अध्याय चौथा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्री गणेशाय नम: ॥॥
जय जय सद्गुरू दीनबंधू ॥ जय जय सद्गुरू कृपासिंधू ॥ जय जय अनादि सद्गुरू साधू ॥ जगद्वंदु सद्गुरूराया ॥१॥
जय जय सद्गुरू दीनदयाळा ॥ जय जय सद्गुरू क्रुपावत्सला ॥ जय जय सद्गुरू अखिल मंगला ॥ पुरविशी लळा शिष्याचा ॥२॥
जय जय सद्गुरू कृपानिधी ॥ जय जय सद्गुरू आदिचा आदी ॥ जय जय सद्गुरू निरूपाधि ॥ गुह्य बोधीं मजलागीं ॥३॥
जेणें कृपा करोन ॥ स्वामीनें बोधिलें मजलागोन ॥ तेणें झालें समाधान ॥ सांगा खूण अंतरींची ॥४॥
जें बोलवल्यामाजि आलें ॥ तें तें अवघें हरपलें ॥ अनिर्वाच्य जें राहिलें ॥ ते वहिलें सांगावें ॥५॥
ॐकार सृष्टिचें कारण ॥ त्याचे सांगावें विवरण ॥ जेणें बोधें माझें मन ॥ तेंचि आपण करावें ॥६॥
ऐसें ऐकोन वचन ॥ बोले सद्गुरू आपण ॥ वेगीं होईं सावधान ॥ सांगतों प्रश्न पुशिले ते ॥७॥
ॐकार बिंदु संयुक्त ॥ योगी जन ध्याती नित्य ॥ त्यामाजी प्रकाशज्योत ॥ त्याची दीप्ति पुढें फांके ॥८॥
अकार उकार आणि मकार ॥ बिंदु अर्धमात्रा साचार ॥ ब्रह्मा विष्णु आणि शंकर ॥ माया सुंदर चौथी कीं ॥९॥
अकार तो ब्रह्मा जाण ॥ उकर विष्णु आपण ॥ मकार तो शंकर पूर्ण ॥ अर्धमात्रा मायेची ॥१०॥
एवं ॐकार जाण ॥ पिंड ब्रह्मांड यापासोन ॥ परि गुरूकृपेविण ॥ याची खूण नकळेचि ॥११॥
अकार ब्रह्मा रजोगुण ॥ सहज करितसे उत्पन्न ॥ उकारें विष्णु आपण ॥ करी पाळण सर्वांचें ॥१२॥
मकार शंकर तमोगुण ॥ त्यांचे कर्में संहारण ॥ बिंदु माया आपण ॥ साक्षी जाण सर्वांशी ॥१३॥
जिच्या सत्तेनें तिघेजण ॥ कर्में करिती आपण ॥ परि त्यांचे कर्मापासोन ॥ साक्षित्वें करोन वेगळे ॥१४॥
तुर्याचें जें प्रकाशक ॥ तेंचि जाणावें आत्मसुख ॥ हें जाणती अनुभवी लोक ॥ इतरां देख नकळेचि ॥१५॥
पिंड ब्रह्मांडाचें कारण ॥ हा उकारचि आहे जाण ॥ ऐशीं बोलती श्रुति पुराणें ॥ चित्तीं आपण धरावें ॥१६॥
अकारें जन्मला ऋग्वेद ॥ उकारीं यजुर्वेद शुद्ध ॥ मकारों सामवेद ॥ अथर्वण वेद शुद्ध अर्धमात्रा ॥१७॥  
अर्धमात्रेचे प्रकाश जाण ॥ तें सूक्ष्म वेदाचें स्थान ॥ जेथोनि चारी वेद निर्माण ॥ तो विलक्षण त्याहोनी ॥१८॥
चारी वेद हे वाच्यांश ॥ पांचवा तो लक्ष्यांश ॥ सद्गुरू कृपेविण नये अनुभवास ॥ करितां सायास नातुडे ॥१९॥
वाच्यांशातें निरसोन ॥ लक्ष्यांश घेईजे आपण ॥ तरीच होइजे पावन ॥ धरीं खूण जीवीं हें ॥२०॥
अकारापासोन मृत्युलोक ॥ उकारीं जन्मला स्वर्गलोक ॥ मकारीं पाताळ देख ॥ अर्धमात्रा प्रकाशक या तिघांची ॥२१॥
स्वर्ग मृत्यु पाताळा ॥ जे जाणते या सकळां ॥ तेचि तुर्या वेल्हाळा जिवाचा जिव्हाळा समस्तांशीं ॥२२॥
अकारीं जन्म मनुष्य ॥ उकारीं देव सर्वस्व ॥ मकारीं जन्मलें राक्षस ॥ जन्म संतां अर्धमात्रा ॥२३॥
म्हणवोन सर्वांतें जाणती ॥ जाणोनि साक्षित्वें वर्तती ॥ शुभाशुभ न लिंपती ॥ धरीं चित्तीं खूण हे ॥२४॥
पिंड ब्रह्मांड ॐकारापासोन ॥ ॐकार सर्वांचें कारण ॥ ॐकार सगुण ब्रह्म जाण ॥ जाणती खूण अनुभवी ॥२५॥
वेदशास्त्रें बोलती ॥ तेंच स्वामी उपदेशिती ॥ परि नये आत्मप्रतीती ॥ म्हणवोन चित्ती उदास ॥२६॥
हा घोडा हा राउत झाला नाहीं ॥ तोंवरी अनुभवासिं नये कांहीं ॥ ऐसें जाणोनि स्वामीहीं ॥ कृपा लवलाहीं करावी ॥२७॥
मागल्या अध्यायीं आपण ॥ स्वामी बोललेति वचन ॥ जी वाच्यांशातें सांडोन ॥ लक्ष्यांश पूर्ण घेइजे ॥२८॥
स्थूल सूक्ष्म कारण ॥ चौथा देह महाकारण ॥ सांगितले ॐकारविवरण ॥ वेगळें करोन स्वामीहीं ॥२९॥
हा तों झाला वाच्यांश ॥ आतां सांगा लक्ष्यांश ॥ जेणें मन विसरे आपणास ॥ तया खुणेस सांगिजे ॥३०॥
चारी देह ते कोण कोण ॥ म्यां प्रत्यक्ष देखावें आपण ॥ त्यांचे वर्ण आणि स्थान ॥ मजलागोन सांगावे ॥३१॥
मागें स्वामी बोलिले  ती ॥ चौं देहांची तुझे ठायीं वस्ती ॥ जैशी भिंतीवरी चित्रांची आकृति ॥ तैशी स्थिति देहाची ॥३२॥
तें म्यां आपण देखावें ॥ देखून त्यातें अनुभवावें ॥ अनुभवोनी निरसावें ॥ ऐसें करावें कृपाळुवा ॥३३॥
जों प्रत्यक्ष अनुभवला नाहीं ॥ तोंवरी त्यातें निरसावें कांहीं ॥ म्हणवोनियां लवलाहीं ॥ सांगा सोई हिताची ॥३४॥
भोजनावेगळी तृप्ति ॥ अन्न म्हणतांहि नव्हे गुरूमूर्ती ॥ तैसेंच शब्दें नव्हे प्राप्ती ॥ अनुभवीं प्रतीती न येतां ॥३५॥
अमृत म्हणतां चिरंजीव होती ॥ तरी शब्दलाभें अनुभव प्राप्ती ॥ स्वप्नींचीं राज्यें जागृतीं भोगिती ॥ तरी हे स्थिति घडों शके ॥३६॥
मृगजळाचें लाधलें उदक ॥ अभ्रछायेशीं नांदते लोक ॥ कांसविचे घृतें दीपक ॥ सांगतां देख त्रैलोक्य कीं ॥३७॥
ससा जरी शिंगें करोन ॥ मारित सत्य पंचानन ॥ तरी शब्दें अनुभवी खूण ॥ कळती जाण शिष्याशीं ॥३८॥
शब्द अनुभव होतां प्राप्ती ॥ तरी गुरू कासया ॥ पाहतां काय न्यून आहे ग्रंथीं ॥ यथास्थिति सांगितली ॥३९॥
विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरी ॥ भागवत आणि ग्रंथांतरीं ॥ उकलोनियां संतचतुरीं ॥ बहुतांपरी सांगितली ॥४०॥
आणि संस्कृत ग्रंथ ॥ पाहिले म्यां बहुत ॥ शंकरभाष्य वेदांत ॥ तेही स्थापित हेंचि ॥४१॥
म्हणती गुरूविना ज्ञान ॥ अनुभवा नये जाण ॥ कां जे शब्दातीत पूर्ण ॥ राहिले म्हणोन गुरूकीजे ॥४२॥
यतो वाचा निवर्तंते ॥ ऐसें हे श्रुतिही साक्ष देते ॥ स्वरूपी मन बुद्ध्यादि केलें यातें ॥ पावती समस्त गुरूराया ॥४३॥
ऐसें म्यां ऐकिलें गुरूमूर्ती ॥ म्हणूनीच पृच्छा करितों बाळमती ॥ मी अपराधी सर्व पदार्थी ॥ करीं विनंती वेळोवेळां ॥४४॥
स्वामी दयावंत म्हणोन ॥ मी बोलतों उद्धट वचन ॥ कृपा करा आपुला जाणोन ॥ सांगा खूण जीवींची ॥४५॥
जे अगोचर सर्वांप्रती ॥ श्रुति म्हणती नेति नेति ॥ जें नातुडे नाना मतीं ॥ तें मजप्रती सांगावें ॥४६॥
जें जें तुम्हीं सांगितलें ॥ तें तें म्यांचि मनीं धरिलें ॥ पहिल्यापरी अंतर पडलें ॥ चित्त झालें प्रकाशरूप ॥४७॥
आतां वाटतें सर्व मायिक ॥ नावडेचि विषय सुख ॥ परी म्यां मज देखावेंचि सम्यक ॥ हें एक राहिलें तें ॥४८॥
जोंवरी मज म्यां देखिलें नाहीं ॥ तोंवरी अनुभवासीं नये कांहीं ॥ म्हणवोनि ज्ञान दृष्टी देईं ॥ लवलाहीं गुरूराया ॥४९॥
अंधापुढें निधान ॥ जरी ठेविलें आणोन ॥ तरी तो त्याचें परीक्षण ॥ कैसा जाण करील ॥५०॥
ज्यासिं झाला सर्पदंश ॥ त्वासि गोड तें लागे विष ॥ कडवट म्हणे दुग्धास ॥ कडू सर्व रस आहे कीं ॥५१॥
तैसें स्वामी सांगतां तें सत्य ॥ परी न बोधेचि माझें चित्त ॥ कां जे वस्तू आहे देहातीत ॥ ते प्राप्त मज नाहीं ॥५२॥
मागिल्या ऐकोन ब्रह्मकथा ॥ उदास वाटतें चित्ता ॥ म्यां ब्रह्मचि व्हावें आतां ॥ ऐसें गुरूनाथा करावें ॥५३॥
स्वामींची भीड धरोन ॥ जरी न करूं कांहीं प्रश्न ॥ तरी मज अंतरींची खूण ॥ पुढें कोण सांगेल ॥५४॥
कल्पतरू जोडिलिया जाण ॥ कां करावी कल्पनेची वाण ॥ जोंवरी निर्विकल्प होय मन ॥ तोंवरी आपण कां न कल्पावें ॥५५॥
चिंतामणी झाल्या प्राप्त ॥ कां चित्ताचे न पुरवावे आर्त ॥ कामधेनु आलिया घरांत ॥ कामना तेथें कां न पुरवावी ॥५६॥
भाग्यें परीस जोडल्यावरी ॥ तरी दरिद्र कां भोगावें घरीं ॥ अमृत सांडोन मृगजळावरी ॥ कोण परीस धांवेल ॥५७॥
तैसा सद्गुरू कृपामूर्ती ॥ जोडिलिया शिष्याप्रति ॥ आपलें समाधान न करोनि घेति ॥ ते वंचती सर्वथा ॥५८॥
कल्पतरू चिंतामणी ॥ सद्गुरू अधिक त्याहुनी ॥ कां जो निर्विकल्पाचा दानी ॥ ऐसें पुराणीं ऐकिलें ॥५९॥
मज जों झालीं नाहीं प्रचीत ॥ तोंवरी कैसा म्हणों मी सत्य ॥ ऐशी ऐकोनि मात ॥ गुरू हांसत बोलिला ॥६०॥
तवं गुरू म्हणे धन्य धन्य ॥ बरवा केला प्रश्न ॥ जेणें होय आत्मदर्शन ॥ ते खूण पूसली ॥६१॥
पुसल्याविण अनुभवी खूण ॥ सांगों नये उपाय करोन ॥ जोंवरी शिष्य झाला नाहीं लीन ॥ तोंवरी आपण बोलों नये ॥६२॥
काया वाचा मानसं ॥ जोंवरी अनुताप झाला नाहीं शिष्याशीं ॥ तो जों न पुसे अति आदरेंशीं ॥ तोंवरी त्यासीं सांगों नये ॥६३॥
आधीं वेदशास्त्राचें कथन ॥ सांगावें वेगळें करोन ॥ अनुताप होईल जरी हे ऐकोन ॥ तरी अनुभव खूण सांगावी ॥६४॥
शिष्याची आशा धरोन ॥ जो उपाव सांगेल ज्ञान ॥ त्याचे गुरूत्वासि पडिले खाण ॥ आली नागवण रोकडी ॥६५॥
घटीं आधीं उदक घालावें ॥ तें न गळे तरीं घृत सांठवावें ॥ पुनरपि गळे तरी उगीच असावें ॥ पुढें न बोलावें कदाकाळीं ॥६६॥
सर्वस्व सांडावें अवचितावरी ॥ चोख तरीं कीजे भांडारीं ॥ तैसें म्यां तुज निर्धारीं ॥ शब्द चातुरीं सांगितलें ॥६७॥
तें शब्द हृदयीं सांठऊन ॥ पुससी अनिर्वाच्याची खूण ॥ विवेकयुक्त वैराग्यपूर्ण ॥ तुजलागोन आहे रे ॥६८॥
आतां तुझे मनोरथ ॥ पुरवील श्री गुरूनाथ ॥ म्यां तुझें पाहिलें चित्त ॥ तरी तूं सावचित आहेशि रे ॥६९॥
फळ आधीं चाखोनि पाहिजे ॥ गोड असे तरी भक्षिजे ॥ कडू लागे तरीं त्यागिजे ॥ जेणें पाविजे सुखातें ॥७०॥
पाहोन मार्गी चेलावें ॥ कार्याविना न बोलावें ॥ आर्ताविना न सांगावें ॥ गुह्य स्वभाव कोणाशीं ॥७१॥
ज्ञातीविना सोयरिक ॥ करों जातां फजीत देख ॥ वैराग्याविना भक्तिसुख ॥ करितां लोक हांसे कीं ॥७२॥
बहिर्‍यापुढें कीर्तन ॥ विटंबनाचि जाण ॥ तैसें विवेकहीना ब्रह्मज्ञान ॥ सांगतां कोण लाभ ॥७३॥
नपुंसकासीं पद्मिण ॥ ते काय होय तयालागोन ॥ मर्कटासीं रत्नभूषण ॥ टाकी तोडोन तत्काळ ॥७४॥
खरासि अर्गजा लेपन ॥ तो धुळीमाजी लोखे जाण ॥ वेडियासीं ज्ञान कथन ॥ सुख कोणा सांगतां ॥७५॥
निर्नासिकांशी आरसा ॥ दावितां सुखावेल कैसा ॥ तुपामाजी घालितां मासा ॥ सुख सहसा न वाटॆ ॥७६॥
अनाचारीयासि आचारू ॥ चोरासि कैसा वेव्हारू ॥ अत्यंजासिं आहारू ॥ कोण निर्धारू करू शके ॥७७॥
चांदणें काय होय कावळीयासी ॥ कीं प्रकाश जैसा घुबडासीं ॥ काजळ कुंकुंविधवांसीं ॥ काय सुखास देईल ॥७८॥
भिल्लासि जैसें राउळ ॥ म्लेंच्छासि काय देउळ ॥ व्यभिचारिणीस स्वामीशीळ ॥ काय निर्मळ वाटेल ॥७९॥
उपभोग प्रेतासीं करितां ॥ तरीं तें काय संतोषे चित्ता ॥ अंधापुढें रत्न ठेवितां ॥ गेले मिथ्या सर्व हे ॥८०॥
तैसे श्रद्धेविना नर ॥ त्यांस सांगों नये पूर्ण विचार ॥ तुज देखोन माझें अंतर ॥ निवालें साचार रत्नाकरा ॥८१॥
तुज जें जें कांहीं सांगितलें ॥ तें तें त्वांचि मनीं धरिलें ॥ आणिक अनुभवात्मक पुसिलें ॥ तेंही वहिलें सांगोन ॥८२॥
परि तूं आतां सावधान ॥ बैस एकाग्र करोन मन ॥ सांगतों खूण अनुभवोन ॥ जेणें करोनि हरे भ्रांति ॥८३॥
येथें जरी अभाव धरिशी ॥ तरी तुझा तूंचि वंचिसी ॥ भाव धरल्यानें तरशी ॥ धरीं मानशीं खूण हे ॥८४॥
जें आदि आणि अवसानीं ॥ राहिलेंसे व्यापोनी ॥ जें पार्वतीप्रती शूळपाणीं ॥ नाना वचनीं बोधिलें ॥८५॥
तेंचि मछिंद्रनाथासीं ॥ प्राप्त झालें परियेसी ॥ मछिंद्रनाथें गोरक्षाशीं ॥ अती आदरेसीं सांगितलें ॥८६॥
गोरक्षीनें मुक्ताबाई ॥ नानापरी बोधिलें पाहीं ॥ जे देहींच झाले विदेही ॥ विचरे मही जीवन्मुक्त ॥८७॥
मुक्ताबाईनें चांगदेवाशीं ॥ सांगितलें ब्रह्मज्ञानासीं ॥ जेणें चौदावें वर्षीं शरीराशीं ॥ काळवंचनेसि ठेविलें ॥८८॥
त्यासी नाहीं प्राप्त पूर्ण ॥ म्हणवोनि धरलें आडरान ॥ तें मुक्ताबाईनें बोधोन ॥ त्यापासोन सोडविलें ॥८९॥
पूर्ण होता अनुभव ज्ञान ॥ दिली काळवंचना सांडोन ॥ मग राहिला सहजीं सहज होऊन ॥ नाहीं पण योजुनी ॥९०॥
चांगदेवापासोन ॥ विमळानंदा प्राप्त पूर्ण ॥ विमळानंदें जनकानंदालागोन ॥ सांगितली खूण जीवींची ॥९१॥
जनकानंदें नृसिंहनंदासीं ॥ ब्रह्मज्ञान सांगितलें त्याशीं ॥ नृसिंहनंदें पुरुषोत्तमासीं ॥ पूर्ण उपदेशीं उप्रदेशिलें ॥९२॥
पुरुषोत्तमें मुक्तानंद ॥ बोधून केला ब्रह्म शुद्ध ॥ त्यापासोन एकानंद ॥ लाधला बोध गुरूकृपेनें ॥९३॥
एकानंदापासोन पुरुषोत्तम ॥ लाधला आत्मानुभव वर्म ॥ तेणें सिद्धानंदासीं परम ॥ बोध सूक्ष केलासे ॥९४॥
सिद्धानंदापासोन ॥ मज प्राप्त झाली पूर्ण ॥ तेचि रत्नाकरा तुजलागोन ॥ सांगतों खूण जीवींची ॥९५॥
बहुत पाल्हाळाशीं काय काज ॥ तुज तत्वार्थ सांगतों निजगुण ॥ जेणें राहशी होउनी सहज ॥ बोले चोज रामानंद ॥९६॥
श्री आदिनाथापासोन ॥ जो बोध चालिला पूर्ण ॥ परंपरा सांगितली वेगळी करून ॥ जेणें पावन होईझे ॥९७॥
गुरु परंपरेचें करी श्रवण ॥ महापातक होय दहन ॥ अज्ञाना होय ज्ञान ॥ ऐसें महिमान स्मरणाचें ॥९८॥
जें परंपरेपासोन ॥ मज पावेतों आलें ज्ञान ॥ तेंचि मी सांगतों तुजलागोन ॥ करी मन एकाग्र ॥९९॥
जें मन बुद्धींस अगोचर ॥ परा वाचा नेणे पार ॥ व्यापोन उरलें चराचर ॥ तें साचार सांगतों ॥१००॥
जें एकचि अनेकीं आहे ॥ परी शुभाशुभीं लिप्त नोहे ॥ प्रकाशरूप कोंदलें पाहे ॥ तेही सोई सांगतों ॥१॥
जें सर्वीं सर्वत्र कोंदलें ॥ आडळेविना संचलें ॥ कांहीं न होऊन सर्व झालें ॥ तें वहिलें सांगतों ॥२॥
जों त्रिगुण त्रिपुटीरहित ॥ ज्यासि नाही आदि अंत ॥ प्रकाशिलें शीत उष्णातीत ॥ तं त्वरित सांगतो ॥३॥
जेथें परा वाचा परतली ॥ नाना मतें राहिली ॥ कोंदोन सर्वत्री उरलीं ॥ ते गुह्य बोली सांगतों ॥४॥
जें आहे नाहीं म्हणता ॥ न येचि गा सर्वथा ॥ तें गुह्य तुज सुता ॥ त्वरें आतां सांगतों ॥५॥
तर्कवितर्कातें सांडोन ॥ वेगळा होय रे सावधान ॥ विषयापासोन काढीं मन ॥ करीं श्रवण आदरेशीं ॥६॥
विषयासीं पाठी ठेवोनी ॥ राहें निर्विकल्प होऊनी ॥ शब्द घे वरच्यावर झेलोनी ॥ धरीं मनीं खूण हे ॥७॥
मन जों एकाग्र झालें नाहीं ॥ तोंवरी हित नोहे कांहीं ॥ मनेंचि बद्धमुक्तता पाहीं ॥ मनेंचि सोंई प्रपंचाची ॥८॥
मन नाना कल्पना करीत ॥ मन सुखदु:ख भोगित ॥ मनेंचि होय यातायात ॥ मनेंचि जात अध:पाता ॥९॥
नाना वेदशास्त्र श्रवण ॥ हे मनबोधार्थ करावें जाण ॥ मन जरीं झालें लीन ॥ तरी पावन आतांचि तूं ॥११०॥
म्हणवोन सर्वांपासोन ॥ काढोनि एकाग्र करीरे मन ॥ सांगतों कथा ते ऐकोन ॥ विचार आपण करावा ॥११॥
भावें केलियावरी श्रवण ॥ सारासार पाहावें विचारोन ॥ विचारावेगळें ब्रह्मज्ञान ॥ होय कोठोन प्राण्यासीं ॥१२॥
म्हणवोनि विचार हाचि सार ॥ विचारेंचि पावे पैलपार ॥ विचारेंचि थोर थोर ॥ ब्रह्म साचार झालेती ॥१३॥
विचारेंचि हरे भ्रांती ॥ विचारेंचि मोक्ष मुक्ती ॥ विचारेंचि होय प्राप्ती ॥ ब्रह्मस्थिती प्राण्यांसीं ॥१४॥
जैसें मृगजळ दुरोन ॥ जळासारिखेंचि दिसतसे जाण ॥ पाहतां जवळी जाऊन ॥ मिथ्या त्वरें होत असे ॥१५॥
भ्रमें रज्जूचा सर्प झाला ॥ तो विचारें करोन भ्रम गेला ॥ स्वप्नीं नाना पदार्थ देखिला ॥ विचारें केला मिथ्याचि तो ॥१६॥
विचारेंचि शुभाशुभ कळे ॥ विचारेंचि द्वैताद्वैत पळे ॥ विचारेंचि भ्रांती मावळे ॥ विचारें गळे मीतूंपण ॥१७॥
एकीं अनेकीं भासत ॥ तें विचारेंचि नासत ॥ विचारें विवेक प्राप्त ॥ असे होत प्राण्यांशीं ॥१८॥
विचारें हरे अज्ञान ॥ विचारेंचि होय ज्ञान ॥ ज्ञानेंचि आकळे मन ॥ अन्य साधन न दिसे ॥१९॥
विचारावेगळा नर ॥ तो पशुरूप साचार ॥ प्रपंच वनामाझार ॥ फिरे गव्हार अहोरात्र ॥१२०॥
तृष्णा तृष्णातें भक्षित ॥ चिंतेच्या दरडी चढे उतरत ॥ आशेसंगें असे फिरत ॥ नाहीं हेत आपुला ॥२१॥
तें अज्ञान मंदमती ॥ म्हणवोनि नाहीं भाव भक्ती ॥ तेणें यातायाती भोगिती ॥ अविचारें गती ऐशी झाली ॥२२॥
तरीं तूं ऐसें न करी ॥ मन आवरोनियां धरी ॥ श्रवण केलियावरी ॥ तूं विचारी सारासार ॥२३॥
तरि सारतें अविनाश ज्योत ॥ असार तें अदृश्य भासत ॥ जें आलें मन बुद्धी आंत ॥ तें नासत सत्यत्वें ॥२४॥
जें जें येईल मन बुद्धी आंत ॥ तें तें तूं जायरे सांडित ॥ मन बुद्धी तेथे हारपत ॥ तेंचि सत्य स्वरूप कीं ॥२५॥
आतां जें जें मी सांगत आहें ॥ तें तें तूं विचारीत जाय ॥ विचारोनि पुढेंचि होय ॥ धरीं स्यो सांगितली ॥२६॥
जैसें पायीं चालतां पंथ ॥ चालवेना तो मागेंचि राहत ॥ पुढें पाहोनियां चालत ॥ असें हो प्राणियासीं ॥२७॥
तैसें अनिर्वाच्य पूर्ण ॥ जें सर्वत्रीं एकसमान ॥ जें स्वप्रकाशें कोंदलें घन ॥ राहिलें व्यापोन जैसें तैसें ॥२८॥
तें आपुलेंपणें जाण ॥ जेथें लयासिं पावतें मन ॥ तेथें जातों मी घेऊन ॥ येईं झडकरोन माघारा ॥२९॥
जैसें कानाविना ऐकावें ॥ नेत्रेंविना पहावें ॥ चरणाविना चालावें ॥ मनेंविना घ्यावें सुख तें ॥१३०॥
माझा शब्द पुढें करोन ॥ तूं मागमागें येईं आपण ॥ शब्द पावेल विश्रांती पूर्ण ॥ तेथें ठाण करी रे ॥३१॥
जैसें पुस्तक वाचितां आपण ॥ वाचिलें तें सांडी पान ॥ पुढें वाची जेंवीं विचारोन ॥ तैसा शब्द सांडोन पुढें होय ॥३२॥
कां जें शब्द त्रिगुणात्मक आहे ॥ वस्तु त्रिगुणातीत पाहें ॥ ते शब्दीं येईल का ॥ म्हणवोनियां सांडिजे ॥३३॥
स्वरूपीं शब्दाचें न चले कांहीं ॥ परि शब्दावीण नकळे अनुभव सोई ॥ अनुभवीं शब्दाचि नाहीं ॥ तेथें कांहीं अनुवाद ॥३४॥
म्हणवोन शब्द करोनियां पुढारी ॥ तूं येईरे माघारीं ॥ चारी घाट उतरोनि निर्धारीं ॥ जावों घरीं अनुभवाचे ॥३५॥
हा मार्ग अति कठिण असे ॥ चौघां ठिकाणी बैसलेसे ॥ जावयाकारणें कोणा रीग नसे ॥ करितां वायेसें जप तप ॥३६॥
पहिले घाटीं ब्रह्मा आपण ॥ बैसलासे मार्ग धरोन ॥ तेथें आहे मोठें रान ॥ मार्ग अनन्य फांकले ॥३७॥
शास्त्रदर्शन चारि वर्ण ॥ हे मार्ग भिन्न भिन्न ॥ परि येहिं घेतलें आडरान ॥ तेंचि वन वसविलें ॥३८॥
पुढें जावयासीं रीग नाहीं ॥ चुकले सद्गुरूची सोई ॥ पडले साधनाचे प्रवाहीं ॥ अहंता देहीं धरोन ॥३९॥
ज्याहीं देहीं अहंता धरिली ॥ त्यांनी या घातींच वस्ती केली ॥ जेहिं देहअहंता सांडिली ॥ तेचि गेले उतरोन ॥१४०॥
तेथें देहअहंतेचें घ्यावें दान ॥ तेणें ब्राह्मयाचें होय समाधान ॥ मग त्याची आज्ञा घेऊन ॥ पुढें आपण चालावे ॥४१॥
दुसरे घाटीं विष्णु आपण ॥ बैसलासे समुदाय करोन ॥ तेथें असे कल्पनेचें रान ॥ तें कठिण उल्लंघितां ॥४२॥
अहं जीवाचे देतां दान ॥ विष्णु संतोषे आपण ॥ मग त्याची आज्ञा घेऊन ॥ पुढें आपण चालावें ॥४३॥
संकल्पविकल्पात्मक जीव ॥ तो विष्णूसीं अर्पूनियां सर्व ॥ शिवोहं धरोनियां भाव ॥ सांडिलें वैभव मागील तें ॥४४॥
तिसरे घाटीं महेश ॥ ठाणें बैसला सावकाश ॥ शिवोहं देवोन त्यास ॥ व्हावें निराश सर्वस्वें ॥४५॥
पहिले घाटीं देहाभिमान ॥ दुसरे घाटीं जीवपण ॥ तिसरे घाटीं शिव आपण ॥ चाली देवोन पुढें कीजे ॥४६॥
चौथे घाटीं तुर्याराणी ॥ जें ब्रह्मादिकांची जननी ॥ जिचे सत्तेनें वर्तति देव तिन्ही ॥ जे खाणी प्रकाशाची ॥४७॥
तेथें अहं ब्रह्मास्मि हेंचि जाण ॥ निरहेत होइजे देवोन ॥ अलक्षपुरीस जावें आपण ॥ तेथें नाहींपण येतसे ॥४८॥
नाहीं होतां सर्व होइजे ॥ ऐसें भाग्यलाहासिं तूंचि तुझें ॥ मन अनर्वाची सहजी सहजें ॥ साक्षित्वां वोझें झालासी ॥४९॥
देहाभिमान वैखरी वाचा ॥ पहिले घाटीं वेंचु त्याचा ॥ मग त्यातें टाकोन विष्णुचा ॥ मार्ग साचा धरावा ॥१५०॥
मध्यचा वाचा जीवपण ॥ दुसरें घाटीं हे देवोन ॥ केवळ शिवपण घेऊन ॥ जावें आपण तिसरे घाटीं ॥५१॥
तिसरे घाटीं शिवपण ॥ आणी पश्यंती वाचा जाण ॥ हे देवोनियां आपण ॥ पुढेंचि पूर्ण चालावें ॥५२॥
अहं ब्रह्मास्मि परा वाचा ॥ चवथे घाटीं वेचू त्याचा ॥ चार्‍हीं वेद नाना मतांचा ॥ रीग याचा येथवरी ॥५३॥
येथोनि शब्दाचा पसारा ॥ मागेंचि राहिला सारा ॥ येथवरी यावें कोणी पुरा ॥ तोचि चराचरामाजी धन्य ॥५४॥
पुढें अनिर्वाच्य निरहेत होऊन ॥ आपणासिं नाहींपण योजून ॥ निर्गुण निर्विकार होऊन ॥ अलक्षपुरीं आपण जाइजे ॥५५॥
जरीं सद्गुरू मार्गीं भेटे ॥ तरीच या घाटींची वाट फुटे ॥ नाहींतरीं अवघेंचि खोटें ॥ मानीं गोमटें वचन हें ॥५६॥
तुला जरी हें देवेल ॥ तरी मज बरोबरी चाल ॥ नाहीं तरी नको बोलूं बोल ॥ वर्म सखोल आहे हें ॥५७॥
तुज मी तेथें नेईन ॥ मग तूं करिशी अनुमान ॥ तेणें तुझी होईल हाण ॥ सत्य वचन मानावें ॥५८॥
या मार्गें व्यासादिक गेले ॥ ते अलक्षपुरीं तें पावले ॥ त्यांची पाहतां पाउलें ॥ आपण वहिले जाऊंरे ॥५९॥
ऐसें ऐकोन वचन ॥ बोले रत्नाकर कर जोडून ॥ स्वामी विलंबु न करावा आपण ॥ जावें घेवून दिनांसीं ॥१६०॥
मी सर्वस्व होउनी उदास ॥ स्वामीची धरिली हे कास ॥ पुरवावी दीनाची आस ॥ तोडा पाश कल्पनेचे ॥६१॥
जें जेथें देववाल ज्यासीं ॥ तें तें मी देईन त्यासीं ॥ विलंब न करीन वेगेसीं ॥ करा पामरासीं अनुभव ॥६२॥
तंव सद्गुरू म्हणे रे सावधान ॥ तुज सांगतों गुह्य खूण ॥ माझ्या शब्दातें पुढें करोन ॥ यावें आपण माघारें ॥६३॥
तरी याची देहीं याचि डोळां ॥ भोगिजे अनुभवाचा सोहळा ॥ हें ज्ञान नाहीं सकळां ॥ भोगी अवलीळा पूर्ण ब्रह्म ॥६४॥
स्थूळ सूक्ष्म कारण ॥ चौथा देह महाकारण ॥ हेचि चारी घाट जाण ॥ तुजलागोन सांगितले ॥६५॥
प्रथम घाट रत्कवर्ण ॥ त्यांचे औट हात प्रमाण ॥ जागृती अवस्था रजोगुण ॥ दैवत जाण ब्रह्म असे ॥६६॥
आकार मातृका त्रिकुट स्थान ॥ वैखरी वाचा अर्धशून्य ॥ स्थूळ देह ऋग्वेद जाण ॥ रत्कवर्ण पृथ्वी सर्व ॥६७॥
सृजन क्रिया पूर्वदिशा इंद्रदेव ॥ नैरृत्य कोण खेचरी मुद्रा ॥ पिपलीका मार्गींचें वैभव ॥ धनकासे सत्यलोक ॥ विश्वअभिमानी ॥६८॥
तंतुवाद्यें गायत्री प्रथम - पाद ॥ गणेश दैवत क्रियाशक्ति शुद्ध ॥ क्षरनिर्णय वडवाग्नि विषयानंद ॥ अहंकार द्वंद्वभाव ॥६९॥
जें जें रजोगुणापासोन उत्पन्न ॥ तें तें रजोगुणीं चढविजे आपण ॥ त्याचेंही सांगतो लक्षण ॥ ऐक सावधान रत्नाकरा ॥१७०॥
इंद्रियें आणि विषयपंचक ॥ हें रजोगुणापासोन जाहलें देख ॥ हें तेथेंचि ठेउनी सम्यक ॥ व्हावें विन्मुख सर्वांसीं ॥७१॥
यासि देउनियां पाठी ॥ चालिरे दुसरिया घाटीं ॥ सर्वांचे साक्षी होउनियां उठाउठी ॥ धरीं पोटीं खुण हें ॥७२॥
जरी याचा लोभ धरिशी ॥ तरी स्वहितातें वंचिशी ॥ देउनियां नाशिवंताशीं ॥ अविनाशासीं साधावें ॥७३॥
दुसरा घाट अंगुष्ठ प्रमाण ॥ तो असे श्वेतवर्ण ॥ तेथें विष्णु दैवत आपण ॥ राज्य जाण करितसे ॥७४॥
श्रीहटस्थानॐकार मातृका ऊर्ध्वशून्य ॥ लिंगदेह दीर्घ मातृका यजुर्वेद श्वेतवर्ण ॥ आप तत्व पाळण क्रिया पश्यंति दिशा वरुण ॥ ईशान कोण ईशान देव ॥७५॥ वामदेव ब्रह्मशुल्क कर्पुरवर्ण ॥ भूचरी मुद्रा धूम्रीं कळामार्ग जाण ॥ मठाकाश कंठस्थान ॥ वैकुंठ लोक पूर्ण ॥ अभिमानी आपण तेजस ॥७६॥
वितंत वाद्यें द्वितीयपाद गायत्री ॥ सूर्यदेवता ज्ञानशक्ती ॥ अक्षरनिर्णय मंदाग्नीप्रती ॥ योगानंद कोहं अहंकाराप्रती ठेविरे ॥७७॥
जेथें स्वप्नअवस्था स्वप्नगुण ॥ मध्यम वाचा जाण ॥ जें जें झालें सत्वगुणापासोन ॥ तें तेथेंचि जाण ठेविजे ॥७८॥
सत्वगुणापासोन ॥ देवता आणि अंत:करण ॥ हें विष्णूसीं देवोन ॥ साक्षी होऊन चालावें ॥७९॥
त्याचें त्यासीं अर्पून ॥ विष्णूचें कीजे समाधान ॥ मग त्याची आज्ञा घेऊन ॥ पुढें आपण चालावें ॥१८०॥
तिसरा घाट श्यामवर्ग ॥ त्याचें अर्धपर्व प्रमाण ॥ तेथें महेश आपण ॥ राज्य जाण करितसे ॥८१॥
कुंडलें ब्रह्मदेव गोल्हाट स्थान ॥ मकार मातृका पश्यंति वाचा मध्य शून्य ॥ कारण देह क्लृप्त मातृका सामदेव तमोगुण ॥ तेजें तत्व श्यामवर्ण ॥ प्रळयक्रिया ॥८२॥
दक्षिण दिशा यमदेव ॥ अग्नी कोण अग्नी देव ॥ चाचरी मुद्रा जोतिकळा कपिमार्गाचें वैभव ॥ महदाकाश हृदय स्थान ॥ सर्व ठेविरे ॥८३॥
कैलास लोक अज्ञान अभिमानी ॥ मृदंग वाद्यें गायत्री तृतीयपाद ठेवोनी ॥ विष्णु देवता इच्छाशक्ति लागोनी ॥ कूठस्थ निर्णय उदराग्नी ॥ अद्वैतानंद ॥८४॥
सोहं अहंकार आपण ॥ जें जें सांगितलें तें ठेवोन ॥ या सर्वांसीं पाठ देवोन ॥ पुढेंचि जाण चालावें ॥८५॥
सुषुप्ती अवस्था तमोगुण ॥ पश्यंति वाचा देइजे आपण ॥ जें झालें तमोगुणापासोन ॥ तेंचि महेशाशीं जाण समर्पावें ॥८६॥
पृथ्वी आप तेज वायु गगन ॥ हे झाले तमोगुणापासोन ॥ हे त्याचे त्यास देऊन ॥ करावें साधन आपुलें ॥८७॥
रत्नाकरा म्यां जें सांगीतलें ॥ तें तें तुवां त्यागिलें ॥ तरी सांगावें आतां वहिलें ॥ खालीं राहिलें काय तें ॥८८॥
आऊट हस्त रक्तवर्ण ॥ तें म्यां टाकिलें अनुभवेंकरोन ॥ तेथोनि काढोनी मन ॥ आलों घेऊन श्वेतवर्ण ॥८९॥
तें अंगुष्टप्रमाद श्वेतवर्ण ॥ तेथें सत्वगुणाचें जनित ठेऊन ॥ त्यापासोन मन काढोन ॥ आलों जाण शामवर्णीं ॥१९०॥
तें शामवर्ण अर्धपर्व असे ॥ तेथें तमोगुनाचें जनित सर्व असे ॥ ठेविलें म्यां अनायासें ॥ आतां मी असें एकला ॥९१॥
जागृत होतां स्वप्न नासे ॥ तैसें तिहीं गुणातें झालें असे ॥ मी याचा साक्षी असें ॥ जाणत असें तिघातें ॥९२॥
आतां मजमाजी विकार नसे ॥ मी मी तिघांचा जाणता असे ॥ कर्मा - कर्मीं लिप्त नसे ॥ तुमचे कृपें मज ऐसें झालें स्वामी ॥९३॥
आतां चौथा घाट तो कोण ॥ त्याचें सांगावें लक्षण ॥ तवं सद्गुरू बोलिलें आपण ॥ भला भला म्हणोन आश्वाशिला ॥९४॥
तिहीं घाटापासोन ॥ तूं मुक्त झालाशि रे आपण ॥ आतां होई रे सावधान ॥ सांगतों खूण चौथ्याची ॥९५॥
नीळवर्ण मसुरप्रमाण ॥ तेथें ईश्वराचे अधिष्ठान ॥ तेथें तुर्या अवस्था साक्षीपण ॥ भावें करोन चढवावें ॥९६॥
अर्धचंद्र ईश्वरदेव जाण ॥ ईकार मातृका औट - पिंड स्थान ॥ महाकारण महाशून्य ॥ अर्धमात्रा अर्धवर्ण वेद कीं गा ॥९७॥
शुद्ध सत्व नीळवर्ण ॥ वायो तत्व सूर्यक्रिया जाण ॥ उत्तर दिशा कुबेरदेव आपण ॥ वायूकोण वायुदेव ॥९८॥
नील सुनील शुद्ध पीतवर्ण ॥ अगोचरी मुद्रा आत्मभाशनी मुद्रा जाण ॥ ज्वाला - कल्पनी मूर्धस्थान ॥ चिदाकाश आपण मान मार्ग ॥९९॥
आश्रय लोकप्रत्यगात्म अभिमानी ॥ घनाकाशें वाद्यें ठेवोनी ॥ चतुर्थपादा गायत्री ॐकारालागोनी ॥ रुद्रदेवता मानी आदिशक्ती ॥२००॥
आत्मनिर्णय शोकाग्नि ॥ विदेहनंदा शिवोनी ॥ पुढेंचि जावें लवकरोनी ॥ धरीं मनीं खूण हे ॥१॥
अहं ब्रह्मास्मि हें वचन ॥ तेथेंचि ठेवावें आपण ॥ पुढें अनिर्वाच्य पूर्ण ॥ नाहीं होऊन जाइजें ॥२॥
चार्‍ही वेद चार्‍ही वाचा ॥ येथपर्यंत गलबला त्यांचा ॥ पुढें अहंब्रह्मयाचा ॥ होय साच अभाव ॥३॥
त्या नीलवर्णामाझारी ॥ असे विजूचे प्रकाश परी ॥ शीत उष्णातीत निर्धारी ॥ प्रकाश अंबरीं कोंदला ॥४॥
तें अलक्षपुर नगर पाहीं ॥ जेथें दिवस रात्र नाहीं ॥ तों तूं व्यापक सर्वांठायीं ॥ धरीं सोई आपुली ॥५॥
बिंदु ब्रह्म सदाशिव देख ॥ पुण्यें गिरी भ्रमर गुंफा एक ॥ परात्पर वाचा ॐकार मातृका ॥ निरशुदेखा देख निरामय ज्ञान ॥६॥
अनुचर्य मातृका सूक्ष्म ॥ वेद विर्गुण शुद्ध सत्त्वगुण ॥ अवकाशत्व शुद्ध पीतवर्ण ॥ चंद्रक्रिया ऊर्ध्वदिशा ब्रह्मदेव जाण ॥ अधोदिशा विष्णुदेव ईशान ॥ सर्व ब्रह्मऋक ॥७॥
उन्मनी मुद्रा शुद्ध स्फटिकवर्ण ॥ शंखमार्ग निराकाश शिखास्थान ॥ पूर्ण बोधिनी मुद्रा जाण ॥ कळातित कळा निरंजन ॥ अभिमानी ॥८॥
निराश्रयें लोक सुस्वर वौशवाद्यनाद ॥ शक्तीदेवता पंच परमार्थ पाद ॥ परा शक्ती ब्रह्माग्नि ब्रह्मानंद ॥ क्षेत्र ज्ञान निर्माण शुद्ध ॥ अनामये अहंकार ॥९॥
पांचवें ज्ञान देहीं ठेउनी ॥ राहावें नाहींच होऊनी ॥ सर्व आपणामाजी जाणोनी ॥ निरहेत होउनी असिजे ॥२१०॥
 तूं अससी ज्ञानरूप आपण ॥ परि देहसंगें भ्रमला होताशि जाण ॥ संदेह असेल तरी वचन ॥ बोल लवकरोन रत्नाकरा ॥११॥
तूं स्वता: ब्रह्म आहेशी ॥ हें म्यां सांगितलें होतें तुजशी ॥ तें आलें किंवा नाहीं अनुभवासी ॥ आतां वेगेंशीं बोलावें ॥१२॥
तूं मागें म्हणत होतासि आपण ॥ जे हा घोडा हा राउत दावा करून ॥ मज दाखवाल तेव्हां समाधान ॥ माझें जाण होईल ॥१३॥
जें मन बुद्धीस अगोचर होतें ॥ म्यां सांगीतलें तूंते ॥ त्वां ओळखिलें किं नाहीं आपणातें ॥ सांग मातें असेल तैसे ॥१४॥
स्वामीचें कृपेंकरोनी ॥ म्यां ओळखिलें मजलागोनी ॥ मी स्वत: प्रकाशाची खाणी ॥ असे व्यापोनि सर्वांतें ॥१५॥
आतां मज म्यां ओळखिलें ॥ तेव्हां माझें मीपण तें गेलें ॥ आतां सद्गुरूपचि संचलें ॥ आलें गेलें दोन्हीं वावो ॥१६॥
मजचि भ्रम झाला होता ॥ तो भ्रमचि गेला सद्गुरुनाथा ॥ मी तो अनादि आतां ॥ ठावों द्वैता नसेचि कीं ॥१७॥
स्वरूप प्रगटचि असे ॥ जें सर्वां जाणत असे ॥ डोळीं डोळां जें गा वसे ॥ प्रकाश भासे सोज्वळ ॥१८॥
दृष्टीचें अग्रशून्याचें सार ॥ तेंचि स्वरूप वस्तीचें घर ॥ जेथोन हा प्रकाश सुंदर ॥ भासे चराचर ज्या तेजें ॥१९॥
त्याच सत्तेनें सर्व वर्तती ॥ परि त्यातें कोणीं न जाणती ॥ ते अतर्क्य नाना मती ॥ ते मजप्रती भासलें ॥२२०॥
मी स्वता: प्रकाश असें ॥ माझ्या प्रकाशें सर्व प्रकाशे ॥ मी मजमाजीच असें ॥ ठाव नसे भेदाशीं ॥२१॥
आतां मी माझा एक ॥ मजमाजी भासे अनेक ॥ त्यानें किं मीचि चाळक ॥ साक्षित्व देख सकळांसीं ॥२२॥
ऐसा मज अनुभव आला ॥ तुमचें कृपेनें संदेह गेला ॥ स्वामी उदीम फळासि आला ॥ सर्वत्रीं भासला एक गुरू ॥२३॥
ऐसें म्हणोनियां चरणीं ॥ मिठी घातली तत्क्षणीं ॥ मनाचे लयें करोनी ॥ गेलों मिळोनी पूर्णब्रह्मीं ॥२४॥
राहिलें नेत्राचें भान ॥ उडालें शब्दाचें भान ॥ हें तुमचें उटलें शब्दाचें भान ॥ हें तुमचें उटलें ठाणें ॥ नाहींपण संचले ॥२५॥
परा वाचा नेणे पार ॥ तेथें कैंचा वैखरीचा उच्चार ॥ जेथें महाकारण नाहीं थार ॥ तें शरीर किमर्थ ॥२६॥
तवं सद्गुरू म्हणती सावधान ॥ बोले बोल रे मजशीं वचन ॥ तूं राहे रे साक्षि होऊन ॥ हें मूर्खपण सोंडीं रे ॥२७॥
तूं चौथा देहाचा साक्षि आहेसी ॥ नातें नाहीं तुज यासीं ॥ सावध होउनियां वेगेंसीं ॥ बोल मशीं उतावेळ ॥२८॥
पिंड ब्रह्मांडींचें विवरण ॥ तुज सांगेन वेगळें करून ॥ राहसि साक्षि होऊन ॥ ते पैं खूण सांगतों रें ॥२९॥
तूं ब्रह्मरूप झालासी ॥ परी साक्षित्वासीं नेणसी ॥ म्हणवोन देहभावनेतें सांडिसी ॥ सावध होईं वेगेसीं शिष्यवत्सा ॥२३०॥
कर ठेवोनियां शिरीं ॥ सावधान केलें झडाकारीं ॥ संबोखुनीयां नाना परी ॥ समोर बैसविलें ॥३१॥
म्हणती तुज व्हावया आत्मदर्शन ॥ म्यां सांगितलें संक्षेपेंकरोन ॥ कां जे ज्ञानदृष्टी देवोन ॥ तोडी बंधन चौदेहांचें ॥३२॥
तुज आत्मदर्शन तें झालें ॥ परि साक्षित्व नाहीं ठसावलें ॥ म्हणवोन देहभावनेतें सांडिलें ॥ आतां वहिलें सावधान ॥३३॥
तूं पिंड ब्रह्मांडांचा जाणता ॥ असशी पिंड ब्रह्मांडांचे परता ॥ हें वेगळालें करोन आतां ॥ तुज तत्वतां सांगेन ॥३४॥
तूं स्थूळ सूक्ष्म नव्हेशी ॥ महाकारणाचा साक्षी आहेशी ॥ मनबुद्धी चित्त अहंकार जाणशी ॥ साक्षित्वें अससी वेगळा ॥३५॥
तूं म्हणतोशी मीच मन ॥ म्हणवोनि स्वरूपीं करितों लीन ॥ आतां राहशीं देहीं विदेही होऊन ॥ ते खून सांगतों रे ॥३६॥
कर्म करोनि अकर्ता ॥ भोग भोगुनी अभोक्ता ॥ ऐशी जे आहे कथा ॥ ते हातां सांगतों रे ॥३७॥
चतुर्थ अध्याय पूर्ण झाला ॥ आतां पांचवा आरंभिला ॥ रामानंद म्हणे रत्नाकरा वहिला ॥ चित्त कथेला दीजे बापा ॥३८॥
जें सांगता बोलतों नये ॥ ते तुज दिली अनुभव सोये ॥ आतां साक्षि होऊनियां राहें ॥ तोचि उपाय सांगतों रे ॥३९॥
जें परंपरापासोन ब्रह्मज्ञान ॥ रत्नाकरा आलें रे चालोन ॥ तेचि तुज सांगितली खूण ॥ हें दोहन उपनिषदांचें ॥२४०॥
अभक्त पाखंडीयासीं ॥ हें गुह्य सांगों नये सहसा त्यासीं ॥ हे खूण धरोनियां मानशीं ॥ जतन यासीं करीं रे ॥४१॥
जरी यातें तूं उपेक्षिसी ॥ तरीं आपणा आपण वंचिशी ॥ हे ज्ञान नाहीं सकळांसीं ॥ विरळा कोणासी असेरे ॥४२॥
निवृत्ति ज्ञानेश्वर ॥ नामा आणि कबीर ॥ एकनाथा गोराकुंभार ॥ कलियुगामाजी ज्ञान यांसीं ॥४३॥
सोपान मुक्ताबाई ॥ परमानंद जोगा पाहीं ॥ भानुदास मिराबाई ॥ रामदास सोई लागलासे ॥४४॥
वेणाबाई विसोबा खेचर ॥ तुकोबा नरहरी सोनार ॥ नरसि मेहता रोहिदास चांभार ॥ संत अपार अनुभवी ॥४५॥
चहूं युगामाजी कोणी ॥ जे जे झाले ब्रह्मज्ञानी ॥ ते याचि अनुभवें करोनी ॥ सत्य मानीं वचनातें ॥४६॥
तेंचि म्यां तुज ज्ञान ॥ सांगितलें उकलोन ॥ आतां याशी करीं जतन ॥ होशी पावन तुझा तूंचि ॥४७॥
ऐसें ऐकोनि सद्गुरूवचन ॥ बोले रत्नाकर कर जोडून ॥ सांगा पिंडब्रह्मांडांचें विवरण ॥ चौं देहांचें ज्ञान करा मज ॥४८॥
ईश्वराचे चार्‍ही देह कोण्कोण ॥ त्यांचें काय असे लक्षण ॥ पिंडींचें देहाचें विवरण ॥ क्रुपा करोन सांगावें ॥४९॥  
ब्रह्मांडीच्या देहाचें विवरण ॥ करोनि सांगा पिंडाचें ज्ञान ॥ जेणें उडे संदेहाचें भान ॥ तेंचि आपण करावें ॥२५०॥
स्वरूपानुभवाचे विषयीं ॥ मज कांहीं संदेह नाहीं ॥ आत्मप्रतीति गुरूप्रतीति पाहीं ॥ शास्त्रप्रचीत ठाईं ठेविले ॥५१॥
जैसा करतळावरी आंवळा ॥ तैसें मज ज्ञान दाखविलें डोळां ॥ माझिया पाळिला लळा ॥ केलें अवलिळा पूर्णब्रह्म ॥५२॥
जे ब्रह्म जाणावयासिं गेलो ॥ तो माझा मीपणासि वचलों ॥ स्वयेंचि ब्रह्म झालों ॥ असें नाडलों द्वैतभावा ॥५३॥
जैसें जळीं पडतां लवण ॥ जाय जळरूप होऊन ॥ प्रळयंबूचे परी जाण ॥ मनोलागोन होतसे ॥५४॥
आब्रह्मस्तंभपर्यंत ॥ आत्मस्वरूपचि भासत ॥ मन असेल यातें पावत ॥ उडतो हेत शरीराचा ॥५५॥
शरीर हें नाशिवंत ॥ मी अविनाश शाश्वत ॥ मज नाहीं जात गोत ॥ शरीर कर्मातें आहे कीं क्गा ॥५६॥
शरीर कर्माकर्म होय ॥ म्हणवोन सांडितों याची सोय ॥ याचे संबंधेंहोत असे अपाय ॥ तरी त्याचें काम काय मज ॥५७॥
स्वामी हे जी सांगितली खूण ॥ तेथें बैसतों मीच जावोन ॥ तो पिंडब्रह्मांडाचें भान ॥ उडातें जाण निश्चयीं ॥५८॥
मी देहासीं असे कंटाळलों ॥ म्हणवोन स्वरूपींच लीन झालों ॥ आतां स्वामींनीं सावध केला गेलों ॥ म्हणवोन आलों देहभावा ॥५९॥
तंव सद्गुरू म्हणे सावधान ॥ पुढिल्या अध्यायीं सांगेन ॥ जेणें राहशीं साक्षी होऊन ॥ तें विवरण सांगतों रे ॥२६०॥
सिद्धानंदाचेनि प्रसादे ॥ बोले रामनंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥२६१॥
इतिश्री चतुर्थोद्याय: ॥४॥ओंव्या॥२६१॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
इति दीपरत्नाकर चतुर्थोध्याय: समाप्त ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP