मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - मनोलय

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


अगा मनाचें करूनि द्वैत स्फुरे । आणि मनाचे करूनि द्वैत विरे ॥
द्वैताभावें अद्वैत स्फुरे । दोन्ही निर्धारें मनेंचि होती ॥१॥
मनमात्र असे जोंवरी । विश्व हें दिसेलच तोंवरी ॥
तें मनची निमालें जरी । तरी हें ब्रम्हारूप ॥२॥
तैसें देह प्राणादि उपाधी जोंवरी । सविकल्पता उठेलची तोंवरी ॥
मग तें सत्य मानो कोणी अंतरीं । कोणी निर्धारो असत्य ॥३॥
परी ते उद्भवतां न राहती । ज्ञात्याज्ञात्याची समान गती ॥
परी जे मिथ्या पाहती ते मुक्त होती । सत्य मानिती ते बद्ध ॥४॥
मात्र सत्यत्व न यावें तयासी । मग उद्भवेना निमेना आपैसी ॥
हें निमावेंचि जरी मानसीं । तेव्हां तें सत्य झालें ॥५॥
सत्यत्व देऊनी जरी रोधिसी । तरी बद्धता न चुके कल्पांतेसी ॥
मिथ्या समजून जरी अव्हेरिसी । तरी ते असतांचि मुक्त ॥६॥
आणिक हें ईशें जितुकें निर्मिलें । तें जीवें काढितां न जाती लोपलें ॥
मन बुध्यादिक तीं ईशें उद्भविलें । तें निमती कैसे ॥७॥
ऐसा वृत्तिरोधें होय अनर्थ । कोणीं निरोधासी न होय समर्थ ॥
आणि  कोणताचि न साधे अर्थ । व्यर्थ देह पीडितां ॥८॥
मन हें कैसें मोडावें । म्हणसी ऐसें स्वभावें ॥
स्फुरण चिद्रूपें पहावें । संकल्पावीण ॥९॥
होय नव्हे जें  जें करी । इतुकेंचि मन हें विकारी ॥
ब्रम्हाचि ऐसा निश्चय धरीं । तरीच मोडें हें मन ॥१०॥
ब्रम्हाचि असे एकलें । होय नव्हे करणें गेलें ॥
हेंचि जाणावें मन मेलें । संकल्प सांडितां ॥११॥
अथवा मन आपणाहुन भिन्न पाहणें । मनाचा साक्षी स्वयें होणें ॥
याचि नांव मन टाकणें । खूण जाणणें हेंचि मुख्य ॥१२॥
मनाच्या एकत्वें जंव हा असे ॥ तंवचि मनासी मनपण असे ॥
आपणाहूनि भिन्न देखतांचि सर्वांतें । चित्त आपैसें टाकलें होय ॥१३॥
जें कां ब्रम्हाकारें स्फुरण । तया मना मन म्हणे कोण ॥
जेथें संशयचि गेलें निपटून । तरी विज्ञान याहून कोणतें ॥१४॥
तस्मात् आपुलें निर्विकल्पत्व खरें । विचारें जाणावें साचोकारें ॥
मग हें सवि (क) ल्प उठें कीं मरें । तया चाड नाहीं ॥१५॥
येथें तुझें काय गेलें । होइना जें स्वभावेंचि झालें ॥
तयाचें मीपण जरी घेतलें । तरी तें बाधक होय ॥१६॥
तो मीपणा जरी न मानितां । तरी व्यापार होतीलचि तत्त्वतां ॥
परी मीपणें घेतसे बद्धता । सहज होता मुक्त ॥१७॥
वृत्तिचीया उदासपणें । अनुसंधानीं रमिजे मने ॥
सहजइंद्रियां उपशम होणें । निजवृत्तीच्या ठायीं ॥१८॥
मनाचा स्वभाव एक चांगुला । गुंतून पडे अनुभविल्या वस्तूला ॥
तस्मात् मन क्षोभेना निदिध्यासाला । नित्य नवी आवडी उपजे ॥१९॥
वातोर्मी उठलिया अनेक । तरी चित्रीची न ढळे वल्लिका ॥
तैसी बुद्धि आरोपिली विवेका । आधिवात - झुळुका न लोटेची ॥२०॥
होतां द्दश्यदर्शनाची भेटी । दोन्ही चैतन्यांसी पडे मिठी ॥
तेथें अज्ञान पळे उठाउठी । सुख कोटी चैतन्यरूप ॥२१॥
जेथें मनाचा नाश होये । तेंचि तें परमानंद सुख पाहे ॥
तेंचि आत्मस्वरूप निश्चयें । जें सुख होतां न भेटें हें द्दश्य ॥२२॥
दर्पणीं जें रूप प्रतिबिंबिलें । तें दर्पणेंशीच जडलें ॥
तें हस्तें काढितांही नये बळें । परी तें जडलें सर्वथा ॥२३॥
तैसीच विचार - दर्पणीं । बुद्धि जडलीया गा कोदंडपाणी ॥
न काढावें आधिचेंनी । हे खूण मनीं जाण तूं ॥२४॥
स्वस्वरूपा वेगळें राहतां । मन स्थिरगा सर्वथा ॥
वणवण करी विषयार्था । त्याची तत्त्वतां आधी जाण ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP