देवता - शंकर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


६१

नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ॥१॥

शिरीं जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ॥२॥

अंगां लावूनियां राख । मुखीं राम नाम जप ॥३॥

भक्तां प्रसन्न नाना परी । अभयंकर ठेऊनि शिरीं ॥४॥

दास ह्मणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा ॥५॥

६२

कराळें विक्राळें भुतें नानापरी । तेथें क्रीडा करी महादेव ॥१॥

अमंगळ सीळा तो नये कंटाळा । डोलतसे भोळा चक्रवर्ती ॥२॥

भुतें मांस खाती रक्त तोंडीं हातीं । वर्डाती झोंबती एकमेकां ॥३॥

कैंचे भारेभार चालिले अपार । फुंपाती विखार आंगावरी ॥४॥

लवथविती ओलीं हत्तीचीं कातडीं । गळती अंतडीं लवथवीत ॥५॥

साजुक सीसाळें टोंचुनी दोरीसी । रुंडमाळ ऐसी हेलावते ॥६॥

वन्हीनें पोळला विषें जाजावला । घामें थबथबीला सावकाश ॥७॥

घामावरी रक्त रक्तावरि राख । राखेवरी विख वाहतसे ॥८॥

भूतफौजा ऐशा भणभणती माशा । नंदीच्या गोमाशा भारेंभार ॥९॥

बेल राख आणि धोतर्‍याचीं फुलें । पुजेलागीं मुलें धांवताती ॥१०॥

सिद्धीची उपेक्षा भयानक दीक्षा । अभक्तांसि शिक्षा लावितसे ॥११॥

दास म्हणें हर तो भोळा शंकर । भक्तांसी अभर करीतसे ॥१२॥

६३

माझा कुळस्वामी कैलासींचा राजा । भक्तांचिया काजा पावतसे ॥१॥

पावतसे दशभुजा उचलून । माझा पंचानन कैवारी ॥२॥

कैवारी देव व्याघ्राच्या स्वरुपें । भूमंडळ कोपें जाळूं शके ॥३॥

जाळूं शके सृष्टि उघडितां दृष्टी । तेथें कोण गोष्टी इतरांची ॥४॥

इतरांची शक्ति शंकराखालती । वांचविली क्षिती दास ह्मणे ॥५॥

६४

सोरटींचा देव माणदेशा आला । भक्तीसी पावला सावकाश ॥१॥

सावकाश जाती देवाचे यात्रेसी । होति पुण्यराशी भक्तिभावें ॥२॥

भक्तिभावें देव संतुष्ट करावा । संसारीं तरावा दास म्हणे ॥३॥

६५

पृथ्वी अवघी लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ॥१॥

आतां कोठें ठेवूं पाव । जेथें तेथें महादेव ॥२॥

अवघा रुद्रचि व्यापिला । ऐसें देवचि बोलिला ॥३॥

दासें जाणोनियां भला । देह देवार्पण केला ॥४॥


References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP