७०
देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर ॥१॥
एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ॥२॥
एका विभूतीचें लेणें । एका भंडार -भूषणें ॥३॥
रामदासीं एक जाला । भेदभाव तो उडाला ॥४॥
७१
निळ्या घोडियाचा स्वार । वरी उधळि भंडार । हातीं खंडा घेऊनी मार । करीत आहे दुर्जना ॥१॥
बेड्या लोहाच्या तुटती । खोडे मध्येंचि फुटती । किती बगाडें लागती । गळ घेती टोंचोनी ॥२॥
भक्तां प्रसन्न होतसे । भाग्य संपत्ति देतसे । दास म्हणे ऐसे कैसे । भगवान नवस पुरविती ॥३॥