११
शोभे ठकाराचें ठाण । एक वचनीं एकबाण ॥१॥
बाप विसावा भक्तांचा ॥ स्वामी शोभे हनुमंताचा ॥२॥
मूर्ति शोभे सिंहासनीं ॥ तो हा राजीव नयनीं ॥३॥
सूर्यवंशाचें मंडण ॥ रामदासाचें भूषण ॥४॥
१२
तो हा राम आठवावा । ह्रदयांत सांठवावा ॥१॥
रामचंरणींची गंगा । महापातकें जाती भंगा ॥२॥
रामचरणींची ख्याति । चिरंजीव हा मारुति ॥३॥
चरण वंदी ज्याचें शिरीं । बिभीषण राज्य करी ॥४॥
शबरीचीं बोरें खाय । मोक्ष दिला सांगूं काय ॥५॥
रामदास म्हणे भावें । कथा कीर्तन करावें ॥६॥
१३
अनाथांचा नाथ भक्तांचा कैवारी । सिंहासनावरी शोभताहे ॥१॥
शोभतसे राम प्रतापें आगळा । दिसे सौम्यलीळा सत्त्वगुणी ॥२॥
सत्त्वगुणी होणें सात्त्विकांकारणें । कोपें संहारणें दुर्जनासी ॥३॥
दुर्जनां संहार सज्जनां आधार । भाविकांसी पार पाववितो ॥४॥
पाववितो पार या भवसिंधूचा । राघव दिनाचा दिनानाथ ॥५॥
दिनानाथ हरि पतितपावन । योगियां जीवन योगलीळा ॥६॥
लीळावेषधारी भक्तांचे माहेर । ध्यानीं गौरीहर चिंतीतसे ॥७॥
चिंतीतसें रामनाम पूर्णकाम । पावला विश्राम रामनामें ॥८॥
रामनामें हरु विश्रांति पावला । हें तों समस्तांला श्रुत आहे ॥९॥
श्रुत आहे राम योगाचें मंडण । संसारखंडण महाभय ॥१०॥
महाभय कैंचें रामासी भजतां । हें जाण अन्यथा वाक्य नव्हें ॥११॥
नव्हे सोडवण रामनामेंविण । रामदास खूण सांगतसे ॥१२॥
१४
राम माझा स्वामी राव अयोध्येचा । त्रिदश देवांचा कैवारी ॥१॥
कैवारी थोर सामर्थ्यें आगळा । तारिलें चांडाळा वाल्मिकासी ॥२॥
वाल्मीकासि फळ जाहलें नामाचें । चरित्र रामाचें शतकोटी ॥३॥
शतकोटी रामचरित्र बोलिला । अवतार जाला नाहीं तोंचि ॥४॥
नाही तोंचि रामचरित्र बोलिला । श्रावण वधिला दशरथें ॥५॥
दशरथ राजा तया पुत्र नाहीं । पुत्रशोक पाहीं शाप त्यासी ॥६॥
श्रापाचा आनंद थोर तया जाला । तेणें पोटा आला रामचंद्र ॥७॥
रामचंद्रें वनीं ताटिला वधिली । सर्व सुखी केलीं ऋषीकुळें ॥८॥
ऋषी संतोषले कार्य सिद्ध जालें । तंव पत्र आलें जनकाचें ॥९॥
जनकाचे घरीं मांडलें सैंवर । तेथें ऋषीश्वर पाचारिलें ॥१०॥
पाचारिले तेथें मार्गीं अवलीळा । रामें चंडशिळा उद्धरिली ॥११॥
उद्धरिली रामें गौतमाची वधु । पुढें कृपासिंधु स्वयंवर ॥१२॥
स्वयंवर पण त्रिंबक कठीण । राम सुलक्षण सकुमार ॥१३॥
सकुमार बाळा जनकनंदिनी । राम चिंती मनीं अहर्निशीं ॥१४॥
अहर्निशीं पाहे राम जगजेठी । राजे लक्ष कोटी सांडुनीयां ॥१५॥
सांडुनी विक्रम सर्वही निवांत । धनुष्य अदभुत देखियेलें ॥१६॥
देखियेलें कोणी कोणासी न बोले । तंव राव बोले धिक्कारुनी ॥१७॥
धिक्कारुनी बोले जनक सर्वांसी । म्हणे पृथ्वीयेसी वीर नाहीं ॥१८॥
वीर नाहीं ऐसें विदेही बोलिला । ऐकोनी उठीला लक्षुमण ॥१९॥
लक्षुमण उभा सर्वांगें वीरश्री । तंव ऋषीश्वरीं वारियेलें ॥२०॥
वारियेलें मग दैत्य क्रूरबुद्धि । क्रोधें गर्वनिधी उकावला ॥२१॥
उकावला थोर गर्वें लंकापती । भ्रष्टला हांसती सर्व राजे ॥२२॥
राजे राजेश्वर पहाती समस्त । रावणा देहांत काळ आला ॥२३॥
काळ आला थोर धनुष्य वाहातां । मग कृपावंता उठवीलें ॥२४॥
उठविती ऋषी ते काळीं रामासी । देइं रावणासी जीवदान ॥२५॥
दान देईं ऐसें ऋषी बोलियेले । मग उचलिलें वामांगुष्ठीं ॥२६॥
वामांगुष्ठें धनुष्य टाकिलें काढुनी । मग चढवुनी वाहियेलें ॥२७॥
वाहियेलें बळें वोढितां कडाडी । पर्वत घडाडी मेरु श्रृंग ॥२८॥
मेरुश्रृंगीं थोर कडक विझाला । सैंवरीं जिंकिला पण रामें ॥२९॥
रामें भग्न केलें धनूष्य कठोर । सर्व ऋषीश्वर संतोषले ॥३०॥
संतोषला राव मांडिला उत्साव । सर्व समुदाव आनंदला ॥३१॥
आनंदले सर्व वाद्यें एकवेळां । माळ घाली बाळा जनकाची ॥३२॥
जनकाची बाळा सैंवर सोहळा । शीघ्र रघुकूळा मूळ गेलें ॥३३॥
मूळ गेलें शीघ्र पाचारुं विव्हाया । लगबग राया जनकासी ॥३४॥
जनकासी थोर आनंद जाहाला । जांवई जोडला रामराणा ॥३५॥
रामराणा शोभे सर्वांगें सुंदर । वामे सकुमार भूमिबाळा ॥३६॥
भूमिबाळा शोभे राम सिंहासनीं । विप्र वेदध्वनीं गर्जताती ॥३७॥
गर्जताती भाट ब्रीदें वाखाणीती । बासिंगीं फांकती रत्नकिळा ॥३८॥
रत्नकीळा बहू भूषणें सुंदरें । दिव्य मकराकारें तळपताती ॥३९॥
तळपताती माळा पदकीं रत्नकीळा । कांसे सोनसळा कांसियेली ॥४०॥
कांसियेली कांस किंकिणी वाजटा । वरी क्षुद्र घंटा झणत्कार ॥४१॥
झणत्कार वांकी मुर्डोंव नेंपुरें । गर्जती गजरें अंदू पायीं ॥४२॥
पायीं चंडशिळा जाली दिव्य नारी । जानकी न करी दंडवत ॥४३॥
दंडवतीं होती बहुसाल बाळा । म्हणोनि भांग टिळा काढियेला ॥४४॥
काढियेला मग केला नमस्कार । लावण्य वोहर रम्य शोभा ॥४५॥
रम्य शोभा आली मंडपीं वोहरें । चारी मनोहरें शोभताती ॥४६॥
शोभतीं मंडपीं मुक्ताफळ घोंस । माळा बहूवस कुसुमाच्या ॥४७॥
कुसुमाचे हार शोभती अपार । परिमळ धूशर पुष्पयाती ॥४८॥
पुष्पयाती दिव्य चंपक मालती । जाई जुई शेवंती पारिजात ॥४९॥
पारिजात गर्भ केतकी कोंवळें । मोगरे नव्हाळे बकूळ पुष्पें ॥५०॥
पुष्पें सुवर्णाचीं करवीर कमळांचीं । परिमळ द्रव्यांचीं दिव्य गंधें ॥५१॥
दिव्य गंधें माळा सर्वांस सोहळा । सुरंग आगळा तुषाराचा ॥५२॥
दिव्यान्नें भोजनें तृप्त सर्वां जनां । सर्वांसी पूजन उपचार ॥५३॥
उपचार जाले अंबरीं पूजिले । रायें निरविलें दुहितेसी ॥५४॥
सर्व एकसरें निघाले गजरें । अंबर धूशरें पूर्ण जालें ॥५५॥
पूर्ण चंद्राकारें त्राहाटिलीं छत्रें । थरकती अपारें मेघडंब्रें ॥५६॥
मेघडंब्रें माही निशाणें थरकती । रोमांच फरकती देखतांची ॥५७॥
देखतांची मार्गें जातां गजभार । निशाणीं अंबर आच्छादिलें ॥५८॥
आच्छदिलें मार्गें जातां भूमंडळ । रथवारुदळभार चाले ॥५९॥
भार चाले पुढें दिव्य सुखासनें । शिबिका आंदणें चौर डोल ॥६०॥
चौर डोल जाती मालती कुंजरें । हिंसती गजरें तुरंगम ॥६१॥
तुरंग उसाळें जाती अंतराळें । उफाळती बळें दोंचि पायीं ॥६२॥
दोन्ही दळें मार्गें जातांचि थोकलीं । तेथें आज्ञा जाली विदेहासी ॥६३॥
रायें लोटांगण घालुनी समस्तां । म्हणे माझी सीता तुम्हांपाशीं ॥६४॥
ऐसें बोलोनीयां उद्गेगला चित्तीं । वियोगें गळती अश्रुपात ॥६५॥