१५
ऐसा नव्हे माझा राम । सकळ जीवांचा विश्राम ॥१॥
नव्हे गणेश गणपाळु । लाडू मोदकांचा काळू ॥२॥
नव्हे चंडी मुंडी शक्ती । मद्यमांसातें मागती ॥३॥
नव्हे भैरव खंडेराव । रोटिभरितासाठीं देव ॥४॥
नव्हे जाखाई जोखाई । पीडिताती ठायीं ठायीं ॥५॥
नव्हे भूत नव्हे खेत । निंब नारळ मागत ॥६॥
रामदासी पूर्णकाम । सर्वाभूतीं सर्वोत्तम ॥७॥
१६
सोडवी जो देव तोचि देवराव । येर जाण नांव नाथिलेंचि ॥१॥
नाथिलेंचि नांव लोकांमध्यें पाहें । ठेविजेत आहे प्रतापाचें ॥२॥
प्रतापाचें नांव एक राघवासी । रामीरामदासी देवराव ॥३॥
१७
नमूं एकदंता माता ब्रम्हसूता । सदगुरु समर्था दंडवत ॥१॥
दंडवत माझें संत सज्जनांसी । भाविक जनांसी आलिंगन ॥२॥
आलिंगिला राम सबाह्य अंतरीं । संसारसागरीं तरावया ॥३॥
तरावया रामनामाची सांगडी । साधनें बापुडीं शिणावया ॥४॥
शिणावया मूळ लोभचि केवळ । जाहला चांडाळ वाल्हाकोळी ॥५॥
वाल्हा कोळी लोभ सांडुनी बैसला । नामें उद्धरला रामाचेनि ॥६॥
रामाचेनि नामीं वाल्हा तो वाल्मिक । तया ब्रम्हादिक जाणतील ॥७॥
जाणतील शतकोटि रामायण । भविष्य कवण दुजा करी ॥८॥
दुजा करी ऐसा नाहीं हो जन्मला । स्वयें निवविला सदाशीव ॥९॥
सदाशिव जाणे कवित्वाचा पार । नेणती इतर थोरथोर ॥१०॥
थोर थोर जरी जाले नामांकित । उपमा उचित देतां नये ॥११॥
देतां नयें रामनामाचें चरित्र । जैसी ते पवित्र गोदावरी ॥१२॥
गोदावरी कथा कीर्ति या रामाची । संसार श्रमाची विश्रामता ॥१३॥
विश्रामता जाली रामउपासकां । जैसी ते चातका जलवृष्टि ॥१४॥
जलवृष्टि केली वाल्मिक ऋषीनें । तयांचीं वचनें सांगईन ॥१५॥
सांगईन रामचरित्र निर्मळ । जैसें तें मंडळ मार्तंडाचें ॥१६॥
मार्तंडाचे कुळीं राघव जन्मला । भाग्योदय जाला विबुधांचा ॥१७॥
विबुधांचा राव आला सोडवणें । आम्हां तेणें गुणें जोडी जाली ॥१८॥
जोड जाली थोर ऋषि संतोषले । यज्ञ सिद्धी नेले रामचंद्रें ॥१९॥
रामचंद्रें बाणीं ताटिका पिटीली । शिळा उद्धरिली हेळामात्रें ॥२०॥
हेळामात्रें रामें त्रिंबक भंगिलें । आणि पर्णीयेलें जानकीसी ॥२१॥
जानकीसी रामें केला वनवास । पितयाची भाष मुक्त केली ॥२२॥
मुक्त करावया त्रिदश देवांसी । रामें वैभवासी सोडियेलें ॥२३॥
सोडियेलें सर्व जाहला तापसी । पंचवटिकेसी वास केला ॥२४॥
वास केला रामें मारिले राक्षस । खरदूषणांस संहारिले ॥२५॥
संहारिले दैत्य कुरंगा पिटीलें । तंव मागें नेलें जानकीसी ॥२६॥
जानकीसी नेलें रावणें चोरुनी । बंधु दोघे वनीं पाहताती ॥२७॥
पाहताती पुढें जटायु भेटला । रामें मुक्त केला निजहस्तें ॥२८॥
निजहस्तें वनीं कबंधा मारिलें । रामें मुक्त केलें निजदासां ॥२९॥
दासांचें मंडण पंपा सरोवरीं । भेटला तो हरी राघवासी ॥३०॥
राघवासी भावें भेटला मारुती । रामचंद्र चित्तीं संतोषले ॥३१॥
संतोषला राम बोले आशीर्वाद । काया हे अभेद राहो तुझी ॥३२॥
राहो तुझी काया सदा चिरंजीवी । तुष्टले गोसावी निजदासां ॥३३॥
निजदास रामें सुग्रीव रक्षिला । वाली बधियेला दुष्ट बुद्धि ॥३४॥
दुष्टांचा संहार धर्माची स्थापना । जानकीजीवना राघवासी ॥३५॥
राघवासी तया किष्किंधा पर्वतीं । मिळाले जुत्पति असंख्यात ॥३६॥
असंख्यात कपी सुग्रीवें आणिले । जैसे उचलले कुळाचळ ॥३७॥
कुळाचळाऐसे मिळाले वानर । लंकेवरी भार चालियेले ॥३८॥
लंकेवरि कपिदळ भार आला । सिंधु पाल्हाणिला रामचंद्रें ॥३९॥
रामचंद्रें आपंगिला बिभीषण । पुढें कपिगण धाविन्नले ॥४०॥
धाविन्नले तेहीं वेढिलें त्रिकूट । राक्षसांचे थाट चालियेले ॥४१॥
चालिले राक्षस भिडती वानर । दैत्यांचा संहार आरंभिला ॥४२॥
आरंभीं वधिला प्रहस्त प्रधान । रणीं जीवदान रावणासी ॥४३॥
रावणासि रामें दिलें जीवदान । मग कुंभकर्ण वधियेला ॥४४॥
वधिला इंद्रजीत आणि अतिकाया । पुरुषार्थी राया लक्षमणें ॥४५॥
लक्षमणें वीर इंद्रोजी दारुण । मारिला रावण रामचंद्रें ॥४६॥
रामचंद्रें सर्व दैत्य निर्दाळिले । पूर तुंबळले शोणिताचे ॥४७॥
शोणिताचे पूर वाहती खळाळा । रामें बंदिशाळा फोडियेल्या ॥४८॥
फोडियेल्या रामें सर्व बंदिशाळा । आपुलाल्या स्थळा देव गेले ॥४९॥
देव गेले सर्व मारिला रावण । लंके बिभीषण स्थापियेला ॥५०॥
स्थापियेला रामें जानकी आणिली । अग्नींतूनि आली दिव्यरुप ॥५१॥
दिव्यरुप सीता राघव भेटली । पुष्पवृष्टि केली सुरवरीं ॥५२॥
सुरवरां मुक्त केलें राघवानें । गगनीं विमानें झळकती ॥५३॥
झळकती विमानें दिव्य महाथोर । बैसले वानर तयांमध्यें ॥५४॥
तयांमध्यें मुख्य रामलक्षुमण । सीता सुलक्षण पतिव्रता ॥५५॥
पतिव्रता रामें वामांकीं घेतली । तेथें आज्ञा जाली सुरवरां ॥५६॥
सुरवरां आज्ञा देउनि निघाले । आश्रमासी आले ऋषीचीया ॥५७॥
ऋषीचे आश्रमीं राम स्थिरावले । सामोरे धाडिलें हनुमंता ॥५८॥
हनुमंता जाणें भरताकारणें । नाहीं तरी प्राण वेचईल ॥५९॥
वेचईल प्राण भरत प्रेमळ । न लावितां वेळ राम आले ॥६०॥
राम आले शीघ्र भेटों भरतासी । मात अयोध्येसी जाणवली ॥६१॥
जाणवली मात जाहला आनंद । आनंदाचा कंद राम आला ॥६२॥
राम आला तेणें सुख सर्व लोकां । गुढिया पताका उभवील्या ॥६३॥
उभविलीं छत्रें बांधिलीं तोरणें । वाद्यें सुलक्षणें वाजिंनली ॥६४॥
वाजिंनलीं वाद्यें आल्या नरनारी । आरतिया करीं घेउनीयां ॥६५॥
घेउनियां करीं रत्नदीपताटें । ओंवाळिती थाटें वनितांचीं ॥६६॥
वनितांचीं थाटें पाहती श्रीराम । भरतासी क्षेम दिलें आहे ॥६७॥
दिलें आहे क्षेम जाहाले अभिन्न । अनुक्रमें जन सुखी केले ॥६८॥
सुखी केल्या माता कौसल्या सुमित्रा । कैकयी सुंदरा सुखी केली ॥६९॥
सुखी केलें रामें संत ऋषि मुनि । मंत्रघोषध्वनि आशीर्वाद ॥७०॥
आशीर्वादीं राम पूजिला ब्राम्हणीं । मग सिंहासनीं आरुढला ॥७१॥
आरुढला राम दिव्य सिंहासनीं । छेत्रीं सुखासनीं दाटी जाली ॥७२॥
दाटी जाली थोर मिळाले वानर । तेणें राजद्वार कोंदाटलें ॥७३॥
कोंदाटलीं बहु छत्रें सूर्यपानें । पताका निशाणें मेघडंब्रें ॥७४॥
मेघडंब्रावरी मत्स्य तळपती । वाद्यें वाजताती नाना वर्णें ॥७५॥
नाना वर्णें घन सुस्वर सुंदर । वाजती शंख भेरी ॥७६॥
शंखभेरीनाद न माये अंबरीं । सिंहासनावरि देवराणा ॥७७॥
रामराणा धीर उदार सुंदर । पाहुणे वानर तया घरीं ॥७८॥
तयां घरीं नळ नीळ जांबुवंत । सुषेण मारुत बिभीषण ॥७९॥
बिभीषण आणि वालीचा कुमर । कपी थोर थोर नामाथिले ॥८०॥
नामाथिले कपी सहपरिवारें । गौरवी आदरें देवराणा ॥८१॥
देवरायें वस्त्रें भूषणें आणिलीं । भांडारें फोडिलीं अमोलिकें ॥८२॥
अमोलिकें रामें फोडिलीं भांडारें । आवडी वानरें शृंगारिलीं ॥८३॥
शृंगारिले सर्व आनंदभरित । राम बोळवीत वानरांसी ॥८४॥
वानरांसी रामवियोग साहेना । उभड धरेना कंठ दाटे ॥८५॥
कंठ दाटे तेणें आक्रंदती थोर । नयनीं पाझर पाझरती ॥८६॥
पाझरती सर्व दीनरुप जाले । पोटेसी धरिलें मायबापें ॥८७॥
मायबापें रामें सर्व सुखी केले । मग बोळविले निजदास ॥८८॥
निजदास कपी संनिध राहिला । तोही गौरविला स्तुतिवाक्यें ॥८९॥
स्तुतिवाक्य काय सांगों श्रीरामाचें । होय विश्रामाचें निजसुख ॥९०॥
निजसुख जनीं नाहीं वृद्धपण । कोणासी मरण तेंही नाहीं ॥९१॥
नाहीं नाहीं जनीं बंधनाचें पाप । सुखीं सुखरुप रामराज्य ॥९२॥
रामराज्यीं नाहीं जनासीं ताडण । धर्म संरक्षण राम एक ॥९३॥
राम एक बाण एकचि वचन । साधूचें पाळण राम एक ॥९४॥
राम एक राजा पुण्यपरायण । गोपिका ब्राह्मण भक्ती करी ॥९५॥
भक्ती करी राम गाई ब्राह्मणांची । सीमा मर्यादेची उल्लंघेना ॥९६॥
उल्लंघीना सीमा रामगुण गातां । राघव तत्वतां निष्कपटी ॥९७॥
निष्कपटीं राम निर्दोष अंतरीं । अक्रा सहस्त्रवरी राज्य केलें ॥९८॥
राज्य केलें रामें सुख सर्व जना । वैकुंठभुवना पुरी नेली ॥९९॥
पुरी नेली रामें सकाळांसहित । करावया मुक्त निजदासां ॥१००॥
निजदास रामें मारुति ठेविला । चिरंजीव केला कल्पकोडी ॥१०१॥
कल्पकोंडी ऐसा देउनियां वर । निघाले सत्वर वैकुंठासी ॥१०२॥
कल्पकोटी रामें केला निजरुप । माझेंचि स्वरुप तूंचि एक ॥१०३॥
वैकुंठासी राम गेले विश्रांतीये । जनांसी उपाय हनुमंत ॥१०४॥
हनुमंतीं राम आहे निश्चयेंसी । रामीरामदासीं ऐक्य भाव ॥१०५॥
१८
सर्वांगें सुंदरु कासे पितांबरु । विद्येचा सागरु वंदियेला ॥१॥
वंदियेली मनीं सरस्वती माता । सदगुरु समर्था दंडवत ॥२॥
दंडवत माझें संत सज्जनांसी । भाविक जनांसी आळिंगन ॥३॥
आळिंगनीं माझें निवालें सर्वांग । भाविकांचा संग देईं देवा ॥४॥
देईं देवा तुझें नाम अहर्निशीं । आठवे मानसीं रुप तुझें ॥५॥
तुझाचि आधार मज अनाथासी । झणीं अव्हेरीसी मायबापा ॥६॥
मायबाप बंधु स्वजन सांगाती । तूंचि आदिअंतीं माहियेर ॥७॥
माहियेर माझें पुण्यपरायण । योगीयां मंडण स्वामी माझा ॥८॥
स्वामी माझा राम अंतरला दुरी । अवस्था अंतरीं वाटतसे ॥९॥
वाटतसे खंतीं सर्वकाळ चित्तीं । केव्हां कृपामूर्ति भेटईल ॥१०॥
भेटईल केव्हां राम माझी माता । जीव हा दुश्चिता सर्वकाळ ॥११॥
सर्वकाळ माझे मनीं आठवण । युगासम क्षण जात आहे ॥१२॥
जात आहे वय वेंचोनियां माझें । रुप रामा तुझें दिसेना कीं ॥१३॥
दिसेना कीं रुप सांवळें सुंदर । कासे पितांबर कासीयेला ॥१४॥
कासीयेली आंगीं चंदनाची उटी । मुक्तमाळा कंठीं डोल देती ॥१५॥
डोल देती माळा पदकीं रत्नकीळा । मृगनाभि टिळा रेखियला ॥१६॥
रेखियलें भाळीं सुगंध परिमळ । लोधले अळीकुळ झुंकारती ॥१७॥
झुंकारती वास घेती सावकाश । राम राजाधीश शोभतसे ॥१८॥
शोभतसे माथां मुगुट रत्नकीळ । कीरटी तेजाळ रम्य शोभा ॥१९॥
रम्य नीमासुर श्रीमुख साजिरें । दिव्य मकाराकारें तळपताती ॥२०॥
तळपती कुंडलें बाहीं बाहुवटे । दोर्दंड गोमटें चापबाण ॥२१॥
चापबाण करीं नवरत्नें भूषण । आणि वीरकंकण कीर्तिमुखें ॥२२॥
मुख मुरडोनी सिंह जाती वनीं । जघन देखोनी संकोचलें ॥२३॥
संकोचले दैत्य पुतळे तोडरीं । गर्जती गजरीं अंदु वांकी ॥२४॥
अंदु वांकी पायीं शोभे वीरासन । माझे मनीं ध्यान आठवलें ॥२५॥
आठवलें रामचंद्र ध्यान चित्तीं । सन्मुख मारुति उभा असे ॥२६॥
उभा असे सर्व बंधु समुदाव । त्रिकुटींचा राव बिभीषण ॥२७॥
बिभीषण आणि किष्किंदेचा राव । सर्व समुदाय वानरांचा ॥२८॥
वानरांसहित राम अयोध्येसी । आनंद जनांसी थोर जाला ॥२९॥
जाला यशवंत राम सूर्यवंशीं । रामी रामदासीं भेटि जाली ॥३०॥
१९
धन्य राजाराम धन्य जानकी सती । धन्य लक्षुमण धन्य दास मारुती ॥ध्रु०॥
धन्य ती अयोध्या धन्य तेथींचे जन । धन्य सूर्यवंश जेथें राम निधान ॥२॥
धन्य तो दशरथ धन्य कौसल्या माता । धन्य तो वसिष्ठ ज्याची राघवीं सत्ता ॥३॥
धन्य ते वानर ज्यांसी राम कृपाळु । धन्य रामदास ज्याचे नामीं निर्मळु ॥४॥
२०
धन्य सूर्यवंश पुण्यपरायण । सर्वहि सगुण समुदाव ॥१॥
समुदाय काय सांगों श्रीरामाचा । अंतरीं कामाचा लेश नाहीं ॥२॥
लेश नाहीं तया बंधु भरतासी । सर्वही राज्यासी त्यागियेलें ॥३॥
त्यागियेलें अन्न केलें उपोषण । धन्य लक्ष्मण ब्रम्हचारी ॥४॥
ब्रम्हचारी धन्य मारुती सेवक । श्रीरामीं सार्थक जन्म केला ॥५॥
जन्म केला धन्य वाल्मीक ऋषीनें । धन्य तीं वचनें भविष्याचीं ॥६॥
भविष्य पाहतां धन्य बिभीषण । राघवीं शरण सर्वभावें ॥७॥
सर्वभावें सर्व शरण वानर । धन्य ते अवतार विबुधांचे ॥८॥
विबुधां मंडण राम सर्व गुण । अनन्य शरण रामदास ॥९॥
२१
राज्य जालें रघुनाथाचें । भाग्य उदेलें भक्तांचें ॥१॥
कल्पतरु चिंतामणी । कामधेनूचीं दुभणीं ॥२॥
परिस जाले पाषाण । अंगिकार करी कोण ॥३॥
नाना रत्नांचे डोंगर । अमृताचें सरोवर ॥४॥
पृथ्वी अवघी सुवर्णमय । कोणीकडे न्यावें काय ॥५॥
ब्रम्हादिकांचा कैवारी । रामदासाच्या अंतरीं ॥६॥
२२
आणुपासुनि जगदाकार । ठाणठकार रघुवीर ॥ध्रु०॥
रामाकार जाहली वृत्ती । दृश्यादृश्य न ये हातीं ॥१॥
रामीं हारपलें जग । दास म्हणे कैचें मग ॥२॥