भारतीय संस्कृतीला ललामभूत ठरतील असे अनेक ग्रंथ निर्माण झाले आहेत. अशा ग्रंथांच्या वाचनाने व नियमितपणे पारायणे करण्याने मानवाचे जीवन सुसह्य होऊन जाते. दु:ख, पीडा, वेदना, दारिद्र्य, भूतबाधा, करणी - धरणी इ. चे निरसन होते. जीवनात आनंद भरून रहातो. धनसंपत्ती, आरोग्य व दीर्घायू लाभते. तसेच उत्तम प्रकारची संतती प्राप्त होते. अशा ग्रंथांपैकी दीपरत्नाकर हा एक उत्तम ग्रंथ आहे.
श्रीरामानंद स्वामी हे एक अवतारी सत्पुरुष मानले जातात. रत्नाकर हा त्यांचा पट्टशिष्य होता. तो त्यांचा सच्छिष्य असल्यामुळे गुरूंचा त्याच्यावर विशेष लोभ होता. त्याच्या मनात आलेल्या काही शंका दूर करून त्याचे अज्ञान नष्ट करण्यासाठी, त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा दीप पेटविण्यासाठी रामानंद स्वामींनी या ग्रंथाची रचना केली आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ इ. अनेक थोर थोर संतांनी या कलियुगात अपार कष्ट करून, समाजात होणारी पीडा, व्यथा, वेदना सहन करून जो जो जीवनानुभव मिळविला, आध्यात्मिक आनंद मिळविला, तो अनुभव रामानंद स्वामींनी दीपरत्नाकर या ग्रंथात ओवीबद्ध करून सांगितला आहे. तो ओवीबद्ध ग्रंथ सामान्य वाचकांच्या सोयीसाठी गद्य स्वरूपात साध्या, सरळ भाषेत, छोट्या - छोट्या कथांच्या स्वरूपात लिहिलेला ग्रंथ म्हणजे दीपरत्नाकर ग्रंथ होय.
सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात सलग चार / पाच तासांची बैठक मारून पारायण करणे अनेकांना वेळेअभावी शक्य होत नाही. म्हणून या ग्रंथाचा प्रत्येक अध्याय संक्षेपाने एक - एक पानात लिहिला आहे. पंधरा अध्यायांची पंधरा पाने थोडक्या वेळेत वाचणे आता सर्वांना सहज शक्य होणार आहे. शिवाय मूळ ग्रंथ - वाचनाचे जे फायदे आहेत, तीच सर्व तर्हेची फळप्राप्ती या ग्रंथाच्या वाचनाने होणार आहे. म्हणून याचे वाचन महत्त्वाचे आहे.
यात गुरूने आपल्या शिष्यास गुप्त ब्रह्मज्ञान समजावून सांगितले आहे. पिंड म्हणजे काय ? ब्रह्मांड म्हणजे काय ? पिंड - ब्रह्मांड म्हणजे काय ? त्यात द्वैत कसे भासते ? ते अद्वैत कसे आहे ? ते सर्व तुझ्यात कसे सामावले आहे ? गुरूभक्तीचे महत्त्व काय ? या गुह्य गोष्टींचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे.
हेच सर्व गुप्तज्ञान सुभोध, सरळ व रसाळ भाषेत सामान्य वाचकांसाठी या ग्रंथात लिहिले आहे. वाचकांनी ते स्वत: जरूर वाचावे, इतरांना ऐकवावे. अशाने वाचणारा आणि ऐकणारे अशा दोहोंचा उद्धार होऊन त्यांना सद्गती प्राप्त होईल.