विठाचे अभंग - पूर्वजन्मीं आराधितां । तु...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
पूर्वजन्मीं आराधितां । तुझें वर्म आलें आमुच्या हातां । नामदेवें सांगितलें जातां । तें सर्वथा देईंजे ॥१॥
आमुचे वडिलीं गा जोडिले । तें तुझे पायीं गा ठेविलें । गौप्य करितो नोव्हे गा भलें । दे उगलें गा दातारा ॥२॥
आमुचें आम्हांसी गा देतां । कां बा नये तुझ्या चित्ता । गार्हाणें देईन संता । चौघां देखतां घेईन ॥३॥
तुझा दारवंटा राखेन हरी । तुज रीघों नेदीं बाहेरी । जरीमोकलिसी अधांतरीं । तरी हे लाज कवणातें ॥४॥
आणिक कांहीं न मागें तूंतें । सेवावृत्ति द्यावी मातें । मज निरवावें संतांतें । आपुला दास म्हणोन ॥५॥
नामयाचा विठा म्हणे । यांत कांहीं करिसी उणें । तरी आमुच्या वडिलाचें निरूपणें । बांधलासी गा विठ्ठला ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2015
TOP