मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ५२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । याज्ञवल्क्य कथा सांगत । विश्वामित्र प्रेमें ऐकत ढुंढि नाम द्विज जात । काशीनगरीत गणेशाज्ञेनें ॥१॥
सारें नगर त्यानें केलें मोहित । बुद्धरुपें विष्णू भरष्ट करित । ढुंढिच्या वचनें राज्य सोडित । दिवोदास काशीचें ॥२॥
बौद्धभाव धरुन इच्छित शिवदर्शनाथं तो प्रयत । ढुंढि विष्णू बोलावित । शंभूस काशीपुरीते तें ॥३॥
गणपास पुढें करुन । शिव जाई तेथ पावन । काशींत गणेश पूजन । प्रथम निवासी त्यास करी ॥४॥
देवगण ऋषिगणांसहित । शंकर तेहां प्रवेश करित । तेव्हां काही वंदित । चरण विघ्नपाचें शिवाचे तैसे ॥५॥
यथास्थान देव ऋषिगण बसत । दिवोदासा मोक्ष देत । नंतर गिरीशास म्हणत । तुजला काशी दिली असे ॥६॥
केलें सर्व पूर्वीसम तवेप्सित । आता जातों मीं स्वधामा परत । जेव्हां महादेवा माझें स्मरण होत । तुज मी दर्शन देईन ॥७॥
ऐसें बोलून ढुंढिविप्रासहित । गजानन अंतर्धांन पावत । देवमुनींच्या समोर क्षणांत । नंतर विश्वनाथें काय केलें ॥८॥
ढुंढीची मूर्ति करुन । देव ब्रह्माणांसह केली स्थापन । विधिपूर्वक केलें पूजन । नमस्कार प्रदक्षिणा सर्व करिती ॥९॥
विश्वेश तेव्हां सर्वांप्रत । म्हणे ऐकावें जें हित । प्रथम ढुंढीस पुजून मज तोषवित । त्यासी भुक्तिमुक्ति मी देईन ॥१०॥
अन्यथा येऊन न मिळेल । काशीवासाचेंही फळ । हे सर्वदाता वक्रतुंड निर्मळ । ऐसे रहस्य जाणावें ॥११॥
वेदांदींचे रहस्य धुंडिलें । तेव्हा त्यांच्या मुळीं दिसलें । तें हें ब्रह्म हृदयीं विलसलें । साक्षात्‍ ब्रह्मपति प्रभू ॥१२॥
म्हणोनि याचें ढुंढिराज । नाव ख्यात केलें सहज । धर्मार्थ काममोक्ष दाता निर्व्याज । या क्षेत्रांत हा निश्चित ॥१३॥
ऐसें सांगून महादेव होत । ढुंढिराजाच्या सेवेंत रत । पूजापरायण नित्य विनत । सावधान सर्वदा ॥१४॥
तैसें विश्वामित्रा भजावें । विघ्नराजा मनीं स्मरावें । अहंकार भाव सोडून द्यावे । तरी ब्राह्मण होशील ॥१५॥
मुद्‌गल सांगती दक्षास । ऐकोनी याज्ञवल्क्याच्या वचनास । विश्वामित्र तो महायश । विचारी विनयें नमर होवोनी ॥१६॥
याज्ञवल्क्या महाभागा केला । मजसी तू बोध भला । आतां सर्वज्ञा ज्ञान मला । सांगावें सर्व समजावून ॥१७॥
अहंकार मी सोडावा । त्याचा मार्ग कोणता दाखवा । तो सांप्रत माझ्या शरीरीं शोधावा । कोणत्या स्थानीं तें सांगा ॥१८॥
गणेशाचें भजन करावें । कोणत्या विधीनें त्यास स्मरावे । त्याचें स्वरुप वर्णावें । योगींद्र तुम्हीं स्वयं म्हणोनी ॥१९॥
याज्ञवल्क्य कौशिकास सांगत । अहंकाराचें रुप विकृत । तो सोडिता ब्राह्मणत्व निश्चित । पावशील तूं तपानें ॥२०॥
तो अहंकार जाणावा । महामने त्याचा त्याग करावा । त्यासाठी विधी बरवा । सांगतों तुज ऐक आतां ॥२१॥
तो अहंकार त्यागशील । तरी ब्राह्मणत्व पावशील । हेंच तप उत्तम आचरशील । देव तो इच्छित देईल तें ॥२२॥
देवावर ठेवी विश्वास । ब्राह्मणत्व दाता तोच सुयश । त्यानें दिलें राजर्षित्वास । तेंच असो सतत मला ॥२३॥
मी कोण इच्छा करणार । तपाचा वृथा अहंकार । त्याची इच्छा ना होय जर । ब्राह्मणत्व मज कैसें प्राप्त? ॥२४॥
मी सदा पराधीन । देहधारी मर्यादित प्रयत्न । दैव अनुकूल होऊन । इच्छित मिळेल तेव्हां मिळो ॥२५॥
ह्या विधीनें महामुने आचर । तप तेंच करी उग्र । तेव्हां लाभशील समग्र । अहंकार लोपत्ता तुझा ॥२६॥
आणखी एक विचार ऐकावा । मत्सर सारा त्यागावा । शरण गणराज मानावा । तेणें सुख तुज लाभेल ॥२७॥
माझ्यासम कोणाचें तप असत । ऐशी स्पर्धा तुझ्या मनांत । अन्य द्विजांचा तू मत्सर करित । तोवरी कैसें ब्राह्मण्य तुला? ॥२८॥
मत्सरभावें तू नाशिले । वसिष्ठांचे शतपुत्र चांगले । राक्षसासम ते झालें । कृत्य तुझें विश्वामित्रा ॥२९॥
त्रिशंकूस्तव प्रतिसृष्टि । रचून झालास तू कष्टी । वसिष्ठा मारण्या युक्ति । नानापरींच्या केल्यासी ॥३०॥
तो मत्सर सारा सोडावा । त्याचा मार्ग आता ऐकावा । सर्व विप्रांत तपस्व्यांत मानावा । कनिष्ठ नीच तू स्वतःला ॥३१॥
मी त्यांच्यापुढे अति लहान । त्यांचें तप अति महान । त्यांच्या तपप्रभावाचें चिंतन । मनानेंही असंभव ॥३२॥
ऐसें स्वतःचें स्थान । तपज्ञान अल्पतम मानून । अन्यांसी द्यावा तू मान । ऐसें तप आचारी तूं ॥३३॥
ऐसें मनांत ठसेल । तेव्हांच ब्राह्मण तू होशील । अन्यथा वृथा तूं मरशील । युगसहस्त्र तप जरी केलें ॥३४॥
सर्वांसी करावें तूं नमन । हृदयांत विनयभाव पावन । राजर्षे महामते ऐसें करुन । ब्राह्मणत्व तुज लाभेल ॥३५॥
ऐसें सांगून महायोगी सांगत । वक्रतुंड प्रभाव कथामृत । तें ऐकून अति विस्मित । विश्वामित्र प्रार्थितसे ॥३६॥
याज्ञवल्क्या तुज नमन । योगींद्रा सांगितलेस महान । वक्रतुंडाचें चरित्र शोभन । आता अनुभवरुप सांगा ॥३७॥
याज्ञवक्ल्य म्हणती ऐकावें । पुरावृत्त जें मज आठविलें । तें तुज प्रीतीनें सांगावें । ऐसा माझा मनोदय ॥३८॥
एके दिवशीं मी जात । ब्राह्मणा मी वैकुंठात । स्वर्गी त्या उत्तम लोकांत । नारायण निवास करी ॥३९॥
त्या नारायणा वंदून । जगदीश्वरा त्या स्तवून । मी विचारिलें त्यालागुन । सार काय सर्वभूतांत ॥४०॥
कोणत्या आधारानें संस्थित । जग हे सारें सांगा असत । महाभागा सांगावें मजप्रत । तूं साक्षात्‍ जगदीश्वर ॥४१॥
हें सारें तुझ्या आधारें वर्तत । हृदयांत सर्वदा भासत । तथापि तुज विचारण्या इच्छा होत । यथार्थ सारें जाणण्या ॥४२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते याज्ञवल्क्यनारायणसंप्रश्नवर्णनं नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP