खंड १ - अध्याय २०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । अंगिरसाचें वचन ऐकून । मुद्‌गल पुलकित होऊन । विनययुक्त विस्मितमन । रोमांचयुक्त म्हणे त्यांसी ॥१॥
ब्रह्मणस्पतीचे अवतार । माहात्म्ययुक्त अति थोर । सांग तें मजसी समग्र । क्रमशः मी भोजन त्यांना ॥२॥
तेणें ब्रह्मभूय सिद्धी पावेन । अंगिरा म्हणे तें ऐकून । गणेशमहात्म्याचे अनंत पावन । अवतार अगणित वर्णावया ॥३॥
वर्षशतांतीही कथन । अशक्य मजसी करण्य गहन । परी संक्षेपानें मी सांगेन । मुख्य मुख्य अवतार ॥४॥
त्या गणेशाचे प्रख्यात । आठ अवतार असत । ब्रह्मधारक सर्वही पुनीत । क्रमशः तुज सांगतो ॥५॥
वक्रतुंड अवतार मत्सरासुरहंता । सिंहवाहन तो ब्रह्मधारक उद्धर्ता । एकदंततार मदासुराचा संहर्ता । आखुवाहन जो असे ॥६॥
महोदर मोहासुराचा अरी । आखुवाहन तो करी । ज्ञानब्रह्मप्रकाशन सत्वरी । ऐसें सांगती श्रुतिस्मृती ॥७॥
गजानन लोभासुराचा हर्ता । सांख्यांना सिद्धिदाता । तोही मूषकवाहन भक्ता । रक्षीतसे सर्वदा ॥८॥
लंबोदर क्रोधासुरा मारी । शक्ति ब्रह्मधारक असुरारी । आखुण तोही संसारीं । ऐसे जाण तूं मुद्‌लमुने ॥९॥
विकटनामक विख्यात । कामासुरा जो जाळित । मयूरवाहन तो असत । सौरब्रह्मधर असे ॥१०॥
विघ्नराजावतार जणात । ममतासुरा तो वधित । शेषवाहन असत । विष्णु ब्रह्मवाचक ॥११॥
धूमरवर्णावतारात । गणेश अभिमानासुरा भारित । तो आखुवाहन स्मृत । शिवात्मा ख्यात संसारीं ॥१२॥
ऐसे हे आठ अवतार कथिले । गणेशाचे अंश जे झाले । विनायक नामें ख्यात जाहले । भजनमात्रें संतोषती ॥१३॥
ते आपुलाले ब्रह्म देती । स्वानंदवासकारी ते गणेश असती । स्वानंदी योगियांसी दिसती । ब्रह्म तेचि निःसंशय ॥१४॥
त्याचे आठ अवतार । असती जगतीं विघ्नहर । स्वानंद भजनानें सत्वर । लीन प्रसन्न तेथ होती ॥१५॥
हे सुपुत्रका माया लीन । स्वयं तेथ होऊन । संयोगें मौनभाव पावून । जनांसि समाधी लाभते ॥१६॥
गणराजाच्या भजनें विनाशत । अयोगि मायाभेद जे भासत । परब्रह्म निवृत्ती प्राप्त । ब्रह्मणस्पति तोचि गणपति ॥१७॥
योगात्मक गणेशान । योगरुपा शांती पावन । शांतिभेदांचे कथन । नानाविध केलें असे ॥१८॥
शांतींत योगशांती । ऐसे रहस्य सांगती । योगाहून परम ब्रह्म जगतीं । अन्य कोणतें असेना ॥१९॥
ही योगाची योगता । ब्रह्मप्राप्तीची महत्ता । ऐसें हे परम गुह्य तत्त्वतां । सांगितलें तुज संक्षेपें ॥२०॥
गणेशा ब्रह्मनायका सर्वभावें । म्हणूनी तूं सदा भजावें । कृतकृत्य जगीं व्हावें । परमभक्त मुद्‌गला ॥२१॥
मी गणेश तप आचरिलें । गणेशव्रत पूर्ण केले । तेणें मज प्राप्त झालें । मनोवांछित वरदान ॥२२॥
अंगिरसा तुझ्या वंशात । गणेशभक्त जन्म घेत । आपुल्या भक्तीनें प्रख्यात । विशेष जगीं ते होतील ॥२३॥
त्यांतही मुद्‌गल अत्यंत । गाणपत्य होईल निश्चित । मुद्‌गलासम भक्त । गणेशाचा जगीं नसेल ॥२४॥
ऐसा भक्त अद्यापि न झाला । भावि काळांतही तोड न त्याला । भक्तराज जो ऐकला । परम पावन होईल ॥२५॥
मुद्‌गलासी प्रणाम करितां । तैसेचि त्याचा स्पर्श लाभता । संभाषण दर्शन त्याचें घडता । उद्धरतील प्राणी जगीं ॥२६॥
त्याच्या शरीरावरुन । वाहेल जो जगीं पवन । त्याचा स्पर्श घडता उद्वरुन । सर्व जंतू मुक्त होतील ॥२७॥
मजला ऐसा वर देऊन । गणेश पावले अंतर्धान । तोच तूं मुद्‌गल महान । माझ्या वंशीं भूषण ॥२८॥
धन्य माझा वंश झाला । गाणपत्य तुजसम ज्यांत जन्मला । नरकांतून तरण्याला । जंतूसी जो साहाय्य करी ॥२९॥
तूं साक्षात्‍ प्रतापवंत । गाणपत्य श्रेष्ठ सर्वांत । महायोगी होशील निश्चित । ऐसा वर माझा असे ॥३०॥
मुद्‌गलासी ऐसें सांगून । अंगिरस उपदेशिती तत्त्व महान । एकाक्षर महामंत्र देऊन । कृतकृत्य त्यासी केलें ॥३१॥
बाळा आजावि जाई वनांत । जें असेल उत्तम प्रशांत । गणेशाची आराधना उदात्त । तेथ करी महाभागा ॥३२॥
तुझ्या तपानें संतुष्ट होईल । गणेश तुज दर्शन देईल । तेणें धन्यता लाभेल । गणेश सायुज्य लाभेल अंतीं ॥३३॥
अंगिरसां विनयें प्रणाम करुन । वनांत गेले मुद्‌गल महान । महा अद्‍भुत तप आचरुन । प्रसन्न केलें गणेशाला ॥३४॥
सांगोपांग एकाक्षर विधान । एकनिष्ठेनें आचरुन । एक अब्ज सहस्त्र संवत्सर पूर्ण । मुद्‌गलांनीं तप केलें ॥३५॥
मूषकवाहन सिद्धिबुद्धिसमन्वित । चतुर्बाहु गणेश प्रकटात । प्रमोद आमोदादि असत । सभोंवतीं तयांच्या ॥३६॥
ऐसा भक्तवत्सल गजानन । नानाभूषणयुक्त महान । महोदर एकदंत त्रिनेत्रधर पावन । चार आयुधें करीं जयाच्या ॥३७॥
ज्याच्या हृदयप्रदेशीं विराजत । चिंतामणि जो भक्तियुत । ऐसा गजमुख प्रसन्नचित्त । म्हणे तेव्हां मुद्‌गलासी ॥३८॥
महाभक्ता मुद्‌गला त्वरित । सांग तुझ्या मनींचें ईप्सित । एकाक्षर विधानानें तृप्त । परम संतुष्ट झालों असे ॥३९॥
सूत म्हणती गणेशवाचन । ऐसें ऐकून करिती नमन । भक्तिपूर्वक हात जोडून । स्तुती करिती गणेशाची ॥४०॥
यथान्याय गणेशाची पूजित । हृदयीं होत आनंदित । सर्वांग होय पुलकित । आनंदाश्रू वाहती ॥४१॥
गद्‌गद स्वरें स्तुती करीत । पुनःपुन्हा प्रणाम करीत । मनीं भक्तिभावयुक्त । अंगिरस कुलदीपक ॥४२॥
मुद्‍गल म्हणती वंश धन्य । जन्म, विद्या, ज्ञान धन्य । तप, तीर्थ माझें धन्य । प्रभू तुझिया दर्शनें ॥४३॥
आज पृथ्वी झाली धन्य । पशुपक्षी लताही धन्य । ज्यांसि लाभलें दर्शन धन्य । गजानना तुझें येथ ॥४४॥
ऐसी बहुविध स्तुती करीत । सर्व सिद्धिदात्या गणेशाची अविरत । स्वात्मनिष्ठ परम भक्तियुत । महामुनी मुद्‌गल ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते गणेशमुद्‌गलसमागमो नाम विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A


References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:49:50.1300000