देवता - विठ्ठल

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३९

पंढरिऐसें तिन्ही ताळीं । क्षेत्र नाहीं भूमंडळीं ॥१॥

दुरुनि देखता कळस । होय अहंकाराचा नाश ॥२॥

होतां संतांचिया भेटी । जन्ममरणा पडे तुटी ॥३॥

चंद्रभागेमाजीं न्हातां । मुक्ति लाभे सायुज्यता ॥४॥

दृष्टी न पडे ब्रह्मादिकां । प्राप्त जालें तें भाविका ॥५॥

रामदासा जाली भेटी । विठ्ठलपायीं दिधली मिठी ॥६॥

४०

पंढरी नव्हे एकदेशी । विठ्ठल सर्वत्र निवासी ॥१॥

आम्हीं देखिला विठोबा । आनंदें विटेवरी उभा ॥२॥

ते दृश्याची दाटी मोठी । पाहतां रुक्मिणी दिसे दृष्टीं ॥३॥

रामदासीं दर्शन जालें । आत्मविठ्ठला देखिलें ॥४॥

४१

धनुष्यबाण काय केलें । कां कर कटावरी ठेविले ॥१॥

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला ॥२॥

किल्किलाट वानरांचे । थोवे दिसतना तयांचे ॥३॥

पंढरीस जालें येणें । एका पुंडलिकाकारणें ॥४॥

दिसे हनुमंत एकला । सैन्यामधुनि कां फुटला ॥५॥

रामीरामदासीं भाव । तैसा भेटे देवराव ॥६॥

४२

राम अयोध्येचा वासी । तोचि नांदे द्वारकेसी ॥१॥

कृष्णनामातें धरिलें । बहु दैत्य संहारिले ॥२॥

सखया मारुती लागुनी । रुप दावी चापपाणीं ॥३॥

पुढें भूभार उतरिला ॥ पांडवांसी सहाय जाला ॥४॥

आतां भक्तांचियासाठीं । उभा चंद्र्भागेतंटीं ॥५॥

राम तोचि विठ्ठल जाला । रामदासासी भेटला ॥६॥

४३

राम कृपाकर विठ्ठल साकार । दोघे निराकार एक रुप ॥१॥

आमुचिये घरीं वस्ति निरंतरीं । ह्रदयीं एकाकारीं राहियेले ॥२॥

रामदास म्हणे धरा भक्तिभाव । कृपाळु राघव पांडुरंग ॥३॥

४४

ब्रह्मयालागुनी मच्छप । पृथ्वीलागुनि कच्छप । तो हा धरुनि विठ्ठलरुप । शोभतो कैसा ॥१॥

पुढती जाला सूकर । प्रल्हादालागुनि उग्र । तो हा सगुणवेषधर । शोभतो कैसा ॥२॥

बळी नेला पाताळीं । नृपावरी धुमाळी । तो हा जोडला पाउलीं । शोभतो कैसा ॥३॥

रावण वधिला शरीं । गोवर्धन गिरिधारी । तो हा जघनावरिल्या करीं । शोभतो कैसा ॥४॥

लुंचित नागिवा उघडा । जो कां बैसणार घोडा । तो हा पुंडलीकापुढां । शोभतो कैसा ॥५॥

ब्रह्मांडांच्या हारी । जया रोमरंध्रीं । तो हा रामदासांतरीं । शोभतो कैसा ॥६॥

४५

भीमातीरवासिनिवासी । उभा पुंडलीकापाशीं ॥१॥

तेथें मानस गुंतलें । माझें चित्त सहजीं विगुंतलें ॥२॥

पुरीं पंढरिनायक । चित्तचैतन्य व्यापक ॥३॥

रामदासीं विषय वोरंगले । कैसें श्रीरंगीं रंगलें ॥४॥

४६

जें कां चैतन्य मुसावलें । विटेवरी विसांवलें ॥१॥

तो हा विठ्ठल उभा राहे । समचरणीं शोभताहे ॥२॥

रामीरामदासीं पाहिलें । विठ्ठल आत्मया देखिलें ॥३॥

४७

माझें मानस विटेवरी । विठ्ठलचरणीं निरंतरीं ॥१॥

पंढरपुरीं मनोरथ ज्याचा । धन्य धन्य तो दैवाचा ॥२॥

जो जो पंढरीस गेला । तेणें कळिकाळ जिंकिला ॥३॥

रामदास म्हणे पंढरी । नाना साधनेंविण तारी ॥४॥

४८

येथें उभा कां श्रीरामा । मनमोहना मेघश्यामा ॥१॥

चाप बाण काय केलें । कर कटावरी ठेविले ॥२॥

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला ॥३॥

काय जाली अयोध्यापुरी । येथें वसविली पंढरी ॥४॥

शरयुगंगा काय केली । कैंची भीमा मेळविली ॥५॥

किल्किलाट वानरांचे । थवे न दिसती तयांचे ॥६॥

दिसे हनुमंत एकला । हा कां सैन्यांतुनि फूटला ॥७॥

काय जाली सीतासती । येथें बहुत जन दिसती ॥८॥

रामदासीं सद्भाव जाणा । राम जाला पंढरिराणा ॥९॥

४९

आम्हीं देखिला विठोबा । आनंदें विटेवरी उभा ॥१॥

तेथें दृश्याची जे भेटी ॥ तेचि रुक्मिणी गोमटी ॥ध्रु०॥

रामीरामदास म्हणे । जो ओळखी तोचि धन्य ॥२॥

५०

लांचावोनी भक्तिलोभा । असे वाळवंटीं उभा । पदकीं इंद्रनीलशोभा । दिशा प्रभा उजळती ॥१॥

भक्तें पुंडलिकें गोंविला । जाऊं नेदी उभा केला । विटे नीट असे ठाकला । भीमातीर वाळुवंटीं ॥२॥

केवढें भाग्य पुंडलिकाचें । उभें दैवत त्रिलोकींचें । की जें तारुं भवसागरींचें । भीमातीरीं विनटलें ॥३॥

एकें पुंडलिकें करुनी जोडी । आम्हां दिधली कल्पकोडी । तुटली संसारसांकडी । रामदास म्हणतसे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP