मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण १ लें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
ॐ नमोनमोश्री, सद्‌गुरुनाथा ॥ तूंचि परम, प्राप्तिदाता ॥
कृपासिंधु, केवळ, समर्था ॥ अनंत अपारा, तूंचि असे ॥१॥
तूं आनंदमये, स्वयं प्रकाश ॥ कैवल्यदाता, परम ईश ॥
तूं निजरूपें, अविनाश ॥ निराकारी, निर्विकार ॥२॥
तूं नि:संग आणि, निरंजन ॥ तूं निरंतर, असशी, अभिन्न ॥
नाहीं तुझिया, समसमान ॥ कोणी नसे, परमात्मा ॥३॥
तूं जव पूर्ण, कृपा करिशी ॥ तव संसारबंधना, तोडिशी ॥
अविद्येपासुनि, सोडविशी ॥ त्राता तूंची, सर्व जीवा ॥४॥
न होईजे देवा, आसुरा ॥ तें तुझेंचि करणें , अपारा ॥
समर्थ न, देखो मी दुसरा ॥ तुजवांचोनी, कोणीही ॥५॥
आणिका कोणा, नमस्कारूं ॥ कवणाचें तरी मी, स्तवन करूं ॥
जयजयाजी, श्रीगुरु ॥ अगाध महिमा, तुझाचि ॥६॥
जैसा पटांत, एक तंतु ॥ तैसा विश्वीं तूं, सर्वभरितु ॥
सर्व व्यापुनि, विरहितु ॥ केवळ अलिप्त, असाचि तूं ॥७॥
दाविशीं अनेक, सगुणरूपें ॥ धरिशीं तूं तीं, उपाधिव्यापें ॥
शिवशक्तयादि, साकाररूपें ॥ सर्वत्न तूंची, अनंता ॥८॥
तुजविण अन्य, नसे कोणी ॥ म्हणुनच अन्यातें, मी न मानी ॥
हा माझा मस्तक, तुझिये चरणीं ॥ ठेविला असे, सत्यदेवा ॥९॥
तूं शुद्धात्मा, आणि, स्वयंज्योती ॥ तुझीच सर्वत्र, ज्ञानदीप्ती ॥
नमो नमोश्री, गुरूमूर्ती ॥ आनंदवैभवीं, प्रविष्ट कीजे ॥१०॥
ब्रम्हारूपें, उत्पत्ती करिशी ॥ विष्णुरूपें, प्रतिपाळिशी ॥
रुद्ररूपें, संहारिशी ॥ पुनरपि ऐसें, चराचरा ॥११॥
तूं सर्वसाक्षी, आणि सर्वज्ञ ॥ तूं सर्व विद्या, विदप्राज्ञ ॥
तूंचि तत्त्वार्थ, निश्चयेंकरून ॥ सर्वेश्वर, म्हणती तया ॥१२॥
तूंचि जाणशी, स्वस्वरूपाशी ॥ म्हणोनीच जाणीव, स्फुरविशी ॥
परमात्मा, ऐसें, म्हणविशी ॥ आदिकारण उपाधीचें ॥१३॥
तुझिये इच्छेचा, विस्तारू ॥ म्हणोनीच, विस्तारलें, चराचरू ॥
हिंसक जीव, असंख्य अपारू ॥ सर्वामाजी, स्फुरद्रूप तूं ॥१४॥
सर्व जीवांची, ज्ञप्तीकळा ॥ विचारद्वारें, जाणें सकळा ॥
तोचि ज्ञानात्मा, जिव्हाळा ॥ त्वंपदाचा, तूंचि अर्थ ॥१५॥
नेमकर्माचीं, सांकडीं ॥ संदेहीं गुंतलीं, बापुडीं ॥
तीं कैशी जातील, पैलथडीं ॥ भव्यभवत्वीं, भवसागरीं ॥१६॥
माया अविद्या, संबंधें ॥ जीव ईश्वर, होती भेदें ॥
हाही तुझाची, विनोदे ॥ खेळ तुझा हा, नाटकी ॥१७॥
तूं स्वानंदवासी, सदोदित ॥ आसीत् पदीं केवळ अलिप्त ॥
तरी दाविशीं, सर्वदा लिप्त ॥ चराचरीं, वृथापरी ॥१८॥
ऐशी करितां, तुझीये स्तुती ॥ हात टेकिती, वेदश्रुती ॥
मी पामरें, प्राकृत किती ॥ वर्णावयाशी, तुज योग्य ॥१९॥
तूं प्रेमभरित, परम पुरुष ॥ चतुर्विध - वाचेचा केवळ ईश ॥
देई मजलागीं, मतिप्रकाश ॥ तुजकारणें, जाणावया ॥२०॥
तूं कृपासिंधू, वरद होशी ॥ तरि मग, मुक्तीच्या लाभाशीं ॥
वेळ न लागे, ज्ञानाशीं ॥ हेंचि सत्य, मी जाणतसें ॥२१॥
म्हणोनि विनवी, शरणागत ॥ ज्ञानप्रभा करावी, मज उदित ॥
अविद्या जाय, क्षणमात्र ॥ तेणें तुजशीं जाणेन मी ॥२२॥
यावरि झाले, गुरु प्रसन्न ॥ करविती, परमार्थाचें कथन ॥
बोलूं सहजीं, शास्त्रमंथन ॥ निर्वाणतेंची, जाणोनी ॥२३॥
प्रथम प्रकरणीं, मंगलाचरण ॥ करूनि वंदिले, तुझिये चरण ॥
जीवन्मुक्तपणाचें मरण ॥ द्यावें मजला, सत्वरी ॥२४॥
देहजगाची, होवो विस्मृती ॥ राहो एक, तुझीच स्मृति ॥
ऐशी वदे, श्रुतिस्मृति ॥ तोचि लाभ मज देई ॥२५॥
इति श्रीपरमामृते, मुकुंदराजविरचिते, मंगलाचरण - गुरुस्तवन नाम, प्रथमं प्रकरणं संपूर्ण ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP