी ॥८१॥
जो देहाचा साक्षी होऊन ॥ राहे जो वेगळा आपण ॥ जैसें जळीं भासे गगन ॥ जळासी जाण लिंपेना ॥८२॥
जैसें जळामाजी गगन ॥ तैसें देहीं असे मीपण ॥ जळीं न लिंपे गगन ॥ तैसा जाण देहकर्मीं ॥८३॥
जळ निश्चळ गगन निश्चळ ॥ जळ चंचळ गगन चंचळ ॥ हा भासमात्र परि अढळ ॥ वस्तु निर्मळ ऐसी देहीं ॥८४॥
त्रिगुणयोगें शरीरा चळण ॥ मी तों गुणातीत निर्गुण ॥ ऐसें जाणोन शरीरभान ॥ सोडी तोचि जण शौच्य कीं ॥८५॥
जें जें त्रिगुणयोगें होये ॥ तें तें मी साक्षित्वें जाणताहें ॥ त्याचे कर्मासीं मज नातें काये ॥ तोचि पाहीं शौच कीं ॥८६॥
अहं ब्रह्मास्मि ऐसें जाण ॥ मीतूंपणाचें उडालें भान ॥ सर्वही मीच ऐसें जाण ॥ तोहि जाण शौच कीं ॥८७॥
अणुपासूनी ब्रह्मवरी ॥ एकचि पाहे चराचरीं ॥ मनाचें सांगीतलें न करी ॥ तोचि निर्धारीं शौच कीं ॥८८॥
माया ममता ती नाहीं ॥ परी ऐक्यता सर्वांठायीं ॥ लौकिक व्यवहार न करी पाहीं ॥ तोचि निश्चयीं शौच कीं ॥८९॥
विद्यावैभव चतुर ॥ ज्ञानाचा तरी भांडार ॥ परी नाहीं अहंकार ॥ तोचि साचार शौच की ॥१९०॥
नित्य नैमित्य कर्म करिती ॥ परी खटाटोप नाहीं चित्तीं ॥ अखंड नामें गर्जना करिती ॥ तोचि होती शौच कीं ॥९१॥
जें जें मन बुद्धींसी आलें ॥ तें तें विषापरी सांडिलें ॥ सहज अनुभवेंसीं राहिलें ॥ तेंचि बोलिलें शौच कीं ॥९२॥
मी असंग निर्विकार ॥ हें सर्वचि मजमाझार ॥ याचा नियंता मी साचार ॥ मी सर्वपर सर्वसाक्षी ॥९३॥
मजपासोनी सर्व होतें ॥ परी म्यां नाहीं केलें यातें ॥ सूर्यकिरणीं मृगजळातें ॥ भासे तें खोटेंचि ॥९४॥
किरणें मृगजळ उत्पन्न केलें नाहीं ॥ परीं तीं भासता त्याचे ठायीं ॥ तेवीं त्रिगुणीं जाण पाहीं ॥ जो कोणी नाहीं होवोनि राहिला ॥९५॥
तेणेंचि एक शौच केला ॥ म्हणोनी वेदशास्त्रीं अधिकारी झाला ॥ स्थापूनि विधियुक्त कर्माला ॥ जो राहिला साक्षित्वें ॥९६॥
शरीरकर्म ऐसें भासत ॥ जैसा जळीं चंद्र दिसत ॥ परी तो आहे व्योमाआंत ॥ भास होत मिथ्याचि ॥९७॥
तैसें आपणावेगळें जाणत ॥ आणि कर्मे साक्षित्वें करित ॥ ज्या ज्या कर्म जो धर्म विधियुक्त ॥ तो आचरत आदरेंसीं ॥९८॥
ज्या वर्णीं जो देह झालासें ॥ तैसेंच कर्म त्यासरिसें ॥ तें आचरावें अति हर्षे ॥ जेणें संतोषे जगदात्मा ॥९९॥
ज्यांनें आपलें साक्षित्व जाणितलें ॥ तेचि वेदाध्यायी बोलिले ॥ म्हणोनी गायत्रीतें वोळखिलें ॥ शुचि झाले आत्मबोधें ॥२००॥
जे सद्गुरु झाले शरण ॥ म्हणोनी लाधले ओंकारविवरण ॥ नेणें अनेकीं एक आपण ॥ कळली खूण गायत्रीचीं ॥१॥
जें सर्व सुखाचें अधिष्ठान ॥ जें वेदांचें आयतन ॥ जेणे होय आत्मदर्शन ॥ येव्हढें महिमान गायत्रीचें ॥२॥
जो मुख्य गायत्री नेणे ॥ तो वेदमहिमा काय जाणे ॥ तेणें जें जें कर्म करणें ॥ तें तें जाणणें पाखांड ॥३॥
मागें सांगितलें अशौच्यलक्षण ॥ तें तें वेदबाह्य कर्म जाण ॥ कां जे पूर्णत्व विसरोन ॥ देह मी म्हणोन मानिला ॥४॥
जो अपवित्र पापाची राशी ॥ जळुका बांधिली रक्तमांसीं ॥ हेंचि मी म्हणोन करी कर्मासी ॥ तो निश्चयेंसी अंत्यज ॥५॥
अंत्यज गांवामाजी फिरत ॥ परी कोण नाहीं आतळत ॥ तो गांवाबाहेर राहत ॥ जो घरांत दृष्टी न पडे ॥६॥
त्याच्या घरावरी कातडें ॥ वाळूं घातलें आतडें ॥ पडलीं चहूंकडे हाडें ॥ गिध उडती घराभोंवती ॥७॥
भोंवता कुतरियांचा कोल्हाळ ॥ उदंड पडला असे मळ ॥ दुर्गंधी उठे अमंगळ ॥ तेथे चांडाळ राहे तो ॥८॥
तैसाचि हाहि जाण ॥ जो नेणे आत्मानुभवी खूण ॥ तो वेदशास्त्र करी पठण ॥ परी कोठें मन शिऊं नेदी ॥९॥
जो वेदशास्त्रें पाहोन ॥ दुसर्‍यासी सांगे निरूपण ॥ परी कोठें आतळों नेदी आपुलें मन ॥ जाउनी राहे महारवाड्यांत ॥२१०॥
तो महारवाडा म्हणसी कोण ॥ तो हा औटहात स्थूळ देहमान ॥ तो भरलासे रक्तमांसेकरून ॥ भोंवते श्वान कामक्रोधाचे ॥११॥
आशा मनाच्या घारी ॥ अखंड फिरती घरावरी ॥ आंतडीं भरलीं ज्या घराभीतरीं ॥ तें शरीर निर्धारीं हेच कीं ॥१२॥
ज्याच्या घरावरती कातडें ॥ आणि मध्ये तीं भरलीं हाडें ॥ मूत्रमांसाचे कोठडे ॥ तेचि मी वेडे मानिले ॥१३॥
म्हणे देहच मी म्हणितला ॥ तोचि अंत्यजवत् वेदें वाळिला ॥ त्याच्या पाहतां कर्माला ॥ होय आपुला घातकीं ॥१४॥
जोंवरी कर्माचा साक्षी नव्हे ॥ तोंवरी कर्म करितां अकर्म पाहे ॥ तो गो गुंतला देहमोहें ॥ म्हणोनि सोय नव्हे हिताची ॥१५॥
तरी ऐसियातें सांडोन ॥ रत्नाकरा पाहें परतोन ॥ राहें साक्षी होऊन ॥ आदरें करीं कर्मातें ॥१६॥
आतां सांडोनी संदेहातें ॥ पाळीं रे वेदमर्यादेतें ॥ कर्म स्थापोनी जेथींचें तेथें ॥ करी भक्तीचें आदरें ॥१७॥
त्वां पूशिलें षट्कर्म तें कोण कोण ॥ तेंही पुढिले अध्यायी सांगेन ॥ जेणें निवे तुझे मन ॥ तें निरूपण सांगेन ॥१८॥
या अध्यायी हेंचि झालें निरूपण ॥ जें साक्षित्वें करावें कर्मालागोन ॥ करावें वेदमर्यादेचें पाळण ॥ देहाभिमान सांडोनी ॥१९॥
जे देहाभिमानें कर्म करिती ॥ तेचि वेदबाह्य बोलिजेती ॥ जे साक्षित्वें कर्म आचरती ॥ तेचि वेदांती जाणावे ॥२२०॥
जे अंतरसाक्षित्व नेणती ॥ आणि बाह्य सोंग दाखविती ॥ तेचि वेदबाह्य बोलिजेती ॥ ते नेणेती आपणा ॥२१॥
जें सर्वत्रीं व्यापक ॥ देहाभिमानाचें न पाहती सुख ॥ तेचि वेदांती चोख ॥ जे सन्मुख ज्ञातिकर्मा ॥२२॥
जें वेगळें करितां निरोपण ॥ कथा वाढली आपण ॥ सांगितली शौच्या अशौच्याची खूण ॥ केलें निरसन पाखांडाचें ॥२३॥
जे अहंकर्तव्यपण वागविती ॥ देहात्मवादें प्रवर्तती ॥ आणि ऐक्यतेतें नेणती ॥ तेचि बोलिजेती पाखांड ॥२४॥
आपुले पूर्णत्वा विसरला ॥ अन्य देवतां भजों लागला ॥ काम्य कर्माचा छंद घेतला ॥ तेचि बोलिजेती पाखांडी ॥२५॥
जे गायत्री मंत्रातें सांडोन ॥ जपती इतर मंत्रालागुन ॥ शिकती मोहनादिक जाण ॥ तेचि पूर्ण पाखांडी ॥२६॥
निर्विकारां विकार लाविती ॥ एकीं अनेक भावना करिती ॥ धनाशें कथा सांगती ॥ ते जाण चित्तीं पाखांडी ॥२७॥
जो स्वजातीचें कर्म सांडोन ॥ इतर कर्म करी आदरेंकरून ॥ शिके यंत्रमंत्रालागोन ॥ तोचि जाण पाखांडी ॥२८॥
ब्रह्मज्ञानी तरी म्हणती ॥ आणि देहअहंतेतें न सांडिती ॥ वेदशास्त्रां दूषिती ॥ तेचि बोलिजेसी पाखांडी ॥२९॥
परमार्थ बुद्धीसीं आळसी ॥ प्रपंच करी आदरेंसी ॥ शिके गारोड सावकासी ॥ तोचि निश्चयेसीं पाखांडी ॥२३०॥
स्नानसंध्येची बोळवण ॥ नित्यनैमित्य त्यागुन ॥ धनाशें करी अनेक पठण ॥ तोचि पूर्ण पाखांडी ॥३१॥
आम्ही मुक्त झालों म्हणती ॥ आणि जीवीं हळहळ वाहती ॥ आपुलालें मत स्थापिती ॥ ते जाण चित्तीं पाखांडी ॥३२॥
बोलासारखी नाहीं करणी ॥ निश्चय नास तो मनीं ॥ मिरवी महत्त्वालागोनी ॥ तोचि निश्चयीं पाखांडी ॥३३॥
काव्य व्याकरणीं चतुर ॥ वेदशास्त्रें पाठांतर ॥ परी कल्पना भरली फार ॥ तोचि साचार पाखांडी ॥३४॥
बोलासारखी नाहीं करणीं ॥ दुसर्‍यासी सांगे अभिमान सांडा मनीं ॥ बोले वर्म पाहोनी ॥ तोचि जाण पाखांडी ॥३५॥
लक्षांश तरी नाहीं प्राप्त ॥ आणि शब्दब्रह्म बडबडीत ॥ बाळ्या भोळ्यासीं भोंदित ॥ तोचि सत्य पाखांडी ॥३६॥
पुढें देवपूजेस्सी झळफळ ॥ अंतर नाहीं निर्मळ ॥ आणि लटकी फिरवी माळ ॥ तो चांडाळ पाखांडी ॥३७॥
धनाशें कर्म करिती ॥ तें तें पाखांड बोलिजेती ॥ जे तीर्थव्रतातें दूषिती ॥ ते जाण चित्तीं पाखांडी ॥३८॥
एकादशीस आवडे भोजन ॥ तांबूल खातसे आपण ॥ भलत्यासी बोले धि:कारून ॥ तोचि पूर्ण पाखंडी ॥३९॥
सर्व नाशिवंत बोलत ॥ परी देह लोभें वर्तत ॥ संतातें असे दूषित ॥ तोचि सत्य पाखांडी ॥२४०॥
आतां ऐक एकचि खूण ॥ ज्या कर्मीं देहाभिमान ॥ जेथें भूतदया नाहीं पूर्ण ॥ तेचि जाण पाखांडी ॥४१॥
ऐसी पाखांडियाची कथा ॥ किती म्हणोन सांगो सुता ॥ जैसा उकरडा उपसितां ॥ तों तों तत्त्वतां दुर्गंधी ॥४२॥
तरी ऐसे पाखांडमत ॥ येणें केला बहुतांचा घात ॥ हें जाणोनियां त्वरित ॥ सांडीं हेत सर्वही ॥४३॥
आतां चहूंवर्णाचीं कर्मे कोण कोण ॥ तें पुढिल्या अध्यायीं सांगेन ॥ रामानंद बोले खूण ॥ सावधान रत्नाकरा ॥४४॥
हा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ जो वेदाचा मथितार्थ ॥ जेणें होय आपुलें हित ॥ तेंचि यांत सांगितलें ॥४५॥
स्वहित करावें ऐसें ज्यांसी ॥ असेल वाटत गा मानसीं ॥ तेणेंचि या ग्रंथासीं ॥ अहर्निशीं पहावें ॥४६॥
पाहोनियां विचारावें ज्ञान पाहोनी स्वभावें ॥ एकाग्र चित्तें असावें ॥ ग्रंथवैभवें आदरें ॥४७॥
श्रवणद्वारें निवावें ॥ अज्ञान समूळ नासावें ॥ भ्रांतीतें निरसावें ॥ सुखा पावावें पठण करितां ॥४८॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥४९॥
इति श्रीचिदादित्यप्रकाश ॥ दीपरत्नाकर ग्रंथांश ॥ पाखांड निरसन उद्देश ॥ दशमोsध्याय: ॥२५०॥
इतिश्री दीपरत्नाकरग्रंथे दशमोध्याय: समाप्त: ॥११०॥
श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥    ॥    ॥ॐ॥ओंव्या॥२५०॥    ॥ॐ॥
इति दीपरत्नाकर दशमोsध्याय: समाप्त: ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP