देवता - श्रीराम

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


रत्नजडित सिंहासन । वरी शोभे रघुनंदन ॥१॥

वामांकीं ते सीताबाई । जगज्जननी माझी आई ॥२॥

पश्चाद्भागीं लक्षुमण । पुढें अंजनीनंदन ॥३॥

भरत शत्रुघन भाई । चामरें ढाळिती दोन्ही बाहीं ॥४॥

नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त ॥५॥

देहबुद्धि नेणों कांहीं । दास अंकित रामापायीं ॥६॥

ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें ॥१॥

राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी ॥२॥

रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी ॥३॥

तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले ॥४॥

कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी ॥५॥

रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं ॥६॥

राम सांवळा सुंदर ॥ कांसें मिरवी पितांबर ॥१॥

चरणीं ब्रीदाचा तोडर ॥ वांके वाळ्याचा गजर ॥ध्रु०॥

मुगुट किरिटी तेजाळ ॥ रत्नें वोप देती ढाळ ॥२॥

जडित रत्नें बाहूवटे ॥ बाहू दोर्दंड गोमटे ॥३॥

पदक वैजयंती माळा ॥ फांकताती राजकळा ॥४॥

भूषणमंडित रघुपती ॥ दास करितसे विनंती ॥५॥

तुम्ही चिंता हो मानसीं । राम शरयूतीरवासी ॥ध्रु०॥

रुप सांवळें सुंदर । ज्याला ध्यातसे शंकर ॥१॥

जडित कुंडलें श्रवणीं । राम लावण्याची खाणी ॥२॥

सूर्यवंशाचें मंडण । रामदासाचें जीवन ॥३॥

१०

मुगुट कीरीट कुंडलें । तेज रत्नांचें फांकलें ॥१॥

ऐसा राम माझे मनीं । सदा आठवें चिंतनीं ॥ध्र०॥

कीर्तिमुखें बाहूवटे । दंडीं शोभतीं गोमटे ॥२॥

जडित रत्नांचीं भूषणें । दशांगुळें वीरकंकणें ॥३॥

नाना रत्नांचें पुंजाळ । पदक वैजयंती माळ ॥४॥

कांसे शोभे सोनसळा । कटीं कटिसूत्र मेखळा ॥५॥

अंदु नेपुरांचे मेळ । वांकीं वाजती खळाळ ॥६॥

राम सर्वांगें सुंदर । चरणीं ब्रीदाचा तोडर ॥७॥

सुगंध परिमळ धूसरें । झेंपावती मधुकरें ॥८॥

गळां पुष्पांचिया माळा । वामे शोभे भूमिबाळा ॥९॥

स्वयंभ सुवर्णाची कांस । पुढें उभा रामदास ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP