२६
पडतां संकष्ट जीवा जडभारी । स्मरावा अंतरीं बलभीम ॥१॥
बलभीम माझा सखा सहोदर । निवारी दुस्तर तापत्रय ॥२॥
तापत्रय बाधा बाधूं न शके कांहीं । मारुतीचे पायीं चित्त ठेवा ॥३॥
ठेवा संचिताचा मज उघडला । कैवारी जोडला हनुमंत ॥४॥
हनुमंत माझे अंगींचें कवच । मग भय कैंचें दास म्हणे ॥५॥
२७
नांव मारुतीचें घ्यावें । पुढें पाऊल टाकावें ॥१॥
अवघा मुहूर्त शकुन । ह्रदयीं मारुतीचें ध्यान ॥२॥
जिकडे जिकडे जाती भक्त । पाठीं जाय हनुमंत ॥३॥
रामउपासना करी । मारुती नांदे त्याचे घरीं ॥४॥
दास म्हणे ऐसें करा । सदा मारुती ह्रदयीं धरा ॥५॥
२८
येईं येईं हनुमंता । माझे अंजनीच्या सुता ॥१॥
तुझी पहातों मी वाट । प्राणसखया मजला भेट ॥२॥
तुज वांचोनि मज आतां । कोण संकटीं रक्षिता ॥३॥
नको लावूं तूं उशीर । दास बहू चिंतातुर ॥४॥
२९
कष्टी जाला जीव केली आठवण । पावलें किराण मारुतीचें ॥१॥
संसारसागरीं आकांत वाटला । भुभुःकार केला मारुतीनें ॥२॥
मज कोणी नाहीं मारुतिवांचोनी । चिंतितां निर्वाणीं उडी घाली ॥३॥
उडी घाली मज अनाथाकारणें । तेणें माझें केलें समाधान ॥४॥
उल्हासलें मन देखोनि स्वरुप । दास नव्हें रुप राघवाचें ॥५॥
३०
मेरुचीया माथां देऊनीयां पाव । जात असे राव कैलासींचा ॥१॥
कैलासींचा राव अक्रावा क्षोभला । देशधडी केला लंकानाथ ॥२॥
लंकेच्या चोहटां मांडियेला खेळ । आगीचे कल्लोळ घरोघरीं ॥३॥
जाळियेलीं घरें सुंदरें मंदिरें । पावला कैवारें जानकीच्या ॥४॥
जानकीचा शोक दुरी दुरावला । यशवंत जाला निजदास ॥५॥
३१
रावणसभेआंत येऊनि हनुमंत । करी दीप शांत निजपुच्छें ॥१॥
पडतां अंधःकार नागवी वानर । वस्त्रें अलंकार समस्तांचीं ॥२॥
नागवीं उघडीं ठोकितां बापुडीं । दडती एकआड एक तेथें ॥३॥
रावणाच्या शिरीं हनुमान टोले मारी । काय धाक धरी रामदास ॥४॥
३२
येतां जंबुमाळी हनुमान महाबळी । सैन्यातें समूळीं संहारिलें ॥१॥
नाना शस्त्रघातें नाटोपे हनुमंत । आला हो प्राणांत जंबुमाळी ॥२॥
पायीं रगडुनि त्याला जीवन्मुक्त केला । संग्राम मांडिला रामदासें ॥३॥
३३
इंद्रजितापुढा आसाळी रोकडा । आळी ते मांकडा गिळायासी ॥१॥
नभा ऊजु मुख पसरिला निष्टंक । विक्राळ विटंक करुनियां ॥२॥
मुखीं प्रवेशूनि बैसे नाभिस्थानीं । पाय पसरुनी फाडियेला ॥३॥
बेंबीपाशीं पोट फाडुनी उद्धट । काळीजसह वेट घेऊनि पळे ॥४॥
ऐसा तो आसाळी मारिल्या तात्काळीं । रामदास टाळी पिटे तेव्हां ॥५॥
३४
पावावया रघुनाथ । जया मनीं वाटे आर्त । तेणें ध्यावा हनुमंत । करील भेटी ॥१॥
हनुमान मी नमी । मज भेटविलें रामीं । विघ्नांचिया कोटी श्रेणी । अंतरोनी ॥२॥
रामउपासकांवरी । अतिप्रेम पडिभरी । होऊनिया कैवारी । निवारी दुःख ॥३॥
रामीरामदासीं श्रेष्ठ । सिद्ध सिद्धासी वरिष्ठ । भवाचा भरियला घोंट । स्मरणमात्रें ॥४॥
३५
मुख्य प्राणासी पुजिलें । रामदर्शन घडलें ॥१॥
तुम्ही पहा हो मारुती । राम भक्तांचा सारथी ॥२॥
देव अंजनीनंदन । रामदासी केलें ध्यान ॥३॥
३६
कपिकुळाचें भूषण । चित्त रामाचें तोषण ॥१॥
धन्य साधू हा हनुमंत । ज्ञान वैराग्य सुमंत ॥२॥
रामरंगीं रंगे चित्त । अखंडित सावचित्त ॥३॥
दास म्हणे मी लेंकरुं । विस्तारवीं बोधांकुरु ॥४॥