अथजन्मनि दुष्टकालाः
तत्रगंडांतः ज्योतिर्निबंधेनारदः पूर्णानंदाख्ययोस्तिथ्योः संधिर्नाडीद्वयंतथा गंडांतंमृत्युदं जन्मयात्रोद्वाहव्रतादिषु कुलीरसिंहयोः कीटचापयोर्मीनमेषयोः गंडांतमंतरालंस्याद्धटिकार्धंमृतिप्रदं सार्पेंद्रपौष्णभेष्वंत्यषोडशांशाभसंधयः तदग्रभेष्वाद्यपादाभानांगंडांतसंज्ञकाः रत्नमालायां पौष्णाऽश्विन्योः सार्पपित्रर्क्षयोश्चयच्चज्येष्ठामूलयोरंतरालं स्याद्गंडांतंस्याच्चतुर्नाडिकंहियात्राजन्मोद्वाहकालेष्वनिष्टम् रत्नसंग्रहेनवनीतारिष्टे सर्वेषांगंडजातानांपरित्यागोविधीयते वर्जयेद्दर्शनंश्रावंतच्चषाण्मासिकंभवेत् तिथ्यर्क्षगंडेपितृमातृनाशोलग्नेतुसंधौतनयस्यनाशः सर्वेषुनोजीवतिहंतिबंधून् जीवन्पुनः स्याद्बहुवारणाश्चः अथैषांदानमुत्तरगार्ग्ये तिथिगंडेत्वनड्वाहंनक्षत्रेधेनुरुच्यते कांचनंलग्नगंडेतुगंडदोषोविनश्यति उत्तरेतिलपात्रंस्यात्पुष्येगोदानमुच्यते अजाप्रदानंत्वाष्ट्रेस्यात्पूर्वाषाढेचकांचनं उत्तरापुष्यचित्रासुपूर्वाषाढोद्भवस्यच कुर्याच्छांतिंप्रयत्नेननक्षत्राकरजांबुधः ।
आतां जन्मसमयीं दुष्टकाल सांगतो -
त्यामध्यें प्रथम गंडांत सांगतो ज्योतिर्निबंधांत नारद - “ पूर्णा, ( पूर्णिमा, अमावास्या ) व प्रतिपदा यांच्या संधीच्या दोन घटिका गंडांत होय, हें गंडांत जन्म, यात्रा, विवाह, उपनयन इत्यादिकांचे ठायीं असलें तर मृत्युदायक आहे. कर्क व सिंह, वृश्चिक व धन, मीन व मेष या लग्नांचा संधि अर्धघटिका गंडांत, हें मृत्युदायक आहे. आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती, या नक्षत्रांचे शेवटचे सोळावे अंश नक्षत्रसंधि आणि त्यांच्या पुढच्या ( मघा, मूल आश्विनी या ) नक्षत्रांचे पहिले चरण हे नक्षत्रगंडांत होत. ” रत्नमालेंत - “ रेवती व अश्विनी, आश्लेषा व मघा, ज्येष्ठा व मूल यांच्या संधीच्या चार घटिका गंडांत आहे. हें यात्रा, जन्म, विवाह यांचे ठायीं अनिष्ट आहे. ” रत्नसंग्रहांत नवनीतारिष्टांत - गंडांतांवर उत्पन्न झालेल्या सर्वांचा परित्याग सांगितला आहे. सहा महिनेपर्यंत त्यांचें दर्शन व श्रवण वर्ज्य करावें. ” तिथींच्या व नक्षत्रांच्या गंडांतावर उत्पन्न झाला असतां पिता व माता यांचा नाश होतो. लग्नाच्या गंडांतावर उत्पन्न पुत्रांचा नाश होतो. सर्व गंडांतावर उत्पन्न झालेला जीवंत राहात नाहीं व बांधवांचा नाश करितो. तो जीवंत असेल तर बहुत हत्ती, घोडे यांनीं युक्त होतो. ” आतां यांच्या दोषाविषयीं दानें सांगतो उत्तरगार्ग्यांत - “ तिथिगंडांतावर उत्पन्न असतां वृषभदान करावें. नक्षत्रगंडांतावर उत्पन्न असतां धेनुदान करावें. लग्नगंडांतावर सुवर्णदान करावें. म्हणजे गंडदोष नष्ट होतो. उत्तरा नक्षत्रावर उत्पन्न असतां तिलपात्रदान. पुष्यावर उत्पन्न असतां गोदान. चित्रांवर उत्पन्न असतां बकरीदान. पूर्वाषाढांवर उत्पन्न असतां सुवर्णदान. उत्तरा, पुष्य, चित्रा, पूर्वाषाढा यांच्यावर उत्पन्न झालेल्याची नक्षत्राकरांत सांगितलेली शांति प्रयत्नानें करावी. ”