मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण ७ वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
परब्रम्हा मुख्य, आदिकारण ॥ तयाशि म्हणणें, महाकारण ॥
देह नसतां हें, नामाभिधान ॥ खुणेसाठीं, दिधलें कीं ॥१॥
कार्यकारणाचें, जें कारण ॥ त्यालाच म्हणावें, महाकारण ॥
कार्यकारण, सरलिया, शून्य ॥ महाकारण, शब्दचि उरे ॥२॥
अवघा दिसे, द्दश्याकार ॥ भासे आपुल्या, जाणिवे समुर ॥
तोचि निरसुनी, तूंची ऊर ॥ ज्ञानस्वरूपीं, होऊनियां ॥३॥
नेणिवेच्या, नेणिव भावा । तूंच जाणशी, स्वयमेवा ॥
तें जाणिव धरोनी, आपुलिया ॥ आपणचि स्वयें, रिझावें ॥४॥
आपण, आपणाशीं, जाणतां ॥ नेणिवचि नाहीं, असें वाटतां ॥
स्वयेचि होउनी, सज्ञाता ॥ निरशी नेणिव, समूळ तें ॥५॥
नेणिवचि जेथें, निरसलें ॥ तेथेंचि जाणिव, राहिलें ॥
तें जाणिवच, आंत प्रकाशलें ॥ आत्मरूप, स्वयंज्योती ॥६॥
जाणे नीट जो, स्वजाणिवा ॥ तोचि प्रपंचार्थीं, करी हेवा ॥
तया आपणा, जाणावया ॥ कोडे न पडे, कदापि ॥७॥
नेणिव तुटोनी, गुरुखुणा ॥ जाणे, तोची आपआपणा ॥
बोलिले हया, अनुसंधाना ॥ महाकारण, देह ऐसे ॥८॥
गेलें वाहोनी, नेणतेपण ॥ आपण आपणा, जाणतेपण ॥
तिन्ही देहांचें, साक्षित्वपण ॥ महाकारण, देहीं असे ॥९॥
तिन्ही अवस्थीं, सजाणपणा ॥ तीच तुरिया ऐशी खूण ॥
तिन्ही देहांचें, अवलोकन ॥ करितो हाच, देह कीं ॥१०॥
सर्व साक्षी, ऐसा आपण ॥ हाच प्रत्यगात्म्याचा, अभिमान ॥
तोचि खोडोन, खुंटवावें स्फुरण ॥ शुद्धतेज, झळकेल कीं ॥११॥
आत्मा स्वयंभू, आपण ॥ जाणे अपुली, आपण खूण ॥
परब्रम्हा जें, निर्वाण ॥ तेंचि जाण, निजरूप ॥१२॥
ऐसें अपुलें, अनुसंधान ॥ करितां निपजे तें, विज्ञान ॥
सृष्टि प्रपंचीं, मिथ्यात्वपण ॥ प्रत्यया येई, सहजचि कीं ॥१३॥
मीच शुद्धात्मा, जाणुन ॥ ऐसा वर्ते जो, दारुण ॥
तयाचा तेथें, साक्षी कोण ॥ केवळ त्याचा, तोचि तो ॥१४॥
जाणिवेचे जें, निजज्ञान ॥ तेंचि शुद्धत्व, आपण ॥
तेंचि द्दढ करावें, परिपूर्ण ॥ निजात्मा तो, तूंचि असे ॥१५॥
ज्ञान जेथुनी, स्फुर द्रवे ॥ तेंचि स्फुरणें, स्वस्वभावें ॥
ऐसें स्वरूप, अनुभवावें ॥ महाकारण, देहीं कीं ॥१६॥
जेथें जाणिव, ज्ञान खुटे ॥ तेथेंचि स्वरूप, तुझें नटे ॥
घनानंद, अभ्यास, नेटे ॥ होई तेथें, अपरिमित ॥१७॥
जें अमर्याद, ऐसे अमोघ ॥ तेंचि जाणण्या, ऐसा ओघ ॥
जें अविनाशस्थान, असे दीर्घ ॥ अखंड ब्रम्हा तेंच कीं ॥१८॥
लोह लोहचुंबीं, जैशी ओढ ॥ तैशी देवभक्तांची, प्रेम जोड ॥
पार्‍याच्या दोन, गोळ्या सोड ॥ स्पर्शास्पर्शे, ऐक्यता ॥१९॥
सोहं दासोहं, द्वैताद्वैत ॥ द्वैताचें करावें, अद्वैत ॥
घनानंदीं, मुक्तीप्रत ॥ पावणें हाची, ज्ञानांत ॥२०॥
इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते महाकारणगदेहविवरणं नाम सप्तमं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP