विठाचे अभंग - उपदेश
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या
१.
देहसमय अंतीं इष्टमित्र मिळती । सांभाळा म्हणती मुलें माझीं ॥१॥
स्त्री धनधान्य ते निरवुनी जात । आपुलें स्वहित विचारीना ॥२॥
गाडे घोडे म्हौसी सेवक आणि दासी । सांडोनियां जासी एकलाची ॥३॥
मी कोणरे काय कसा आलों येथें । हित कीं अनहित करोनी जातों ॥४॥
हें तंव सूचेना नाठवे ज्याच्या मना । जुंपिलें तें घाणा चौर्यांसींच्या ॥५॥
विठा म्हणे तया कोण सोडविता । वेगीं पंढरिनाथा शरण जावें ॥६॥
२.
माळा मुद्रा सोंग घेऊन होती संत । सदा विषयांत चित्त त्यांचें ॥१॥
पोटासाठी एक घेऊनियां वेष । ठकविती देश रांडापोरें ॥२॥
पाषाण बांधोनि नदीये निघाला । सांगा कोण गेला पैलतीरा ॥३॥
ब्राम्हणाचे परी मैंद वेष धरी । घालावया करीं फांसे जैसे ॥४॥
विहा म्हणे संतन म्हणता त्यासीं । जाती नरकासी अध:पाता ॥५॥
३.
उदर भरावया घेऊनियां सोंग । घरोघरीं बोंब उपदेशाची ॥१॥
आपणा कळेना कळेना लोकां सांगे ज्ञान । धरूनियां ध्यान बक जैसा ॥२॥
आपण बुडाले आणिकां बुडविती । हात धरुनी जाती यमलोका ॥३॥
दुरी पंथ जाणे तया यमपुरी । पापाची शिदोरी बांधोनियां ॥४॥
विठा म्हणे काय करूं त्याच्या कपाळा । पापाचा कंटाळा न धरिती ॥५॥
४.
मांजराचे डोळे गेले । उंदिर धराया तळमळे ॥१॥
तैंसा नव्हेरे संन्यास । धांवे विषयावरी हव्यास ॥२॥
वेश्या झाली पट्टराणी । स्मरीना पूर्वील करणी ॥३॥
सर्प प्रतिवर्षीं पालटे । परि अहंकार न पालटे ॥४॥
पहिलें पोशिलें मर्कटा । कोणें शिकविल्या चेष्टा ॥५॥
म्हणे नामयाचा विठ । विज्र लागो या ल्ल्लाटा ॥६॥
५.
कामधेनु गाई घालुनी बाहेरी । ताक घरोघरीं मागतसे ॥१॥
कल्पतरु वृक्ष असे ज्याचे घरीं । तो कां दारोदारीं भीक मागे ॥२॥
ऋद्धि आणि सिद्धि विठोबाच्या दासी । तया ह्रषिकेशी शरण जावें ॥३॥
इंद्र आणि चंद्र विठोबाचे किंकर । देव सुरवर ध्याती ज्यातें ॥४॥
राव आणि रंक विठोबाचे मागते । ते कायरे तूंतें देती बापा ॥५॥
ऐसा कोण आहे सर्व पुरविता । एका भग वंता वांचोनियां ॥६॥
मुखीं नाम असें पुण्य ज्या पदरीं । कळींकाळावरी सत्ता त्याची ॥७॥
विठा म्हणे शरण जाय ह्रषिकेशी । मग निजसुखासी पावसील ॥८॥
६.
जाति ज्ञान नाहीं मति ज्ञान फर । फुंजे दंभाकार लौकिकांत ॥१॥
तेथें माझ्या मना नव्हे समाधान । न पाविजे खूण संतांवीण ॥२॥
संत तेचि जाणा शांत ज्याचें मन । अणूचें प्रमाण दुजें नाहीं ॥३॥
विठा म्हणे तेथें स्थिरावलें मन । झालें समाधाम त्याचेसंगें ॥४॥
७.
अनंत अपरंपार नाम हें सधर । नाम सुखसागर अमृत लहरी ॥१॥
नाम हेंचि तारूं नाम हेंचि तारक । भवमूळ छेदक नाम तुझें ॥२॥
नाम हेंचि जीवन नाम हें निधान । नाम हें कारण आनंदाचें ॥३॥
नाम हें सांठा तोचि वैकुंठींचा मोठा म्हणतसे विठा नामयाचा ॥४॥
८.
नाम तारी पतितासी । ते कां अव्हेरी भक्तांसी ॥१॥
प्रेमळ देवा चें लडिवाळ । करी निजांगें प्रतिपाळ ॥१॥
सेवाऋणें वागवी भार । जन्मोजन्मींचा दातार ॥२॥
स्वामि स्वये अंगिकारी । वोळगा कांहो दारोदारीं ॥३॥
निष्ठुर नव्हे कोणेकाळीं । कृपाकटाक्षें कुरवाळी ॥४॥
दास विठा म्हणे वेगें । यात्ने जावें माझें संगें ॥५॥
९.
हरि म्हणा हरि म्हणा अहो जन । आणिक बोलाल तरी विठ्ठलाची आण ॥१॥
अहिल्या पाषाण अजामेळ कुळहीन । उद्धरिला दर्शनें वाल्मिक जाण ॥२॥
नामयाचा विठा संतचरणीं ठेवोनि माथा । कीर्तनेंबीण वृथा नको गोष्टी ॥३॥
१०.
धर्म अर्थ मोक्ष काम । हाकारितां रामराम ॥१॥
जें जें आवडे मनासी । त्यानें जावें पंडरीसी ॥२॥
चला आनंदें कौतुकें । पेठ भरली पुंडलिकें ॥३॥
न चले कोणाची थोरी । राया रंका एकी खरी ॥४॥
सांडोनियां आहे भाव । हाचि करावा व्यवसाव ॥५॥
विठा म्हणे विष्णुदास । आणिक न लगे सायास ॥६॥
११.
बरवें बरवें वाळचंद्र । काय इच्छिसी वैकुंठ ॥१॥
हें सुख तेथें नाहीं । मुक्ति घेउनी करिसी काई ॥२॥
म्हणे नामयाचा विठा । बापा नको जाऊं वैकुंठा ॥३॥
१२.
देखुनी पंढरीच्य सुखा । मोक्षपद आलें फुका ॥१॥
अवघें विठ्ठलचि झालें । येणें पुंडलिकें केलें ॥२॥
ऋद्धि सिद्धि पंढरपुरीं । होवोनी वोळती कामारी ॥३॥
मुक्ति वागती अंगणीं । घरोघरीं वाहे पाणी ॥४॥
तीर्थ चिंतवणी करिती । पुढें आमुची कोण गती ॥५॥
आला कळिकाळा त्रासू । विठा म्हणे विष्णुदासू ॥६॥
१३.
बहुतां पुंण्याचे कष्ट । त्यासी प्राप्त हें वैकुंठ ॥१॥
तैसी नोहे ही पंढरी । पतित पापियातें तारी ॥२॥
बहुता तपाचें प्रत्यक्ष । त्यासी अपकारी मोक्ष ॥३॥
जेणें केलीं तप तीर्थें । तोचि आवडे मुक्तीतें ॥४॥
देह यासी नानविधि । त्यासी प्राप्त होय सिद्धी ॥५॥
विठा म्हणे नामघोष । पळ काढील महा दोष ॥६॥
१४.
ज्यासी नावडे पंढरी । तोचि वसेल अघोरीं ॥१॥
त्यासी जाची यमदूत । सकळ पूर्वजांसहित ॥२॥
जया नावडे हरिनाम । तया कुंभपाकीं धाम ॥३॥
जया नावडती संत । ते चालती यमपंथ ॥४॥
जया नावडे भीमरथी । तेचि अघोरीं पचती ॥५॥
या बोलाचा धरीं विश्वास । विठा म्हणे विष्णुदास ॥६॥
१५.
हरिकथा ऐकतां संसार आठविती । तयाच्या सुकृति अवघा नाशा ॥१॥
निश्चित होऊनि ऐकतां श्रवणीं । यमाची करणी न लगे कांहीं ॥२॥
आतां रामकृष्ण म्हणे कांरे वाचा । कळिकाळ मोचा बाहतील ॥३॥
विठा म्हणे संतीं अवधान द्यावें । ह्रदयीं धरावें केशवनाम ॥४॥
१६.
काय गाणीव काय जाणीव । काय शहाणीव कीर्तनाची ॥१॥
थाक तोडिलें डोळे मोडिले । लोकां मानवलें बरें गातो ॥२॥
हरिचें नाम तूं नेणसी । वांयां कीर्तनीं उभा ठाकसी ॥३॥
हरीचें नाम तुम्ही गारे प्रेमें । विठा म्हणे माझ्या बापाच्या नांवें ॥४॥
१७.
जैसा आंबा वर्षत पाडी । तैसी धरीं गोडी कीर्तनीं नाचें ॥१॥
न करी घातमात न लावी वेळू । तेणें हा गोपाळू अंतरला ॥२॥
दुधावरील साय मधेसी गोडी । तैसी धरी आवडी रामनामीं ॥३॥
जतीचा साटा तो वैष्णव लाटा । म्हणतसे विठा नामयाचा ॥४॥
१८.
यात्रे बोलावितो हरी । कांहो नवजा पंढरी ॥१॥
विठोबा कृपेचा कोंवळा । बहु भक्तांचा कळवळा ॥२॥
भक्त आठवती चित्तीं । देवा वाटे परम खंती ॥३॥
देव अवज्ञा अनुचित । पृथक सत्ता आत्मघात ॥४॥
ऋण वारी भगवंत । दुबळा नव्हे लक्ष्मीकांत ॥५॥
दास विठा म्हणे त्वरा । यात्ना पंढरीची करा ॥६॥
१९.
द्रौपदीचें थालीपात्र । त्यांत कैंचे शाखापत्र ॥१॥
माव याची अभिन्नव । वाव मानसीं उपाव ॥२॥
जंव लाधला तो आपण । केलें तृप्त त्रिभुवन ॥३॥
सेवा घेउनी सारी काम । अंगें चैतन्य निष्काम ॥४॥
याच्या छळें आकर्षिला । बळिचा द्वारपाळ झाला ॥५॥
भक्तियोगें द्वेषेंभयें । वेघ लाउनी सन्मुख होये ॥६॥
दोही बाही आपण देव । काय नेणा पंढरिराव ॥७॥
दास विठा म्हणे धंदा । कृपा देवाची सपादा ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2015
TOP